श्री मयुरेश उमाकांत डंके
☆ आपलं मूल : चतुर की रॅन्चो? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“सर, अभ्यासाला बसायलाच नको वाटतं. त्यातलं मला काही येतच नाही. आता तर परिक्षा तोंडावर आहे. काय करु, काही समजत नाही. ” बारावी कॉमर्स मध्ये शिकणारा मुलगा असं सांगताना अक्षरशः धाय मोकलून रडत होता. पालक अतिशय सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या उच्च मध्यमवर्गीय. पण मुलाच्या करिअर आणि अभ्यासाच्या बाबतीत गणित कुठंतरी चुकत होतं.
“कॉमर्स मध्ये प्रवेश घेण्याआधी कुणाचा सल्ला घेतला होता का? ” मी विचारलं.
“खास सल्ला असा काही कुणाचा घेतला नाही. पण कॉमर्स घेऊन सीए होणं हा चांगला ऑप्शन आहे, म्हणून कॉमर्स घ्यायला लावलं. ” मुलाचे वडील म्हणाले.
“घ्यायला लावलं? म्हणजे? “
“तो सीए करायला नकोच म्हणत होता. आम्हीच करायला लावलं. ” वडील.
“मला अभ्यास जमतच नाही. पाच पाच तास क्लासेस करायचे आणि अजून वरून अभ्यास करायचा, हे मला जमणारच नाही. मी आधीपासूनच सांगत होतो. पण तरीही मला जबरदस्तीनं क्लास लावला ह्यांनी.. ” मुलगा रडत म्हणाला.
“ह्याचं सगळं आईवडिलांनी ऐकायचं, तर मग एवढी एक गोष्ट आईवडिलांची ऐकली तर बिघडलं कुठं? आणि एवढं काय मोठं मागतोय मी? फक्त सीए हो एवढंच म्हणतोय ना? ” वडील म्हणाले.
“पण सीए होणं सोपं नाहीये. ” मी म्हटलं.
“बरोबर आहे ना. पण मला सांगा, तुम्ही महागडं हॉटेलिंग करता, ब्रँडेड कपडे घालता, दोनशे रुपयांच्या खाली पेन वापरत नाही, वरून पुन्हा आठवड्याला दीड हजार रुपये पॉकेटमनी घेता. ते काय सगळं फुकट येतं का? ही सगळी छानछोकी बाप देतोय ना, ती देण्याची ऐपत कमावणंसुद्धा सोपी गोष्ट नाहीय. ” वडील म्हणाले आणि मग प्रकरण अजूनच ताणलं गेलं. वाद अगदी टिपेला गेला. त्यावेळी दोघांना शांत करून मी पाठवून दिलं आणि दोन दिवसांनी फक्त वडिलांनाच बोलावलं.
“सीए होण्याचं सोडा, आधी बारावी मध्ये पास व्हायचं बघावं लागेल. ” मी म्हटलं.
“असं कसं? आम्ही त्याला क्लासेस तर सगळे लावले आहेत. ” वडील म्हणाले.
“मान्य. पण क्लासेस लावून हा प्रश्न सुटत नाही. त्याचा बेसिक प्रॉब्लेम निराळाच आहे. “
“काहीही प्रॉब्लेम नाहीये त्याला. फक्त निवांत बसून खायचंय आयुष्यभर. बाप कमावतोय ना? मग जगा त्याच्या जीवावर आणि मजा मारा.. ” वडील वैतागून म्हणाले.
“तसं माझं मत नाही. सतत अभ्यास कर म्हणून सांगणं आणि अभ्यास कुठल्या पद्धतीनं, कुठल्या तंत्रानं कर याविषयी शिकवणं ह्या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. तासनतास अभ्यास केला म्हणजे सगळंच आलबेल असतं, असं नसतं. ” मी त्यांना म्हटलं.
आम्ही बरीच चर्चा केली. त्यातून त्यांना त्याचं गांभीर्य लक्षात आलं असावं. त्यांनी मुलाला आमच्या “साधना” शिबिराला पाठवायचं ठरवलं. पण एकाचवेळी संताप, मनस्ताप आणि मुलाचं पुढचं सगळं भवितव्य अधांतरी दिसत असल्यानं अत्यंत अस्वस्थ झालेलं एका बापाचं मन मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहत होतो.
त्यांचंही चूक नाही म्हणा. सतरा-अठरा वयाच्या मुलाचं शिक्षण किमान बारा वर्षं तरी झालेलंच असतं. बारा वर्षं हा काही कमी काळ नाही. एवढ्या मोठ्या काळात, चांगल्या शाळेत घालून, चांगल्या ट्युशन्स लावूनसुद्धा मुलाची अभ्यास करण्याची पद्धतच अजून म्हणावी तितकी चांगली नाही म्हणजे काय? पालकांना असं वाटणं अगदी स्वाभाविक असतं. कित्येकांना तर अभ्यास कौशल्य आणि परीक्षा कौशल्य हे तर फॅड वाटतं.
पण तसं नाही. हे फॅड नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातली माणसं बघा, त्या क्षेत्रात चांगलं, वेगवान, अचूक काम करण्यासाठीची त्यांची स्किल्स वेगवेगळी असतात. मग ते एखाद्या भेळवाल्याचं कांदा कापण्याचं स्किल असो, माडावरून नारळ उतरवणं असो, एखाद्या महागड्या सिल्क साडीला इस्त्री करणं असो किंवा तंदूर भट्टीवर काम करणं असो.. कौशल्य तर आहेच.
आपण बऱ्याचवेळा कौशल्य या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावतो आणि तिथंच फसतो. कौशल्य म्हणजे कमीतकमी वेळात जास्तीत जास्त काम करणं, असं आपल्याला वाटतं. पण तसं नाही. कौशल्य म्हणजे एखादं काम इतरांपेक्षा अत्यंत उत्तम आणि अचूक करण्यासाठीचं स्वतःची अशी खास शैली विकसित करणं. त्यासाठी गती हवी, शक्ती हवी, बुद्धिमत्ता हवी, योग्य मार्गदर्शन हवं, शिस्त हवी, सातत्य हवं आणि निरंतर सराव हवा. गती, शक्ती, बुद्धी, मार्गदर्शन, शिस्त, सातत्य आणि सराव या सातही गोष्टींचा एकत्र समन्वय साधल्याशिवाय कुठलंच कौशल्य कोणत्याही माणसात विकसित होऊच शकत नाही. जेव्हा या सातही गोष्टी एकत्र साधल्या जातात तेव्हा त्या कृतीमध्ये एक निराळं चैतन्य येतं, ती गोष्ट इतरांपेक्षा अत्यंत उत्तम होते, इतरांपेक्षा तिची गुणवत्ता वाढते आणि अर्थातच त्या व्यक्तीचा आत्मविश्र्वासही वाढतोच. आपल्याला असं वाटत असतं की, अशी कुशल माणसं त्यांच्या गोष्टी किती सहजपणे आणि बिनकष्टात करतात, पण तसं नसतं. कष्ट तर करावेच लागतात. पण कष्टांचे डोंगर उपसणं आणि योग्य दिशेनं कष्ट करणं यामध्ये खूप फरक असतो.
आता नेमकं इथंच आपल्या मुलांचं अभ्यास प्रकरण फसतं. केवळ शाळा, कॉलेज, क्लासेसना गेलं म्हणजे अभ्यास होतोच, असं कुणाला वाटत असेल तर तो मोठा गैरसमज आहे. जोपर्यंत अत्यंत शिस्तबद्ध आणि योग्य पद्धत वापरुन सराव होत नाही, तोपर्यंत चांगला अभ्यास होऊच शकत नाही.
केवळ शिकलेलं लक्षात राहणं म्हणजे अभ्यास असं अनेकांना वाटतं. पण तोसुद्धा असाच मोठा गैरसमजच आहे. मला चित्र कसं काढायचं हे माहिती असलं म्हणजे उत्कृष्ट चित्र काढता येईलच असं नाही. एखादी रेसिपी तोंडपाठ केली म्हणजे तो पदार्थ अत्यंत उत्तम जमेलच, असं नाही. वर्षानुवर्षं आपल्या घरात तयार होत असूनही आपल्याला एखाद्याच्या हातचीच चकली आवडते, एखाद्याच्या हातचेच गुलाबजाम आवडतात. साधी भेळ खाण्यासाठीसुद्धा आपण ठराविक भेळवाल्याकडेच जातो. कपडे शिवायला टाकण्यासाठीचा आपला टेलर ठरलेला असतो. घरच्या कार्यक्रमांमध्ये फोटो काढणारा फोटोग्राफर ठरलेला असतो इथपासून ते मेंदी कुणाकडून काढून घ्यायची हेही ठरलेलं असतं.
या सगळ्या व्यक्तींमध्ये एक समान धागा असतो. तो म्हणजे त्यांच्या त्यांच्या कामातलं त्यांनी प्राप्त केलेलं गुणवान कौशल्य. “मी आठ दिवस सँडविच च्या स्टॉलवर उभा राहिलो ना, तर मी ह्याच्यापेक्षा सुद्धा भारी करुन दाखवीन” हे म्हणणं सोपं असतं. पण ते जमणं कठीण असतं. झाकीरभाई जगात भारी तबला वाजवतात यात शंकाच नाही. पण त्यांच्या वादनाला शोभेल असा तबला तयार करणं, हेही सोपं काम नसतं. चार चार रिबाँड स्ट्रोक्स अगदी लिलया बसतील असा कॅरमबोर्ड तयार करणं प्रत्येकालाच जमत नाही.
आता काळानुसार शैक्षणिक अभ्यासक्रम बदलले आहेत, बहुतांश अभ्यासक्रमांसाठी निरनिराळ्या प्रवेशपरीक्षा आल्या आहेत, त्यांचेही अभ्यासक्रम आहेत आणि वेगळ्या परीक्षापद्धती आहेत. त्यात यश मिळवणं गरजेचंच आहे. नुसत्या पाठांतरावर, वाचनावर किंवा लिखाणावर ते शक्यच नाही. मग एकाचवेळी नियमित अभ्यास आणि प्रवेशपरीक्षेचा अभ्यास हा तोल सांभाळायचा कसा? त्यासाठीच हवं अभ्यास कौशल्य आणि परीक्षा कौशल्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण..
मानसतज्ज्ञ मयुरेश डंके आणि पूर्वा डंके यांचं “साधना” हे कौशल्य शिबिर गेली २० वर्षं झाली, शेकडो विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षा कौशल्यांचं प्रशिक्षण देतंय. विशेष म्हणजे, साधना शिबिरातलं एकही अभ्यास कौशल्य किंवा परीक्षा कौशल्य अन्यत्र कुठंही सापडतही नाही आणि शिकवलंही जात नाही. कारण, यातलं प्रत्येक कौशल्य त्यांनी स्वतः संशोधन करुन विकसित केलेलं आहे. प्रत्येक विषयच नव्हे तर, प्रत्येक धड्याच्यानुसारसुद्धा अभ्यासाची तंत्रं त्यांनी आखली आहेत. त्यांची कुठलीच अभ्यास पद्धत गूगलवर सुद्धा सापडत नाही. त्यामुळं, हे खऱ्या अर्थाने अत्यंत वेगळं आणि आपल्या मुलांसाठीचं मूलभूत आवश्यक प्रशिक्षण आहे.
दरवर्षी हे शिबिर २७ ते ३१ डिसेंबर या काळात पुण्यात सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी होतं. हे पूर्णवेळ निवासी शिबिर असतं. सगळ्या मुलांची राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय असते. चार दिवसांच्या या प्रशिक्षणात मुलांसाठी एकूण २३ सेशन्स असतात, सरावाची सत्रे वेगळी असतात. पालकांसाठी स्वतंत्र सेशन असते. यावर्षी पालकांसाठी एकूण चार सेशन्स असणार आहेत. शिबिरासाठी विद्यार्थीसंख्या खूपच कमी असते. केवळ २५ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येतो.
दोन महिन्यांवर बोर्डाची परिक्षा आलेली असताना शून्य अभ्यास झालेला हा मुलगा जून महिन्यात मात्र आनंदानं नाचत पेढे घेऊन आला. ज्या परीक्षेत नापास होण्याची त्याला पूर्ण खात्री होती, त्याच परीक्षेत त्यानं ८३% गुण मिळवले होते. सगळा “साधना” शिबिराचा परिणाम..! आपल्या देशातली शिक्षणव्यवस्थाच अशी आहे की, मुलांना स्वतःला एकाचवेळी विद्यार्थी आणि मार्कार्थी असं दोन्हीही घडवावं लागतं. आणि “साधना” मध्ये ते काम अगदी परफेक्ट होतं..!
यशाची कथा आपोआप लिहिली जात नाही, त्यासाठी कौशल्य लागतं, हे मात्र खरं..!
©️ श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





