उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “रखुमाई रुसली” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर ☆
☆
सावळ्या हरी,
ऐकू या तरी,
काय झाला रुसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जावू पुसायला ||
रखुमाई म्हणते फुगवून गाल
भक्तांच्या चालीवर तुमचा ताल
या भक्ताघरी काय ठेवलाय हो?
उठसूट घुसायला…
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जावू पुसायला ||
कोणी ती तुमची जनी का बनी
तिची कशी केली वेणीफणी
दळणकांडण करून गेला
लुगडी धुवायला…
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जावू पुसायला ||
तो एक वेडा तुकोबा वाणी
त्याने कुठे लिहिली चार-दोन गाणी
विमान धाडायची गरज होती का
फुकटचे बसायला…
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जावू पुसायला ||
उगाळलं चंदन हरकत नाही
एकनाथ तसा कुणी परका नाही
श्रीखंड्या बनून तिथंच राहिलात
पाणी भरायला…
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जावू पुसायला ||
आणखीन तो एक सेना न्हावी
त्याची ती धोपटी तुम्ही का घ्यावी
राजाची केली स्वतः हजामत
आणि बसला तासायला…
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जावू पुसायला ||
भले दामाजीने धान्य वाटले
त्यासाठी तुम्ही काही करावे म्हटले
पितांबर सोडून
लंगोटीशिवाय काही नव्हतं नेसायला…
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जावू पुसायला ||
नाम्याचे गेला कीर्तन ऐकायला
अंगात आल्यावानी लागलात नाचायला
तरी बरं, तिथं कबीर होता
सावध करायला…
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जावू पुसायला ||
चोखोबा एक तर जातीचा महार
त्याने कुठं केलं मायबाप जोहार
त्याच्या संगतीने ढोरं ओढलीत
रोहिदाच्या संग चामडी रंगवलीत
गोरीबासंग मडकी घडवलीत
आता कोण बाकी सांगा गुरुनाथ
काय झालं हसायला…
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जावू पुसायला ||
* * * *
कवी: अज्ञात
प्रस्तुती: उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





