डॉ. माधुरी जोशी
मनमंजुषेतून
☆ ती कराचीची ट्रंक!!! ☆ डॉ. माधुरी जोशी ☆
पेपरमधे रावळपिंडीला आपलं घर पहायला जाणाऱ्या आजींची बातमी वाचली. १५ वर्षाच्या असतांना फाळणीत त्या भारतात आल्या. आता ७५ वर्षं झाली…. नव्वदीच्या झाल्या त्या…. पण ते जुनं घर, मित्रमैत्रिणी, गल्ल्या, रस्ते, घरं, कॉलेज सगळं पहावसं वाटलं परत….. आणि परवानगी घेऊन त्या गेल्या गतकाळातल्या स्म्रुती जागवायला……
.. क्षणात मला ४७ च्या फाळणीत नेसत्या वस्त्रानिशी, जीव मुठीत धरून, कसेबसे हिंदुस्थानात पोहोचलेले माझे सासूसासरे आठवले. तेंव्हा त्यांच्या डोळ्यापुढे सगळा अंधार…. कुठे जायचं? कुठे रहायचं? हातात कामंच नसेल तर कसं जगायचं? खरंच… केवढी भयाण पोकळी ही…. अनपेक्षित…. भयप्रद… जरी नातेवाईक असले तरी काही काळासाठी… कायम कसं चालेल भार टाकून!! आणि हिंदुस्थानात पण ऑलवेल नव्हतंच ना.. सगळं अस्वस्थ, कासावीस, अस्थिर, उधळलेलं….. स्थिरं व्हायला काळ लागणारंच होता.
एकीकडे बोटीनं काही सामान आलं. होतं. ज्यात काही भांडीकुंडी, एक लोखंडी ट्रंक असं काहीबाही होतं. एक सुखवस्तू जीवन, शिक्षकी पेशाच्या उत्तम नोकऱ्या, रहायला बऱ्यापैकी घर, घरात सोयीचं सारं सामान, आसपास ओळखीची घरं….. अशा सगळ्या कराचीतल्या सम्रुद्ध वातावरणातून आता जिवंत तरी पोहोचू की नाही आणि पोहोचलो तरी जगायचं कसं असे भयाण प्रश्न अचानक आ वासून उभे राहिले. जरी नातेवाईक असले तरी किती काळ? आपलं आपण उभं रहायलाच हवं…. पण कसं? कधी? कुठे??? सारी प्रश्नचिन्हंच प्रश्नचिन्हं….
सासुबाई मूळच्या धारवाडच्या. त्या काळातल्या ग्रँज्युएट.. संस्क्रुत वर प्रभुत्व असणाऱ्या…. ते घरंच सुशिक्षितांचं…. घरात वकील, डॉक्टर्स असे वडीलधारे… स्वतःचं मोठसं घर…. घरात राहणारी चुलत, मामे, मावस, आते भावंडं….. घराघरात अशी प्रथाच होती एकत्र जगण्याची…. एक सुशिक्षित, सुखरूप, सुखवस्तू, सम्रुद्ध जगणं होतं त्यांचं….
धारवाड फुलांचं, रसरशीत मातीचं, सुंदर हवामानाचं शांत गाव असं म्हणत त्या….. घरापासून कॉलेजपर्यंत जातांना येणारा मोगरीचा गंध, तिची टपोऱ्या मोत्यांसारखी फुलं, अबोलीनं बहरलेली सदैव टवटवीत शेंदरट अबोली घोसांची अगणित झुडपं, लाल पाठीच्या कुंदाच्या चांदण वेली, शेवंतीवर डोलणारे गुच्छांचे ताटवे…. लाल मातीवर केशरी, पिवळी, पांढरी, पखरण आणि सुगंध पण जपणारी रंगपंचमी…. आणि शांत, चढ उताऱ्याच्या रस्त्यांवरून बहिणी, मैत्रिणींबरोबर रोजचं चालंत जाणंयेणं….. असं सुंदर धारवाड…. त्यांना पाकिस्तानात कराचीला शिक्षकाची नोकरी करणाऱ्या सासऱ्यांचं स्थळ आलं. ते गणिताचे स्कॉलर, विद्यार्थी प्रिय शिक्षक, दिसायला चांगले… नीटस… कसल्या जबाबदाऱ्या नसणारे… तरी पण घालमेल झालीच.. ।एकदम पाकिस्तान? काय करायचं? पण तो बंध नियतीनंच बांधलेला होता… लग्न झालं आणि त्या कराचीला म्हणजे चक्क फॉरेनलाच गेल्या की….. शिक्षणामुळे त्यांनाही नोकरी मिळाली आणि एक छान, सुखाचा, सुरक्षित संसार सुरू झाला.
कराची पण भावलं त्यांना. सम्रुद्ध, संपन्न कराची…. शांत, समजूतदार शहर…. त्या सांगत आपल्याकडे भाजीची गाडी येते तशी ड्रायफ्रूट येत ढिगानी विकायला…. शेंगदाण्यासारखे पिस्ते बदाम आक्रोड खायचो आम्ही…. सुंदर ताज्या भाज्या… रसरशीत सगळं….. माणसं जिवाला जीव देणारी…. शिक्षक म्हणून जरा जास्त मान…. संध्याकाळी शाळेतून आल्यावर जरा फेरफटका मारून यावं तर वाटेवर दमदमीत सुगंधाच्या जुई मोगरीच्या लदलेल्या गाड्या… साऱ्या गल्लीत दरवळ… ।….
असं छान चाललेलं असतांना अचानक वादळ उठलं सुसाट… भयाण विचारांचे वारे.. ।।आपण सुरक्षित नाही अशा चर्चा.. त्या भितीदायक भावनेन ंशाश्वतीच उरली नाही आनंदानं जगण्याची… ।नव्हे!! जगण्याचीच… मग घाबरलेले सगळे भारतीय एकत्र आले… लपूनछपून कुठे कुठे आश्रय घेतले आणि एक दिवस त्या ट्रेननी ना जाणो कोणकोण, कुठून, कसे, कुणाच्या मदतीनं हिंदुस्थानात परत आले. इथलं जगणंही नव्या लढाईचं होतं. एक मात्र सबळ, भक्कम गोष्ट होती ती म्हणजे दोघांच्या हातातलं शिक्षण… शिक्षकी नोकरीचा अनुभव… कासव गतीनं का होईना हळुहळू गणितं सुटली आणि एका अपमानित, अस्थिर, भयाण वातावरणाला पूर्णविराम मिळाला.
पुण्यात सुरवातीला त्यांच्याकडे ती ट्रंक होती. त्यात त्या वाण्याकडून आणलेल्या सामानाच्या पुड्या ठेवत. तेच कपाट आणि तेवढीच ग्रोसरी…. लागेल तेवढीच आणायची… जपून, पुरवून वापरायची…. ती ट्रंक नव्या संसाराच्या सुरवातीचा आधार… हळुहळूहळू स्थिरावत गेलं. सरकारी नोकऱ्या मिळाल्या. कधी एकत्र कधी वेगळ्या बदल्या झाल्या. महाराष्ट्रभर…. पण आता लढाई जरा वेगळ्या अर्थी सोपी होती…. जगणं आर्थिक, मानसिक सुरक्षित झालं. अक्षरशः शून्यातून त्यांनी पुन्हा संसार उभा केला.
या सगळ्या प्रवासात ही ती ट्रंक, जी सोबत होती. साक्षीदार होती. साधारण सव्वा फूट उंची, रुंदी, खोलीची चौकोनी, लोखंडी, काळी, भक्कम कडीकोयंड्याची… दोन्हीकडे धरायला कड्या आणि चांगलं दीड दोन इंचाचं उंच झाकण असलेली ती ट्रंक मग माझ्या घरात आली. त्यावर ऑईलपेंटनं नाव लिहीलं होतं S. M. Joshi Karachi असं….. मग आमच्या घरातले हातोडी, पाने, स्क्रू ड्रायव्हर, पकड, वायर्स, पिना असं नेहमी न लागणारं पण कामाचं सामान त्यात राहिलं. मग नको असलेली वाट्या भांडी किसणी स्टीलची गाळणी…. मग असंच काहीबाही…. शेवटी काही न ठेवता ट्रंक अडगळीत माळ्यावर गेली. जणू विस्मरणात गेली. जुनी झाली, , गंजली…
अलीकडे रंगकाम आवश्यक झालं माळ्याला ओल आल्यानं… सगळ्या सामानाबरोबर ट्रंक खाली आली. एकदम वाटलं काय करावं हिचं!! १९४७ ते २०२२!! बापरे!! अम्रुत महोत्सव की हिचा. ७५ वर्षांची झाली ही… जरा जास्त गंज धरला होता… झाकण जरा वाकडं झालं होतं… पण बरीचशी होती तशीच होती. भंगारात देण्याचा प्रश्नंच नव्हता. कराचीपासून या क्षणापर्यंत तिनं सोबत केली. केवढा काळ, केवढी स्थि्त्यंतरं, सभोवती कायकाय बदलतांना पाहिलं हिनं…. त्या ट्रेन प्रवासात ती पण भेदरली असेल मालकासारखी? पण तिनं साथ सोडली नाही हे मात्र नक्कीच…..
एकदम मनात आलं हिला चांगली घासूनपुसून लख्खं करावी. सुंदरसा मेटल स्प्रे कलर करावा आणि नव्या रुपात, ऐटीत, समाधानानं, क्रुतज्ञतेनं माळ्यावर नाही तर अगदी बैठकीत सन्मानानं ठेवावं हिला. तिचा गौरव करावा. मग शोध घेतला. पर्याय सापडला आणि ती गंजलेली, S. M. Joshi Karachi नावाची पेटी गेली पुढच्या रुपांतराला…. १०/१२ दिवस झाले. आणि नीतळ, झुळझुळीत, सिल्व्हर कलरची ट्रंक घरी आली. मुलांना या उद्योगातलं काहीच माहिती नव्हतं… पण त्या काळ्या ट्रंकेचा हा सुखद कायापालट भावला सगळ्यांना…. त्यांच्या आजीआजोबांची ती आठवण अधिक सुंदर होऊन अगदी हॉलमधे विराजमान झाली आहे. जणू आम्ही तिचे ऋण मानले. ७५ वर्षांपूर्वी कराचीच्या तिच्या अस्तित्वानंतर आज तिला नवजीवन मिळालं.
आता माझ्या शोभेच्या नाजुक वस्तू, फुलांचे हार, तोरणं, नाजुक पणत्या, यांना छान जागा मिळाल्येय त्या ७५ वर्षांच्या बुजुर्ग ट्रंकेच्या कुशीत!!!
© डॉ.माधुरी जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





