श्री सुधीर करंदीकर
मनमंजुषेतून
☆ “पहाटेचे स्वप्न…” भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
आज रोजच्या प्रमाणेच सकाळी फिरायला बाहेर पडलो. बायको मुलीकडून दुपारी येणार होती, त्यामुळे बाहेरचं चहा, असा प्लॅन ठरला. फिरतांना फक्त समोर बघून चालायची रोजचीच सवय लागल्यामुळे, आज फिरतांना, जरी बायको बरोबर नव्हती, तरी मान इकडे- तिकडे फिरायला तयार नव्हती. मारुती मंदिराजवळ पोहोचलो आणि मंजूळ स्वरातली हाक ऐकू आली – काका, या चहा प्यायला, कुठे होता! आज बऱ्याच गॅप नंतर भेटताय, आमच्या मॉर्निंग वॉक मैत्रिणी मनवा – मेघना बोलवत होत्या. बाजूच्या दुकानातून लगेच चहाचे ग्लास हातात आले. गप्पा सुरु झाल्या. तेवढ्यात मनवा म्हणाली – काका, समोर भारद्वाज पक्षी बघा. आज नक्कीच काहीतरी चांगले घडणार.
मी : माझा पण हाच अनुभव आहे. आमच्या बागेत, सकाळी रोजच भारद्वाज दिसतो आणि रोजचाच दिवस छान जातो. आज तुम्ही पण भेटल्या मुळे, आज काहीतरी एक्सट्रा चांगले असणार!
मेघना : काका कंपाऊंड च्या गेटवर बसलेला भारद्वाज बघितला, तर स्वप्नामध्ये देव येतो असे म्हणतात. कधी दिसला, तर तुमचा अनुभव सांगा, आणि त्यावर लिहा.
मस्त आणि भरपूर गप्पा – टप्पा झाल्या आणि बाय करून आम्ही आपापल्या दिशेला निघालो.
आज मनवा आणि मेघना भेटल्यामुळे दिवस छान जाणारच होता, त्यामुळे भारद्वाज पक्षानी आज सुटी घेतली, तरी चालण्यासारखे होते. रोज फिरून आल्यानंतर, माझी बागेत चक्कर असते आणि तेव्हाच, चिक्कूच्या झाडावर किंवा जमिनीवर चालतांना मला भारद्वाज दिसतोच. मी लगीच बायकोला हाक मारून, पक्षी बघायला सांगतो. तिचा दिवस चांगला गेला, तरच माझा जाणार, हे पक्के असते.
आज खरोखरच भारद्वाज पक्षानी सुटी घेतली होती. उद्या सकाळी भारद्वाज नक्की गेट वर बसलेला दिसणार, हा विचार दिवसभर डोक्यात घोळत होता.
नेहेमीप्रमाणे, दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी फिरायला बाहेर पडलो. फिरून परत आलो, आणि गेटवर चक्क भारद्वाज! मी लगेच हात जोडून नमस्कार केला व त्याला थँक्स म्हणालो. बघता बघता पक्षी उडून गेला. म्हणजे आज रात्री स्वप्नात देव येणार हे नक्की.
स्वप्न पडणं, हे एक कोडंच आहे. ठरवून ती कधी पडत नाहीत आणि न ठरवून ती थांबत पण नाहीत. स्वप्न सुंदर असेल, का भयदायक असेल, का असंबध्द असेल, हे पण आपल्या हातात नसतं. काहीही असो, पण आज रात्री स्वप्नात देव येणार, हा विचार दिवसभर मनात डोकावत होता. नेहेमीप्रमाणे रात्री ११ ची गाणी ऐकता ऐकता, केंव्हा झोप लागली, ते समजलेच नाही.
कुणीतरी मला झोपेतून उठवत होतं, असं मला जाणवलं. कुणीतरी प्रेमानी हाक मारतंय, असं वाटलं आणि मी उठलो. बघतो तर समोर साक्षात परमेश्वर. मी लगेच उठून देवाला नमस्कार केला.
मी : देवा, तुम्ही मला सगळ्याच आवश्यक गोष्टी भरभरून दिल्याबद्दल, मी तुमचे खूप खूप आभार मानतो. तुमची कृपा सगळ्यांवर कायम असू द्या.
देव : मी समोर न दिसता सुद्धा, लोक माझ्या मूर्तीसमोर उभे राहून, मागण्यांची यादी वाचत असतात. आणि मी तुझ्या समोर असूनही, तू काहीच मागत नाहीस! चल माग, काय काय पाहिजे?
मी : मला खरोखरच काहीही नको. ज्यांना खरी गरज आहे, त्यांनाच माझ्याऐवजी द्या!
देव : अरे तुझ्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे दोन दोन – तीन तीन फ्लॅट्स आहेत, परदेशी गाड्या आहेत. तू अजूनही वडिलांनी ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या घरात राहतोस, भारतीय छोटी कार वापरतो. माग, तुला मागायला खूप स्कोप आहे.
मी : मला खरंच काहीही नको, सगळं मस्त चाललंय.
देव : तुझ्या मनात काहीतरी मागायचे आहे, हे नक्की. पण, मागू का नको असं तुला होतंय!
मी : देवा, तुमच्यापासून काहीच लपू शकत नाही, हेच खरं. खरंच मागू का?
मी : रोज दिवसभरात, खूप मनाला खटकणाऱ्या गोष्टी घडत असतात. त्या सुरळीत करता आल्या, तर सगळ्यांचेच जीवन आनंदाचे होऊ शकेल. रस्त्यावरची जीवघेणी वाहतूक, भ्रष्टाचाराच्या घटना, अन्नपदार्थ – औषधे यामध्ये भेसळ, पैशांकरता आणि फॅशन च्या नावाखाली नट – नट्यांनी आणि सगळ्यांनीच सुरु केलेले अंग प्रदर्शन आणि त्याचे दुष्परीणाम, स्त्रियांवर वाढणारे अत्याचार, टीव्ही / मोबाईलचा अतिरेक आणि मुलांवर त्याचे दुष्परिणाम, अशी बरीच मोठी यादी आहे.
देव : तुझे म्हणणे अगदी रास्त आहे. मी मनुष्याला बुद्धी दिली आहे. काय चांगले – काय वाईट हे त्याला समजते. तुम्ही लोक बुद्धी गहाण ठेवता. मी आणि माझे, यातंच तुमचं आयुष्य खर्ची पडतं, मी यात काय हस्तक्षेप करणार! आणि हे कलियुग सुरु आहे, यामध्ये, या अशा गोष्टी घडणारच. माझा पुढचा आणि शेवटचा ‘कल्कि’ हा अवतार आहे, त्याचाच हा पूर्व रंग आहे, असे पण सांगता येईल.
मी : सगळे लोक नेमून दिलेले कायदे कानून पाळतील, एवढा जरी धाक तुम्ही निर्माण केला, तर सगळेच आनंदात राहू शकतील.
देव : ठीक आहे. आपण एक एक विषय घेऊ.
तुझ्या यादीतला पहिला विषय घेऊ – जीवघेणी वाहतूक. याकरता मी काय करायचे, ते तू मला सांगायचे. कुठलेही कायदे – कानून मोडता कामा नयेत, जे चांगल्या मार्गानी जात आहेत, त्यांना त्रास होता कामा नये. योजलेले उपाय, योग्य जागी चिमटा बसेल इतपतच कठोर असावेत.
‘जीवघेणी वाहतूक’ याकरता मी काय करावे, ते एका कागदावर लिही आणि कागद घडी करून झोपताना देवघरात ठेव. मला सगळे मुद्दे पटत असतील, तर सकाळी तुला कागद उघडलेला दिसेल व त्याच दिवशी, सकाळ पासून माझी कार्यवाहीची पूर्वतयारी तुला दिसेल. आणि नंतरच्या दिवशी, सकाळी ८ वाजता अंमलबजावणी सुरु होईल. फक्त एक महिना असे सुरु राहील.
जर लिहिलेले मुद्दे मला पटले नाहीत, तर कागद बाजूला केलेला दिसेल. तुला पुन्हा वेगळे लिहावे लागेल. गुड नाईट अँड गुड मॉर्निंग.
सकाळी नेहेमीप्रमाणे रात्रभर सुरु असलेल्या रेडिओ स्टेशन च्या मंजुळ स्वरांनी मला जागे केले. आज एकदमच फ्रेश वाटत होते. सकाळी बागेत भारद्वाज पक्षाचे दर्शन झाले. दिवस मस्त गेला.
देवाबरोबर बोलणे झाले त्याप्रमाणे जीवघेणी वाहतूक सुरळीत होईल याकरता देवाने काय काय करावे हे मुद्दे मी लिहून कागद तयार केला आणि झोपण्यापूर्वी तो कागद देवघरात ठेवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. देवघरात जाऊन बघितले, तर ‘अहो आश्चर्यम्’. कागद उघडलेला होता. म्हणजे देवाला मी लिहिलेले सगळे मुद्दे पटले आहेत. मी खूप खुश झालो.
सकाळचा चहा घेऊन आम्ही फिरायला बाहेर पडलो. सिटी मल्टिप्लेक्स वरुन, पुढे मेन रोडवर आलो. नेहेमी सगळ्याच रस्त्यांवर विविध पक्षांचे अभिनंदनपर होर्डिंग असतात / वाढदिवसाचे होर्डिंग असतात, जाहिरात करणारे होर्डिंग असतात. कार्पोरेशन अधून मधून होर्डिंग काढण्याची कारवाई करत असते. पण पुन्हा होर्डिंग आपापल्या जागेवर येतच असतात. आज सगळी होर्डिंग जागेवरच होती, पण त्यावरचा सगळा मजकूर रातोरात बदललेला होता. सगळ्यांवर वाहतुकीविषयी माहिती दिसत होती, वाहतुकीचे नियम दिसत होते. एका मोठ्या होर्डिंग वर मजकूर असा होता —
रस्त्यावर आलेल्या सगळ्यांचेच स्वागत. पादचारी आणि वाहनचालक या सगळ्यांचेच जीव मोलाचे आहेत. रस्त्यावर असेपर्यंत, तुमची सुरक्षा, ही जबाबदारी आमची आहे. वाहतुकीचे नियम हे सगळ्यांवरच १०० टक्के बंधनकारक राहतील. नियम अगदीच मोजके आणि सोपे आहेत. नियम लक्षात कसे ठेऊ, असे टेन्शन घेऊ नका. रस्त्यांवरची सगळी होर्डिंग यापुढे फक्त वाहतूक नियम दाखवतील. इतर जाहिराती करण्याकरता, इतर माध्यमे वापरली जातील.
वाहतूक नियम —
१) लाल – हिरवा दिवा ‘थांबा’ आणि ‘जा’ सांगतो. ते पाळा
२) दाखवलेली स्पीड लिमिट बंधनकारक आहे. लिमिट ३० असेल तर वेग +/- ५ एवढाच चालेल.
३) रस्त्यावर वेडी वाकडी गाडी चालवू नका
४) झेब्रा मार्किंग वर वाहने थांबवू नका. अलीकडेच / मागेच थांबवा
५) गाडी चालवतांना मोबाईलवर बोलू नका
६) फुटपाथवर वाहन चालवू नका
७) रस्त्यांवर उलट दिशेनी वाहन चालवू नका
८) स्वतःच्या डोक्याची काळजी वाटत असेल तर हेल्मेट वापरा – सीट बेल्ट वापरा.
काही लोकांना होर्डिंग मधला हा बदल लक्षात आलेला दिसत नव्हता. पण काही ठिकाणी घोळके जमायला लागले होते. थोडं पुढे गेल्यावर एलबीएस रोड लागला. ठिकठिकाणी स्पीड लिमिट ३० किमी असे बोर्ड दिसत होते.
– क्रमशः भाग पहिला
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





