श्री सुधीर करंदीकर

??

☆ “नवीन वर्षाच्या शुभेच्छा – ३६५ दिवसांकरिता…” ☆ श्री सुधीर करंदीकर

वर्षभर निरनिराळे योग साधून, जसे निरनिराळे सण / उत्सव / वाढदिवस / जागतिक दिवस, वगैरे, याकरता आपली शुभेच्छांची देवाण घेवाण सुरु असते. त्या दिवशी बहुतेकांची सुट्टी असते, घरी पूजा असते / काही कार्यक्रम असतो, येणारे जाणारे असतात, गोड खाद्य पदार्थ असतात, आणि शुभेच्छांची जोड पण असते. आणि त्यामुळे सगळ्यांना तो एक दिवस खरंच छान जातो.

आता नवीन वर्षाच्या आपण जेव्हा शुभेच्छा देतो तेव्हा त्या ३६५ दिवसांकरता असतात. वर्ष सुरु होतांना पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला सगळीकडेच शुभेच्छांची भरपूर देवाण घेवाण सुरु असते, त्यामुळे तो दिवस छान जातो. पण नंतर पुढचे ३६४ दिवस आनंदाचे जाण्याकरता शुभेच्छा देणाऱ्यांची किंवा घेणाऱ्यांची काहीच हालचाल नसते. नुसते एक दिवस हॅपी न्यू ईयर म्हणून पूर्ण वर्ष नक्कीच आनंदाचे जाणार नसते.

आता ह्या दिलेल्या आणि घेतलेल्या शुभेच्छा जर आपल्याला वर्षभराकरता फलद्रुप करायच्या असतील, म्हणजे हा आनंदाचा दिवा जर आपल्याला वर्षभर तेवत ठेवायचा असेल, तर आपल्याला त्यात कायम तेल टाकत रहायला पाहिजे, म्हणजे त्याकरता शुभेच्छा देणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यांनी वर्षभर त्याकरता काहीतरी करत रहायला पाहिजे.

लगेच प्रश्न उभा राहतो – म्हणजे काय करायला पाहिजे?

आपण आधी बघू – भाग पहिला – शुभेच्छा देणाऱ्यांनी समोरची व्यक्ती वर्षभर आनंदी राहण्याकरता स्वतः काय करायला पाहिजे.

मी जेव्हा समोरच्याला वर्ष आनंदाचे जावो अशा शुभेच्छा देतो, तेव्हा माझा वर्षभर असा रोल असायला पाहिजे, कि, वर्षभर माझ्या प्रत्येक कृतीमधून, मी त्या व्यक्तीला आनंदच दिला पाहिजे. चांगले बोलून आनंद दिला पाहिजे. जरुरीच्या वेळेस मदतीचा हात पुढे करून आनंद दिला पाहिजे. कामासंबंधी विचारपूस करून आनंद दिला पाहिजे. घरच्यांची खुशाली विचारून आनंद दिला पाहिजे. नेहेमी संपर्क ठेवून आनंद दिला पाहिजे. असे वर्षभर करत राहणे, यालाच खऱ्या अर्थानी भरीव / ठोस शुभेच्छा देणे असे म्हणता येईल. हा बदल आपल्याला ह्या वर्षी नक्कीच करायचा आहे.

आता बघू भाग दुसरा म्हणजे – शुभेच्छा घेणाऱ्यांनी मिळालेल्या शुभेच्छा वर्षभर फलद्रूप ठेवण्याकरता म्हणजे स्वतः वर्षभर आनंदी राहण्याकरता स्वतः काय करायला पाहिजे.

१) आपल्यापैकी प्रत्येकाच्या सुखी आणि आनंदी जीवनाबद्दलच्या कल्पना वेगळ्या असणार, हे सरळ आहे. म्हणून सुखी आणि आनंदी जीवनाबद्दल आपल्या ज्या काही कल्पना असतील, वर्षभराकरता आपली काही उद्दीष्ट असतील, त्यांचं आपल्याला यावर्षी एक काल्पनिक चलचित्र तयार करायचं आहे, आणि रोज सकाळी उठल्यावर, आणि दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा ते बघायचं आहे. झोपतांना पण ते बघायचं आहे. ह्यालाच स्वप्न रंगवणे आणि ते स्वप्न बघणे, असे पण म्हणता येईल. असे यावर्षी नियमित केल्याने आपले स्वप्न साकार होणार / आपण वर्षभर आनंदी राहणार हे निश्चित.

कारण, What you think, so you become & What you imagine, so it happens.

२) मला समोरच्यांकडून ठोस शुभेच्छा मिळाल्या, आता यांचे जर मला सुंदर रोपटे करायचे असेल, ते फुलवायचे असेल, तर मला पण योग्य ती मेहेनत करायला पाहिजे, त्याला नियमित पाणी घालायला पाहिजे / खतं घालायला पाहिजे. मी जर कायम निरुत्साही असलो, कायम निरनिराळे नकारात्मक विचार मनात घोळत बसलो, हे दुखतंय – ते दुखतंय, हेच उगाळत बसलो, तर बियांचे सुंदर रोपटे कसे होणार आणि ते कसे फुलणार? स्वतःला सकारात्मक करण्याकरता / ठोस करण्याकरता, हेल्दी बॉडी आणि हेल्दी माईन्ड, हीच प्रूव्हन व्दिसूत्री आहे.

ही व्दिसूत्री अस्तित्वात उतरवण्याकरता अतिशय सोपे / कुठलाही साईड इफेक्ट नसणारे / खर्च नसणारे, अध्यात्मिक गुरूंनी दिलेले प्रिस्क्रिप्शन हे असे आहे – —

# रोज स्वत:करता एक तास द्या, त्यामधे –

* ३० मिनिटे चालणे : मस्त बूट घाला, रंगीबेरंगी कपडे घाला. मोबाईल घरी ठेवा. फिरतांना ‘बिग नो’ टू घरगुती वाद / नकारात्मक चर्चा. रमतगमत चालणे – नो वे! स्विफ्ट चालायचे आहे, ताठ चालायचे आहे. सकाळी फिरणे जमत नसेल, तर संध्याकाळी जाता येते. चालतांना दोन्ही हातानी ज्ञान मुद्रा किंवा तत्सम मुद्रा केली तर उत्तमच.

* १० मिनिटे प्राणायाम : तुमचा यावरचा अभ्यास असेल, तर त्याप्रमाणे करा. नाहीतर -. ५ मिनिटे अनुलोम – विलोम करा आणि ५ मिनिटे दीर्घ श्वसन करा, ५ मिनिटे ओंकार जाप करा.

* १० मिनिटे ध्यान करा : विचारशून्य अवस्थेमधे बसणे 

* १० मिनिटे व्यायाम : आपल्या शरीराच्या सर्व सांध्यांची हालचाल होईल असे अगदी सोपे व्यायाम आपल्याला करायचे आहेत. आपण शाळेमध्ये पीटी च्या तासाला करायचो, साधारण तसेच.

आठवड्यातून ५ दिवस केले तर चालेल का? वगैरे, असे कुठलेही ऑपशन्स याला नाहीत.

# कळते पण वळत नाही —

‘कळते पण वळत नाही’ या म्हणीतून, या वर्षी आपल्याला पूर्णपणे बाहेर पडायचे आहे. म्हणजे जे कळते, त्याला आता वळते करायचे आहे. तब्येत छान राहण्याकरता ‘जंक फुड खाऊ नका’ हे आपल्याला कळते पण वळत नाही. ‘अति तेलकट-तुपकट खाऊ नका’, ‘साखरेचा अतिरेक टाळा’, ‘सिगरेट, दारू प्रमाणात ठेवा’, हे पण आपल्याला कळत असतं, पण वळत नसतं.

ज्या ज्या गोष्टींकरता, आपण ही म्हण वापरतो, त्या सगळ्यांना या वर्षी वळते करायचे आहे.

# आलिया भोगासी असावे सादरं – चित्ती असू द्यावे समाधान —

ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, त्यांचा मनापासून स्वीकार करायचा. प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधानी असणे, फार महत्वाचे असते. समाधानी माणूसच मनन करू शकतो आणि परिस्थिती बदलू शकतो. अप्रिय घटनांवर मनन केलं, तर समजू शकतं, की, आपलंच ‘असं – असं’ चुकलं होतं, किंवा आपण कुणाची तरी मदत घ्यायला पाहिजे होती. आणि चूक सुधारून पुन्हा घोडदौड सुरु करता येते. घडणाऱ्या सगळ्याच चांगल्या – वाईट घटनांचे शिल्पकार आपणच आहोत, ही समज महत्वाची आहे.

# संवाद —

घरामध्ये आई-वडील, मुलं-मुली, सासु-सासरे, नवरा-बायको यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असेल, तर घर आनंदी राहतं आणि ओघानीच आपण पण आनंदी राहतो. आणि याकरता जरूर आहे संवादाची.

एकमेकांची विचारपूस करणे, काय हवे-नको ते विचारणे, इतरांच्या चांगल्या कामाचे नेहेमीच मनापासून कौतुक करणे – प्रशंसा करणे, या गोष्टींना या वर्षी महत्व द्यायचे आहे.

# कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे —-

रोजच्या आपल्या प्रवासात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. अशावेळेस, ह्यानी असं कां केलं? त्यानी असं कां केलं? हा असं कां वागतो? वगैरे, काथ्या कूट करण्यात आपण आपली सगळी ऊर्जा वाया घालवतो आणि हातात काहीच येत नाही. ज्ञानी मंडळी सांगतात – कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक जण आपापल्या वरच्या संस्कारांप्रमाणे वागत असतो, आणि ते आपल्याला पटेलच असे नाही. मी काय करावं एवढाच सोपा विचार मला करायचा आहे आणि आनंदात राहायचे आहे.

# मन चंगा तो सब चंगा —

मानसिक स्वास्थ्य बिघडले, की सगळेच बिघडते, आणि सगळ्याच बाबतीत उतरती कळा सुरू होते. मग आपण ज्योतिषाला हात दाखवतो / पत्रिका दाखवतो. आपल्या पत्रिकेत कुठल्या घरात शनि आहे, कुठल्या घरात राहू – केतू आहेत, मंगळ कुठे आहे, आणि मग त्यांना प्रसन्न कसे करता येईल, यावर आपले तन / मन / धन आपण एकाग्र करतो. आणि आपली भरकटत भ्रमंती सुरु होते.

शांत डोक्यानी विचार केला, तर लक्षात येते, की आकाशातले शनि-मंगळ-राहू-केतू यांचा आपल्यावर प्रभाव जेमतेम १० टक्के असतो. ९० टक्के प्रभाव टाकणारे / मानसिक स्वास्थ्य बिघडवणारे किंवा घडवणारे, खरे शनि-मंगळ-राहू-केतू-बुध-गुरु-चंद्र-सूर्य हे आपल्याच घरात आणि आपल्याच अवति-भवती असतात. एकदा का आपल्या घरात / आपल्या मित्रमंडळीत / आपल्या सहकाऱ्यांमधे, कोण शनी आहे / कोण राहू – केतू आहे / कोण गुरु आहे, – – – -, हे आपल्याला समजले, या जवळच्या ग्रहांच्या आवडीनिवडी आपण समजून घेतल्या, त्यांच्या चाली आपण समजून घेतल्या, तर त्यांना खुश ठेवणारी आणि आपल्याला त्रास न होणारी, आपली चाल आपल्याला ठरवता येते आणि आपले आयुष्य खूप सोपे होते, मनाला ताणतणाव पण राहत नाहीत.

प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो, हा निसर्गाचा नियमच आहे. प्रत्येक झाडाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक प्राण्याचा स्वभाव वेगळा असतो.

स्वभावाला औषध नक्कीच असते. पण ते फक्त स्वतःचा स्वभाव बदलण्याकरता – इतरांचा नाही.

# वर्तमानकाळात रहा —

आपण आपला ५० % वेळ भूतकाळातल्या कडू आठ्वणी उगाळण्यात घालवतो आणि ५० % वेळ भविष्याची काळजी करण्यात घालवतो. त्यामुळे ताणतणाव हेच आपले आयुष्य बनते. मन आणि शरीर यांना बरोबर ठेवणे, यालाच वर्तमानकाळात राहणे असे म्हणतात, यालाच योगसाधना म्हणतात, यालाच ध्यान म्हणतात. ताणतणाव मुक्ती करता हीच महाऔषधी आहे.

# जर – तर ला बाय बाय —-

बहुतेक जण आनंदी होण्याकरता कुठल्यातरी बंधनाशी जोडी बांधतात. जर नवऱ्यानी माझं कौतुक केलं तर मी आनंदी होईन, जर बायकोनी असं – असं केलं तर मी आनंदी होईन. अशी जर-तर ची आपण लाईन लावतो, आणि परिणाम काय होतो, ते आपण अनुभवतोच. यावर्षी जर-तर ला बाय बाय करायचे आहे. आणि करायचं काय आहे? तर, आपण सगळ्यांवर अनकंडिशनल प्रेम करायचं आहे आणि स्वतः अनकंडिशनल आनंदी राहायचं आहे. असं म्हणतात, की, जर आपलं शरीर प्रेमानी आणि आनंदानी शिगोशीग भरलेले असेल, तर कुठलेही इन्फेक्शन / कुठलाही आजार / कुठलीही व्याधी आपल्या शरीरात प्रवेश करूच शकत नाही, कारण कुठे जागाच शिल्लक नसते.

# कायम आनंदी चेहेरा —

कायम आनंदी चेहेरा – ही आरोग्याची गुरूकिल्ली आहे. रस्त्यावर हातगाडी घेऊन हिंडणारे भंगारवाले नेहेमीच हसतमुख असतात. चहाची टपरी चालवणारे / रस्यावर झाडलोट करणारे, कायम हसतमुख असतात. मग आपलाच चेहेरा एरंडेल तेल प्यायल्यासारखा का असतो?

आपण नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहिलो आणि सकारात्मक-हसतमुख व्यक्तींना जवळ केले, तर हमखास हसतमुख राहता येते. आपल्या आवडीचे छंद, जसे वाद्य वाजवणे, गाणी म्हणणे, चित्रकला, वगैरे यामध्ये जर आपण रमलो तर आपल्या चेहेऱ्यावर हमखास आनंद फुलतो.

चला तर मग – यावेळेस शुभेच्छांची देवाण घेवाण करतांना देणाऱ्यांनी “ठोस” बनायचे आहे, आणि शुभेच्छा घेणाऱ्यांनी पण “ठोस” बनायचे आहे.

नवीन वर्षाकरिता माझ्याकडून तुम्हाला खूप खूप आणि “ठोस” हार्दिक शुभेच्छा!!!

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted