श्री तुकाराम दादा पाटील
विविधा
☆ लहानपण, बालपण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
कशाचीच फिकीर नसते.
मजा असते सगळी, खेळण्यात,
मित्रांसोबत शिवारभर हुंदडण्यात,
निसर्गाच्या सानिध्यात.
छानछान खायला मिळतं. कोडकौतुक अमाप होतं, म्हणूनच लहानपण सगळ्यांनाच कायमच हवंहवंसं वाटत. पण त्याची मजा लुटता येण्यासाठी तुमच्या जवळ निसर्गाची आवड, मित्रपरिवार, घरच्यांचं पाठबळ, आणि तुमच्या तना मनातलं अमाप चैतन्य असावं लागतं. हे फार उशिरा म्हणजे बालपण निघून गेल्यावर कळतं. तेव्हा मन खट्टू होत. अपराधीपणाची भावना निर्माण होते मनात. एक छानशी संधी हकनाक हुकल्याची. तेव्हा कुठलाच पर्याय हातात नसतो… जुन्या आठवणीं आठवण्या शिवाय.
पण ज्यांनी आपलं बालपण घरच्यांचे पाठ शेकणारे धपाटे खाऊन ही मनसोक्त उपभोगलय, अनुभवलय ते भाग्यशाली ठरलेत.
कारण त्यांच्या जवळ आहे आठवणींचा जादुई पेटारा. तो उघडून ते कुठेही केव्हाही आपला स्वतःचा आनंदी कोश निर्माण करून तल्लीनतेने तेथे समधीस्त होऊन, गेल्या दिवसांच्या चित्रफितींचे अवलोकन करत असतात. अशा अनेकानेक चित्र फिती ज्यांच्या पोतडीत ठासून भरून ठेवल्या आहेत त्यांना एकांतवासाने कधीच छळले नाही. तर आनंदाचा पुनः प्रत्यय घेण्याची संधी वारंवार उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच आठवणीच्या इलाख्यातले हे मुसाफिर कायम हसतमुख राहून इतरांना ही हसमुख बनवण्यात तरबेज असतात.
प्रत्येकाला आपलं लहानपण आठवत असेल. त्यातला आपला मोलाचा वाटा त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या काळजावर कोरून ठेवला असेल. त्यांच्यावर साठलेली वयाची धूळ जराशी झटकली की कुबेराला ही देता येणार नाही असा अविनाशी खजीना त्याच्या पुढ्यात अवतरतो.
मग त्यातला प्रत्येक दस्तऐवज त्याच्या गतकाळातील वैभवाला त्याच्या समोर प्रस्तुत करतो आणि आनंदी बनवून स्वप्नसश्रृष्टीची सफर घडवून आणतो. हे गतवैभव प्रत्यक्षात उपभोगता येणं दुरापास्त असलं तरी त्याला आठवून पंख लावून भुतकाळाची अविस्मरणीय सफर नक्कीच करता येते. म्हणूनच बालपणाला, लहानपणाला आपापल्या पासून कधीच दूर लोटून देवू नका. त्याच सतत चिंतन मनन तुम्हाला एक नवी ऊर्जा बहाल करून नवचैतन्य बहाल करील यात काही शंका नाही.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






