सुश्री अपर्णा परांजपे
☆ ✍️ गृहीत धरणे… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
☆
“न जायते म्रियते वा कदाचि-
न्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो-
न हन्यते हन्यमाने शरीरे ॥
(वेदांचे वाचन मननाने घडलेले काही चिंतन…)
गृहित धरणे अगदी सहज प्रक्रिया असते. जन्माच्या क्षणापासून ती सुरू असते. (आधीही ती असतेच हे नंतर लक्षात येतं!) सहजपणे व्यक्ती एक गोष्ट लक्षात ठेवून म्हणजेच गृहीत धरुन जीवन जगत असतो. उदाहरणार्थ आईशी आत्मीयता, तळमळ, प्रेम असते जे नंतर आपोआप त्याच्या सहज स्वभावात परिवर्तित होतं. शिक्षण हेच घ्यायचं असंच वागायचं हाच निर्णय योग्य हे करत असताना आधीच पेरून ठेवलेल्या कल्पना, वस्तू, व्यक्ती च त्याच्या आधार असतात. तसंच तो सहजतेने आपले कार्य करत असतो. सगळं सुरळीत असतं पण अचानक गृहित धरलेली एखादी साखळी कमी पडली, तुटली तर मात्र चिडतो व आक्रमक भूमिका घेतली जाते. आता मात्र संघर्ष अटळ असतो व या संघर्षातूनच खरे दुर्भाग्य, दुःख सुरू होते. या दुःख संकल्पनेवर आधारीत दुःखांची न संपणारी मालिका सुरू होते.
कारण पाया हा तसेच विचार व कृती करण्यास भाग पाडतो. वेगळा काहीही विचार नसल्याने या संकटातून बाहेर पडणे व्यक्ती ला शक्य नसते. तळमळ, चिडचिड, क्रोध, संताप, असूया, द्वेष, तुलना हेच या पायाभूत दुःखाचे फलित असते, ज्यातून बाहेर पडणे केवळ अशक्य असते.
मीच का? मला च का? माझे काय चुकले ह्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत व तळमळ वाढते. ही अवस्था कशी संपेल असे सखोल चिंतन सुरू होते, ते ही अतिशय सहजतेने, नैसर्गिकरीत्या तेव्हा आपण काहीतरी गृहीत धरले जी आपलीच चूक आहे, असे लक्षात येते. मग त्याच क्षणी दोषारोप थांबून स्वतः चे अवलोकन केले असता आपला विचारांचा मार्ग वेगळा आहे, ज्यात या वस्तू, हे लोक, हे विचार अडथळा आहेत, त्यांना हे समजणे शक्य नाही, मला काहीतरी वेगळं हवंय जे ह्यातून मिळूच शकत नाही, हे जाणवलं की मग गृहीतकंच बदलतात. आपला मार्ग शोधण्यासाठी आपणच एकटे आहोत पण समर्थ आहोत. आपले संकल्प, इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप मोठा आधार आतच आहे ज्याला आत्मविश्वास म्हणतो, तो जागृत होतो व स्वतः ची स्वतः चा आधार, चांगल्या वाईट फळांचा स्वीकार इतरांवर दोषारोप न करता करतो.
गृहित धरणं ही आपली अपेक्षा इतरांवर न लादता आपली जबाबदारी आपणच घेतो व आत्मविश्वासाने पुढे जातो. हा जो प्रवास आहे ती परमेश्वराने दिलेली च सगळ्यात मोठी देणगी मुक्त इच्छा असते ज्याचा वापर आत्मविश्वास जागृत झाल्यावर करता येतो.
जमिनीच्या आत बीज दुभंगून रोपटे जसे डौलदार बाहेर पडते तद्वतच तो आनंदाने उल्हसित होतो स्वयंस्फूर्तीने!
बुध्दी ही मायिक आहे, मर्यादित आहे, देहासोबत तयार झाली आहे त्यामुळे तिच्या कक्षेप्रमाणे विचार होणे सहज शक्य आहे त्याप्रमाणे वागणे हे ही योग्य आहेच पण ते अंतिम सत्य नसल्याने निराशा पदरी पडते. ही निराशा म्हणजेच जमिनीतल्या बीचाचे फुटणे! निराशा, दुःख, व्याकुळतेतूनच खऱ्या सुखाचा शोध घेतला जातो, तोच “आतला” आत्मविश्वास असतो!
याला विचारांचे शुध्दीकरण म्हणता येईल! आत असलेले शाश्वत तत्व त्याचा मार्गदर्शक, आधार ठरतं! आतूनच कौतुक व आतूनच शिक्षा अनुभवत वरून मात्र डेरेदार वृक्ष तयार होतो जो काहीही गृहित न धरता इतरांना आधार देण्यात समाधान मानतो.
स्वधर्म म्हणजे हेच समाधान, जे तो धर्म समजतो त्यापेक्षा आमूलाग्र बदललेले पण तरीही आपलेसे भासलेले असते. सुख हे घेण्यात नसून देण्यात असते हे पारंपरिक गृहितक मोडल्याचे शाश्वत समाधान त्याला अर्थातच चिरकाल आनंददायी असते.
ह्यालाच वेदांत “मुक्ती”, “मोक्ष” म्हणत असेल, नाही का?
☆
भगवंत हृदयस्थ आहे 🙏
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






