श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी

महात्मा गांधी हे टागोरांपेक्षा बरेच लहान. पण दोघे अगदी सख्खे मित्र होते. गंमत म्हणजे ही मैत्री ते समविचारी आहेत म्हणून होती कां, तसेही नाही. आपण म्हणतो नं, ‘तुझं माझं पटेना आणि तुझ्याशिवाय गमेना’ तसा प्रकार आहे हा! कित्येक बाबतीत त्यांच्यात मतभेद होते, कधी कधी टोकाचे, पण त्यामुळे मैत्रीत बाधा आली नाही.

त्यांच्यातल्या मतभेदाला सुरवात, गांधींजींनी शांतिनिकेतनला दिलेल्या पहिल्या भेटीपासूनच झाली. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आले आणि लगेंच ६ मार्च १९१५ ला त्यांनी शांतीनिकेतन ला पहिली भेट दिली. तोपर्यंत टागोर जगप्रसिद्ध झाले होते, कारण १९१३ मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता.

शिक्षणाबद्दलच्या विचारात दोघांमध्ये मूलभूत मतभेद होते. गांधीजींच्या मते शिक्षण हे व्यावहारिक व सर्वांगीण विकासावर केंद्रित हवे. जागतिक प्रवाहाशी जुळवून घेण्याची त्यांना गरज वाटत नव्हती. शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार त्यांना गरजेचा वाटत नव्हता. याउलट टागोरांचा शिक्षण विषयीचा दृष्टिकोन वैश्विक होता. तरीही भारतीय परंपरांचा पण शिक्षणात अंतर्भाव व्हायला हवा म्हणून त्यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली, जिथे भारतीय परंपरा व आंतरराष्ट्रीय मूल्ये यांचा मेळ घालणारे शिक्षण देणारी व्यवस्था होती. यामुळे गांधीजी शांतिनिकेतनच्या शिक्षण पद्धतीवर संतुष्ट नव्हते.

गांधींच्या मते अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःची कामे स्वतः करावी. नोकर, स्वयंपाकी, झाडूवाले, पाणीवाले यांची गरज नसावी. त्यांनी हे मत टागोरांकडे व्यक्त केलं व टागोरांनीही कोणताही किंतु न बाळगता ही पद्धत अंमलात आणली. तो दिवस (१० मार्च) ‘गांधी दिवस’ म्हणून रविंद्रनाथांनी घोषित केला. आजही तेथे या दिवशी सर्व कामगारांना सुट्टी दिली जाते व विद्यार्थी सर्व कामे करतात.

स्वातंत्र्य, समता व मनुष्य धर्म यांची दोघांनाही ओढ आहे पण गांधीनी लोकलढ्याचा मार्ग अवलंबिला. मात्र टागोरांना अहिंसात्मक लढा प्रसंगी हिंसक होतो याचे भय वाटे. हा लढा सामान्य माणसातील सुप्त सामर्थ्य जागे करतो यावर दोघांचा विश्वास होता. पण विराट समुदायाच्या भावनांना गांधी ऐनवेळी कसा आवर घालणार ही चिंता टागोरांना होती. उपोषणात टागोरांना अतिरेक दिसे तर गांधीजींना त्यात आत्मशुद्धी दिसे. उपोषण हा एक अहिंसक जुलूम आहे ही टागोरांची भूमिका तर तो नैतिक बळाचा वापर आहे ही गांधीजींची भूमिका होती.

दोघेही वसाहतवाद व भांडवलशाहीच्या विरोधात होते. पण गांधीजींनी राजकारणाचा मार्ग स्विकारला आणि टागोरांनी शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्राचा! असहकार चळवळ, शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार, परदेशी कपडे जाळणे याला टागोरांचा प्रचंड आक्षेप होता.

रोज अर्धा तास प्रत्येकाने चरखा चालवावा असे आवाहन गांधीजींनी केले, तेव्हा टागोर उपहासाने म्हणाले, “जर यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत होणार असेल तर मग अर्धा तास का, साडे आठ तास का नाही?” एकूणच गांधींच्या चरखा प्रकरणावर ते टीका करत, व यामुळे भारत पुन्हा मध्ययुगात जाईल, अशी शंका व्यक्त करत.

स्वातंत्र्य चळवळीत उपेक्षित घटकांसह समाजातील सर्व घटकांच्या समावेशाचा आग्रह गांधीजींनी धरला. हिंदू मुस्लिम ऐक्य, दलितांची उन्नती यावर त्यांनी भर दिला. ते अनेकदा पाश्चात्त्य संस्कृतीवर टीका करत. याउलट टागोरांचा राष्ट्रवाद विश्व व्यापी व मानवतावादी होता.

बिहारच्या भूकंपानंतर गांधीजी म्हणाले होते, “हरिजनांना अस्पृश्य म्हणून वाळीत टाकल्याबद्दलची ही शिक्षा देवानेच दिली आहे. “

यावर टागोरांनी कडाडून टीका केली. कारण ते अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात होते. त्यांच्या मते लोकांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे. वैज्ञानिक प्रगतीनेच राष्ट्र समृद्ध होईल यावर त्यांचा दृढ विश्वास होता.

दोघेही अहिंसा, सहिष्णुतेवर आधारित मानवतावाद व निसर्ग प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. दोघेही आत्मनिर्भरतेच्या बाजूने होते. दोघेही गरिबी व दयनीय अवस्थेत जगणाऱ्यांच्या बद्दल प्रेम व सहानुभूती बाळगून होते. दोघेही भारताच्या प्राचीन संस्कृतीचा व आध्यात्मिक इतिहासाचा अभिमान बाळगणारे होते.

गांधीजींच्या मते, माणसे सगुण ईश्वराची पूजा करत असतील तर ती मानसिक गरज म्हणून पहावी. जनसामान्यांना दिलासा देणारा परमेश्वर त्यांना मान्य होता. टागोरांचं उपनिषदीय अध्यात्म सामान्यांच्या पचनी पडणारं नाही म्हणून त्यांना पसंत नव्हतं.

गांधीजींना ईश्वर सत्यामधे दिसत होता तर टागोरांना ईश्वर प्रेमात दिसत होता व दोघांचे मार्गही वेगळे होते. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने सत्य मिळविण्याचा प्रयत्न केला. तर टागोरांनी सहकार्य, परस्पर आदर व सहिष्णुतेच्या मार्गाने प्रेम म्हणजेच ईश्वर मिळविण्याचा प्रयत्न केला.

दोघांना एकमेकाबद्दल प्रचंड आदर होता. दोघे एकमेकाचे प्रचंड चाहते होते. मूल्ये सारखीच पण तपशिलात मतभेद होते. त्यांच्यात सतत पत्र व्यवहार होत होता. त्यात मतभेदांची मोकळी चर्चा व्हायची कारण दोघांनाही परस्परांची थोरवी मान्य होती. आणि त्यामुळेच गांधीजींनी टागोरांचा उल्लेख ‘गुरुदेव’ असा केला तर टागोरांनी गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली 

दोघांनीही मैत्रीचे नाते कसे निभावले याचीही उदाहरणे आहेत.

अनुसूचित जातींना स्वतंत्र मतदार संघ देण्याच्या ब्रिटिश प्रस्तावाच्या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले होते. त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटल्याने टागोर स्वतः त्यांना भेटायला गेले. त्यावेळी सुदैवाने इंग्रज सरकारने त्यांची मागणी मान्य केली होती आणि या नेत्याने उपोषण सोडले. त्यावेळी महात्माजींनी टागोरांना स्वतः रचलेले गाणे गाण्याची विनंती केली आणि खरोखरच टागोरांनी ‘जीवन जाखन शुकै ए जय करुणाधारे’ हे गाणे म्हटलं.

विश्वभारतीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी निधी गोळा करणे या उद्देशाने नृत्य नाट्य पथक घेऊन टागोर दिल्ली दौरा करत होते. ही बातमी गांधीजींपर्यंत पोहोचली. इतक्या उतार वयात निधी गोळा करण्यासाठी त्यांना फिरताना पाहून गांधीजींना अतीव दुःख झाले. गांधीजी त्यांना भेटले व त्यांच्या पैशाची व्यवस्था ही केली.

टागोरांच्या मृत्यूच्या आधी एक वर्ष म्हणजे १९४० मध्ये गांधीजी कस्तुरबांसह या आजारी कवीला भेटायला गेले होते. टागोरांनी त्यांना विनंती केली की आपल्या नंतर गांधींनी विश्वभारतीचा कार्यभार स्वीकारावा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५१ मध्ये विश्वभारती ला भारत सरकारने केंद्रीय विद्यापीठ म्हणून मान्यता दिली.

एकाच वेळी एकमेकांचे विरोधक व प्रशंसक असणाऱ्या या दोन महान विभूतीं सारखी शुद्ध, स्पष्ट व आदरयुक्त मैत्री पुन्हा होणे नाही.

—–

☆ गीत : ८२ ☆

TIME is endless in thy hands, my lord. There is none to count thy minutes.

Days and nights pass and ages bloom and fade like flowers. Thou knowest how to wait.

Thy centuries follow each other perfecting a small wild flower.

We have no time to lose, and having no time we must scramble for our chances. We 

are too poor to be late.

 

And thus it is that time goes by while I give it to every querulous1

 man who claims it, and thine altar is empty of all offerings to the last.

 

At the end of the day I hasten in fear lest thy gate be shut; but I find that yet there is time.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८२ ☆

मोजतसे क्षण।

कोण तुझे पण।

काळाचे बंधन।

तुला नाही॥

 

दिस राती जाती।

ऋतु सरताती।

युगे युगे भक्ती।

वाट पाही॥

 

काळ तुझ्या हाता।

फुले उमलता।

आणिक सुकता।

काय राही॥

 

सृष्टी आवडीने।

निर्मि सवडीने।

काळ कावडीने।

पाणी भरी॥

 

आम्ही तो पामर।

काळाचे चाकर।

मिळता भाकर।

सारे साहू॥

 

असे ज्याचा त्याचा ।

आपल्या वाट्याचा।

त्याच्या प्रसादाचा।

कालखंड॥

 

माझ्या वेळे साठी।

सगेच भांडती।

कसा तुझ्या साठी।

वेळ काढू॥

 

साधे ना सकळ।

न काढी जो वेळ।

तो तुझ्या जवळ।

जाता न ये॥

 

दिसाच्या शेवटी।

येतो तुझ्या कुटी।

दार जगजेठी।

लावू नको॥

 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ८३ ☆

MOTHER, I shall weave a chain of pearls for thy neck with my tears of sorrow.

The stars have wrought their anklets of light to deck thy feet, but mine will hang upon thy 

breast.

Wealth and fame come from thee and it is for thee to give or to withhold them. But this my sorrow is absolutely mine own, and when I bring it to thee as my offering thou rewardest me with thy grace.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८३ ☆

जरी चंद्रतारका घेऊन येती

पैंजण रुणझुण तुझ्या पदाला॥

*

ओवीन म्हणतो तुझियासाठी

माझ्या दुःखाश्रुंची माला

जी रुळेल तव वक्षावरती

हृदयाशी करी हितगूजाला॥

*

मानमरातब आणिक मत्ता

तूच देतसी, तूच घेतसी

दुःखावर परी माझी सत्ता

अर्पित तुजला, घे हृदयासी॥

*

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ८४ ☆

IT is the pang of separation that spreads throughout the world and gives birth to shapes innumerable in the infinite sky.

It is this sorrow of separation that gazes in silence all night from star to star and becomes lyric among rustling leaves in rainy darkness of July.

It is this overspreading pain that deepens into loves and desires, into sufferings and joys 

in human homes; and this it is that ever melts and flows in songs through my poet’s 

heart.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८४ ☆ 

☆ 

विरह वेदना भुवना व्यापिते

अंबरी अगणित रचना निर्मिते॥

*

नीरवतेतुन ती अंधारी फिरते

सहसंवेदना ताऱ्यांत शोधिते॥

*

तीच आणखी बनुनी गीते 

पाऊसओल्या पानी सळसळते॥

*

ही अनुभूती वैश्विक असते

प्रेम, अपेक्षा यातही रुजते॥

*

आनंद, यातना घरोघरी पाहते

तीव्रता तयांची हृदयी सांडते॥

*

माझे कवीमन त्यात अडकते

काव्य त्यातुनी जन्मा येते॥

☆ 

– क्रमशः भाग २८

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted