अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ स्ट्राॅबेरी रास्पबेरी ☆ अमृता देशपांडे ☆

या वर्षीच्या लंडन ट्रिपची एक गोष्ट.

जेव्हा आपण आपल्या देशाबाहेर जातो, तेव्हा त्या देशाचे हवामान, खानपान, प्रवासाची साधने, वेळेचा फरक या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक बघाव्या लागतात. सुरवातीचे चार दिवस तिथले तापमान, रोजचे व्यवहार यांची सवय करून घेण्यातच जातात. येताना हवामाना प्रमाणे कपडे आणणे व वापरणे हे पहिले आणि महत्वाचे काम असते. हळूहळू वेळेच्या फरकाची सवय होते.

खूपसे भारतीय पदार्थ आता जगभर उपलब्ध आहेत. इडली डोश्याची तयार पाकीटे, सर्व प्रकारचे गोड पदार्थ मिळतात. फळभाज्या, पालेभाज्यांची पाश्चात्य रूपे लोभसवाणी असतात. चवीत फरक जाणवतो, पण… मिळतात तरी!

पेरु, चिक्कू, फणस, जांभळे, सीताफळ, करवंदे, द्राक्षे, खायचे तर भारतातच. रत्नागिरी, देवगड हापूस आंबा एक्सपोर्ट क्वालिटीचा परदेशातच मिळतो, त्या आंब्यांना प्रचंड महागड्या किंमतीचे काटे लगडलेले असतात. मनमुराद आंबे खाण्याचा आनंद भारतातच.

पण इकडे फळे खाताना त्या फळांची आठवण काढायची नाही, असेच मनात धरून इथल्या फळांच्या आस्वादाचा अनुभव आणि आनंद घ्यायचा.

जून, जुलै इथे summer ऋतू असतो. उन्हाळ्याची फळे कलिंगड, काकड्या, स्ट्राॅबेरी, रास्पबेरी मिळतात.

इथे वीकेंडला स्ट्राॅबेरी, रास्पबेरीच्या मळ्यात जाऊन स्वतः फळे काढून खाण्याचा आनंद लुटता येतो.

एका रविवारी आम्ही ” स्ट्राॅबेरी पिकिंग” ला जायचे ठरवले.

एक दीड तासाच्या अंतरावर ड्राईव्ह करत आम्ही सिक्रेट फार्मला पोचलो. तो मळा स्ट्राॅबेरी रास्पबेरीचा होता. काकड्या, टोमॅटोही भरभरून होते. प्रवेशदाराशीच एक हस-या गो-या ताई स्वागताला ऊभ्या होत्या. टेबलवर दोन प्रकारच्या आकाराचे प्लास्टिकचे डबे होते. लहान डबा 2 पौंड तर मोठा 5 पौंड. त्यात तुम्ही भरतील तेवढ्या स्ट्राॅबेरीज रास्पबेरीज घ्यायच्या. समोर लांबवर पसरलेल्या फळवेलींच्या रांगा बघून तर आम्ही धावतच सुटलो.

अनेकजण फळे काढण्यात मग्न होते. आम्हीपण रमलो. लालचुटुक स्ट्राॅबेरी हिरव्यागार पानात लपलेली होती. हलकेच काढावी लागत होती. वेलींना सतत पाणी पुरवण्याची व्यवस्था तिथे होती. काढता काढता एक लालचुटुक फळ मट्कन जिभेवर चढत होतं. स्ट्राॅबेरीचे स्टॅण्ड होते. उभे राहून बेरी काढता येतील असे. स्ट्राॅबेरीच्या थंडगार मळ्यात किती वेळ गेला कळलेच नाही. डबे भरल्यावर रास्पबेरीच्या मळ्यात शिरलो. आपण त्याला रासबेरी म्हणतो. रासबेरी हे स्ट्राॅबेरी पेक्षाही लहान नाजूक फळ. जमिनीलगत वेली रांगेत होत्या. त्यामुळे वाकून काढाव्या लागत होत्या. छोटुल्या बाळाच्या करंगळीच्या वरच्या भागावर बसेल इतका छोटा कोन आणि त्यावर एकदम पिटुकल्या मोहरी एवढ्या टिंबकटू गोळ्या, काय तो गुलाबी रंग! इटुकल्या पिटुकल्या रासबेरीने आम्हाला खूपच गुंतवून ठेवले. पाच वाजले असं कुणीतरी म्हटलं तेव्हा निघालो. कारण अजून टोमॅटोच्या शिवारात जायचे होते. भरलेले डबे घेऊन टोमॅटोच्या मांडवात शिरलो. टोमॅटोचे वेल उंच उंच काठ्यांवरती शिस्तीत चढवले होते. छोटुले टोमॅटो ते लहान भोपळ्याएवढे टोमॅटोंचे घड वेलींवर लगडले होते. हिरवे आणि लाल.

