श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “दोन मुलगे…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
मी अमेरिकेतून आईच्या अंत्यसंस्काराला आलो होतो, अंगात $3, 000 किमतीचा खास शिवलेला सूट घातला होता. एअरपोर्टवरून भाड्याच्या आलिशान SUV मधून गावात घरापाशी पोहोचलो. डिझायनर सन-ग्लासेसच्या मागे अजून न सांडलेले अश्रू लपले होते..
गावातील इतर लोकांची परिस्थिती पाहता मला माझ्या स्वतःचा अभिमान वाटत होता.
मी ‘यशस्वी’ झालो होतो.
आयुष्यात पुढे गेलो होतो.
गेल्या 15 वर्षांपासून मी शिकागोमध्ये राहून लॉजिस्टिक्सचा व्यवसाय चालवत आहे. मी चांगली कमाई केली आहे.
मी गाव सोडल्यानंतर, माझ्या धाकट्या भावाला म्हणजे डेव्हिडला आईजवळ राहता यावं म्हणून मी डेव्हिडला दर महिन्याला $200 पाठवत होतो आणि आईच्या उपचारासाठी $100 वेगळे पाठवत होतो..
माझ्या मते, त्यामुळे मी ‘चांगला मुलगा’ ठरत होतो.
माझ्यामुळे घराची बिलं भरली जात होती.
माझ्यामुळे आई नीट खातपित होती.
माझ्यामुळे सगळं ‘व्यवस्थित’ होत होतं.
अंत्यसंस्कारानंतर, घरी परतल्यावर माझ्या तक्रारी सुरू झाल्या –
“अंगण एवढं कोरडं का पडलंय?” मी खिडकीतून पाहत डेव्हिडला विचारलं.
“मी एकदा बागायतीसाठी जास्त पैसे पाठवले होते, त्याचं काय केलंस. ”
भिंतीवरील उखडलेला रंग पाहत मी म्हणालो, “मी सांगितलं होतं, कुणाला सांगून रंगरंगोटी कर, मी पैसे पाठवतो. पण तू काहीच केलं नाहीस. “
आणि मग मी नकळत एक सीमा ओलांडली.
“आई इतकी बारीक का झाली होती?”
“मी पाठवलेल्या पैशातून तू तिला निट खायला प्यायला देत होतास ना?”
डेव्हिड काहीच बोलला नाही.
तो स्वयंपाकघरातील टेबलाजवळ बसला होता — अंगावर न बसणारा जुना सूट, डोळ्याखाली गडद वर्तुळे, हात सुजलेले आणि खरखरीत.
तो माझ्यापेक्षा लहान होता, पण दिसायला माझ्यापेक्षा मोठा दिसत होता..
मी पुन्हा व्यवसायाच्या सुरात आलो.
“घराविषयी बोलायला हवं,” मी म्हणालो.
“सध्या बाजार चांगला आहे. पटकन विकता येईल. 60-40 वाटू — तू जास्त घे, कारण तू इथे राहिलास. ”
मी कृतज्ञतेची अपेक्षा करत होतो.
पण त्याऐवजी, डेव्हिड हळूच उठला, एका जुन्या ड्रॉवरमधून वही काढली आणि टेबलावर ठेवली.
“वाच,” तो शांतपणे म्हणाला.
ती आईची ‘देखभाल नोंदवही’ होती.
12 ऑक्टोबर:
ती संपूर्ण रात्र किंचाळत होती. मला ओळखत नव्हती.
पाच वेळा चादरी बदलल्या.
तिला स्वच्छ करताना तिने माझा चावा घेतला. रक्त येत होतं, पण तिला मी एकटी सोडू शकत नव्हतो.
3 नोव्हेंबर:
मायकलने पाठवलेले पैसे घरखर्चासाठी पुरेसे होते, पण आईच्या हृदयाच्या औषधांसाठी नाही.
इन्शुरन्सने पैसे देण्यास नकार दिला.
म्हणून आज माझी बाईक विकली.
25 डिसेंबर:
‘ तिचा यशस्वी मुलगा’ फोन करत नाही, म्हणून ती दिवसभर रडत होती. काहीही खात पित नव्हती..
तिने थोडं खावं म्हणून मी मायकलचा जुना व्हॉइसमेल लावला आणि त्यावर तिला मी थोडं भरवलं.
आणि मी तिच्या खाटेजवळ जमिनीवर झोपलो.
15 जानेवारी:
अंघोळ घालताना तिला उचलताना माझी पाठ दुखावली.
डॉक्टर म्हणाले — डिस्क सरकली आहे…
शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेणं शक्य नाही.
माझ्या घशात शब्द अडकले.
डेव्हिड माझ्याकडे पाहून म्हणाला,
“तू पैसे पाठवलेस. आणि त्यासाठी मी आभारी आहे.
पण तू पैसे पाठवत असताना — तू छान झोप घेत होतास.
तू सुट्ट्या घेत होतास. सहलीला जात होता. स्वतःचं छान आयुष्य जगत होतास. ”
तो छातीवर हात ठेवून म्हणाला,
“मी चार वर्षांत एकदाही पूर्ण रात्र झोपलो नाही.
माझी नोकरी गेली..
माझा साखरपुडा तुटला..
पैसे रात्री 3 वाजता साफसफाई करत नाहीत.
पैसे घाबरलेल्या आईला शांत करत नाहीत.
पैसे मरण यातना होत असताना कुणाला मिठी मारत नाहीत. ”
त्याचा आवाज मंद झाला.
“भावा, तू घर विक. सगळे पैसे तूच ठेव.
मी माझा वाटा आधीच घेतलाय,
ह्या घरात राहून, उपभोग घेऊन.. “
तो आईच्या खोलीत गेला आणि दार बंद केलं –
पहिल्यांदाच, अनेक वर्षांनंतर, शांत झोपायला..
मी एकटाच स्वयंपाकघरात उभा राहिलो.
माझे घड्याळ, बूट, आरशातील प्रतिबिंब पाहत..
कशालाच आता अर्थ उरला नव्हता..
मी फक्त औषधांचे पैसे दिले.
त्याने रात्रभर जागून ती औषधं तिला दिली.
मी फक्त अंत्यसंस्कारांचे पैसे दिले..
त्याने तिच्या आजारपणात शेवटपर्यंत तिचा हात धरून ठेवला..
त्या दुपारी मी घर पूर्णपणे डेव्हिडच्या नावावर केलं.
त्याच्या भविष्यासाठी..
ती माझ्याकडून त्याला भेट नव्हती..
तो ‘थकीत मोबदला’ होता, त्याच्या त्यागाला, त्याच्या निस्वार्थी सेवेला, त्याच्या समर्पणाला. जे अमूल्य आहे म्हणून मी आयुष्यभर त्याचा ऋणी आहे..
—
एक आत्मचिंतन:
प्रत्येक कुटुंबात दोन भूमिका असतात:
उपग्रह मूल— यशस्वी, दूर राहणारं, पैसे पाठवणारं..
काठीसारखं मूल — जवळ राहणारं, संपूर्ण ओझं वाहणारं, वाकेपर्यंत.
तुम्ही पैसा दिला म्हणजे तुम्ही सर्व जबाबदारीतून मुक्त होत नाहीत..
बँक ट्रान्सफर आईबाबांचे डायपर बदलत नाही..
पैसा रात्री जागत नाही..
बॅन्क चेक एकटेपणी सोबत देत नाही..
तुम्ही जर शिक्षणासाठी, नोकरीसाठी घर सोडलं असेल,
तर जो भाऊ घरी राहिला आहे त्याचा त्यागही लक्षात घ्या..
आणि जेव्हा उरलेलं वाटायची वेळ येईल,
तेव्हा एक जाणीव ठेवा – आपल्या आईबाबांच्या सेवेसाठी
ज्याने स्वतःचं संपूर्ण आयुष्य दिलं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये..
* * * *
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





