image_print

सुश्री संगीता कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈 

☆ कार्ल्याची एकविरा देवी ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

एकवीरा आईचे मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला या लेण्यांजवळ आहे..

कार्ला निवासीनी शक्तीदायीनी श्री एकविरा देवी आई महाराष्ट्राची आराध्य कुलदेवता, हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आई एकविरा देवी म्हणजेच आदिमाता रेणुका.. परशुरामाची माता… 

जगप्रसिद्ध कार्ला लेणीच्या तोंडाशी असणारे एकविरा देवीचे मंदिर म्हणजे कोळी बांधवांबरोबरच तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान… या देवीची मूर्ती ही स्वयंभू असून हे देवस्थान पांडवकालीन असल्याचे मानले जाते… आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभू असून अतिशय प्राचीन आहे. आईची मूर्ती स्वयंभू तांदळा दगडात प्रगटलेली “शेंदूर चर्चित” आहे.. लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थान हे मंदिराचे वेगळेपण.. प्राचीनता आणि तिचे लोभस रूप यामुळे या देवीचे  महत्व काही वेगळेच आहे..  

आपण मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम आपल्या  नजरेस पडतो आईचा चांदीचा नक्षीदार गाभारा.. ते नयनरम्य नक्षीकाम पाहून मन मोहून तर जातेच  पण आईचे  लोभस रूप पाहून आपण आपलेच राहत नाही.. ते लोभस तेजस्वी रूप डोळ्यात साठवत डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागतात ते समजतही नाही.. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य व ते प्रसन्न रुप पाहून मन अगदी उल्हासित होतं. मनात नवीन चैतन्यं निर्माण होतं..

शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होताच वातावरणात एक वेगळीच उर्जा सामावल्याची अऩुभूती होते. एका अद्वितीय शक्तीचा जागर या नऊ दिवसांमध्ये केला जातो.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत एकविरा मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी व देवीचा नवस फेडण्यासाठी येतात.

    !! एकविरा आई तू डोंगरावरी

        नजर हाय तुझी कोल्यांवरी  !!

असे म्हणत आराध्य दैवत असलेल्या  आणि नवसाला पावणारी म्हणून कोळी समाजात एकविरा देवीचं स्थान पूजनीय आहे…नवसाला पावणारी कोळी बांधवांचे आराध्य दैवत असणारी देवी..  

देवळाच्या भोवती निसर्ग सिध्दहस्ताने वंदन करत आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्तीदेवता आहे..

डोंगरातलं स्थान, प्रसन्न रूप, जागरूक देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महत्व असलेल्या  या देवीचं लोभसवाणं रूप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळ्यात साठवून घ्यायलाच हवे..  नव्या उमेदीने जगण्यासाठी आई एकविरेचे दर्शन व परिसरातील निसर्ग- सौंदर्याने आपले मन प्रफुल्लित होऊन जाते हे मात्रं निश्चितच… 

 

संग्रहिका –  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments