संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “उंच उंच उडतांना…” ☆ संध्या बेडेकर ☆

 ” Exclusive category च्या मुलांसमोर असलेले challenges. “

काल ताईचा फोन आला. म्हणाली, अग! आमंत्रण द्यायला फोन केलाय. उद्या अजयच्या नवीन घराची वास्तुशांत आहे. तेंव्हा तुम्ही सर्व सादर आमंत्रित आहात. जरा लवकरच ये ग.

मी म्हंटले अरे व्वा!! अभिनंदन!! खूप आनंदाची गोष्ट. आम्ही नक्की येणार. कुठे घेतलंय ग नवीन घर???

ताई म्हणाली अग! ‘प्रभात रोड’ वर. पेंट हाऊस घेतलय. चांगल मोठं घर, चार बेडरुम चे आहे

मी म्हटलं अरे व्वा!!! मस्तच.

माझ्या डोळ्यासमोर ताईची आधी ची दोन मुंबईची घर, एकानंतर एक आली. तसेच अनिता, ताईची एकुलती एक सून व तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी. त्यांची पण दोन घर नागपुरात आहेत म्हणे. आणि आता हे पाचवे घर पुण्यात, तेही ‘प्रभात रोड’ वर. व्वा मस्तच!! .

अजय, ताईचा एकुलता एक मुलगा. अजय आणि अनिताची पण एकच मुलगी ‘अनघा ‘.

म्हणजे जेवढी माणसे घरात, तेवढीच घर. ‘Per head one house’. असा तो हिशोब आहे.

मी स्वतः शीच हसले.  हे म्हणाले,  अगं! काय म्हणाल्या ताई??

मी म्हंटले,  अहो, वास्तुशांती चे आमंत्रण आले आहे. अजयने नवीन घर घेतलय.  आमच्या चेहऱ्यावर आनंद, व कौतुक तर होतेच, बरोबर मनात अनेक प्रश्न एकानंतर एक आले.

मी स्वतः शीच बोलले,  आपल्या वेळेस लग्नात आम्ही पांच साड्या देऊ. अशा गोष्टी होत असत.  आता अनघाच्या लग्नात आम्ही पांच घर देऊ अशा गोष्टी होतील का?? गोष्टी जरी नाही झाल्या, तरी हिशोब करताना हा विचार मनात येणारच.  आणि मुलगा पण असाच मिळाला, ‘एकुलता एक ‘व त्यांच्या घरी पण असंच ‘status’ असलं तर ‘अनघा व Mr X ‘ यांची एकुण दहा घर असतील. आणि याच status चा मुलगा मिळायची शक्यता जास्त आहेच.

खरं तर हे मुलांचे भाग्य आहे. त्यांच्या आजी आजोबांचे कष्ट. नंतर त्यांच्या आई-वडीलांचे कष्ट. उच्च शिक्षित आई-वडीलांनी आपल्या मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे साम्राज्य उभं केले आहे. त्यांनी हे सर्व कमवले आहे. व मुलांना नशीबाने मिळाले आहे.

अनघाच्या पिढी ला सर्व ऐश्वर्य सहज मिळाले आहे.

आपल्या पिढी ने काटकसर करून एकेक गोष्ट/ वस्तू जमविली. पगार कमी असायचे. घरात मुलांची संख्या जास्त असायची. त्यामुळे काहीही घ्यायचे म्हणजे आधी’ planning ‘करावे लागायचे. आता हे घ्यायचे. पूढच्या वेळेस पैसे जमले की, मग आपण डायनिंग टेबल घेऊ या. हळूहळू एकेक सामानाची आवश्यकतेनुसार लिस्ट बनत गेली. व वस्तू घरात येत गेल्या. प्रत्त्येक वेळी किती आनंद होत होता. जेंव्हा आपण फ्रिज घेतला, तेंव्हा तर आनंदाला पारावार नव्हता. सर्वांना सांगुन झाले. आईला पत्रात सविस्तर कळविले. त्या दिवशी आपली आता श्रीमंत लोकांत गणना होणार का?? असा पुसटसा विचार मनात येऊन गेला. त्यांनंतर स्कूटर, वाशिंग मशीन, microwave व इतर अनेक गोष्टी घरात येत गेल्या व हळूहळू आम्ही श्रीमंत होत गेलो. प्रत्त्येक येणाऱ्या वस्तू ने आम्हाला खूप आनंद दिला. एवढे पैसे आपण खर्च करू शकलो याचा अभिमान वाटत असे. हळूहळू आयुष्याचा ग्राफ वर जात होता. व त्याबरोबरच समाधान, आनंद होत होता. आयुष्यातील या घटना मनावर कोरल्या गेल्या आहेत. आजही कितीदा तरी आम्ही घरचे सर्व एकत्र बसलो, तर या सर्व गोष्टींची चर्चा होते. व तेवढाच आनंद आजही होतो.

एवढे सर्व विचार मनात आले. केसेट rewind झाली. घर घेणे  म्हणजे तर कितीदा तरी पैशाचा हिशोब झाला. हप्ता कसा भरायचा??? यावर चर्चा झाली. आता नको, पूढच्या वर्षी बघूया. असं करत करत शेवटी हिम्मत करून एक फ्लॅट घेतला.

या सर्व विचारांचा अजयच्या नवीन घरातल्या वास्तुशांती च्या कार्यक्रमाशी काय बरं संबंध????

मनात सहज आलं, अनघाला या लहान सहान (?? ) गोष्टींचा आनंद मिळणार नाही. कारण तिच्या समोर परिस्थिती वेगळी असेल. त्यांचे विश्व वेगळेच असेल. सर्व महागाच्या वस्तू ज्या बहुतेक आम्हाला माहीत ही नाहीत त्या सर्व तिच्या घरी सहजच असणार आहैत.. कदाचित त्यांच्या लिस्टमध्ये world tour करणे, five/seven star हॉटेल मधे सहज जाणे, विमानाने प्रवास करणे, BMW घेणे, I phone, प्रत्येकाची वेगळी कार, भरपूर नोकर चाकर, अशा अनेक गोष्टी त्यांच्या जीवनात सहज असतील.

पैशाचा हिशोब करावा लागणार नाही.  मनात आलं आणि घेतलं. असं असेल.

पीढी दर पीढी असे बदल दिसणारच आहेत. याचे फायदे व नुकसान दोन्ही आहेत. मुलांना नशीबाने सर्व मिळत आहे. भाग्यवान आहेत. कष्टाने कमविलेल्या पैशाची किंमत असते. सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत करणे जमले पाहिजे. ऐश्वर्य टिकवता आले पाहिजे. त्यात भर घालता आली पाहिजे.

या ‘exclusive category ‘च्या आई-वडीलांसमोर ‘challenges ‘वेगळेच असतात. समोर पंचपकवानांनी भरलेलं ताट असताना मुलांना शिस्त लावायची आहे. स्वतः शिस्तीत राहुन ते शिकवायचे आहे. .

खूपदा मनात आले, खरच गरज असते का एवढ्या गोष्टीं जमविण्याची?? पण मग कमविलेल्या पैशांचे काय करायचे.???? ही अशी क्षमता प्रत्येकात असतेच असे नाही. ज्यांच्यात असते, त्यांचे ‘status’ असेच वाढत जाते. आणि त्यात चूक असे काही नाहीच.

शिक्षणाच्या जोरावर मिळविलेले साम्राज्य आहे हे. आणि शिक्षणाचा पर्याय सर्वांनाच असतो. संधी प्रत्येकाला मिळतेच. अशा गोष्टी मिळावायला भाग्य लागतच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे, म्हणजे वेळेवर कष्ट व वेळेवर बरोबर निर्णय घेता आले पाहिजे. पैशाचे ‘Investment’ बरोबर जागी करता आले पाहिजे. सवयी चांगल्या असल्या पाहिजेत.

” संघर्ष करता आला पाहिजे “.

म्हणतात ना

“संघर्ष प्रकृती का ‘आमंत्रण ‘ है ।

जो स्विकार करता है, वही आगे बढ़ता है।”

पैसे कमविणे जेवढे कठीण आहे. तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त कठीण ते टिकविणे आहे. नाही तर पैसा संपायला किती वेळ लागतो???

या पैसाचा माज डोक्यात जाता कामा नये. नाही तर राजाचा रंक व्हायला ही वेळ लागत नाही.

एक वाचलेले छान वाक्य सहज आठवलं,

“Kite gives us very good message 

Fly high but always stay connected to the ground. “

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments