सौ अंजली दिलीप गोखले
☆ मिरजेची कर्तृत्ववान माहेरवाशीण… भाग – २ – लेखिका : डॉ. सुमेधा रानडे ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆
कु. शिल्पा मुकुंद मैंदर्गी
☆
- आव्हान तिसरे दैनंदिन जीवनातील अडचणी
काही मिनिटे आपण डोळे झाकून राहू शकतो, पण कुणी डोळे मिटून एकजरी काम करायला सांगितले तर किती अवघड होईल? शिल्पाताईच्या बाबतीत तिच्या आईवडिलांनी पहिल्यांदाच ठरवले होते की तिला स्वयंपूर्ण करायचे. त्यांनी कधीच तिला पांढरी काठी देऊन ‘अंध ‘ नाही केले. परिणामी शिल्पाताई स्वतःची सगळी कामे स्वतः करतेच. आणि एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 1988-2000 या काळात शिल्पाताईचे वडील हे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक झाले. त्यांच्या काळात शाळेने शैक्षणिक क्षेत्रात कमालीची भरारी घेतली होती, 10वी आणि 12वी ला बोर्डात सर्वात जास्त मुले याच शाळेची असायची. महाराष्ट्र राज्यात 12वी मध्ये पहिला आलेली वेदिका सखदेव, ही शाळेसाठी आणि सरांसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट. अशी मोठी जबाबदारी असताना सुद्धा सरांनी शिल्पाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. पण नंतर सरांच्या आजारापणात याच शिल्पा ताईने आपल्या लाडक्या बाबांना रोज फिरवून आणणे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणे हे सर्व केले. डोळस असलेले आपण सुद्धा काहीवेळा कर्तव्यात कसूर करु पण तिने नाही केले. आज सुद्धा ती आईचे पथ्य पाणी सांभाळते, बँक, घरातील सर्व छोटी कामे ती स्वतः करते. सुई मध्ये दोरा ओवून छान छान गजरे करते, स्वतःच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी matching साडी, दागिने योजून ठेवते. अनेक फोन नंबर तिला तोंड पाठ आहेत. हिमालयाला न बघता सुद्धा त्यावर उत्तम कविता ती करते, पांडुरंगाची मानस पूजा ती कवितेतून करते. अनेक भावकविता, मुक्तछंद कविता ती करते. ती एकपाठी आहे, अनेक श्लोक, स्तोत्र तिला खूप कमी वेळात पाठ होतात. खरंच डोळस माणूस सुद्धा कमी पडेल अशी सर्व कामे शिल्पा लीलया करते.
- नवीन आव्हान-क्रोशा चा रुमाल विणायचेआव्हान तिने सध्या उचलले आहे.
ती सध्या गाणे पण शिकतीये, ‘गायन विशारद’ ही पदवी सुद्धा तिच्या खात्यात जमा होणार यात शंका नाही, आणि अजून एक उदाहरणं ती निर्माण करणार!
अश्या अनेक आव्हानांना सहज पार करणारी शिल्पाताई हसतमुख, लाघवी आणि अत्यंत प्रेमळ आहे. तिच्या या स्वभावाने तिने असंख्य लहान -मोठया मैत्रिणी बनवल्या आहेत. 4थी पासून तिला प्रत्येक परीक्षेला स्वतःपेक्षा छोट्या वयाची पेपर writer (लेखनिक)घेणे गरजेचे होते, त्या प्रत्येकीने तिला उत्तम साथ दिली. MA च्या परीक्षेवेळी BA करणाऱ्या कु. श्रद्धा म्हसकर हिने तर अतिशय उत्तम पद्धतीने शिल्पाताईला सहाय्य केले. त्या सर्वांची साथ तिच्यासाठी मोलाची ठरली. कुठेही शिल्पा ताईच्या बोलण्यात तक्रार, नकारात्मकता, अंधत्वाबद्दल नाराजी नाही..
तिला मी नेहमीचा प्रश्न विचारला, की मिरजेने तुला काय दिले? त्यावर शिल्पाताई अगदी आनंदाने म्हणाली, ‘मिरजेने माझे कुटुंब मला दिले, ज्यात माझ्या आई वडिलांनी मला इतके चांगले संस्कार दिले, मला कधीच माझ्यातील उणीव जाणवू दिली नाही, आणि माझ्या बहिणभावांनी सुद्धा मला कधी वेगळी वागणूक दिली नाही, उलट हास्यविनोद, चिडवाचिडवीने सर्वसामान्य मुलांप्रमाणे माझे बालपण गेले. माझा उत्तम आत्मविकास माझ्या घरातल्या सर्वांमुळे झाला. आमचे घर शिवनेरी चौकात, भर वस्तीत आजूबाजूला मंदिरे, मठ.. त्यामुळे मिरजेतील अध्यात्मिक वातावरणाने मला कायमच सकारात्मक ऊर्जा दिली. अनेक वर्ष माझ्या दोन्ही काकू घरातच संस्कार वर्ग घ्यायच्या, त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण शांत आणि सात्विक राहिले.
मिरजेची सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे इथे ‘ व्यावहारिकता (professionalism)कधीच कुणाच्यात दिसले नाही रस्त्यातून जाताना अनेक लोकं मदत करत, अगदी कामवाल्या मावशींनी सुद्धा काळजीपूर्वक क्लासला सोडले आहे. आवर्जून उल्लेख करावा अश्या 3 स्त्रिया माझ्या आयुष्यात अत्यंत महत्वाच्या आहेत, ज्यांनी व्यवहारापेक्षा माणुसकी, भावना, प्रेम यांनाच महत्व दिले यातील पहिली स्त्री म्हणजे नृत्यगुरु ‘सौ. धनश्री आपटे ‘ज्यांच्या बरोबर 27 वर्षांचा माझा शिष्य म्हणून सहवास आहे, जो आता ऋणानुबंध बनला आहे.. दुसरी स्त्री म्हणजे सौ. अंजली गोखले, ज्या 2011 पासून माझ्या बरोबर आहेत, स्वतःचा संसार सांभाळत त्या कायमच माझ्या बरोबर एक मैत्रीण, एक वाचक, माझ्या कार्यक्रमाची निवेदक, मला माझ्या नृत्याच्या कार्यक्रमाना जपून घेऊन जाणारी अश्या अनेक भूमिका पार पाडतात. गेली 15 वर्षे त्या रोज दुपारी 2. 30 ते 4 येऊन विविध पुस्तके वाचून दाखवतात (कधी प्रत्यक्ष तर कधी ऑनलाईन). MA चा पूर्ण अभ्यासक्रम त्यांनी मला वाचून दाखवून अभ्यास करुन घेतला. अनेक विषयांवर आम्ही चर्चा करतो. मला कविता स्फुरली की मी त्यांना फोन करते, आहे ते काम सोडून त्या माझी कविता लिहून घेतात, सांगावे तेवढे कमीच त्यांच्या बद्दल. आणि तिसरी स्त्री म्हणजे अनिता खाडिलकर माझ्या बाहेरच्या कामांसाठी मला घेऊन जाणे, बँकेतील कामे यासाठी त्या निरपेक्ष वृत्तीने कायमच माझ्या हाकेला धावून येतात. आई आजारी असल्याने घरातील-बाहेरची कामे मी यांच्याच साथीने सहज पूर्ण करते. किती भाग्यवान आहे मी!
हे सगळे मिरजेनेच दिले.
शिल्पा ताईचे हे वाक्य ऐकताना मनात विचार आला की मिरजेच्या या माहेरवाशिणीला मिरजेच्या या खंबीर सासुरवाशिणींची साथ मिळतीये हे किती सुंदर आहे! एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा आधार बनली, निरपेक्ष वृत्तीने!!
आजपर्यंत शिल्पा ताईला असंख्य ठिकाणी मान -सन्मान मिळाले आहेत. त्यात ‘मिरज भूषण ‘, अपंग सेवा केंद्राचा ‘जीवन गौरव ‘, कन्या महाविद्यालयाचा ‘मातोश्री’ यांचा उल्लेख आवर्जून करावा वाटतो. आजही तिचा आणि तिच्या आईचा दिवस पहाटे 4 वाजता ॐकार आणि प्राणायामाने होतो, तिचा दिनक्रम अतिशय व्यस्त आहे, त्यातून ती नृत्याचे online वर्ग पण घेते. आपल्या सारख्या इतर अनेक जणींना तिला प्रोत्साहीत करायचे आहे. त्यादृष्टीने तिचे आणि धनश्री ताईंचे प्रयत्न सुरु आहेत. देव जेव्हा एखादा ज्ञानेंद्रीय कमी देतो ना, तेव्हा बाकी 4 ज्ञानेद्रियांची ताकद वाढवतो हे ऐकले होते, शिल्पा ताईला बघून ते मनोमन पटले. त्यापुढे जाऊन मी म्हणेन की अश्या विशेष लोकांचं *6वे ‘मन’ हे इंद्रिय देव अजून सुंदर बनवतो.
तिच्या वडिलांचे स्वप्न होते, की शिल्पाचा भरतनाट्यम dance शो परदेशात व्हावा. हे स्वप्न लवकरच पूर्ण होवो अशी आम्हा मिरजकरांकडून शुभेच्छा! आणि तुझ्या कार्याला, उत्साहाला, जिद्दीला मानाचा मुजरा!! तिच्यासाठी श्री रामदास स्वामींचा हा श्लोक म्हणावा वाटतो..
सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
सुखाची स्वयें सांडि जीवी करावी॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें॥१०॥
– समाप्त –
लेखिका : डॉ. सुमेधा रानडे, मिरज
प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







