डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दिवाळी म्हणजे…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
बापरे… ऑक्टोबर महिना संपला?
ऑक्टोबर आला कधी आणि गेला कधी कळलंच नाही…!
विजयादशमीने या महिन्याची सुरुवात झाली….
हा दिवस विजयाचा….!
जिंकणं हे मोरपिसासारखं असतं….. ते हळूच गालावरून फिरतं आणि गुदगुल्या होतात…. त्याला काहीही वजन नसतं…. जिंकणं झेलायला ताकद लागत नाही…
…. पण हरणं म्हणजे मणामणाच्या बेड्या, अत्यंत जड… लोकांचे टोमणे, आणि बरंच काही…. खरी ताकद हे हरणं झेलायला लागते…
…. जो हरूनही, हरण्याचं ओझं उचलून पुढे पुढे चालत राहिला आहे… तो तिथेच निम्मा जिंकलेला असतो…. आणि हरणंही तितकं वाईट नसतं…. हरणं मिठासारखं खारट असेलही, पण आयुष्याला चव त्यामुळेच येते…!
जिंकलेल्या माणसांच्या कथा वाचल्याने फक्त चांगला संदेश मिळतो….
पण हरलेल्या माणसांच्या कथा वाचल्याने, ते का हरले? हे आपल्याला “रेडीमेड” समजतं, जे आपण पुढे टाळू शकतो….
…. जोरात उडी मारायला, दहा पावलं मागे यावं लागतं हे अंतिम सत्य आहे…. ती दहा पावलं मागे येणं म्हणजे हार नव्हे…. मोठी बिल्डिंग बांधायला आधी जमिनीत 100 फूट खोल खाली जावं लागतं, तेव्हाच आपण उंची गाठू शकतो…. आकाशात झेप घ्यायची असेल तर जमिनीच्या मुळाशी जावंच लागतं….
“अपयश” नावाचा रोग झाला तर, परिश्रम आणि सातत्य हे त्यावरचं रामबाण आणि जालीम औषध आहे….! जो जिंकतो त्यांना “मेडल” मिळत असेलही, पण जे वारंवार हरून सुद्धा परिश्रम आणि सातत्याने यश मिळवतात त्यांच्या गळ्यात “हार” घातला जातो….!
आणि या “हाराची” किंमत त्या “मेडल” पेक्षा जास्त असते माऊली…!!! जिंकलो की स्वतःला आवरणं आणि हरलो की स्वतःला सावरणं म्हणजे आयुष्य….!
असो, तर या महिन्यात दिवाळी आली….
दिव्यांची ओळ / मालिका म्हणजे दिवाळी…!
अंधाराला दूर सारून प्रकाश निर्माण करणे म्हणजे दिवाळी….
घराघरात दिवे लावणं म्हणजे दिवाळी….
फराळ तयार करणे (हल्ली विकत आणणे) आणि तो खाणे म्हणजे दिवाळी….
डोळे चोळत पहाटे एखाद्या सांगितीक कार्यक्रमाला जाऊन हजेरी लावणे म्हणजे दिवाळी…
फटाके उडवून नवीन कपडे घालणे म्हणजे दिवाळी….
….. हे सर्वांनाच माहित आहे….
खरं तर ….
.. एखाद्याची “वेदना” समजून घेऊन “वैद्य” होणं म्हणजे दिवाळी…
.. गुण माहित असताना एखाद्याला “साथ” देणं हा स्वार्थ, पण दोष माहित असताना एखाद्याला “हात”देणं म्हणजे दिवाळी…!
.. स्फोट घडवण्यासाठी वातीला आग लावणं नव्हे… स्फोट घडण्याआधी ती वात विझवणे म्हणजे दिवाळी…!
.. स्वतःच्या अंगणात रांगोळीआणि दाराबाहेर दोन दिवे लावणे म्हणजे दिवाळी नव्हे… ज्यांना अंगणच नाही, अशांच्या दारात जाऊन फराळ देऊन, त्यांच्या चेहऱ्यावरच्या ओबडधोबड परंतु आनंदी रेषा, आपल्या मनात सन्मानाने रांगोळी म्हणून जपणे म्हणजे दिवाळी…!
.. ज्यांना डोळेच नाहीत, अशा विझलेल्या दोन दिव्यांमध्ये तेज निर्माण करणे म्हणजे दिवाळी….
.. अंधारात अडखळणाऱ्या वाटसरूला वाट दाखवण्यासाठी “कंदील” आणि “पणती” घेऊन पुढे जाणे… त्याला वाट दाखवणे… म्हणजे दिवाळी….!
