अर्चना सुरेश देशपांडे
जीवनरंग
☆ अग्निदिव्य… भाग – २ ☆ अर्चना सुरेश देशपांडे ☆
(मामाच्या घरी तिला “अश्रित “हाच दर्जा मिळाला होता. राब राब राबून शिव्या खाणेच तिच्या नशिबात होते. आपल्या नशिबात आहे ते भोगायलाच पाहिजे असा विचार करून ती गप्प बसत होती आणि तोंडातून ब्र न काढता जोमाने अभ्यास करीत होती.)
इथून पुढे – –
तिचे शिक्षक त्यांना जमेल तेवढी मदत करत होते. जात्याच हुशार असल्याने तिला थोड्या अभ्यासाने चांगले मार्क पडत होते. सरस्वतीचा वरदहस्त असल्याने तिने धीराने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, गुणवत्ता यादी चमकली आणि वर्गशिक्षिकेचया सहकार्याने “निराधार केंद्रात” प्रवेश मिळवला. तिच्या या निर्णयामुळे मामा दुखावला गेला पण घरातील वातावरण पाहून त्याने तिला नाईलाजाने होकार दिला. पुढे बुद्धिमत्तेच्या जोरावर पुण्यात बी. जे. मेडिकल महाविद्यालयात शिष्यवृत्ती मिळवून ती जिद्दीने डॉक्टर झाली. पुढे डी. जी. ओ पदवी संपादन केली हुशार विद्यार्थिनी म्हणून तिचे कौतुक झाले. मामालाही आनंद झाला. मामीने गोड पदार्थ करून तिला जेवायला बोलावले आणि घरी राहण्याचा आग्रह केला पण आता माधुरीला स्वतःच्या हिमतीने जगायचे होते, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करायचा होता. आपला नोकरी करण्याचा निर्णय तिने स्पष्ट सांगितलं. त्याच वेळी तिला तिच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून डॉक्टर साने यांच्या हॉस्पिटल बद्दल माहिती मिळाली. कासे गाव पासून 20 किलोमीटर आत वाटेगाव आहे. तिथे जाण्याची तुझी तयारी आहे का? तुझे आयुष्य पुण्यासारख्या शहरात गेले तेव्हा खेडेगावात जायचे की नाही ते तू ठरव. असे त्यांनी सांगितले. त्याच क्षणी तिने वाटेगाव ला जायचे ठरवले.
प्राध्यापकांनी सांगितले, “मधुरा वाटेगावला डॉक्टर साने यांचे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल तसे फार मोठे नाही, तिथे गोरगरिबावर मोफत उपचार केले जातात एकंदरीत कमी पैशात उपचार केले जातात. त्यामुळे तुला पगार कमी मिळेल पण देव माणसासारख्या दांपत्याकडून बरेच शिकायला मिळेल हे निश्चित. “ठरवल्याप्रमाणे ती वाटेगावला डॉक्टर साने यांना भेटली. तिने आपली कागदपत्रे त्यांना दाखवली. तिची मार्कलिस्ट व इतर सर्टिफिकेट्स पाहून साने यांना तिचे कौतुक वाटले आणि त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये तिला काम करण्याची संधी देण्याचे ठरविले.
ममता हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या क्वार्टर मध्ये तिची राहण्याची सोय केली. तिची राहण्याची सोय झाली आणि साने कुटुंबासारख्या सज्जन माणसांचा आधार मिळाला. माधुरीने “वाटेश्वराच्या “साक्षीने कामाला सुरुवात केली आणि मिळालेल्या संधीचे सोने केले. आपल्या डॉक्टरी पेशाला सर्वस्व मानले. आजच्या “कलियुगात मोजकीच माणसे कर्तव्य या शब्दाला जपणारी असतात “आणि माधुरीचा स्वभाव तोच आहे हे डॉक्टर जाणून होते. माधुरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती प्रत्येक रुग्णाशी प्रेमाने व न थकता आपुलकीने बोलायची. किती ही शंका विचारल्या तरी न चिडता त्या शंकांचे निरसन करायची, कायम हसतमुखाने गोड बोलून रुग्णांना आपलेसे करण्याच्या या पद्धतीमुळे ती लवकरच सर्वांची लाडकी झाली. तिच्यामुळे हॉस्पिटलचे वातावरण हसते खेळते झाले होते.. ती गुणी व परिस्थिती समजून वागणारी होती. डॉक्टर नेहमी तिचे कौतुक करत. “कौतुकाने ओझे कमी होत नाही पण कर्तव्य पेलणारे हात बळकट होतात “हा त्यांचा अनुभव होता. डॉक्टर साने दांपत्याला मूलबाळ नसल्याने त्यांनीही माधुरीला मुलीप्रमाणे माया लावली होती. आणि माधुरी सारख्या पोरक्या मुलीला “मायेची सावली “मिळाली होती. माधुरी सारख्या अनाथ मुलीला अनाथ मुलाबद्दल जिव्हाळा