सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “मनात काही रुतलेले…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
हल्ली लाईट सारखे जातात म्हणून सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम, वरच्या टाकीत पाणी भरून घेणे. त्यासाठी बटन लावून मी मोटर चालू केली टाकी भरली की पत्र्यावर पाणी पडतं आणि लगेच बटन बंद करावे ही सूचना मिळते. त्यासाठी मी बाहेरच थांबले पण माहित नाही कोणत्यातरी विचारात गर्क झाले होते. खर तर पाणी भरायला सात ते आठ मिनिटे लागतात. इतक्यात जिन्याचा दरवाजा उघडून भाची वर आली तीने शांतपणे बाथरूम मधले बटन बंद केले आणि ती खाली निघून गेली मी म्हणलं, “सॉरी सॉरी, माझ्या लक्षातच राहिले नाही आणि मला पत्र्यावरचा आवाज ऐकू आला नाही खरंतर मी यासाठीच इथे बसले होते”…. तिने ते काहीच ऐकले नाही तिला कामाची घाई होती ती निघून गेली, पण मला मात्र ती गोष्ट खूप लागून राहिली. असे कसे चालू राहीले.. आपल्या लक्षात कसे राहत नाही? … आणि सहजच एका प्रसंगाची आठवण झाली….
मी सेवासदन मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते तेव्हाची गोष्ट मी आणि आई वरच्या मजल्यावर राहत होतो. एक खोली स्वयंपाकघर आणि एक खोली झोपणे बसणे उठणे अशा दोन खोल्यामोठ्या होत्या आणि समोरची मोठी गच्ची असा वावर आमचा असायचा. स्वयंपाक घराच्या खोलीत स्वयंपाक घर म्हणून व्यवस्था नव्हती मी एक रेडीमेड किचन टेबल ठेवले होते त्याला एक बेसिन होते पण ते पाईपला, गटरला जोडलेले नव्हते. पाणी एका बादलीत जमा करायचे आणि ते भरले की बाहेर जाऊन सांडून टाकायचे अशी हात धुण्याची व्यवस्था होती. टेबलवर एक पीप ठेवलेले होते. एके दिवशी रात्री आईने काहीतरी स्वयंपाक घरामध्ये केले बहुधा तीने हा त्या पिपाखाली हात धुतला आणि नळ पूर्णपणे बंद करायची विसरली तो थोडासा उघडा राहिला. सकाळची शाळा होती मला लवकरच पहाटे जाग आली पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घरात गेले तर बादली भरून अर्ध्या पाऊण स्वयंपाक घरात पाणी झाले होते मी कपाळाला हातच लावून घेतला आता हे पाणी काढल्याशिवाय गत्यंतर नव्हते भराभर ओंजळीने पाणी काढले मग एका जुन्या साडीने सगळे घर पुसून घेतले पंखा फास्ट करून सोडला हे सगळं करायला माझा एक तास गेला. घाईघाईने आवरून मी शाळेला निघाले तेवढ्यात आई उठली होती. ती म्हणाली काय झालं? मी काही बोलले नाही फक्त एवढेच म्हणाले, ” तू काही काम करत जाऊ नकोस ग… ” या वाक्यातला माझा स्वर बरोबर नव्हता हे तिला जाणवलं! पुन्हा आठ दिवसांनी अशीच घटना घडली शनिवारची शाळा सात वाजता मला मुख्याध्यापक म्हणून हजर होण गरजेचे मला जाग आली आणि मी उठले तर आई अंथरुणावर नव्हती म्हणलं बाथरूम मध्ये असेल तिथे नव्हते मग लक्षात आला रे स्वयंपाक घराची लाईट चालू आहे. पाहते तर परवा प्रमाणेच पाणी खाली सांडलेले आणि आई ते भरत होती… दिवस थंडीचे तिला खाली बसता येत नव्हत… 85 वय हे दृश्य पाहिल्यावर मला काय झाले मी लिहू शकत नाही मी फक्त आईला मिठी मारली आणि तिला पलीकडच्या खोलीत घेऊन आले… तिचे पाय पुसले