सौ राधिका भांडारकर
☆ माझी जडणघडण… भाग – – ७७ / २ – ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
ग्रँड कॅन्यन.
(साधारण एक तासाची ही भूगर्भीय सफर होती. आम्हाला दुपारी सव्वा बाराची वेळ मिळाली. इथेही वेळेत एक तासाचा फरक आहे. एक तासाने हा परिसर मागे आहे.
आम्ही तिथल्या गिफ्ट शॉपमध्ये काही खरेदी करण्यात वेळ घालवला)
इथून पुढे —
ही सफर अवघड, साहसी असणार याची कल्पना होतीच. संपूर्ण पायी सफर होती. आमच्याबरोबर टुर गाईड होता. आम्हाला सफरपूर्वी अनेक सूचना दिल्या गेल्या. कुठल्याही सॅक्स, काठी कॅमेरा बरोबर नेता येणार नव्हत्या. मोबाईलला परवानगी होती.
आमचा दहा बारा जणांचा गृप होता. काही वृद्ध ही होते.
अमेरिकन, जपानी चायनीज सारेच होते. मी सर्वात ज्येष्ठ असेन. पण ही सारी मंडळी अतिशय सहकार्य देणारी होती.
सर्वांच्या मनांत एकच स्वप्न होतं, या जमीनीच्या पोटात दडलंय् तरी काय? हे बघण्याचं..
अक्षरश: आम्ही धरतीच्या उदरात चाललो होतो. अतिशय
सरळ अशा शिड्या होत्या. सांभाळून उतरावे लागत होते.
असे सहा टप्पे आम्ही उतरलो. सातवा फारच कठिण होता. भूमिकन्या सीतेची मला आठवण झाली. धरतीने तिला जसे कुशीत घेतले तसे ती आम्हालाही घेत होती.
आता आम्ही प्रत्यक्ष कॅन्यनजवळ पोहचलो. आणि जे नजरेला दिसलं ते या दोन डोळ्यात मावणारं नव्हतंच. अरुंद, चढउताराची, वालुकामय अशी पायवाट तुडवत आम्ही त्या भूगर्भातल्या खिंडीत चालत होतो.
कुंभाराने बनवलेल्या मडक्यासारखं ते अनंत आकार घेउन
पसरलेलं होतं. धरतीच्या वर एका बाजूला या कॅन्यनचं
उघडं द्वार होतं. तितपर्यंत आम्हाला जायचं होतं. बाहेर येण्याचा रस्ता फक्त तोच होता. आता no come back.
चालायचे. वळसे घेत. बघत बघत. वरुन सूर्यकिरण पाझरत होते. छाया प्रकाशाचा अत्यंत मनोरम खेळ आम्ही पहात होतो. त्या दगडांमध्ये शार्क, ईमो, सी हाॅर्सचे आकार दिसत होते. एक लेडी विथ द विंड नावाचंही शिल्प तयार झालं होतं. तिचा चेहरा आणि तिचे उडणारे केस. हे सगळं आमच्या नजरेसमोर आमचा टूर गाईड आणण्यास मदत करत होता. आणि मग “अय्या! खरंच” “ओह माय गॉड” सारखे ऊद्गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होते. ज्या वाटेने आम्ही चाललो होतो त्या वाटेवरुन पावसाळ्यात पाण्याचा प्रचंड लोट वाहतो. सगळी वाळू वाहून जाते. तेव्हां ही सफर बंद ठेवावी लागते. इथे मन्सुन एप्रील ते जुनपर्यंत असतो आणि तसंही पावसाचा नेम नसतोच. आमचे भाग्य म्हणून आम्हाला हे पहायला मिळाले. आतमध्ये चालत असताना मधून मधून आम्हाला वाळुतला ओलसरपणा जाणवतही होता.
जवळ जवळ एक दीड तासाने आम्ही धरतीच्या उदरातून बाहेर आलो. सूर्यप्रकाशात आलो. आता आम्ही जमिनीवर होतो. डोक्यावर रणरणतं ऊन होतं. पण हवेत सुखद गारवा होता.
जे पाहिलं, अनुभवलंं ते वर्णनातीत होतं.
निसर्गासमोर माणूस म्हणून जगताना मी फक्त एक कण आहे असेच वाटले.
मनोमन त्या किमयागाराला मनापासून वंदन केले.
आज आमच्या ग्रँड कॅन्यन टूरचा शेवटचा टप्पा होता.
आज आमाही सेडोना या जवळच्याच नगरीला भेट द्यायचे ठरवले.
फ्लॅगस्टाफ ते सेडोना हा एकतासाचा ड्राईव्ह आहे. म्हणजे साधारण आमच्या हाॅटेलपासून वीस मैलाचा प्रवास.
अॅरीझोना स्टेट म्हणजे जगातले एक नंबरचे वाळवंट.
रुक्ष, रेताड, रखरखीत. मात्र सेडोना हे येथील अतिशय नयनरम्य, निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे.
ड्राईव्ह अतिशय रमणीय होता. घाटातला, वळणा वळणाचा रस्ता. दुतर्फा उंच सुचीपर्णी (पाईन)चे उंच वृक्ष. आणि पलीकडे अजस्त्र कॅन्यन. अॅरीझोना म्हणजे पर्वतीय, भूगर्भीय आश्चर्यच.. आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात आम्ही पर्वत राशीवर वारा, पाणी आणि खचणार्या मातीमुळे तयार झालेली ही नैसर्गिक विवीध आकारांची लाल पांढरी कधी पिवळी अशी असंख्य शिल्पे पाहिली. आणि प्रत्येक वेळी मंत्रमुग्ध झालो. आजच्या प्रवासातही आम्ही अनेक वेळा न राहवून थांबलो. फोटो काढले. आणि निसर्गोत्सवाचा आनंद ऊपभोगला. इथेच आम्ही नवरात्री देवीची असंख्य रुपेच पाहिली जणू…
सेडोना येथील अमिताभा स्तुप आणि शांती वनाला आम्ही भेट दिली. जवळ जवळ १४एकर मध्ये वसलेलं आणि उंच उंच लाल खडकांनी वेढलेलं थंडर माउन्टनच्या पायथ्याशी असलेलं. मनाला अगाध शांती देणारं हे स्थान आहे. जेट्सुमा या न्यूयाॅर्कर लामाने ही जागा स्तुपासाठी निवडली. तिबेटीयन पद्धतीचा हा स्तुप आहे.
इथे सर्वधर्मीय लोक ध्यान धारणा (meditation) आणि प्रार्थने साठी येतात. नतमस्तक होतात.
अखंड महागनी लाकडात कोरलेली बुद्धाची मूर्ती इथे एका खडकावर स्थित आहे. ही मूर्ती इंडोनेशीयाहून या स्तुपास भेट म्हणून दिली गेली आहे. आणि जवळ जवळ ३६ फूट उंच अशी ही सुंदर मूर्ती आहे.
त्या ठिकाणी पोहचल्यावर खरोखरच माणूस हळुहळु तणावमुक्त होतो. तिथल्या वातावरणात अशी काही उर्जा आहे की सार्या चिंता, विकार झाडावरच्या पानाप्रमाणे गळून पडतात. इश्वर एक आहे, चराचरात त्याचं वास्तव्य आहे हे जाणवतं. माझ्या मनाने जो गारवा इथे अनुभवला तो शब्दातीत आहे. खरोखरच इथे मला तो भेटला. त्याच्या चरणी मी लीन झाले. एक अद्वैताचीच अनुभूती मला मिळाली…
सेडोना येथील चॅपल आॉफ होली क्राॉसला आम्ही भेट दिली. हे दुसरं भक्तीमय वातावरणाचं स्थान. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांत.
हे चॅपल कोकोनिनो नॅशनल फाॅरेस्ट लँडवर, उंच अशा टेकडीवर अतिशय सुबक पद्धतीने बांधलेले आहे. हे बांधण्यास केवळ अठरा महिने लागले. १९५६साली या चॅपलचे बांधकाम पूर्ण झाले. जवळजवळ ३००, ३०० यु एस डाॅलर्स या बांधकामासाठी लागले.
उंच गाभार्यात धातुची येशुची क्रुसावरची मूर्ती आहे.
