श्री जगदीश काबरे
☆ “भीती.. एक मूलभूत प्रेरणा” ☆ श्री जगदीश काबरे ☆
भीती ही सजीवांच्या उत्क्रांतीतील अत्यंत मूलभूत आणि संरक्षणात्मक यंत्रणा आहे. चार्ल्स डार्विन यांनी ‘नैसर्गिक निवड’ या सिद्धांतात दाखवून दिले आहे की, ज्या प्राण्यांमध्ये धोक्याच्या जाणीवेनंतर त्वरेने प्रतिक्रिया देण्याची क्षमता होती, तेच अधिक काळ टिकले. भीती ही म्हणूनच कधीकधी नकारात्मक नसून जीवनरक्षक ठरली आहे. जंगलात अचानक साप दिसल्यावर पाय मागे घेणे, आगीपासून दूर पळणे किंवा वेगाने धावणाऱ्या वाहनापासून बाजूला होणे, या सर्व क्रिया भीतीमुळेच घडतात. मेंदूमधील अमिग्डाला हा भाग संभाव्य धोक्याचे संकेत ओळखून शरीरात ‘लढा किंवा पळा’ (fight or flight) अशी प्रतीक्षिप्त प्रतिक्रिया निर्माण करतो. त्यामुळे हृदयाची गती वाढते, स्नायूंमध्ये रक्तपुरवठा वाढतो आणि क्षणार्धात निर्णय घेतला जातो. म्हणून भीती ही कमकुवतपणाची नव्हे, तर सजगतेची खूण आहे.
परंतु माणूस केवळ जैविक प्राणी नाही; तो सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणात घडत असतो. लहानपणापासून मिळालेले संस्कार, पालकांची वागणूक, शाळेतील अनुभव, समाजातील मूल्यव्यवस्था, या सर्व गोष्टी मिळून भीतीचा स्वभाव ठरवतात. ज्या मुलाला सतत दडपण, शिक्षा, अपमान किंवा चुकलास तर संपलास, अशी भीती दाखवली जाते, त्याच्या मनात असुरक्षिततेची पायाभरणी होते. तो प्रसंगासमोर उभा राहण्याऐवजी मागे हटण्याची सवय लावतो. उलट ज्या मुलाला चुका करण्याची मुभा, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि प्रयत्नांचे कौतुक मिळते, त्याच्यात आत्मविश्वासाची बीजे रुजतात. त्यामुळे एकाच परिस्थितीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया भिन्न असतात—एक घाबरते, दुसरी धैर्याने उभी राहते. पण कधीकधी समाज ‘शूर’ म्हणून ज्या व्यक्तीला ओळखतो, तीही विशिष्ट प्रसंगी घाबरते. कारण धैर्य हा गुण कायमस्वरूपी नसून परिस्थितीनुसार बदलणारे मानसिक स्थित्यंतर असते. एखादा सैनिक रणांगणात निडर असू शकतो, पण कुटुंबीयांच्या आजारपणासमोर असहाय्य वाटू शकतो. एखादा वक्ता मंचावर प्रभावी बोलू शकतो, पण अन्यायाविरुद्ध सार्वजनिक भूमिका घ्यायची वेळ आली की सामाजिक बहिष्काराच्या भीतीने गप्प बसू शकतो. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांनी विलायतेतून परत आल्यानंतर हिंदू शास्त्रानुसार प्रायश्चित्त घेतले होते. कारण येथे भीती ही केवळ शारीरिक धोक्याची नसते; ती सामाजिक प्रतिमेची, नातेसंबंधांची, आर्थिक सुरक्षिततेची किंवा सत्तेच्या दबावाची असते. म्हणूनच सत्य आपल्या बाजूला असले तरी त्यासाठी उभे राहण्याचे धैर्य सर्वांकडे असतेच असे नाही. समाजात अनेकदा ‘शूर’ आणि ‘भ्याड’ अशी द्वैती विभागणी केली जाते. पण प्रत्यक्षात धैर्य आणि भीती हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत. भीती नसलेला माणूस बेजबाबदार ठरू शकतो; तर भीतीच्या अतिरेकाने माणूस निष्क्रिय होतो. खरे धैर्य म्हणजे भीतीची जाणीव असूनही योग्य कृती करणे होय.