गरम पाण्याचे पिशवी दिली… पांघरूण घातलं मी बोलले काहीच नाही माझे डोळे मात्र वाहत होते. मी त्या दिवशी न बोललेल्या गोष्टी तिला लागल्या होत्या तीच चूक पुन्हा तिच्या हातून झाली आणि ती सुधारण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न करत होती. मी तिला एवढेच म्हणाले, ” मी खूप वाईट आहे ना तुला समजून घेतलं नाही “… ती अक्षरही बोलली नाही मी भराभर खोली पुसून घेतली.. सगळ आवरलं… तिला गरम चहा दिला आणि शाळेला गेले….! आई
जाऊन पंधरा वर्षात झाली आता कधीकधी माझ्या हातूनही पिपाची तोटी उघडी राहते कुणीतरी आठवण करून देत… “आत्या नळ उघडा आहे” मी म्हणते, ” हं आमच्या आई साहेब आल्यात बर का हे सांगायला बघ तुझ्याकडून नळ उघडा राहतो… चुकलं चुकलं आईसाहेब “मनात मी त्या केलेल्या चुकीची कबुली देते आणि नळ बंद करते. चूक माणूस करत नाही… जी बाई आयुष्यभर इतक्या जणांच्या वेळा संभाळत संसारासाठी राब राब राबली ती कशी चूक करेल. तीच व्यवस्थापन हे फार सुंदर होतं अष्टावधानी असणारी ही माणसं म्हातारपणाने विस्मृतीच्या छायेत जायला लागतात आपण त्यांना समजून घ्यायला हवं. त्या क्षणी जर समजून घेता आले नाही तर ती गोष्ट आपल्याला आयुष्यभर मनाला लागून राहते….! माझ्याकडूनही हल्ली नळ उघडा राहणे, दूध उतू जाणे, करपणे, मोटार चालू राहणे हे प्रकार घडत आहेत लक्षात येते बुद्धीचा प्रचंड वापर करणारे आपण मेंदूनी थकलोय.. हे समजून घेणार कुणीतरी हवंय पण कोण असणार आहे? …. पुढच्या पिढीला वेळ नाही ते म्हणतात तुम्ही करू नका ना… पण त्यांच्या हे लक्षात येत नाही तुम्ही करू नका म्हणण्यात तुम्ही आम्हाला अधिक म्हातारं करत आहात. लहानपणी तुम्ही केलेल्या असंख्य चुकांना तुमच्या आई बापाने पोटात घातलेले असते मग म्हातारपणीच्या घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण नाही का पोटात घालून घेऊ शकत? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे… कारण काळाचा वेग वाढलेला आहे तो मागच्या पिढीसाठी पुढच्या पिढीचा नेहमीच वाढतो पण इथे तो दुप्पट झालाय त्यांच्याबरोबर धावणे आपल्याला कठीण आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घ्यायला त्यांच्याकडे वेळच नाही कारण जगण्यासाठी चा त्यांचा संघर्ष वाढलेला आहे आपण उपभोगलेली जीवनातली शांती आज त्यांच्याकडे नाही…. सगळंच अवघड झाले पण यातून मार्ग काढण्यासाठी मी मात्र ठरवले…. एक पाटी आणायची त्यावर लिहायचं मोटार चालू केली आहे.. बंद केले की पुसून टाकायचं किंवा दूध तापायला ठेवले आहे… हे लिहायचं आणि दूध तापायला ठेवायचं खोलीतून बाहेर पडताना स्वतःला तीन प्रश्न विचारते…. नळ बंद आहे का? गॅस बंद केला आहे का? दूध फ्रीजमध्ये ठेवले आहे का? आणि त्यानंतरच मी बाहेर पडते. आता आपल्या प्रश्नावर आपणास सोल्युशन शोधायचे दिवस आले आहेत बाकी “तो पाठीशी आहेच” ही श्रद्धा ठेवायची आणि कामाला लागायचं फार वाईट वाटून घ्यायचे नाही मग काय मंडळी हे सगळं तुमच्या बाबतीत ही घडतं ना मग उपाय शोधा…. पटतंय का बघा….!
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





