श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “Not today! Not today!” ☆ श्री संभाजी बबन गायके

Not today! Not today! Not today!.. आज मी मरणार नाही.. कुटुंबाला मरू देणार नाही!

… अगदी मागच्याच आठवड्यात त्याला केवळ साडेतीनशे मीटर्स अंतर पोहताना खूप दम लागला होता… त्यासाठी त्याने त्याच्या जलतरण प्रशिक्षकाची बोलणीही खाल्ली होती. आणि आज तर त्याच्यापासून किनारा सुमारे चार किलोमीटर्स दूर होता… आणि त्या समुद्रातल्या लाटा त्याला पुढे जाऊ देत नव्हत्या! पण त्याला तर किना-यावर पोहोचायचंच होतं… आज तो मृत्यूला शरण जाणार नव्हता… आणि त्याची आई आणि त्याचे दोन भावंडं अशा तिघांनाही मरणाच्या दारात सोडून येणार नव्हता!

ऑस्ट्रेलियामधील पर्थ शहराच्या दक्षिणेला २०० किलोमीटर्सवर असलेल्या क्विन्डालप या समुद्रकिना-यावर जिओग्राफी बे याठिकाणी केवळ तेरा वर्षे वयाच्या ऑस्टिनचे कुटुंब सुट्टीसाठी आलेले होते… आई जोन, त्याची आठ वर्षांची धाकटी बहिण आणि अकरा वर्षांचा धाकटा भाऊ असे तिघे होते. सुट्टीच शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. परत जाण्याची तयारी झालीच होती… पण हाताशी आणखी थोडावेळ असल्याने त्यांनी समुद्रात फेरफटका मारण्यासाठी एक Paddle Board भाड्याने घेतला… हे रबरी बोर्ड्स हवा भरून फुगवले जातात… आणि हा बोर्ड वल्हे मारून चालवावा लागतो. या board वर ऑस्टिनची आई आणि त्याची दोन्ही भावंडं स्वार झाली… तर ऑस्टिनने स्वत:साठी कयाक बोट घेतली होती… निमुळती असलेली ही छोटीशी बोट वल्ह्याने वल्व्हावी लागते. या समुद्रसफरीला एक तासभर लागणार होता. ऑस्ट्रेलियन माणसं तशी दर्यावर्दी. खोल समुद्रात ते अत्यंत सहजतेने विहार करतात. पोहण्याचे शिक्षण हा त्यांच्याकडे शालेय शिक्षणाचा भाग आहे. समुद्रात बुडणा-या लोकांना वाचवण्यासाठी त्यांच्या समुद्र किना-यांवर विशेष जीवरक्षक तैनात असतात… हे आपण टी. व्ही. वरील बॉन्डाय रेस्क्यू कार्यक्रमात पाहिले असेलच.

 ऑस्टिन छान कयाकिंग करीत होता… पण उत्साहाच्या भरात तो समुद्रात काहीसा जास्त पुढे जाऊ लागला… तसे त्याच्या आईने त्याला मागे बोलवण्यासाठी Paddle Board त्याच्या जवळ नेला. या प्रयत्नात तिचा Paddle Board पाण्यात पलटला आणि तिच्या हातातला एक वल्हे पाण्यात पडले आणि दूर वाहून गेले. आता सर्वजण पाण्यात होते… जोन ने कसाबसा तो paddle board सरळ केला आणि त्यावर तिघेही चढले… जोन Paddle Board एका वल्ह्याने वल्हवू लागली… पण तितक्यात समुद्रात जोराचा वारा सुटला, लाटा उफाणल्या आणि paddle board आणि कयाक यांना आत आत खेचू लागल्या…! आणि paddle board पुन्हा पलटी झाला… जोनच्या हातातलं दुसरं वल्हे सुद्धा पाण्यात पडले! ऑस्टिन त्याची कयाक घेऊन यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावला… त्या तिघांना त्याने कयाकमध्ये ओढून घेतले… पण आता कयाक जड झाली… तिच्यात पाणी भरू लागले… मग या सर्वांनी पाण्यात उद्या घेतल्या… कयाक मधले पाणी समुदात खाली केले… आणि कयाक सरळ करीत पुन्हा तिच्यात चढले… पण आता लाटा आणखी जोरदार येऊ लागल्या… कयाक टिकेल असे वाटत नव्हते. पण तरीही कुणी फार घाबरले नव्हते! किनारा काही फार दूर नव्हता. शिवाय paddle board आणि कयाक ज्या हॉटेलने भाड्याने दिले होते… ते लोक… यांना उशीर झाला म्हणून यांना शोधायला येतीलच… असं जोन ला वाटलं! पण तसं काही घडलं नाही. चार तास उलटून गेले होते या संघर्षाला…

 किना-यावर जवळपास कुणी नव्हतेच… आणि पुढे येणारी प्रत्येक लाट त्यांच्यातले आणि किना-यातले अंतर वाढवत वाढवत चालल्या होत्या. लाटा त्यांना तब्बल चौदा किलोमीटर्स अंतरापर्यंत घेऊन गेल्या होत्या… ओरडून काहीही फायदा नव्हताच… सर्वांच्या अंगावर Life Jackets होती… यामुळेच ते समुद्रात पडले तरी बुडणार नव्हते सहजी. परंतु वारा, थंड आणि खारे पाणी… आणि शार्क मासे! तरीही जोराचे प्रयत्न करीत हे कुटुंब किना-याकडे येण्याचा प्रयत्न करीत राहिले… दहा किलोमीटर्सचे अंतर त्यांनी पारही केले होते… सर्वांना आपण निश्चित किना-यावर पोहोचू, आपल्याला वाचवायला कुणीतरी येईल, असे वाटत होते. पण काहीच झाले नाही… अंधार पडण्याची चिन्हे होती… आपण किना-यापर्यंत पोहत जावे आणि मदत मिळवावी, असे जोनला वाटले… पण दोन लहान मुलांना असं समुद्रात सोडून येणं तिला पटेना… मग तिने एक निर्णय घेतला… ऑस्टिनने कयाक घेऊन किना-याकडे निघावे… आम्ही paddle बोर्ड धरून तरंगत राहू… त्याला पाठवावे! ऑस्टिनने कयाक पुढे काढली.. त्याच्याही अंगावर life jacket होतेच… तो नजरेआड झाला! लाटा कमी होण्याचे मात्र नाव घेईनात!

अंधार पडू लागला… आपण पोराला पुढे पाठवून चूक तर नाही ना केली? आईचं हृदय विचार करून रडू लागलं! बराच वेळ झाला… कुणीही मदतीला आलं नव्हतं!

 इकडे ऑस्टिन कयाकने पुढे पुढे सरकत असताना त्याच्या लक्षात आलं की आपण काही फार पुढे जाऊ शकत नाही आहोत… त्याने पाण्यात उडी घेतली… पण life jacket सुद्धा जड झाले आहे… त्यामुळे पोहण्याचा वेग कमी होतो आहे.. त्याने ते काढून फेकले… आणि त्याला जितक्या पद्धतीने पोहता येत होते त्या त्या पद्धती त्याने अवलंबल्या… ब्रेस्ट स्ट्रोक, back stroke, survival swimming इत्यादी. त्याच्या मनात काय सुरु होतं यावेळी? मला आज किना-यावर पोहोचायचेच आहे… मी आज मरणार नाही… माझ्या कुटुंबाला मरु देणार नाही! ऑस्ट्रेलियन लोक today या शब्दाचा उच्चार साधारणत: to die असा करतात… पण ऑस्टिन मात्र not today… आज नाही… असं मनाशी म्हणत राहिला… त्याला त्याचे मित्र आठवत होते… त्याचं आयुष्य आठवत होतं.. शरीर बधीर होत चाललं होतं… आपण किती थकलो आहोत… हेही त्याला जाणवत नव्हतं… त्याला फक्त किनारा गाठायचा होता! इकडं समुद्रात असलेया जोन आणि तिच्या भावंडांनी आता आशा सोडायला सुरुवात केली… अंधार झाला होता!

ऑस्टिन किना-यावर पोहोचला… आणि कोसळला… पण दुस-याच क्षणी उठला… थकलेले पाय… वाळूतून धावू लागले… तिथून माणसं आणखी दीड दोन किलोमीटर्स दूर होती! जीवाच्या आकांताने ऑस्टिन धावला… पण त्याच्या दुर्दैवाने इंग्लीश भाषा समजू शकतील अशी माणसं त्या गर्दीत नव्हती… होती ती सारी परकीय पर्यटक माणसं होती… ऑस्टिनने आणखी पुढे धाव घेतली… फोन बूथ गाठला… ००० हा तातडीचा फोन डायल केला… आणि अगदी शांतपणे, आत्मविश्वासाने त्याची परिस्थिती कथन केली… मला हेलीकॉप्टर, विमान, बोट हवी आहे… माझी आई, माझे बहिण, भाऊ समुद्रात अडकलेत. त्याने बचाव पथकाला त्यांचा ठावठिकाणा नेमका कुठे असेल ते अचूक सांगितले… पण अंधार पडलेला होता… हेलीकॉप्टरने तो भाग पिंजून काढीत या लोकांना शोधलं… एक आधुनिक बोट त्यादिशेने भरधाव गेली… त्यांनी paddle board ळा धरून पाण्यात कसेबसे तग धरून राहिलेल्या त्या तिघांना वर उचलून घेतले… जोनने विचारले… ऑस्टिन? बचावकर्त्यांनी ऑस्टिन सुखरूप असल्याचे सांगितल्यावरच जोनचा जीव स्थिर झाला! किना-यावर पोहोचताच ऑस्टिनने जोनला आलिंगन दिले… भाऊ, बहिणीला जवळ घेतले… वैद्यकीय उपचारांनंतर या सर्वांना घरी सोडण्यात आले… Austin Applbee हा तेरा वर्षांचा पोरगा… not today… not today… not today म्हणत मृत्यूला हरवणारा पोरगा… हिरो ठरला आहे! जीवन अनमोल आहे… ते वाचवण्यासाठी ऐनवेळी शरीरही त्याच्या मर्यादा ओलांडून जाऊ शकते… फक्त जिद्द हवी… हेच यातून सिद्ध झाले.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments