डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
मनमंजुषेतून
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आम्हाला ५२ मुलं आहेत…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
– – आभाळात आपण इंद्रधनुष्य साकारू शकत नाही…
पण कोणाच्या दारात रांगोळी तर काढू शकतो…
– – आभाळात आपण फुलांची झाडं लावू शकत नाही…
पण कोणाच्या दारात फुलांचं झाड तर लावू शकतो…
फुलं एकतर आपल्या अंगणात पडतील किंवा दुसऱ्यांच्या… त्याने काय फरक पडतो…?
अंगण पाहून फुलं सुवास द्यायची थोडीच थांबतात…?
– – याच भावनेने या महिन्यात आपल्या सर्वांच्या साथीने जे काही थोडेफार जमलं ते केलं…!
आता जून महिना सुरू होईल, शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या चिमण्यांचा चिवचिवाट या मे महिन्यात माझ्या मागे सुरू झाला आहे…
अंकील, काका, मामू, बाबा, बाबू, पप्पा, डाकसाब, भाऊ, भैय्या या नावाने हाक मारत अख्खा मे महिना या पोरा आणि पोरींनी माझा नुसता जीव खाल्ला आहे…
– – नवीन शाळा कॉलेजचा हंगाम आता सुरू होईल…
सर्वांना शाळा कॉलेजमध्ये जायची गडबड आहे, त्याआधी सर्वांना मापाचे युनिफॉर्म, शूज सॉक्स, शाळा, कॉलेजच्या फीया, दुरेघी / एकेरी वह्या, आवडणाऱ्या रंगाच्या वॉटर बॅग, आणि अजून लई काय काय…
पोरांनी नुसतं डोकं उठवलंय…!
पण दरवर्षी मी बाप होऊन जातो, दरवर्षी माझ्या घरात जून ते ऑगस्ट दरम्यान पाळणा हलतो…
I am blessed – –
‘ए गपा रे, हाताची घडी तोंडावर बोट… ‘ पोरांवर डाफरून मी शिक्षकाच्या भूमिकेत येतो.
मलाच माझ्या लहानपणी शाळेत जायची इतकी इच्छा का नव्हती याचं कोडं मला अजून पडतं…
माझी इच्छा मग मी याच पोरांवर भागवून घेतो… तुमच्या मदतीने…!
तर सध्या मुलांना लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट घेणे, संस्थेला लागणारे आधार कार्ड, फोटो, त्यांचे रिझल्ट वगैरे वगैरे अशा गोष्टी घेणे, शाळेत / कॉलेजमध्ये जाऊन फी कन्फर्म करणे, कोणी ऑनलाईन फी घेतंय तर कोणाला कॅश हवी आहे, त्याचे लिस्टिंग करणे आणि दिवसभर फिरत राहणे…
मनीषा सोडून माझ्याकडे सोबतीला आणि मदतीला कोणी नाही…
… अख्खा महिना या चिमण्यांच्या भविष्यातल्या घरट्यांचा विचार करत गेला…!
तुम्हा सर्वांच्या घरात एक दोन किंवा तीन मुले असतील, शाळा कॉलेज जवळ आल्यानंतर ती तुमचं काय डोकं खात असतील? ते तुम्ही जाणताच…
– – शाळा कॉलेज ही मुलांची नसतातच, ती आई बापाची परीक्षा असते…!
… मला आणि मनीषाला 52 मुले आहेत… आता आमची परीक्षा सुरू झाली आहे…
आणि ती किती असेल याची आपण कल्पना करू शकता…
आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा संक्षिप्त… (In bulletted points) आपणास सविनय सादर – –
– दवाखान्यात जे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांना डबा आणून देणारा कोणीही नातेवाईक नाही, अशा सर्वांना जेवणाचे डबे देऊन आपणच नातेवाईक झालो…
… देत आपण आहात आम्ही फक्त हात झालो…
– रस्त्यावरील असहाय्य अवस्थेत जगणाऱ्या लोकांना कोणीही जेवण देत नाही अशांना आपण अन्नाचे दान तरी कसे म्हणू? दान करणारा मी कोण? आपल्या साथीने, त्यांची क्षुधा शांती केली आहे…
– ज्यांना घराबाहेर काढले आहे, अशा अनेक माऊली रस्त्यावर उन्हात अशाच तडफडत आहेत, जीव तव्यागत तापला आहे, आपल्या साथीने थंडगार पाणी त्यांच्या चेहऱ्यावर शिंपडून त्यांना रोज प्यायला थंड पाणी देत आहोत, तृष्णाशांती म्हणतात ती हीच असावी का…?
– अत्यंत क्रिटिकल केसेस ज्यांना कोणत्याही दवाखान्यात ऍडमिट केले जात नाही, अशांची जमेल तितकी सेवा रस्त्यावर करत आहे आणि त्यानंतर ओळखीने त्यांना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत आहे आणि आपण त्यांचे बिल भरत आहोत… आपण म्हणजे पुन्हा “आपणच”आम्ही नव्हे…!
– महिन्यात कितीतरी सणवार येतातच, आपल्या या रस्त्यावरील माऊलींना कोणी गोडधोड देत नाही आणि म्हणून त्यांना गोडधोडाचे जेवण दिले आहे, “आपण” आम्ही नव्हे…!
– ज्यांना हात नाहीत पाय नाहीत किंवा दोन्ही असून नसल्यासारखे, अशा सर्वांना वैद्यकीय उपकरणे देऊन खऱ्या अर्थाने पायावर उभे केले आहे, त्यांनी आता काहीतरी काम करावे यासाठी प्रयत्नात आहे.
– – अनेक ताईंना हातगाडी देऊन कामाला लावले.
– – 70 वर्षाच्या आजोबांना पुणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर स्वच्छता करण्याचे काम मिळवून दिले आहे.
– – भूक लागली की भीक मागणारे आमचे लोक त्यांच्याकडे जे जमा असेल ते मला जेऊ घालतात, हाताने… शाही जेवण कदाचित यालाच म्हणत असावेत…!
मी त्यांच्यात बसून हे खाताना, या कड़क उन्हात कोणी पदरानं वारा घालतं, कुणी पाणी भरवतं, तर कुणी घास तोंडात घालतं…
– – भिकेमधलं खाऊन सुद्धा, भिक्षेकर्यांसाठी काम करताना, मला मी कुठल्यातरी देशाचा राजा आहे किंवा बादशहा आहे असा फील मला येतो…
… मी कुणीही नसतानाही, मला हा फील देणाऱ्या माझ्या त्या प्रत्येक माऊलीला साष्टांग नमस्कार.
– अजूनही सांगण्यासारखं बरंच बरंच आणि बरंच काही आहे…
– किती लिहू? काय काय लिहू? कुठे थांबू? माझं मलाच कळत नाही.
हाताचे चार तुकडे झाले आहेत, पायाचा चुराडा झाला आहे, हाडं मोडून शरीराच्या बाहेर आली आहेत, डोकं फुटून मेंदू बाहेर आला आहे, खून होऊन पोटातली आतडी बाहेर आली आहेत, त्यांचे ऑपरेशन करतानाचे फोटो इत्यादी इत्यादी मी कधीही आजवर शेअर केले नाही. माझ्याकडे अशाच फोटोंची भरमार जास्त असते.
– – असे फोटो टाळून, लेखाजोखा लिहिणे आणि त्यातून खूप काळजीपूर्वक आपल्याला फोटो… तेही कोणाची ओळख न दाखवता मास्क करून दाखवणे… हे सुद्धा माझ्यासाठी महिन्याच्या शेवटी दिव्य असते, वेळ खाऊ असते…!
पण मला त्यात अत्यंत आनंद होतो… ,! – कारण आपल्या मदतीमधून काय काम झाले हे साधारणपणे आपल्याला कळवणे हे सुद्धा माझे मी परम कर्तव्य समजतो…
तर माऊली काही चुका भुला झाल्या असतील तर माफ करावे…
आज अकरा वर्ष 24 तास मी या क्षेत्रात आहे, केवळ आपल्यामुळे…!
तरीही माझं काहीतरी चुकत असेलच…
चुकत असेन तर पदरात घ्या…
– – आणि नाहीच चुका पदरात घेतल्या, तर मी जाऊ कुठे…????
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





