सुश्री प्रभा हर्षे
वाचताना वेचलेले
☆ “शोध स्वतःचा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
☆
दोन माणसे प्रवासाला निघाली. दोघांचेही स्थान एकच असल्याने त्यांनी एकत्र प्रवास केला.
सात दिवसांनंतर त्यांना वेगळे होण्याची वेळ आली.
पहिला प्रवासी: भाऊ, आपण आठवडाभर एकत्र राहिलो. तुम्ही मला ओळखलंस का?
दुसरा प्रवासी: नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, परंतु आपण एकत्रच प्रवासात होतो, एवढं मात्र खरं….
पहिला प्रवासी: सर, मी एक प्रसिद्ध ठग आहे पण तुम्ही नक्कीच महान ठग आहात…
तुम्ही तर माझे गुरु निघालात….!
दुसरा प्रवासी: कसे काय?
पहिला प्रवासी: काहीतरी चोरी होईल या आशेने मी सतत सात दिवस तुमच्या वस्तूंचा शोध घेतला, पण काहीच सापडले नाही. तुम्ही एवढ्या लांबच्या प्रवासाला निघालात आणि तुमच्याकडे काहीच नाही!
तुम्ही पूर्णपणे रिकाम्या हाताने आला होतात काय?
दुसरा प्रवासी: माझ्याकडे एक मौल्यवान हिरा आणि काही सोन्याची नाणी आणि खर्चापाण्यासाठी काही पैसे होते.
पहिला प्रवासी: मग खूप प्रयत्न करूनही मला ते का सापडले नाहीत?
दुसरा प्रवासी: मी जेव्हा कधी बाहेर जायचो, तेंव्हा मी हिरे, नाणी आणि पैसे तुमच्या पिशवीत ठेवत असे,
इतके दिवस तुम्ही माझी पिशवी शोधत राहिलात!
तुम्ही तुमचे स्वतःचं गाठोडं शोधण्याची तसदी घेतली नाही,
तर मग तुम्हाला काहीही सापडेल, अशी अपेक्षा कशी करायची?
तात्पर्य: ईश्वर नेहमी आपल्या झोळीत आनंद ठेवतो, पण आपल्या गाठोड्याकडं बघायला आपल्याला वेळच नाही! ज्या दिवशी आपण इतरत्र सुख शोधणे बंद करू, तेव्हाच आपण आपले सर्व प्रश्न सोडवू.
जीवनातील सर्वात मोठा गूढ मंत्र म्हणजे स्वतःचा शोध घेणे आणि जीवनाच्या मार्गावर पुढे पुढे जाणे!
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