भिंतींवर, येशूला ज्या खिळ्यांनी क्रुसावर ठोकले त्यांची प्रतिकात्मक म्युरल्स आहेत. शांत मेणबत्यांच्या प्रकाशात त्या मूर्तीकडे पाहताना नकळतच आपल्या कानात शब्द ओतले जातात, ” हे! प्रभु! यांना क्षमा कर. कारण त्यांना कळत नाही ते काय करत आहेत..! “
मन अंतर्मुख होते.
समोरच्या ऊंच लाल खडकात हातात लहानग्या येशुला घेतलेली मदर मेरी दिसते. प्रार्थनेसाठी उंचावलेले भक्तीमय करांचे दर्शन होते…
सारेच अलौकिक. कल्पनेच्या पलीकडचं. सूक्ष्मतेतून विशालतेकडे नेणारं.. द्वैतातून अद्वैताकडे जाणारं..
परमात्म्याची वाट दाखवणारं.
सेडोना मधल्या लाकीपाकी या आर्ट्स आणि क्राफ्ट विलेजला आम्ही भेट दिली. हे एक कलाकार आणि त्यांची कलाकारी प्रस्तुत करणारं, ओक क्रीकच्या किनारी वसलेलं असं देखणं गाव. सुंदर पायवाटा, कारंजी, विवीध रंगांची फुलझाडे, कलात्मक रितीने रंगवलेल्या भिंती पाहताना खूपच मजा वाटत होती. इथे पन्नास पेक्षा अधिक दुकाने आहेत. विवीध कलात्मक वस्तुंचे सुंदर प्रदर्शनच म्हणा ना.
अनेक क्युझीनची रेस्टारंट्स इथे आहेत. आम्ही एका मेक्सीकन रेस्टाॅरंट मध्ये दुपारचे जेवण घेतले…
किती पाहशील तू.. किती घेशील तू अशीच आमची स्थिती झाली. पाय दुखत होते. मन भरत नव्हतं. खिसाही रिकामा होत होता.. अखेर नाईलाजानेच बाहेर पडलो त्या सौंदर्य नगरीतून..
आमच्या या ग्रँड कॅन्यन सफरीतला अत्यंत आकर्षक आणि एक्सायटींग कार्यक्रम म्हणजे फ्लॅगस्टाफ शहरातील वेधशाळेची (observatory) भेट.
फ्लॅगस्टाफ हे खगोल शास्त्रज्ञांचे प्राचीन संशोधन पीठ आहे. १८९४ मध्ये ही लाॅवेल वेधशाळा स्थापीत झाली.
१९१२ साली ब्रह्मांडात होणारे बदल आणि विस्तार यांचा विस्तृत अभ्यास, संशोधकांनी या वेधशाळेत केला.
१९३० साली इथे प्लुटो या ग्रहाचा शोध लागला.
सूर्यमाला, ग्रह तारे, आकाशगंगा, आणि अंतराळ या विषयीचे संशोधन इथे सातत्याने होत असते.
तीन ते चार मीटर उंच असलेले LDT आणि DCT हे जगातील अत्यंत कार्यक्षम असे टेलीस्कोप इथे आहेत.
जगातील सर्व खगोलप्रेमी लोक इथे भेट देउन ग्रहतार्यांच्या राज्यातला आनंद भोगतात. आज आम्हीही त्यापैकी एक होतो हे अहोभाग्यम्.!! लहानपणी माझे वडील आम्हाला पहाटे किंवा रात्री खुल्या मैदानावर केवळ तारे पहायला घेऊन जात. आज जगप्रसिद्ध टेलीस्कोपमधून हे ब्रह्मांडपाहताना कोण आनंद होत होता हे कसे सांगू?
रिंग असलेला तो डौलदार शनी आणि त्याचे ८२ चंद्र तसेच केवळ वायुरुपी भला मोठा गुरु हा ग्रह आणि चार चंद्र इतक्या जवळून डोळ्यात साठवताना देवाने दृष्टी दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले….
बघावं तितकं थोडं.. लिहावं तितकं थोडं..
तर अशीही अमेरिकेतल्या अॅरोझोना राज्यातील आमची मनमौजी सफर साठा उत्तरी सफल संपूर्ण झाली.
*अद्भुत* या शब्दांचा खरा अर्थच या सफरीत मी अनुभवला असे म्हणायला हरकत नाही.
– भाग ७७ समाप्त.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



