उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ चार अनुवादित लघुकथा – रथयात्रा / अंधाऱ्या गल्लीतील प्रकाश / असीम प्रेम / आव्हान – मूळ हिन्दी लेखिकाएं : मीरा जैन / समीरा पत्रावाला / हेमलता मिश्र ‘मानवी’ / ज्योत्स्ना कपिल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆☆☆☆
१) रथयात्रा – –
काही विदेशी पर्यटक भारत भ्रमण करण्यासाठी आले होते. ते एका प्रेक्षणीय स्थळाकडे निघाले होते. वाटेत यांना एक मोठी रथयात्रा दिसली. मोठा, सजवलेला रथ होता. रथात एक काचेची पेटी होती. तीही फूलमाळांनी सजवलेली होती. त्या पेटीतही एक सजवलेला कलश होता. त्या कलशात लाल माती होती. लोक गावातले असोत की शहरातले असोत, मोठ्या श्रद्धेने त्या काळाशाला नमन करत होते. कलशाशेजारी एक दानपेटी ठेवलेली होती. त्या रथामागे प्रचंड जनसागर लोटला होता. लोक आपआपल्या शक्यतेनुसार त्या दानपेटीत पैसे टाकत होते.
विदेशी पर्यटकापैकी एक जण आपल्या साथीदाराला म्हणाला, ‘इंडियन्स अजूनही मागासलेले आणि अंधश्रद्धाळू आहेत. जसा काही तो कलश त्यांच्या मनोकामना पूर्ण करणार आहे. ’
एवढं ऐकून त्यांच्याबरोबर जाणारा गाईड म्हणाला, ‘ सॉरी सर! तो कलश, त्यातली लाल माती निर्जीव दिसत असली, तरी आम्हा सगळ्यांसाठी ती सजीव आहे. सगळ्या देशवासीयांच्या माना त्या निर्जीव वाटणार्या शो केसपुढे श्रद्धेने लवताहेत, कारण त्या शो केसमध्ये असलेल्या कलशामधील लाल माती आमच्या देशाच्या सरहद्दीवरील आटी आहे. ती देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या रक्ताने लाल झाली आहे. सरहद्दीवर लढणार्या आमच्या सूर-वीर सैनिकांच्या बलिदानाची ती निशाणी आहे. त्या काळाशाशेजारी ठेवलेल्या दानपेटीतील रकमेचा विनियोग त्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी केला जाणार आहे. ’
हे स्पष्टीकरण ऐकता ऐकता मगाशी टीका करणार्या त्या विदेशी पर्यटकाचे डोळे भरून आले.
तो म्हणाला, ’ खरोखरच भारत महान आहे.’
मूळ हिन्दी कथा : भक्ति का सैलाब
मूळ लेखिका – मीरा जैन मो. 9425918116
मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454
☆☆☆☆
२) अंधार्या गल्लीतील प्रकाश – –
घरात जन्मलेल्या नव्या नातवाच्या खुशीत, गीतांजली काही कीन्नरांना मिठाई आणि पैसे देत होती, ते पाहून राजू आश्चर्यचकित झाला. हीच आहे का ती गीतांजली, जी प्रत्येक सामाजिक मुद्यावर आपली कडक आणि ठाम मते मांडते आणि नेहमीच तिची कुणाशी ना कुणाशी जुंपते.
एक घटना राजूच्या डोळ्यासमोर जीवंत होऊन साकार झाली…
तो आणि गीतांजली, पौर्णिमाच्या लग्नासाठी जात होते. सिग्नलशी गाडी थांबते न थांबते, तोच एक किन्नराने टाळ्या वाजवत गीतांजलीच्या पुढे हात पसरण्याचं दु:साहस केलं. बस! मग काय? गीतांजली सुरू झाली. खूप वेळ त्याला समजावत राहिली, की असं धड-धाकट असताना भीक मागणं चुकीचं आहे. यात समाजाचे नुकसान आहे. वगैरे… वगैरे…
किन्नरही काही कमी नव्हता. त्याने सरळ सरळ विचारले, ‘आम्हाला कामावर ठेवणार कोण?’
गीतांजली लगेच म्हणाली, ‘ मी ठेवीन. माझी कपड्यांची शो-रूम आहे. आजपासूनच तुला कामावर ठेवते. तुला वीस हजार रुपये महिना मिळतील!’
किन्नरने जोरात टाळी वाजवली नि हसत हसत म्हणाला, ‘बस! इतकेच? महिन्याचे साठ हजार तर मी मागून कमावतो. तुला काम पाहिजे, तर सांग! तसं मागण्याचं काम सोपं नाही. तुझ्याच्याने नाही होणार!’ त्याच्या उत्तराने गीतांजलीला गप्प बसवलं.
– – त्या दिवसांनंतर गीतांजलीच्या मनात या समुदायाविषयी जवळ जवळ घृणाच निर्माण झाली. त्यामुळेच आज ती जे करत होती ते पाहून राजूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या चेहर्यावर उमटलेले प्रश्नचिन्ह पाहून गीतांजली म्हणाली, ‘माझ्यात झालेल्या बादलाचं कारण जाणून घ्यायचय, हो ना!’
राजूने होकारार्थी मान हलवली.
गीतांजली संथपणे हळुवार आवाजात सांगू लागली, ‘ परवा कामासाठी भाईंदरला गेले होते. संध्याकाळी काहीशा उशिराच एका अंधार्या गल्लीजवळ रिक्षाची वाट पाहत उभी होते. तिथे थोडीशी गर्दी जमली होती. एक हट्टा-कट्टा गुंड एका शालेय मुलीला त्रास देत होता. तो जवळ जवळ तिला ओढूनच नेत होता. मी हटकलं नसतं, तर त्याने तिला नेलंही असतं. ‘
ती थोडा वेळ थांबली. मग म्हणाली, ‘माझं म्हातारं शरीर त्याला थांबवू शकत नव्हतं. इथे हजर असलेली तरुण मुले मात्र त्या गुंडाच्या धिप्पाड शरीराकडे बघून, जसे काही जमिनीत गाडले गेले होते. मी मदतीसाठी आरडा-ओरडा केला. माझा आवाज ऐकून एक किन्नर आला. काय घडते, हे लक्षात येताच त्याने जोरात आवाज केला आणि काही क्षणातच तिथे अनेक किन्नर एकत्र झाले आणि सगळ्यांनी मिळून त्या मुलीला वाचवले. ‘
गीतांजली दूर जाणार्या किन्नरांकडे बघत राहिली, मग हळुवार स्वरात म्हणाली, ‘न जाणे आपण कधीपासून पौरुषत्वाला, हिमतीच्या ऐवजी शरीराने मोजणं सुरू केलं! त्यामुळे आपण कधी कधी लोकांना समजण्यात चुका करतो. ’
राजूच्या मनात अजूनही अनेक प्रश्न निर्माण होत होते, पण त्याला सध्या तरी गीतांजलीचं हे बदललेलं रूप आवडलं होतं.
मूळ हिंदी कथा – ‘ अँधेरी गली की रोशनी’
मूळ लेखिका – समीरा पत्रावाला मो. 9867546293
अनुवाद – उज्ज्वला केळकर मो. – 8369252454
☆☆☆☆
३) असीम प्रेम – –
‘नाही! मी तुझ्याकडून हे फूल घेऊ शकत नाही. नाही स्वीकारू शकणार मी हे फूल! अमन, तुझ्या प्रेमाचे निवेदन मी स्वीकारू शकत नाही. ’
‘का बरं?’ तू आणखी कुणाची वाट बघते आहेस का? कोण आहे तो नशीबवान?’
‘माझ्या हृदयाने कायम अमनचीच कामना केलीय. ’
‘तरी पण आजच्या प्रेम दिवशी तू माझं फूल स्वीकारायला नकार देतेयस. तुझ्या मनात दूसरा कुणी भऱलाय का?’
‘ इतका मोठा आरोप तू माझ्यावर करू नकोस. मी केवळ अमन आणि अमनचीच कामना केलीय! पण काय करू? कसं सांगू? मी आता तुझ्यायोग्य राहिले नाही. तू मागच्या सुट्टीत चंदीगडला गेला होतास, तेव्हा सीमा पार करून काही आतंकवादी आमच्या गावात आले. त्यांनी गावातल्या काही मुलींना आपल्या वासनेच्या शिकार बनवल्या. मी अभागीही त्यांच्यापैकी एक होते अमन. आता तूच सांग. पायतळी चुरगाळलेलं फूल ईश्वराला अर्पण करत नाहीत ना!’ बोलता बोलता स्फुंदून स्फुंदून स्नेहा रडू लागली. अमन क्षणभरासाठी स्तब्ध झाला. दुसर्या क्षणी त्याच्यातील सुरक्षा रक्षक जागा झाला.