सामाजिक संरचना भीतीला अनेकदा साधन म्हणून वापरते. कुटुंब, धर्म, राजकारण, कार्यालयीन व्यवस्थापन या सर्वच ठिकाणी ‘भीती’ ही नियंत्रणाची पद्धत म्हणून कार्यरत असते. “लोक काय म्हणतील? ”, “नोकरी जाईल”, “देव रागावेल”, “समाजातून बहिष्कृत केले जाईल”, या मानसिकतेपोटी भीतीची संस्कृती रुजवली जाते. भीतीत वाढलेला माणूस प्रश्न विचारणे टाळतो, अन्याय सहन करतो आणि शक्तिशाली व्यक्तींच्या आक्रमणाला बळी पडतो. येथे मानसशास्त्रीय दृष्टीने सामाजिक असहाय्यता दिसते. वारंवार पराभव किंवा दडपशाही अनुभवल्यानंतर माणूस प्रतिकार करण्याची इच्छा गमावतो. याच्या उलट, भीतीवर मात करणारी व्यक्ती यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते, कारण ती कृतीशील असते. काही व्यक्तींच्या बाबतीत भीती पूर्णपणे नाहीशी होत नाही; परंतु ती स्वीकारूनही पुढे जाण्याची क्षमता विकसित केली जाते. मानसशास्त्र सांगते की, धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे, तर भीती असूनही योग्य कृती करणे. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहते, तेव्हा बाह्य दबावांची तीव्रता कमी होते. सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आढळतात की, भीतीवर मात केलेल्या व्यक्तींनीच अन्यायाला आव्हान दिले आणि समाजात बदल घडवले. जसे महात्मा गांधी न्यायालयासमोर सत्य सांगण्यास कधीही कचरले नाहीत आणि मिळेल ती शिक्षा आनंदाने भोगली. याचा अर्थ त्यांच्याकडे अलौकिक शक्ती होती असे नव्हे तर त्यांच्याकडे होते ते आत्मभान, तर्कशक्ती आणि परिणामांची जाणीव असतानाही उभे राहण्याचे साहस.
मानसिकदृष्ट्या भीतीवर मात करण्यासाठी काही घटक महत्त्वाचे ठरतात. पहिला घटक म्हणजे आत्मजागरूकता. ही आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते हे ओळखायला शिकवते. दुसरा, अनुभवांची पुनर्रचना करणे. म्हणजे असे की, एखादा प्रसंग अपयशाचा नसून शिकण्याची संधी आहे, असा दृष्टिकोन स्वीकारणे. तिसरा, सामाजिक पाठबळ मिळणे. मित्र, कुटुंब किंवा सहकारी यांचे समर्थन व्यक्तीला स्थैर्य देते. चौथा, मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी तयार होणे. स्वतःच्या तत्त्वांवर उभे राहण्याची तयारी. या प्रक्रियेत व्यक्ती हळूहळू भीतीला शत्रू न मानता मार्गदर्शक म्हणून पाहू लागते.
थोडक्यात, भीती ही मानवी स्वभावाची अपरिहार्य आणि नैसर्गिक प्रेरणा आहे. ती आपल्याला धोक्याची जाणीव करून देते, पण तिच्या अधीन राहणे किंवा तिला नियंत्रित करणे हे आपल्या सामाजिक संस्कारांवर, मानसिक प्रशिक्षणावर आणि मूल्यव्यवस्थेवर अवलंबून असते. जो माणूस भीतीच्या छायेतून बाहेर पडून परिस्थितीला सामोरे जातो, तो केवळ वैयक्तिक यशाकडेच वाटचाल करत नाही, तर सामाजिक परिवर्तनाचाही वाहक ठरतो.
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





