श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सप्तसोपान… लेखक : श्री विश्वास बीडकर ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

मध्यंतरी एक मस्त जुगलबंदी अनुभवता आली.

डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि मंगला खाडिलकर यांची शाब्दिक जुगलबंदी होती ती.

सोहळा होता ‘सप्तसोपान’ या वेगळ्या उपक्रमाच्या उद्घाटनाचा.

‘वरिष्ठ आणि जेष्ठ’ यामधलं अंतर समजावून सांगणं हा मूळ उद्देश.

 

समोरच्याचं मन मोकळं करून त्याला बोलतं करणं, यात हे दोघेही सचिन तेंडुलकर.

 

डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी सुरुवातीलाच सांगितलं, “आपण जमलो आहोत ते एकाच गोष्टीसाठी, ‘Healthy Aging. ‘

आपल्या नियंत्रित आजाराची फारशी काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सगळे ती घेत असणारच. प्रश्न आहे तो, बौध्दिक क्षमता वाढविण्याचा.

जे आजपर्यंत आयुष्यात केलं आहे, त्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं की तुम्ही वृध्दत्व विसरणार.

जे शिकलो आहोत, जे आजपर्यंत केलं आहे, तो मार्ग आपल्या मेंदूला पूर्ण परिचयाचा आहे. तो वापरून वापरून थोडा खड्डेमयही झाला आहे.

नवीन रस्ते मेंदूला दाखवले, तर तो परत एकदा उत्साहित होतो, अधिक कार्यक्षम होतो.

म्हणूनच हा ‘सप्तसोपान’चा उपक्रम.

 

वयानं वरिष्ठ होऊ लागलं की प्रथम जाणवतं ते नाते संबंध. इतरांशी आपलं वागणं. या संदर्भात डॉ. नाडकर्णी यांनी सूर्यमालेचा संदर्भ सांगितला. आपण स्वतः म्हणजे सूर्य आणि आपली नाती म्हणजे सूर्यमालेतले ग्रह.

आपण एवढचं लक्षात ठेवायचं, कोणत्या नात्याचा ग्रह आणि त्यातलं अंतर समजून घेणं.

 

वय वाढलं की सगळ्यात कमी होतं जातं ते नवीन शिकणं.

तेचं सप्तसोपानमध्ये करायचं.

 

आमच्यासारख्या बॅंकेत आयुष्य घालवलेल्यांनी संख्या, अकाउंट्स सोडून नवीन काही शिकायचं. काय शिकायचं,

तर, गाणं, ब्रिज असे छंद जोपासण्याचा प्रयत्न. यात फक्त शिकण्याचा आनंद घ्यायचा.

नो परीक्षा. नो नैपुण्य चाचणी.

 

भाजी टवटवीत राहण्यासाठी मध्येमध्ये पाणी शिंपडतात, तसं आपला मेंदू टवटवीत राहण्यासाठी हे नवीन शिकण्याचे शिंतोडे.

 

हे सगळं डॉक्टर समजावून देताना,

मंगला खाडिलकर यांनी एका शब्दात सांगितलं, ‘स्वानंद ‘.

 

पुढे मंगलाताईंचं एक वाक्य मला तरी खूप भावलं,

” प्रत्येक नात्याला एक शेल्फ लाईफ असतं.

जशी पदार्थांची चव बदलते तशी नात्यांचीही. “

या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट.

 

तो विरत असतानाच,

डॉक्टरांचं पुढचं वाक्य,

” म्हणूनच त्या नात्यात कृतीचं preservatives टाकायचं! “

परत तेवढाच कडकडाट.

आहे की नाही मस्त जुगलबंदी.

 

अजून एक करायचं वरिष्ठांनी जेष्ठत्वाकडे जातांना, आपल्या नकळत आपल्या बाबतीत चार गोष्टी घडतात,

शिंक, खोकला, उचकी

आणि

सल्ला!

 

हा सल्ला देणं थांबवायचं.

त्या आधी समोरच्या व्यक्तीची भावना ओळखायची आणि मग ठरवायचं सल्ला द्यायचा का नाही ते.

” You Mirror My Emotions “

हे वाक्य सतत लक्षात ठेवायचं.

 

डॉक्टरांचं पुढचं विवेचन फार महत्त्वाचं होतं.

” नॉस्टॅल्जिया हा अविभाज्य भाग आहे या वाढत्या वयात. पण हा Nostalgia Process of Cheering असा असावा.

कसा नसावा,

तर Toxic Nostalgia म्हणजे,

वाक्याची सुरूवातच,आमच्या वेळी…

आणि,

” तुम्हाला काय त्याचं “

अशी नसावी.

 

ज्ञानेश्वर महाराजांचा एक

शब्द, ‘ सहनसिध्दी ‘ हा अखंड लक्षात ठेवायचा म्हणजे जेष्ठत्व मुरतं आणि वृध्दत्व परिपक्व होत जातं.

 

कार्यक्रम संपता संपता एका भारतीय फिलॉसॉफर यांचं वाक्य डॉ. आनंद यांनी सांगितलं, ‘ Only Body has DOB & DOD, otherwise it is all Legacy! ‘

 

या वाक्याला अनुसरून मंगला खाडीलकरांनी शांता शेळके यांच्या कवितेच्या ओळी जुगलबंदीत गुणगुणल्या..

 

त्या आठवण्यासाठी आता मंगलाताईंचा फोन नंबर शोधणं किंवा शांता शेळके यांचा कविता संग्रह, हा नवीन अभ्यास सुरू करायचा आहे.

 

डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे. मला ही पोचायचं आहे, वरिष्ठ नागरिक ते जेष्ठ नागरिक या पदापर्यंत अभ्यास करत करत!

लेखक: श्री. विश्वास बीडकर

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
डाॅ. मनोज अणावकर
0

खूप छान!