श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “ऑपरेशन रिडल!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
ऑपरेशन रिडल!
अर्थात… रणभूमीवर मरणाचं कोडं सोडवणारी लढवय्यी ‘१९, मराठा बटालियन’!
युद्धास तोंड फुटल्यावर रणभूमी सैनिकांसमोर कधी कोणता पेच टाकेल हे सांगता येत नाही. मृत्यू तर उभाच असतो वाट पहात. तोही मग कोडं घालतो एखादं आणि आजमावतो कुणाच्या काळजात किती धमक आहे ते. त्यादिवशी ज्याला ते कोडं उमगलं आणि सोडवता आलं… तो जेता होतो!
वर्ष १९६५. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे कश्मीरमध्ये टोळीवाले घुसवले. उद्देश तोच होता… भारताविरोधात तिथे उठाव घडवून आणायचा… आणि काश्मीर पाकिस्तानात घ्यायचे! हसून पाकिस्तान मिळवले होते.. आता घुसून काश्मीरही पाहिजे होते त्यांना. त्यांनी त्यांच्या या घुसखोरीला नाव दिलं होतं… ऑपरेशन जिब्राल्टर! पाकड्यांना हे नाव कसं सुचलं असेल? ७११ या वर्षी मुसलमानी आक्रमकांनी स्पेन जिंकून घेण्याची मोहीम तिथल्या जिब्राल्टर नावाच्या पर्वतापासून केली होती, असे म्हणतात.
काश्मिरात हल्लेखोर टोळीवाल्यांचे लहान लहान गट मोठ्या प्रमाणात घुसवायचे, त्यांना सीमेपलीकडून मदत पोहोचवत राहायचे, स्थानिक जनतेत भारताविरोधात असंतोष निर्माण करायचा म्हणजे बंड करून उठतील. आणि मग काश्मीर पाकला जोडायचा असा त्यांचा होरा होता.
कश्मिरात लढाई आहे म्हणजे भारताचे सर्व लक्ष काश्मीर सीमेवरच केंद्रित राहील, असेही त्यांना वाटले होते. पण रानडुकराने सिंहाच्या शेपटीला चावा घेतल्यावर सिंह त्याचं नरडं धरतो… हे ते विसरले होते. ५ ऑगस्ट, १९६५. जम्मू, पुंछ, उरी, टिठ्वाल, गुरेज आणि कारगिलमधून सुमारे ८००० टोळीवाले लढवय्ये पाकिस्तानने भारतात लहान गटांत घुसवले. त्यांनी काश्मीरमध्ये एकत्रित यायचे व मोठा हल्ला करायचा… असे ऑपरेशन होते!
भारतात घुसलेल्या टोळीवाल्यांशी आमचा काही संबंध नाही, असे पाकिस्तानी सैन्याने सोंग घेतले होते खरे, पण या टोळीवाल्यांना पुढे घुसता यावे यासाठी पाकिस्तानी तोफखाना भारतीय सैन्यावर तुफान गोळाबारी करीत होता!
पण सर्वच काश्मिरी पाकच्या या बतावणीला बळी पडणा-यातले नव्हते. त्यांतील अनेकांनी भारतीय सैन्याला साहाय्य करायला सुरुवात केली. आणि पाकचा डाव त्यांच्यावरच उलटू लागला.
२८ ऑगस्ट, १९६५ पर्यंत भारतीय फौज पाकने १९४८ मध्ये चोरून घेतलेल्या पाक-व्याप्त काश्मीरमध्ये युद्धबंदी रेषा ओलांडून सुमारे आठ किलोमीटर्स आत घुसल्या आणि हाजी पीर खिंड ताब्यात घेतली… तिथूनच घुसखोर काश्मिरात येत असत. या अत्यंत साहसी हल्ल्यात भारतीय सैन्याचे नेतृत्व १ PARA चे त्यावेळी मेजर असलेले व पुढे लेफ्टनंट जनरल पदी पोहोचलेले श्री. रणजीत सिंग दयाल साहेबांनी केले.
सप्टेंबर महिन्यात आणखी ५५०० सशस्त्र टोळीवाले घुसखोर भारतात घुसण्याच्या पवित्र्यात पाक गिळंकृत काश्म्रीरमध्ये सज्ज होते… पण ते घुसण्याच्या आतच भारताने एक मोठी खेळी केली!
भारताचे लक्ष केवळ काश्मिरात केंद्रित असेल, आणि भारत कधीही स्वत: सीमा ओलांडून हल्ला करीत नाही अशा भ्रमात असलेल्या पाकड्यांना भारताने ६ सप्टेंबर, १९६५ रोजी लाहोर, सियालकोट कडे जाणारी आंतरराष्ट्रीय सीमारेषा पार करीत पश्चिम पाकिस्तानात जोरदार मुसंडी मारून मोठा धक्का दिला… त्यामुळे छांब भागातून पाकिस्तानी सैन्याला शेपूट घालून मागे पळून जावेच लागले!
बुद्धीबळाच्या पटावर उभ्या असणा-या प्रत्येक सोंगटीची भूमिका ठरवून दिलेली असते. पण माणसांच्या प्रत्यक्ष रणात मात्र ज्याच्या वाट्याला जी भूमिका येईल ती निभावून न्यावी लागते… काहीही झालं तरी जिंकण्यावाचून पर्याय नसतो!
मराठा लाईट इन्फंट्रीची एकोणीसावी तुकडी लेफ्टनंट कर्नल एस. डी. परब साहेबांच्या नेतृत्वात पाकिस्तानात घुसली होती. मराठयांनी मानिहाला, जहमान आणि चटानवाला हे भाग जिंकून घेतले होते. या लढाईत एक कंपनी कमांडर गंभीर जखमी झाले. एक कनिष्ठ अधिकारी आणि दोन सैनिक धारातीर्थी पडले तर तब्बल २९ सैनिक जबर जखमी झाले होते! या लढाईत स्वत: जबर जखमी होऊनही लढत राहणारे मेजर विजय कुमार यांना वीर चक्र पुरस्कार जाहीर झाला.
दिनांक २० सप्टेंबर, १९६५. एका सैन्य ‘कंपनी’मध्ये सुमारे १२० सैनिक असतात.
पंजाबातील खेमकरण/लाहोर भागात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ठत्ती जयमाल सिंग नावाचे चंदिगढच्या पश्चिमेला २२० किलोमीटर्सवर असलेले एक गाव. या सीमेपासून जवळच हुदियारा-बार्की रस्त्यावर पाकिस्तानचा अत्यंत ताकदवान सैनिकी तळ होता. १९, मराठा बटालियनने थेट याच तळावर तुफानी हल्ला चढवला. पाकिस्तान्यांनी अर्थातच मोठा प्रतिकार केला. त्यामुळे अत्यंत भीषण लढाई होणं साहजिकच होते. संख्याबळ आणि शस्त्रास्त्रे यांबाबत पाकडे वरचढ असतानाही आपल्या बहादूर सैनिकांनी जीवाची पर्वा न करता त्यांची दाणादाण उडवून दिली. सकाळी सव्वा सहा वाजता १९, मराठा लाईट इन्फंट्रीच्या ‘सी’ कंपनीने दुश्मनाच्या दिशेने पुढे पाऊल टाकले! Forward Observation Officer म्हणून सेकंड लेफ्टनंट के. एस. चोक्कर हे सैन्यात अगदी नुकतेच दाखल झालेले तरणेबांड अधिकारी सोबत होते. साडेसात वाजले होते… वाटेत लागलेला एक खोलगट नाला पार करीत असतानाच ‘कंपनी’वर उजव्या बाजूने गोळीबार सुरु झाला! …
नायब सुबेदार हरिबा बर्गे यांच्या नेतृत्वात असलेल्या सर्वांत पुढच्या गटावर तिथून दोनशे यार्ड्सवर असलेल्या खंदकामधून मारा होऊ लागला. सी अर्थात Charlie कंपनीचे ‘टायगर’ असलेल्या अधिका-याने त्वरीत परिस्थितीचा अचूक अंदाज घेतला. ‘टायगर’ हे तुकडीचे नेतृत्व करीत असलेल्या अधिका-याचे रेडीओ संदेश वहनामध्ये वापरायचे गुप्त नाव (call sign) होते… त्यांचे नाव होते… भारतीय सेनेचे जांबाज अधिकारी मेजर मोहम्मद अहमद झाकी साहेब.
शत्रूवर समोरून चालून जायचं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं होतं! त्यामुळे ‘टायगर’ने सैनिकांना तिथून उजव्या बाजूला नेलं. तेवढ्यात अनुभवी, शूर शिपाईगडी असलेले नायब सुबेदार हनुमंत बर्गे यांच्या उजवा पाय शत्रूच्या लाईट मशीन गन मधून डागल्या गेलेल्या मोठ्या फैरीने जायबंदी झाला! त्वरीत निर्णय घेत ‘टायगर’ने (C. H. M.)कंपनी हवालदार मेजर कृष्णा सावंत यांना प्लाटूनची धुरा सांभाळण्याचा आदेश दिला! उजव्या बाजूने सावंत साहेबांचे प्लाटून आणि आणखी एक बहादूर सैनिक सुबेदार वासुदेव दळवी यांचे प्लाटून डाव्या बाजूने थेट शत्रूवर चालून गेले… गोळ्यांच्या वर्षाव सुरूच होता!
ऊसाच्या शेतातून मराठे अगदी भुतासारखे शत्रूच्या समोर उभे ठाकले… शत्रू गडबडून गेला. तोफखाना विभागाचे सेकंड लेफ्टनंट के. एस. चोक्कर साहेबांनी शत्रूवर मारा सुरु करण्याचे आदेश दिले. दरम्यान चोक्कर साहेबांसोबत रेडीओ सेट आणि रायफल घेऊन चाललेला सैनिक शत्रूच्या गोळ्यांनी जखमी झाला. ‘टायगर’ ने दुस-या एका सैनिकाला रेडीओ सेटची जबाबदारी सोपवली. पण रेडीओ सेट नादुरुस्त झाला असं वाटलं कारण त्याच्यावर येणारे संदेश बंद झाले होते. पण रेडीओ खरंच खराब झाला किंवा कसे हे समजायला मार्ग नव्हता. त्यावर ‘टायगर’ चोक्कर साहेबांना म्हणाले, ”तुम्ही रेडीओवरून तोफखान्याला संदेश देत रहा… जर त्यांनी तुम्ही सांगितलेल्या लक्ष्यावर अचूक मारा केला याचा अर्थ तुमचा रेडीओ काम करतो आहे, असे समजा! ” होय, रेडीओमधून संदेश प्राप्त होत नव्हते… मात्र पाठवले मात्र जात होते! तोफखाना अचूक गोळाबारी करीत होता! जणू One Way Communication!
पण ते ठिकाण म्हणजे शत्रूचा मोठा तळ होता. त्यांच्याकडूनही तेवढाच जबरदस्त तोफखान्याचा मारा सुरु होता. एवढ्यात चार्ली कंपनीवर जवळच्या ढोलन या ठिकाणाहून तोफगोळे आणि रणगाड्यातून डागल्या जाणा-या गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला! तेवढ्यात डाव्या बाजूने पुढे जात असलेले सुबेदार वासुदेव दळवी ‘टायगर’ यांच्याकडे पाहून ओरडले, ”साहेब, पुढं बघा… दुश्मनाचा बंकर! ’
त्याचवेळी ‘टायगर’ त्या बंकरवर दोन ढांगांत पोहोचले… त्यांच्या रेडीओ ऑपरेटर सैनिकाला, लान्स नायक बबन टिमकिरे यांना त्याच बंकर मधून डागल्या गेलेल्या लाईट मशीनगनच्या गोळ्यांनी जबर जखमी केले. कंपनी हवालदार मेजर कृष्णा सावंत साहेबांनी त्या बंकरवर हल्ला करून त्यातील शत्रूला नेस्तनाबूत केले! त्यावेळी जबरी हातघाईची लढाई झाली… खंदकात रायफलने एकमेकांवर गोळीबार करता येण्याएवढी जागा नसते… तिथे अक्षरश: शारीरिक झटापट करावी लागते, बंदुकीच्या टोकाला असलेल्या सु-याचा वापर करून शत्रूला भोसकावे लागते!
या हल्ल्याने शत्रूचे त्या ठिकाणचे मुख्य केंद्र आपल्या ताब्यात आले होते. तिथे दोन आर. सी. एल. जीप गाड्या (Recoilless Guns बसवलेली वाहने), त्यांचे ट्रेलर, दोन ट्रक भरून दारूगोळा आणि त्यांच्या अधिका-याकडे असलेला नकाशा… एवढी सामुग्री हाती लागली! सतरा पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह तिथे विखरून पडलेले होते. अप्रतिम युद्धकौशल्याचा वापर करीत चार्ली कंपनीने शत्रूला त्याच्या मागे जाऊन कोंडीत पकडले होते. भांबावलेला शत्रू वाट फुटेल त्या दिशेला पळाला… तिथून दक्षिणेला असलेल्या संकरता गावाकडे. सकाळचे सव्वा नऊ वाजले होते… अवघ्या तीन तासांत १९ मराठाने शत्रूचे खूप मोठे ठिकाण कब्जात घेऊन खूप मोठी फत्ते हासील केली होती! विजयाचे निशाण फडकावून मागे रेडीओ संदेश पोहोचवला गेला… आणि मागून येत असलेल्या तुकड्यांना पुढे येण्याचे आदेश दिले गेले!
नऊ वाजून वीस मिनिटे झाली… कंपनीची जमवाजमव सुरु होती.. आणि तेवढ्यात अचानक रणगाड्यावरून डागला गेलेला एक गोळा येऊन आदळला आणि त्यात नेमके ‘टायगर’ जबर जखमी झाले!
आणि त्यातच पाककडून पुन्हा तोफा, रणगाडे आग ओकू लागले. शत्रूची निरीक्षण चौकी शत्रूला गोळीबारासाठी अचूक मार्गदर्शन करीत होते, हे लक्षात येण्यास वेळ लागला नाही. याचाच दुसरा अर्थ होता की शत्रू पुन्हा जोरदार हल्ला घेऊन तिथे येणार! आणि तसेच झाले. पुन्हा मोठ्या संख्येने शत्रू आला. कारण त्यांना ती जागा जिंकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता… अन्यथा तिथून लाहोर काही फार दूर नव्हते.. आणि भारतीय फौज तिकडेच निघाली होती! १९, मराठाच्या शिल्लक सैनिकांनी कित्येक तास हा हल्ला थोपवून धरला. मदतीला आणखी सैन्य पाठवा, असा संदेश आपल्या ‘टायगर’ ने रेडीओवरून पाठवला… पण यावेळी रेडीओ संदेश यंत्रणा बहुदा नादुरुस्त झालेली होती… संदेश पोहोचलाच नाही! ‘टायगर’ मात्र ही जिंकलेली शिकार सोडून मागे हटायला राजी नव्हता!
सेकंड लेफ्टनंट चोक्कर साहेबांचा आर्टीलरी विभागाशी जोडला गेलेला रेडीओ मात्र काम करत होता. त्याच्या माध्यमातून संदेश पोहोचवले गेले. त्यामुळेच लेफ्टनंट बिक्रम सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी मदतीसाठी धावली. आणि त्यानंतरच ‘टायगर’ स्वत:वर उपचार करून घेण्यासाठी वैद्यकीय केंद्रात गेले… तोवर त्यांनी जागा सोडली नव्हती. या ‘टायगर’ ने ७, बलोच ही शत्रूची कंपनी पोझिशन ताब्यात मिळवली होती… लढाईच्या दाहकतेच्या मानाने आपले नुकसान तसे कमीच म्हणावे लागेल, असे झाले होते. रेडीओ ऑपरेटर टिमकीरे, एम. एम. जी. गन चालक मनोहर कलगुटकर आणि अन्य तीन सैनिक धारातीर्थी पडले होते!
मात्र ती जागा ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तान्यांनी खूपच जोरदार प्रयत्न केले, सर्व ताकद, दारूगोळा पणाला लावला. विविध मोर्चांवर झालेल्या संघर्षात ‘मराठा’ने खूप बलिदाने दिली… जवळजवळ एक कंपनी म्हणजे शंभर-एकशेवीसहून अधिक सैनिक देशासाठी कामी आले.
मेजर व्ही. डी. गुप्ते यांच्या नेतृत्वात १७, राजपूत रेजिमेंटची बी कंपनी मदतीला आली होती. सायंकाळी चार वाजता पाकने तोफा, रणगाडे यांच्यासह मोठा प्रतिहल्ला चढवला. तो नाकाम झाल्यावर पुन्हा तासाभराने तसाच हल्ला झाला. पण याही भारतीय जवानांनी जागा हातची जाऊ दिली नाही. २० सप्टेंबरचा दिवस आणि त्यानंतरची पूर्ण रात्र पाक तोफखाना आपल्यावर मरणाचा वर्षाव करीत राहिला… आपले सैनिक धारातीर्थी पडत होते… आपले दोन रणगाडेही यात नष्ट झाले. आपण पाकचे तीन रणगाडे नेस्तनाबूत केले.
रात्र उलटत चालली होती. युद्धबंदी होण्याची शक्यता पाकिस्तानने हेरली… त्या अगोदर हे लष्करीदृष्ट्या अतिशय मोक्याचे केंद्र पुन्हा ताब्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न पाक करीत होता… पण त्यात त्यांना यश येणार नव्हतं.. कारण त्यांची गाठ ’१९, मराठा’शी होती. शेवटचा प्रयत्त्न म्हणून पाकिस्तानने निकराचा जोर लावला… आपले एक कंपनी कमांडर जायबंदी झाले. ऐन युद्धाच्या वेळी नेतृत्व नसेल तर सैनिकी कारवाईवर प्रतिकूल परिणाम होतो. पण सुदैवाने असा ऐनवेळी धावून जाणारे अधिकारी आपल्याकडे होते. मेजर सुरेंदर परशाद त्यांचे नाव. परशाद असे जरी म्हटले जात होते, तरी त्यांचे खरे आडनाव प्रसाद असे होते. आणि ते पंजाबचे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि आमदार मास्टर तेग रां यांचे एकुलते एक चिरंजीव होते.
पाकचा तुफान मारा सुरु होता… सैनिक सततच्या लढाईने थकून गेले होते. अशावेळी मेजर साहेब स्वत: पुढे झाले. त्यांनी कंपनीची कमान हाती घेतली. गोळीबाराच्या वर्षावातून धावत जात विविध खंदकांत आडोसा घेत प्राण पणाला लावणा-या सैनिकांपर्यंत ते पोहचत होते.. त्यांना प्रोत्साहन देता देता अचूक मार्गदर्शन देत होते, योजना आखीत होते, वरीष्ठांशी संपर्क साधून माहिती देत होते.
पाकिस्तानी हल्ला परतवून लावल्याशिवाय प्रशाद साहेबांनी जागा सोडली नाही… मात्र प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांच्या देहाची साथ जीवाने मात्र सोडली! त्यांच्या बलिदानाने सैनिक पेटून उठले… आणि त्यांनी पाकला नमवले! मोठी कामगिरी करून, बलिदाने देत भारतीय फौजेने हे सैनिकी ठिकाण जिंकून घेतले होते… मात्र युद्धबंदी आणि नंतर झालेल्या वाटाघाटीमध्ये या ठिकाणावरचा ताबा भार्तीय्स सैन्याला सोडावा लागला… आजही ती जागा शत्रूच्याच ताब्यात आहे! म्र्जस्त सुरेंदर परशाद यांना मरणोत्तर वीरचक् पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लष्करी डावपेचाच्या कारणाने भारताने हे युद्ध थांबवल्याची घोषणा केली… तेंव्हा हा मोठा पाकिस्तानी लष्करी तळ आपल्या मालकीचा झालेला होता! पण तीन अधिकारी, एक कनिष्ठ अधिकारी, २९ सैनिक गमावले गेले होते. यात सर्व कंपनी कमांडर सैनिक एक तर धारातीर्थी पडले होते किंवा जबर जखमी तरी झाले होते… पण त्यांनी आघाडीवर राहून जीवाची बाजी लावल्याने लढाईचे पारडे आपल्या बाजूला होते. युद्धाची गरज ओळखून उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पुन्हा दक्षिणेकडून उत्तरेला वेगाने जाऊन १९, मराठाने शत्रूचे चार प्रचंड मोठे परवतून लावले होते… याला कारण होते कठीण परिश्रम, उत्तम प्रशिक्षण, समन्वय आणि ‘मराठा’चा लढाऊ बाणा!
बटालियन जशी बलिदाने मोजते तशी मिळालेल्या पुरस्कारही मोठ्या अभिमानाने मिरवते. चार वीर चक्रे, पाच सेना मेडल्स आणि पाच ‘Mentioned- in- Despatches’ एवढी कमाई केली होती १९ मराठाने… मात्र त्या बदल्यात रणभूमीवर रक्त सांडलं होतं! ‘Mentioned- in- Despatches’ मध्ये शौर्य गाजवलेल्या सैनिकांना कमलाच्या पानाच्या आकाराचे पदक बहाल करून युद्धाच्या अहवालात त्याच्याबद्दल गौरवोद्गार लिहिलेले असतात! या लेखातील बरीचशी माहिती ज्यांच्या लेखातून घेतली आहे त्या, त्यावेळी मेजर असलेल्या मोहमद अहमद झाकी साहेबांना वीर चक्र प्रदान केले गेले. झाकी साहेबांनी पुढे १९७१ मध्येही मराठा लाईट इन्फंट्रीच्या ‘काळी पाचवी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुस-या बटालियनचे यशस्वी नेतृत्व केले होते. पुढे अति विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित केले गेले झाकी साहेब भारतीय सैन्यात लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचले.
भारतीय सैन्याने या संपूर्ण सैन्य कारवाईला ऑपरेशन रिडल (Op Riddle) अर्थात कोडे असे नाव दिले होते. कारण पाकिस्तानने घातलेले विचित्र कोडे आपल्याला अचूक सोडवायचे होते. तमाम भारतीय सैनिकांनी हे कोडे सोडवायला तनमन पणाला लावले. १९, मराठाने तर यात सिंहाचा वाटा उचलला… आणि शौर्याची भूमी असलेल्या महाराष्ट्राची, हिंदवी स्वराज्य संस्थापक सर्वदा स्मरणीय छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या नसा-नसांत वाहणा-या लढाऊ बाण्याचे दर्शन जगाला घडवले.
दिनांक २२ सप्टेंबर रोजी ‘१९, मराठा’चा शौर्य दिन असतो. यानिमित्ताने त्या युद्धात प्राणांचे बलिदान दिलेल्या सैनिकांना अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली. या आणि आधीच्या आणि पुढच्याही अनेक लढायांत प्राणांची बाजी लावणा-या सैनिकांना, अधिका-यांना वंदन आणि आताही अभिमानाने कार्यरत असलेल्या वीरांना salute, रामराम आणि शुभेच्छा.
जय हिंद… जय हिंद की सेना.. जय महाराष्ट्र… जय शिवराय.. जय शंभू राजे!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