हुंदके देणार्या निर्दोष स्नेहाला गळामिठी घालत अमन एकच वाक्य बोलला, ‘त्या नापाक लोकांचे पाय आमच्या पवित्र धारणीला लागले, म्हणून काय आपण आपल्या धरणीला अपवित्र मानायचं? नाही नं? मग त्या जंगली जनावरांच्या अभद्र हरकतीमुळे तू कुठे मलीन झालीस?तू तर या पवित्र धरेसारखी पवित्र आहेस,
जी नेहमीसाठी अमनचीच इच्छा धरून आहे. विसरून जा सगळं. तू माझीच आहेस. नेहमीसाठी. आता त्या जंगली जनवरांसाठी माझ्या बंदुकीतल्या गोळ्या आणखीनच निर्मम होतील. बघच तू!
– – आणि प्रेमदिवाणी स्नेहाने आपले डोळे अमनच्या पावन इच्छेवर ओवाळून टाकले. त्या अपरिभाषित प्रेमदिवशी.
मूळ कथा – ‘अछोर प्रेम’
मूळ लेखक – हेमलता मिश्र ‘मानवी’ मो. ९325855263
मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो– 8369252454
☆☆☆☆
४) आव्हान – –
जूनागड संस्थानच्या वार्षिक गायन स्पर्धेची घोषणा झाली होती. संगीत प्रेमींमध्ये खूप उत्तेजना निर्माण झाली होती. उस्ताद जाकिर खान आणि पंडित ललित शास्त्री दोघेही बेजोड गायक होते, पण त्यांच्यात तीव्र स्पर्धा होती. राष्ट्रीय संगीत आयोजन स्पर्धेसाठी दोघेही आपली सर्व ताकद पणाला लावून, जिवाची बाजी लावून रियाज करत होते. दोघांच्याही शागीर्द, शिष्यात हाणामारीची वेळ येत असे. दोघांचेही शिष्य आपापले गुरू श्रेष्ठ असल्याचे सांगत.
खानहेब एखादा आलाप घ्यायचे, तेव्हा लोक शुद्ध-बुद्ध हरपून ऐकत राहायचे. इकडे शास्त्रीजींच्या एका आरोह-अवरोहाच्या प्रवाहात लोक श्वास रोखून, त्यांना ऐकत राहत. दोघांचाही रियाज ऐकून स्पर्धेत विजेता होण्याचा गौरव कोण प्राप्त करेल, हे सांगणे मोठे मुश्कील काम होते. त्यांच्यात कोण विजेता होईल, याबद्दल मोठ मोठया पैजा लागत.
शास्त्रीजींची बोटे सतारीवर थिरकत होती. ते आपल्यातच मग्न होऊन स्वरांच्या लहरी विखरत होते. पशू-पक्षी ते सूर ऐकता ऐकता सगळं विसरून गेले होते. एवढ्यात त्यांचा एक शिष्य पळत पळत त्यांच्याकडे आला. म्हणाला, ‘आपण संगीताच्या दुनियेतील सम्राट होऊन रहाल. आपल्याला यापुढे कधीच कुणीच आव्हान देऊ शकणार नाही.
‘का बरं?’
‘गुरुजी, आत्ता आत्ताच बातमी कळली, की आज रियाज करता करता खानसाहेबांचा अंतकाळ झाला. ’ अतिशय उत्तेजित आवाजात त्यांचा शिष्य सांगत होता.
– – हे ऐकताच शास्त्रीजींचं तोंड उघडं ते उघडंच राहिलं. मग डोळ्यात अश्रू तरळले. मग त्यांनी सतार उचलली. ती गवसणीत घालून नेहमीच्या जागी ठेवली. मग देवी सरस्वतीला प्रणाम केला. मग शून्य नजरेने आभाळाकडे बघत भरून आलेल्या आवाजात म्हणाले…
‘आज माझी उमंग, उत्साह, मनोबळ सरलं… आता मी जीवनात कधीच गाऊ शकणार नाही.
मूळ हिन्दी कथा – ‘ चुनौती ‘
मूळ लेखिका – ज्योत्स्ना कपिल.. मो. 9412291372
मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो– 8369252454
☆☆☆☆
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