आपला कंदील कदाचित छोटा असेलही… पण जेव्हा तो आपण दुसऱ्याला दाखवतो, तेव्हा तो कंदील भव्य “आकाश कंदील” होऊन जातो….. दुसऱ्याला वाट दाखवण्यासाठी वापरलेला, आपला छोटा दिवा / पणती सुद्धा मग खऱ्या अर्थाने “दिव्य” होऊन जाते…
…. मुळात आपल्याला “आकाश कंदील” व्हायचंच नाही, आपल्याला व्हायचं आहे “आभाळ कंदील”..!
आदरणीय कवयित्री शांताबाई शेळके यांनी “आभाळ” आणि “आकाश” मधला फरक सांगितला आहे….
“आभाळ” भरलेलं असतं पाण्याने….
“आकाश” रिक्त / रिकामं / कोरडं असतं….!
जे भरलंय ते “आभाळ”…..
जे रिकामं आहे ते “आकाश”….!!!
आपण माणसं आहोत, आपण रिक्त / रिकामे आणि कोरडे असूच शकत नाही…. आपण प्रेम, दया, माया, सहानुभूती या सर्वांनी भरलेले आहोत….
मग आपण कोरडे कसे…????
.. आपण “आभाळ”आहोत आपण “आकाश” नाही…!!!
.. आपल्याला “आकाश” व्हायचंच नाही….
.. आपल्याला व्हायचं आहे “आभाळ”…..!
या दिवाळीत आपण “आकाश कंदील” नाही….
“आभाळ कंदील” लावूया का….?
….. आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही हेच करण्याचा प्रयत्न केला…. केलेत आपणच आम्ही फक्त माध्यम झालो…!
– यावर्षी दिवाळीत आपण सर्वांनी मिळून रस्त्याकडेला राहणाऱ्या जवळपास पंधराशे लोकांना संपूर्ण फराळ दिला आहे. त्यांचीही दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
– दुसऱ्या पुढे हात पसरून जगणाऱ्या तीन व्यक्तींना स्वतंत्र काम करण्यासाठी मदत केली आहे. ज्या हातांनी ते भीक मागायचे तेच हात आता काम करू लागले आहेत.
– जवळपास 500 लोकांना रस्त्यावरच वैद्यकीय ट्रीटमेंट दिली आहे.
– ज्यांची दृष्टी अधू झाली आहे अशा सर्वांची डोळे तपासणी करून, गरजूंचे ऑपरेशन करून चष्मे दिले आहेत. आता ते पुन्हा नव्याने जग बघू लागतील. काम करण्यातील मुख्य अडथळा आता दूर झाला आहे. यांना आपण कामाची संधी देणार आहोत.
– लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अत्यंत गरीब आणि 400 गरजू महिलांना आपण सर्वांनी मिळून नवीन साड्या दिल्या आहेत.
– जे लोक आता काम करू लागले आहेत परंतु रस्त्याकडेला भिजत झोपतात, अशांसाठी त्यांच्या निवासाची व्यवस्था आपण केली आहे.
– पूर्वी याचना करणाऱ्या लोकांकडून स्वच्छतेचे काम करून घेऊन सर्वांना महिनाभर पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.
– रस्त्यावर उपाशी पडून असणाऱ्या लोकांना जेवणाचे डबे दिले आहेत.
– हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत परंतु जेवण आणून देणारं जवळचं मात्र कुणी नाही, अशांना हॉस्पिटलमध्ये जाऊन जेवणाचे डबे दिले आहेत.
… या सर्व गोष्टींना “अन्नदान” म्हणणे मला योग्य वाटत नाही, दान करणारे आपण कोण? देणारा आणखी कोणीतरी वेगळा आहे…. आपण यांची फक्त भूक भागवण्यासाठी माध्यम म्हणून काम केले… “क्षुधाशांती” हा शब्द मला जास्त योग्य वाटतो…!
आपण सर्वांनी शारीरिक, आर्थिक आणि मानसिक मदत भरभरून केली आहे, आणि म्हणून या महिन्याचा लेखा योगा आपल्या पायाशी सविनय सादर…!
आपण आपल्या हातांनी दिले… म्हणून आम्ही ते पोहोचवू शकलो…
.. हो… आम्ही फक्त पोहोचवणारे, बाकी यात माझा आणि मनीषाचा काहीही रोल नाही…!
.. आपण दुसऱ्याला आनंद वाटणारं झाड आहात, आम्हाला त्याची फांदी व्हायला आवडेल….
.. दोन्ही हातांनी आपण तळागाळातल्या लोकांना सेवा देत आहात, या हाताचं एखादं बोट व्हायला आम्हाला आवडेल…
आपणास कृतज्ञतापूर्वक नमस्कार करत आहोत, कृपया स्वीकार करावा हि प्रार्थना
आपले स्नेहांकित,
डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





