संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “मला ब्रेक हवाय !” ☆ संध्या बेडेकर ☆
If you are tired, learn to take a rest. Take break.
मला break हवाय.
…
आज सकाळपासूनच माझी चिडचिड सुरू होती. इतक्यात हे अस बरेचदा होतय. म्हणजे उगीच चिडचिड करायला मी काही वेडी नाही. तसा माझा स्वभाव ही नाही. ही चिडचिड सध्या तरी स्वतःपर्यंतच आहे. मी नोकरी करत नाही, पण घर सांभाळण घरातील सर्वांची ची वेळ, डबे, त्यांचे मूड, चिडचिड खाण्याचे नखरे, जेष्ठांचे औषधपाणी, घराचे मेंटेनन्स, सांभाळणे हे काही सोप्प काम नाहिये. आणि ते फक्त काही दिवसांचे / महिन्यांचे नाही तर वर्षानुवर्ष तेच ते चालू आहे. थोडक्यात हे म्हणजे सर्वांच्या तालावर नाचणेच झाले नाही का ? खरतर हे सर्व करण्यात मला आनंदच मिळतो. आवडत मला. त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून स्वयंपाक करण खरच आवडत मला. जसजस माझ वय वाढतय तसतशी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की थोडी चूक झालीच आहे माझी. सर्व मनासारख, सतत त्यांच्या सेवेत मागेपूढे हजर राहणे.
हे बरोबर नाही. एकतर त्यांच्या सवयी बदलतात. काम करायची सवय नाही. उद्या अजयचे लग्न झाले तर ती सून पण कदाचीत अजयला म्हणेलही… की तुमच्या आईने तुम्हाला काही सवयी लावल्या नाहीत. खूप लाडावून ठेवल आहे. आज नोकरी करणारी सून येण्याची शक्यता जास्त आहे, तेंव्हा नवर्याचे सहकार्य अपेक्षित असतेच.
हे सर्व विचार मला अस्वस्थ करतायेत. हे अस का होतय ? हा विचार मला अस्वस्थ करतोय. वय झालय म्हणण्यापेक्षा वय वाढतय, हे म्हणण जास्त योग्य होईल., तस म्हंटल तर 50/52 वर्ष वय म्हणजे काही खूप नाहीच. शक्ती कमी झालीय की काही आजार वगैरे? आता कुठे सून आणायची वेळ आली आहे.
मी माझा प्रोब्लेम घरात सांगीतला नाही तर, त्यांना कळेल कसा ? हे अस ओढून ताणून घर चालवण बरोबर आहे का ? उद्या मी च आजारी पडले, तर सर्वांनाच जास्त त्रास होईल. मला विश्रामाची गरज आहे का ? ब्रेक हवाय का ?
हे विचार मनात घर करून बसले आहेत.
आज दुपारी आईंना चहा देतांना, आई म्हणाल्याच… काय ग अनिता ? काय विचार करतेय ? आज तुझ्या भावाचा फोन आला होता ना. सर्व ठीक आहे ना त्यांच्याकडे. बर वाटत नाहीये का ? अजय काही बोलला का ? इतक्यात लक्षात आलय, तू नेहमीसारखी प्रसन्न दिसत नाही.
आईंच्या तीक्ष्ण नजरेत काहीच सूटत नाही. हे खरय.
मी म्हंटल… आई अहो.. माहित नाही का ? पण मला सध्या थकवा जाणवतोय. उत्साह वाटत नाही.
अग! मग सांगायच न. तू सांगितल नाही तर कळेल कस?
आई अहो ! तुम्हाला सांगायच अस माझ बरेचदा ठरवून झाल हो. पण पुन्हा तेच… पुत्र प्रेम, पति प्रेम आड येत, जबाबदारी आठवते.
आणि मी काहीच बोलत नाही.
आता मात्र बदल करायची वेळ आली आहे. हे कळतय मला.
आई म्हणाल्या… अग बाई !
आता आईपणा, सूनपणा, बायकोपणा, सर्वच बाजूला ठेव जरा. अग ! देवी बनायचा प्रयत्न करू नको. ब्रेक घे.
नाही म्हणजे.. सहन करायची / ऐकायची एक लिमिट असते ग.
उद्या तुझी तब्येत बिघडली तर ? कोण लक्ष देणार आहे ?
घर एक घर आता पूरे झाल.
अग! मी केलेली चूक तू करू नकोस.
अग! शांत राहण चांगली सवय आहे. ज्या घरातील स्त्री शांत स्वभावाची असते, ते घर छानच चालत. पण कोणत्याही परिस्थितीत, कितीही त्रास असताना शांत राहण म्हणजे आत्महिंसाच असते ती.
स्वतःपेक्षा जास्त दुसर्यांचा विचार करणे, महत्व देण हे कुठे तरी थांबवायला शिकलेच पाहिजे. स्वतःकडे दुर्लक्ष करण बरोबर नाही.
आई पूढे म्हणाल्या… अग! घर सांभाळताना मी पण स्वतःला विसरले होते. आणि आता मला स्वतःला आठवायला औषधांची गरज लागते.
आमच्या जमान्यातही बायका भजन क्लास, जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमांना जायच्याच. त्या पण छानच घर सांभाळत होत्याच की.. मी आपली आता यांची यायची वेळ झाली, त्याची वेळ झाली याच विचारात असायची. मला कोणी नको जाऊ अस कधी म्हंटल नाही. माझ पण तेच असायच ना… घर एक घर
अग! खूप पर्याय असतात / आहेतच.
आपल्या सोयीनुसार त्यांची सर्वीस घ्यायची. स्वतःसाठी हक्काने पैसे खर्च करायला शिकायच असत.
घरी खूप संपत्ती आहे मालमत्ता आहे. त्याचा उपभोग घ्यावा. जीवनशैली गरज पडेल तशी बदलावी ना. मीच सर्व काम करेन, हा हट्ट का ?
आजोबा सर्व शांतपणे ऐकत होते.
थोड्याच वेळात अजय आणि बाबा ऑफिस मधून परत आलेच.
अजय म्हणाला… या रविवारी Mother’s Day I love. My Mom, and Aaji too.
कस celebrate करायच ? Mom आजी कुठे जायच? सांगा.
आजोबा म्हणाले… अरे फक्त Mother’s Day लाच आई, आजी आठवतात का ? बाकी कधी काही चौकशी केली आहे का ? अरे! आमची देखरेख तुझी आई करते. तिला काय हवय ? काय आवडत ? एखादा तिच्या आवडीचा सिनेमा तिला बघायचा आहे का ? हे कधी विचारल का तिला ?
तिच्याजवळ बसून काही विचारपूस वगैरे केली का ? कधी.
अरे! लग्न झाल्यावर तुझी जबाबदारी वाढणार आहे. तिच्या बरोबर पण असच वागशील का ?
आईवर तुझ प्रेम आहे, हे माहित आहे आम्हाला, कधी कधी ते दाखवायच पण असत ना… आपल्या कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून. नाहीतर तुझ्या मनातल तिला कस कळेल ?
हे बघ सध्या अनिताला डोॅक्टर कडे न्यायची गरज आहे. तिला काम केल्यावर थकवा वाटतोय.
आधी हे काम कर. मग जंगी पार्टी करूयात.
अरे!लहानपणी शिकवलय ना… रस्ता पार करताना आधी डावीकडे, मग उजवीकडे… पुन्हा डावीकडे बघायच आणि मग रस्ता पार करायचा.
अरे! आयुष्यातही वेगवेगळया वळणावर जरा थांबाव. सर्व दृष्टिने विचार करावा. आपली जबाबदारी, कर्तव्य आपण बरोबर करतोय ना. काही ऐकायच / विचारायच/ सांगायच राहून तर नाही गेल. याचा विचार करावा. फक्त महिला दिवस, Mother’s Day ला नाही तर हे आपल्या वागण्यात असाव.
प्रेमाच्या दोन शब्दांत खूप जादू असते. काळजीने केलेल्या विचारपूस मध्ये अर्ध अधिक बरे होण्याची ताकद असते.
बरे असो…
उद्यापासून आपल्या घरी स्वयंपाक करायला मावशी असणार आहेत. अनिता ! त्यांची पूर्ण तयारी झाल्यावर फोडणीचे काम मात्र तूच कर. तुझ्या हातची भाजी आमटी आवडते सर्वांना. फक्त तेवढच करायच हं.. हे लक्षात ठेव.
माझ्याकडून Mother’s day ची दोन्ही आयांना हीच भेट.
हो फक्त Mother’s Day ला नाही तर नेहमीसाठी.
बाबा म्हणाले…
अग ! अनिता घरातील सगळ्यांची देखभाल करताना, स्वतःला विसरायच नसत. स्वतःवर प्रेम करायला शिकायच असत. तू या घरासाठी खूप मौल्यवान आहेस.
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




