श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ महावस्त्राचे पदर – भाग १३ – ‘पिता-पुत्र’ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
आजचा हा तेरावा भाग लिहिताना माझे मन पित्याविषयीच्या अथांग कृतज्ञतेच्या आणि आदराच्या भावनेने दाटून येत आहे. पिता म्हणजे मायेची अबोल सावली आणि जगण्याचा भक्कम आधार! जोपर्यंत त्याचं छत्र शिरावर असतं, तोपर्यंत माणूस संपूर्ण जगाशी लढायला निर्धास्त असतो. पण या जीवनसागरात जेव्हा आपलं गलबत वादळात हेलकावे खातं आणि दिशाहीन होतं, तेव्हा तो दीपस्तंभ बनून अचूक मार्गदर्शन करीत राहतो.
नुकतेच माझे एका शासकीय अधिकाऱ्याशी या विषयावर बोलणे झाले. ते तरुण असून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन एका मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याशी बोलताना जाणवले की ते आपल्या वडिलांबद्दल अगदी भरभरून आणि आदरयुक्त प्रेमाने बोलत होते; वडिलांविषयीची कृतज्ञता त्यांच्या प्रत्येक शब्दातून पाझरत होती. मी त्यांना सहज विचारले, “तुम्ही आता एवढे मोठे अधिकारी झालात, तरी वडिलांबद्दल इतक्या आदराने बोलता! ” ते नम्रपणे म्हणाले, “होय सर, माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी माझ्यावर तसे संस्कार केले; त्यांच्यामुळेच आज मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. माझ्या नोकरीत जेव्हा जेव्हा मोहाचे किंवा कसोटीचे प्रसंग येतात, तेव्हा तेव्हा माझे वडील माझ्या डोळ्यांसमोर उभे राहतात. त्यांचे शब्द कानात घुमतात आणि मग कधीही माझे पाऊल वाकडे पडत नाही! ” डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप आणि आम्ही’ हे पुस्तक आपल्यापैकी बहुतेकांनी वाचले असेलच. त्यांचे वडील स्वतः अशिक्षित होते; पण त्यांनी दाखवलेली जिद्द आणि मार्गदर्शनामुळेच डॉ. नरेंद्र जाधव जीवनात एवढे मोठे यश संपादन करू शकले.
आई-मुलीचं नातं जितकं बोलकं, हळवं आणि पारदर्शक असतं; त्याच्या अगदी उलट, वरून शांत, शिस्तप्रिय पण आतून अथांग काळजी आणि जबाबदारीने भारलेलं नातं म्हणजे ‘बाप आणि लेक’ (वडील-मुलगा)! हे नातं वरवर पाहता अबोल असतं, पण त्याच्या मौनातच संसाराचा संपूर्ण भार पेलण्याची ताकद दडलेली असते.
माझे वडील हे माझ्यासाठी केवळ एक पालक नव्हते, तर ते माझे खरेखुरे मार्गदर्शक आणि संस्कारांचे उगमस्थान होते. आमची आर्थिक परिस्थिती तशी अगदी साधारण होती. पण आपल्या मुलांचे शिक्षण उत्तम व्हावे, त्यांच्या पंखांना बळ मिळावे म्हणून वडिलांनी स्वतःच्या प्रकृतीची तमा न बाळगता दोन दोन नोकऱ्या केल्या; पण आमच्या शिक्षणात कधी खंड पडू दिला नाही. स्वतः अपार कष्ट उपसून मुलांच्या भविष्याची पायाभरणी करणारा बाप काय असतो, हे मी त्यांच्याकडे पाहून शिकलो.
त्यांनी मला केवळ जगण्याचे संस्कारच दिले नाहीत, तर वाचनाची नितांत सुंदर गोडी लावली. लहानपणी माझ्यासाठी निवडून छान छान पुस्तके आणून देणारे माझे वडीलच होते. त्यांना स्वतःलाही वाचनाची प्रचंड आवड होती. विविध धार्मिक ग्रंथांचे त्यांचे सखोल वाचन होते; पण विशेष म्हणजे, ग्रंथांचे वाचन असूनही त्यांचे विचार अत्यंत आधुनिक आणि पुरोगामी होते. जुन्या रूढी-परंपरांना केवळ परंपरेचा भाग म्हणून घट्ट चिकटून बसण्यापेक्षा, काळाच्या कसोटीवर जे योग्य आणि विवेकवादी वाटते, तेच सहजपणे स्वीकारावे असा त्यांचा ठाम दृष्टिकोन होता. नवीन गोष्टी आणि बदल ते मोकळेपणाने आत्मसात करत असत.
वडिलांचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय होता. वेळेचे अचूक नियोजन हा त्यांचा स्थायीभाव होता; वेळ वाया घालवणे त्यांना मुळीच आवडत नसे. ठराविक वेळेला ठराविक गोष्टी न चुकता करण्याची त्यांची शिस्त होती. माझी पुस्तके किंवा शाळेचे दप्तर घरात अस्ताव्यस्त पडलेले त्यांना अजिबात आवडायचे नाही. घरातली ती शिस्त आणि कष्टांचे मोल यामुळेच माझ्या आयुष्याला एक योग्य आकार मिळाला.
मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो, तेव्हा आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि वरिष्ठांना पसंत पडेल अशा तळमळीने करण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी मला दिला. “वर्गावर शिकवायला जाताना नेहमी पूर्वतयारी आणि अभ्यास करून जा, ” असे त्यांचे ठाम सांगणे असायचे. त्यावेळी माझे एम. ए. चे पहिले वर्ष पूर्ण झाले होते; पण नोकरी लागल्याने मी पुढील शिक्षण अर्धवट सोडले होते. तेव्हा त्यांचा मला सतत आग्रह असायचा की, राहिलेले एम. ए. चे वर्ष कसेही करून पूर्ण कर. त्यांच्या याच आग्रहामुळे मी पुढे ते शिक्षण पूर्ण केले. नोकरी सांभाळून ते करताना थोडा त्रास नक्कीच झाला; पण पुढे संपूर्ण सेवाकाळात त्याचा मला खूप मोठा फायदा झाला. या सगळ्या पितृऋणांतून मी कसा उतराई होऊ?
कवी आरती प्रभू यांची एक अजरामर कविता आहे—
“गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्राचे देणे,
माझ्यापाशी आता कळ्या आणि थोडी ओली पाने… “
कधी कधी नात्यांमध्ये असं सुंदर आणि आवश्यक असलेलं नक्षत्रांचं देणं द्यायचं राहून जातं. काळ हातातून वाळूसारखा निसटून जातो आणि राहून गेलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टींची एक अनामिक बोच मात्र आयुष्यभर मनाला लागून राहते.
माझं ज्यांच्यावर जिवापाड प्रेम होतं, असे माझे हे पूज्य वडील आयुष्याच्या शेवटी शेवटी खूप थकले होते. त्यांचं वय बरंच झालं होतं. मी त्यावेळी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होतो. मी सकाळी शाळेत जायला निघालो, की त्यांचं लक्ष माझ्याकडे असायचं; ते मोठ्या आशेने माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहायचे. “बाबा, येतो मी… ” असं जाताना सहज जरी म्हटलं, तरी त्यांच्या वृद्ध चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलायचे! बऱ्याचदा मी त्यांना सांगूनच निघायचो; पण कधी कधी सकाळच्या घाईगडबडीत आणि धावपळीत माझ्याकडून तेवढंही बोलणं व्हायचं नाही. मी तसाच निघून जायचो आणि त्यांचे डोळे आशेने माझ्या वाटेकडे लागलेले असायचे. मग नंतर दिवसभर मलाच स्वतःची अपराध्यासारखी रुखरुख लागायची. काय हवं असायचं त्या प्रेमळ पित्याला? जाताना आपल्या मुलाने आपल्याकडे प्रेमभराने पाहावे, दोन शब्द सांगून जावे, एवढीच त्यांची माफक अपेक्षा असायची.
शाळेत कामाचा प्रचंड ताण असायचा. वर्गात दिवसभर मोठमोठ्याने शिकवून घसा दुखायचा, मुलांची ती अखंड कलकल; शाळा सुटून घरी आलो की डोकं अक्षरशः भणाणून गेलेले असायचे. अशा वेळी घरात आल्यावर वाटायचे की आता कोणाशीच काही बोलू नये, शांत पडून राहावे. मी तसा प्रयत्न करायचोही. पण त्याच वेळी पुन्हा वडिलांची हळवी अपेक्षा असायची की मुलाने क्षण-दोन क्षण आपल्याजवळ बसावे, आपली मायेने विचारपूस करावी. पण त्या थकलेल्या मनःस्थितीत कधी कधी तेही माझ्याकडून राहून जायचे.
बाबा तर आज या जगात नाहीत; पण आता ते क्षण आठवले की प्रामाणिकपणे वाटते की आपलं चुकलं! आपण कितीही दमलेलो असलो, तरी त्या आधारवड असलेल्या वडिलांजवळ दोन मिनिटे शांत बसायला हवे होते. त्यांना वेळच्या वेळी जेवण, खाणपान, औषधपाणी सगळं काही उत्तम मिळत होतं; पण एका वृद्ध बापासाठी तेवढंच पुरेसं नसतं, त्याला मुलाचा सहवास आणि प्रेमाचे दोन आश्वासक शब्द हवे असतात. हे सगळं आज कळतंय, पण आता सांगायला माझे बाबा मात्र राहिले नाहीत! या आठवणींनी डोळे आजही नकळत भरून येतात. हे नक्षत्रांचे देणे खरोखर द्यायचे राहून गेले…
वडिलांनी मुलासाठी आपल्या कर्तव्यात कधी कोणतीही कसर ठेवली नव्हती; मुलानेही त्यांच्या शब्दाबाहेर कधी पाऊल टाकले नाही. पण तरीही, “बाबा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही मला हवे आहात! ” हे चार शब्द जोपर्यंत ते हयात होते, तोपर्यंत प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांत पाहून बोलण्याचे राहूनच गेले. हा संकोच म्हणा की अहंकार म्हणा बहुधा जगातल्या प्रत्येक बाप-लेकाच्या नात्यात आडवा येत असावा.
बापाचं प्रेम हे जमिनीखाली खोलवर गेलेल्या वटवृक्षाच्या मुळांसारखं असतं; ते वरून हिरवंगार दिसत नाही, पण संपूर्ण संसाराला वादळात घट्ट रोवून धरतं. मुलगा वयात आला, की वडिलांच्या चपला त्याच्या पायात बसू लागतात. मग सुरू होतो एक आदरयुक्त संकोच. बाप मुलाच्या तोंडावर कधी कौतुक करत नाही, पण बाहेर चारचौघांत अभिमानाने सांगतो, “माझ्या पोराने नाव काढलं बरं का! “
आणि जेव्हा हा वटवृक्ष अचानक कोसळतो, तेव्हा संसाराचे सारे ऊन-पाऊस थेट मुलाच्या अंगावर येऊन आदळतात. त्यावेळी खांद्यावर पडलेल्या जबाबदाऱ्या पेलताना मुलाला पदोपदी जाणीव होते की आपल्यासाठी वडिलांनी आयुष्यभर किती खस्ता खाल्ल्या होत्या! म्हणून हा वटवृक्ष जोपर्यंत आपल्या डोक्यावर उभा आहे, तोपर्यंत त्याच्या सावलीत बसण्याचा कृतज्ञ आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे. या वटवृक्षाच्या पारंब्या होऊन आपण जमिनीत घट्ट रुजावे आणि पुढे स्वतः वटवृक्ष होऊन कुटुंबाची धुरा सांभाळावी, हीच खरी पित्याची शिकवण असते.
नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा ‘पिता-पुत्र’ नावाचा पदर अबोल त्यागाचा, कर्तव्याचा आणि नक्षत्रांच्या देण्यासारखा अनमोल आहे. ‘न ऋण जन्मदेचे फिटे’ या उक्तीप्रमाणे हे पितृऋण कधीही न फिटणारे आहे; पण हे देणं जरी पूर्णपणे कधीच फेडता येत नसलं, तरी ते संस्कारांच्या आणि आठवणींच्या रूपाने कृतज्ञतेने जपणे म्हणजेच या नात्याचा खरा सन्मान!
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