टोमॅटोच्या बाबतीत आपल्याकडचे आणि इथले टोमॅटो भाऊ भाऊ वाटतात. रंग रूप तेच. लहानमोठे तसेच. निसर्गाने त्यात फरक केला नाही.

एकाच वेलीवर लगडलेले 20-20 टोमॅटो म्हणजे मुद्दाम प्रदर्शनासाठी केलेली प्रतिकृती भासत होती. स्वच्छ, गुटगुटीत बाळासारखे गोंडस टोमॅटो.

छोटी छोटी लाल टोमॅटोची बाळं आणि हिरवे तरतरीत लठ्ठ टोमॅटो घेऊन आम्ही निघालो. हिरवे टोमॅटो आम्ही घेतलेले बघून गो-या ताईने विचारलेच, why you are carrying green tomatoes?  मी म्हटलं

” चटणी ” हे ऐकल्याबरोबर ती आश्चर्यात पडली.

आता मात्र भूक लागली होती सगळ्यांनाच. आम्ही सगळे मित्रपरिवार 10 जण होतो. परतताना वाटेवरती सॅण्डी नावाचे खेडेगाव लागले. तिथे एक रेस्टाॅरंट मिळाले. लकीली तिथे इतकं छान भारतीय जेवण मिळालं, कि जेवून सगळे तृप्त झालो. स्ट्राॅबेरी, रासबेरी, टोमॅटोचे डबे सांभाळत रात्री घरी पोचलो.

दिवस एकदम मस्त गेला. दुस-या दिवशी उठल्यावर स्ट्राॅबेरी, रासबेरी वाट बघत होत्या. इतकी नाजूक फळे धुतानासुद्धा हलकेच हाताळावी लागत होती. काल काढतानाच जिभेला संतुष्ट केल्याने जीभ गप्प होती. सर्वानुमते जॅम करण्याचा मोह आवरून त्यांचा गर क्यूब्ज ट्रेमध्ये ठेवण्याचे ठरले. आणि स्ट्राॅबेरी रासबेरी लालगुलाबी चौकोनी वड्या बनून फ्रीजमध्ये सुखात आनंदात रहात आहेत.

आता वळले टौमॅटोकडे. त्यांची चटणी केली. आठ-दहा दिवसात तिचा पण चट्टामट्टा होईल.

“स्ट्राॅबेरी रास्पबेरी पिकिंग” इव्हेंट छान झाला.

बालपणीची आठवण सतत मनात रेंगाळत होती.

11-12 वर्षांचे असताना घरच्याच मित्रमंडळीतील मुलांमुलींबरोबर मिणचे या गावी गेलो होतो. तिथे करवंदीच्या जाळीतून करवंदे काढून खाण्याची मज्जा काही औरच होती. ” काळी काळी मैना डोंगरची मैना” म्हणत हिरवी कच्ची आंबट आणि पिकलेली काळीभोर आणि आतून लालचुटुक गोड गोड करवंदे खातानाचा स्वर्गीय आनंद आठवला..

 

©  अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted