श्री मकरंद पिंपुटकर
☆ मोरुचा पापा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
काल एका कामासाठी मी माझ्या गावी – उंबरगावला आलो होतो, मित्राकडे उतरलो होतो आणि आत्ता आज सकाळी त्याच्यासोबत त्याच्या घरून निघालो होतो.
निघताना, चेष्टेत मी त्याला विचारलं, “मोरुचा पापा” घेतलास ना रे? ”
त्याचा चेहरा पडला, मला जवळजवळ खेचतच तो म्हणाला, “आधी इथून निघू या, मग तुला सांगतो. “
मी काय विचारत होतो ते तुला बहुधा कळलं नसावं, म्हणून मी त्याला समजावत म्हणालो, “अरे, हा खूप जुना शब्द आहे. मो – रु – चा – पा – पा म्हणजे मोबाईल, रुमाल, चावी, (रेल्वे / बसचा) पास, पाकीट – हे सगळं घेतलंस ना, एवढंच विचारत होतो मी !”
माझं एवढं बोलणं होईपर्यंत, लिफ्टने आम्ही इमारतीच्या तळमजल्यावर आलो होतो, आतापावेतो तो थोडा relax झाला होता. म्हणाला, “अरे हो, मला ठाऊक आहे मोरुचा पापा म्हणजे काय ते. मोबाईल येण्यापूर्वी यालाच पेरूचा पापा म्हणत – पे म्हणजे पेन अशा अर्थाने. पण, तू हा प्रश्न विचारलास तेव्हा बायको जवळच होती, तिने माझ्या विसरभोळेपणाबद्दल प्रवचन दिलं असतं, आणि मोरुचा पापा काय, मीच कसा मोरू आहे हे तुला सांगितलं असतं, म्हणून मी तुला तिथून अर्जंट बाहेर काढलं. “
त्याच्या या स्पष्टीकरणाने मी आणखीनच गोंधळात पडलो. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो मला समजावून सांगू लागला.
– – “गेल्या वर्षीची गोष्ट. कंपनीच्या कामासाठी मला मुंबईहून विमानाने चेन्नईला जायचे होते. (उंबरगाव हे पश्चिम रेल्वेवर, मुंबई अहमदाबाद रेल्वेमार्गावर गुजरातमधील पहिले रेल्वे स्टेशन आहे. मुंबईपासून साधारण १५० किलोमीटर दूर) महत्त्वाचे presentation होते आणि साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली होती.
मुंबईहून सकाळी ११:३० ची फ्लाईट होती, उंबरगावहून सकाळी ६ वाजताच्या वलसाड पॅसेंजर ट्रेनने निघावे लागणार होते, म्हणजे ८:३० पर्यंत बोरिवली णि तिथून रिक्षाने विमानतळ गाठायचा होता.
झ्या बायकोला एक चांगली सवय आहे. मला असं लवकर निघायचं असलं की, सकाळच्या घाईगडबडीत काही राहायला नको म्हणून, आदल्याच दिवशी, माझी बॅग भरून ती दाराशीच ठेवते. त्याप्रमाणे तिने माझ्या दोन्ही बॅग्स दाराशीच ठेवल्या होत्या. एक लॅपटॉपची बॅग – ज्यात विमानाचे तिकीटही होते आणि दुसरी बॅग – जिच्यात माझे कपडे, कंपनीची कामाची कागदपत्रं होती. कंपनीने मला हातखर्चासाठी पन्नास हजार रुपये रोख देऊन ठेवले होते, तेही याच दुसऱ्या बॅगेत होते.
सकाळ झाली. मी आन्हिके आटोपून, बायकोने दिलेला गरमागरम चहा पिऊन निघालो. स्टेशनला पोचलो, दहा पंधरा मिनिटांत गाडी आली, बसायला जागा मिळाली, स्थिरस्थावर झालो, गाडीने वेग पकडला, आणि… ” मित्र सांगताना थबकला, आत्ताही हे सांगताना त्याच्या कपाळावर घाम आला होता.
“… आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या हातात फक्त लॅपटॉपचीच बॅग आहे, माझी कपड्यांची दुसरी बॅग माझ्याकडे नाहीये. मला दरदरून घाम फुटला. मी घरून तर दोन्ही बॅगा घेऊन निघालो होतो. का दुसरी बॅग घरीच राहिली होती?
मी बायकोला फोन लावला. थंडी होती, आज कामाची काही धावपळ नसल्याने ती पांघरुणात मस्त गुरफटून झोपली असणार, झोपमोड केल्याबद्दल ती रागावणार हे ठाऊक होतं, पण पर्याय नव्हता, मी तिला फोन केला.
बराच वेळ रिंग वाजल्यावर पेंगुळलेल्या आवाजात तिनं फोन उचलला. पण माझा प्रश्न ऐकल्यावर तिची झोप पार उडाली. “तू घेतल्या होत्या दोन्ही बॅगा, ” तिने ठामपणे सांगितलं, “पण, थांब क्षणभर, मी खात्री करून घेते, ” ती म्हणाली. दोन सेकंदांत ती पुन्हा फोनवर आली – इथे घरात नाहीये तुझी बॅग, तू नक्की घेऊन गेला आहेस दोन्ही बॅगा. ” तिने ठामपणे सांगितलं.
मी फोन ठेवला. डोक्यात नुसतं वादळ उठलं होतं… ती बॅग स्टेशनावरच राहिली का? का गाडीत चढताना कोणी चोरली?
सगळ्यात मोठा प्रश्न होता – आता काय करायचं? त्या दुसऱ्या बॅगेतल्या कागदपत्रांशिवाय चेन्नईतील माझी मीटिंग शक्य नव्हती. विमान पकडले नाही, चेन्नईला गेलो नाही, तरी फटके होते, शिवाय कंपनीने दिलेल्या पैश्यांचे काय? .. अनेक विचारांनी डोकं नुसतं भंडावून गेलं होतं.
एवढ्यात माझा फोन वाजला, बायकोचा फोन होता, आवाजावरून तिची झोप पूर्णपणे उडाल्याचं स्पष्ट जाणवत होतं. “बाबा रे, तुझी बॅग मिळाली. घराबाहेर लिफ्टसमोर विसरला होतास तू. ” या दोन वाक्यांव्यतिरिक्त तिला अजून बरंच काही सुनवायचं होतं, पण ती संयम बाळगून होती, हे मला जाणवत होतं.
.. माझ्या डोक्यात चक्रं फिरू लागली.
थोड्या वेळाने, ६:३० च्या सुमारास, मी ज्या गाडीत होतो ती वलसाड पॅसेंजर ट्रेन डहाणूला पोचणार होती. डहाणूला मी जर उतरलो, तर तासाभराने, ७:३० वाजता पुढची ट्रेन – फ्लाईंग राणी एक्सप्रेस येणार होती. ही गाडी अंधेरीला – बोरिवलीपेक्षा विमानतळाच्या जास्त जवळच्या स्टेशनला – सकाळी ९:१५ वाजता पोचणार होती, तिथून मला चेन्नईचं विमान पकडणं तांत्रिकदृष्ट्या तरी शक्य होतं.
मी बायकोला म्हटलं, “ती बॅग घे, रिक्षा पकड, आणि डहाणूला ये. मी फ्लाईंग राणी पकडतो आणि पुढे जातो. “
बायको निघाली. आधी आमच्या घराजवळून तिला डहाणूला जायला रिक्षा मिळेना, मग ती पहिल्या रिक्षाने “अकरा मारुती” स्टॉपला पोचली. तिथे तिला डहाणूसाठीची रिक्षातर मिळाली, तो अव्वाच्या सव्वा भाडं मागत होता, पण मौके की नजाकत देखते हुवे तिने ते भाडं मान्यही केलं. पण एवढं झाल्यावर डहाणूच्या दिशेने सुसाट निघण्याऐवजी, हातात पैसे पडल्यावर, त्या रिक्षावाल्याने मोर्चा फिरवला तो cng पंपाकडे.
तिकडे बायको आणि इकडे मी घड्याळावर नजर खिळवून होतो. रिक्षा एकदाची आता डहाणूच्या दिशेने निघाली होती. दरम्यान मी आमच्या कंपनीतल्या डहाणूला राहणाऱ्या राजूला फोन केला. त्याला थोडक्यात हे सगळं सांगितलं, आणि डहाणू रिक्षा स्टँडवर त्याला तयारीत राहायला सांगितलं.
गाडीची वेळ झाली, तरी अजून बायको आणि रिक्षा पोचल्या नव्हत्या. राजूचा मला फोन आला, तो म्हणाला, “ट्रेन आलीच तर तुम्ही चढा आणि opposite बाजूच्या दरवाज्यात येऊन उभे रहा. ”
माझी ट्रेन २ क्रमांकाच्या फलाटावर येणार होती आणि रिक्षा १ क्रमांकावर. नियमानुसार राजूने जिने चढून २ क्रमांकाच्या फलाटावर येणं अपेक्षित होतं, पण तो बहुधा रुळांवरून उड्या मारून येणार होता.
इकडे फलाटावर गाडी आली, आणि तिकडे रिक्षा डहाणू स्टेशनच्या स्टँडवर शिरली. राजूचा मित्र तिथे तयारीत उभा होताच. रिक्षा थांबण्यापूर्वीच त्याने बायकोकडून बॅग ताब्यात घेतली आणि तो फलाटाकडे धावला. इकडे मी ट्रेनमध्ये चढून दरवाज्यात येऊन उभा राहिलो.
राजूने बॅग घेतली, फलाटावरून रेल्वे रुळांवर तो झेपावला, गाडी हलली होती, बॅग उंचावत तो माझ्या दाराकडे आला, मी बॅग ताब्यात घेतली आणि सुस्कारा सोडला.
मी आत येऊन जागेवर बसलो, पाच मिनिटं झाली तरी माझ्या छातीत अजून धडधडत होतं. श्वास थोडा नियमित झाल्यावर मी आधी बॅग तपासली. पैसे, कागदपत्रं सगळं व्यवस्थित होतं. मी बायकोला फोन लावला.
ती अजून घुश्श्यात होती. दोन मिनिटं तिनं आधी तिची सगळी भडास काढली, आणि शेवटी म्हणाली, “आता यापुढे तू, तुझी बॅग आणि तुझा विमानप्रवास याबाबत पुन्हा फोन केलास, तर मी काही तो फोन उचलणार नाही. “
तर अशी ही माझ्या विसरभोळेपणाची कथा. तू तो मोरूच्या पाप्याचा प्रश्न विचारून जखमेवरची खपलीच काढत होतास, म्हणून तुला मी घाईगडबडीनं बाहेर काढलं. “
तो सांगत होता, मी त्याचा चेहरा पाहत होतो, आणि खरंच, तो आत्ता अगदी मोरूच दिसत होता.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




