प्रा.भारती जोगी
मनमंजुषेतून
☆ “खेळातल्या दोन चिठ्ठ्या…” – हिन्दी लेखिका / कवयित्री : अमृता प्रीतम ☆ प्रा.भारती जोगी ☆
तो सांगायचा…
ती ऐकायची.
चाललाच होता हा खेळ…
सांगण्या-ऐकण्याचा.
खेळात असायच्या दोन चिठ्ठ्या.
एका चिठ्ठीत लिहिले होते, *” बोल”. *..
आणि… दुसरीत लिहिलं होतं, ” *ऐक*”
आता हा नियतीचा खेळ म्हणावा की योगायोग? ? ?
तिच्या हाती सतत तीच चिठ्ठी येत राहिली…
जिच्यावर लिहिले होते, “*ऐक*”
मग काय…
ऐकत राहिली ती…
ऐकलं तिनं फर्मान अन् आदेश
तिनं ऐकले उपदेश! !
सगळी बंधनं तिच्यासाठी…
वर्जन, मनाई… तिलाच! !
माहित होतं तिला की…
ऐकणं-सांगणं… केवळ क्रिया नाहीत या! !
राजाने सांगितलं, ” पी हा विषाचा प्याला “…
ती *मीरा* झाली.
ऋषी म्हणाले, ” शीळा हो”…
ती *अहिल्या* झाली.
प्रभूंनी सांगितलं, ” निघून जा”…
ती *सीता* झाली.
चितेतून फुटली किंकाळी…
कुणाच्याच कानांनी नाही ऐकली.
ती *सती* झाली.
त्रिवार तलाक म्हंटलं… तर…
ती *परित्यक्ता* झाली.
तिचं म्हणणं, सांगणं… मनातच घुसमटून राहिलं.
शब्द घशातच अडकले,
ओठ जणू शिवले गेले…
हुंदके गळ्यातच दाटले.
कारण…
तिच्या हाती ; *ती* चिठ्ठी लागलीच नाही कधीच…
जिच्यावर लिहिले होते… *”बोल*”…
(अमृता प्रीतम यांच्या वह कहता था, वह सुनती थी या हिंदी कवितेचा मराठी स्वैर भावानुवाद)
अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




