श्री हेमंत तांबे
☆ विवेक… ☆ श्री हेमंत तांबे ☆
एका छोट्याश्या गोष्टीवरून आपण एखादा विचार फुलवत न्यायचा. कारण जेव्हा विचार फुलत जातो त्यानंतर आचार खुलत जातो. *<– याला फार किंमत द्यायची नाही. पण उनाडक्या करण्या पेक्षा वेळ चांगला जातो. तमाशा पाहून लोकं फुकट गेली नाहीत आणि किर्तन प्रवचन ऐकून सुधारली नाहीत ! –>* मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ती वाचताना भाव असा ठेवा की, आपल्याला मतितार्थ समजावून घ्यायचा आहे, वाक्य रचनेला किंमत द्यायची नाही. — मी एकदा एका हाॅटेलात दुपारी बसलो होतो, बाहेर ऊन रणरणत होतं, अंगाची काहीली झाली होती. एवढ्यात एक माणूस त्या उपाहारगृतात आला आणि वेटरला म्हणतो, “खूप तहान लागल्येय एक थंड पाण्याचं ग्लास द्या.” — त्या हाॅटेलचा मालक हे ऐकत होता, तो म्हणतो, “आमच्या कडे ग्लासातून पाणी मिळेल, पण थंड पाण्याचं ग्लास नाही, कारण थंड पाण्याचं ग्लास तयार करण्याचं तंत्रज्ञान अजून विकसित झालेलं नाही. तुम्हाला निश्चित काय हवंय ?” — बहुतेक तो हाॅटेल मालक दर्शन शास्त्राचा विद्यार्थी असावा किंवा जातिवंत अत्यंत खडूस असावा. ….. थोडक्यात विपरीतार्थ काढू नयेत, शब्दच्छल करण्यात काही अर्थ नाही !
एकदा एका उच्च दर्जाच्या चित्रकारानं त्याच्या तरुणपणात ठरवलं की, आपण असं चित्र एखाद्या श्रमजीवी व्यक्तीचं रेखाटू या की, त्याच्या हसऱ्या चेहऱ्या सोबतच त्याच्या डोळ्यांतील भावांतून दया, सत्य, सौंदर्य, आनंद व परमात्याचं दर्शन होईल. आपली ही कलाकृती अजोड अद्वितीय झाली पाहिजे, त्यासाठी त्यानं तशा व्यक्तीच्या चेहऱ्याचा शोध सुरू केला. गावोगावी रानोमाळी, खेडं ते शहर, शेतकरी ते कामगार सर्व ठिकाणी त्याचा शोध सुरू झाला. वर्षभर भटकंती केल्यावर एका डोंगरावर एक तरूण शेतकरी आपल्या गायी चरवताना त्याला जसा हवा होता तसा मिळाला. त्याचा चेहरा आणि डोळ्यातील भाव त्या चित्रकाराला सौंदर्यानुभुती व परमात्याची प्रचिती देत होते. त्या चित्रकारानं हुबेहूब त्याचं चित्र रेखाटलं. त्या चित्राच्या डोळ्यांतील भाव त्याला हवे होते तसेच व्यक्त झाले होते, खूप आनंदित झाला तो. जी जी व्यक्ती ते चित्र पाहात होती, ती तर मोहवून जात होती. समाधान, तृप्तता, शांती, आनंद, सौंदर्य, पूण्य, सत्य थोडक्यात परमात्म्याचं दर्शन त्या डोळ्यांतून होत होतं. प्रत्येकजण त्या चित्रकाराचं कौतुक करत होता. अशी अनेक वर्षे निघून गेली. ते चित्र त्या कलाकाराच्याच कला दालनात नव्हे, तर सर्वत्रच कौतुकास पात्र झालं होतं !
आता तो कलाकार म्हातारा झाला होता. त्याला असं वाटलं की, आपण मरण्यापूर्वी असं एखाद्या माणसाच्या चेहऱ्याचं चित्र रेखाटू या की, त्याच्या डोळ्यातून हिंसा, क्रौर्य, कृतघ्नता, घृणा, पापच दिसेल. आपलं पहिलं सुंदर माणसाचं चित्र आणि हे जे चित्र रेखाटणार आहोत ते एकत्र ठेवूया आणि जनतेला ठरवूद्या आपल्याला काय हवं, आपण कसं वागावं, कसं दिसावं. त्यानं त्यासाठी वेगवेगळ्या दुष्कृत्यांत सहभागी असलेल्या लोकांचे चेहरे पाहायला सुरुवात केली. पण त्याला मनासारखा चेहरा काही मिळेना, म्हणून तो शेवटी तुरुंगात गेला. तिथल्या तुरुंगाधीकाऱ्याला त्यानं सांगितलं की, मला वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या, अत्यंत क्रुर खुंखार गुन्हेगाराची भेट हव्येय. तुरुंगाधीकाऱ्यानं त्याची तशा एका गुन्हेगाराशी म्हणजे कैद्याशी भेट घालून दिली आणि तो निघून गेला. या चित्रकारानं त्या कैद्याला पटवून त्याच्या चेहऱ्याचं हुबेहूब चित्र काढलं. ते चित्र इतकं लाजवाब होतं की, त्या चित्रातील डोळ्यांतून त्या चित्रकाराला हव्या असलेल्या सर्व वाईट गोष्टी दिसत होत्या. चित्र पूर्ण झालं आणि तो चित्रकार निघणार तेव्हा, त्या कैद्याच्या चेहऱ्यावर उदासी, दुःख, दैन्य, अगतिकता, पश्चात्ताप दाटून आला आणि तो रडू लागला. या चित्रकाराला नवल वाटलं, इतक्यात तो कैदीच म्हणतो, “भल्या माणसा, विस वर्षांपूर्वी तुच माझ्या खूप प्रेमळ समाधानी आनंदी चेहऱ्याचं चित्र काढलं होतंस. काळ कसा पटापट निघून गेला पाहा आणि मी चांगल्याचा वाईट कसा झालो कळलंच नाही. श्रमातून मिळणाऱ्या समाधान आनंदा ऐवजी, श्रम न करता पैसा मिळवण्याचा मार्ग म्हणून चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या लुटपाट दरोडेखोरी हत्या सुरू केल्या आणि आज या तुरुंगात खितपत पडलोय. गेल्या विस वर्षांत अनेकानेक चुका गुन्हे मी केले, पण आता पश्चात्ताप करून काही उपयोग नाही. जर शक्य असेल तर आणि ते माझं जुनं चित्र तुझ्या कडे असेल तर, ते पहिलं चित्र आणि हे नविन चित्र एकत्र ठेवून खाली लिही की, “ही दोन्ही चित्रं एकाच व्यक्तीची आहेत. या दोन्ही चित्रांतील व्यक्तीच्या डोळ्यातील भाव पाहा. कारण आपल्या डोळ्यातील भाव आपल्या वागणूकीचे इच्छेचे कर्तृत्वाचे दर्शन देतात. व्यक्ती एकच असली तरी पहिलं चित्र ती व्यक्ती श्रम करत सन्मार्गावर असतानाचं आहे, तर दुसऱ्या चित्रात तिच व्यक्ती श्रम न करता वाममार्गाला लागल्यानंतरचं आहे. मार्ग निवड आपली राहिल !”
सनातन संस्कृतीत ध्येय महत्वाचं आहेच, पण ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग त्याहून महत्वाचा आहे. ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग आपल्याला समृद्ध करत जाणारा असेल, तर ध्येय प्राप्ती नंतर सच्चिदानंद ही परमोच्च अवस्था प्राप्त होते !
© श्री हेमंत तांबे
पाटगाव.
मो – 9403461688
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