असणे साहजिकच होते म्हणूनच तिने अनाथ मुलीचा स्वीकार करण्याचे ठरविले तिच्यावर चांगले संस्कार केले, तिच्या बालपणीच्या लाडाकोडात स्वतःचे बालपण अनुभवले. माधुरीचा व्याप व जबाबदाऱ्या वाढत होत्या. विमल मावशी आपली नोकरी सांभाळून आपुलकीने मोहिनीला सांभाळत होत्या. तिची जेवणाची वेळ, शाळेची वेळ पाळत होत्या, तिचे कोड कौतुक करत होत्या. तिच्या ” आजी” या शब्दाने सुखावत होत्या. मोहिनी बालपणापासून कुशाग्र बुद्धीची होती. , माधुरी सारखीच बुद्धिमत्तेच्या जोरावर चमकत होती,. दहावी उत्तम गुणांनी पास झाली. तिला थोडी समज येताच माधुरी ने तिला तिची “जन्म कहाणी” सांगितली. त्यानंतर तिचा आई बद्दलचा आदर भाव अजून वाढला. वाटेगाव तसे खेडेगाव असल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिला सांगलीला जावे लागले. आपल्यापासून दूर पाठवणे माधुरीला जड वाटत होते पण “भावनेपेक्षा कर्तव्य” करणे जरूर आहे या विचारांनी तिला सांगलीला पाठवण्याचा विचार माधुरीने निश्चित केला. चांगल्या गुणामुळे विलिंग्डन कॉलेजमध्ये ला प्रवेश मिळाला. मोहिनी मन लावून अभ्यास करत होती. मैत्रिणींना अभ्यासात मदत करत होती. वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा जिंकून कॉलेजचे नाव उज्वल करत होते. सगळ्यांच्या आग्रहाखातर तिने जी. एस पद पण स्वीकारले पण अभ्यासात कुचराई केली नाही. बारावी उत्तम गुणांनी पास झाल्यावर तिने आईचा वारसा पुढे चालवण्याचा मानस बोलून दाखवला आणि माधुरीने दिला दुजोरा दिला. गुणांच्या जोरावर मिरज मेडिकल कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला. जिद्दीने M. B. B. S. केले. पुढे बालरोग तज्ञ म्हणून बोर्डात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तिच्या पदवीदान समारंभाला येण्यासाठी महाविद्यालयाकडून डॉक्टर साने व माधुरीला आग्रहाचे निमंत्रण होते. तिच्या पदवीदान समारंभाला माधुरीने डॉक्टर साने कुटुंबासमवेत हजेरी लावली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी साने यांना पुढील रांगेत बसवले, माधुरी त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसली. मोहिनीचे नाव पुकारण्यात आले. टाळ्यांच्या कडकडाटात मोहिनी स्टेजवर आली. समोर आपली आई व आजोबा यांना पाहून तिला खूप आनंद झाला. तिने आदरपूर्वक सर्वांना हात जोडले आणि मेडल आपल्या आजोबांच्या हस्ते मिळावे अशी मोहिनीने अध्यक्षांना विनंती केली. डॉक्टर साने स्टेजवर येताच मोहिनीने त्यांना चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि पाठोपाठ प्राचार्यांना वाकून नमस्कार केला डॉक्टर आजोबांच्या हस्ते मेडल स्वीकारल्यानंतर हातात माईक घेऊन ती म्हणाली, “नमस्कार, माझ्या आजी आजोबांचे आशीर्वाद व शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच आणि आईचे उपकार ही’त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळाली चांगले काय? आदर्श कसे वागावे याचे ज्ञान मिळाले त्यांच्यामुळेच मी आज तुमच्या पुढे उभी आहे” पुढे माधुरी कडे पाहून म्हणाली, “तू माझी जीवनदात्री आहेस. आज मी जी काही आहे ते केवळ तुझ्यामुळे. मी खूप आनंदात आहे ते तुझ्यामुळे. माझ्या नशीब मोठं म्हणून मला तुझ्यासारखी आई मिळाली.. “माधुरीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि केलेल्या अग्नी दिव्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले.
तिच्या यशाप्रीत्यर्थ साने यांनी ममता हॉस्पिटलच्या टेरेसवर “कौतुक समारंभ “आयोजित केला त्यावेळी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी व डॉक्टरांचे स्नेही हजर होते. माधुरीचे प्राध्यापक डॉक्टर गोडबोले यांनाही साने यांनी अर्जवून बोलवले होते. माधुरीने निवृत्त झालेल्या विमल मावशींना प्रेमाने बोलावले होते. मोहिनीने स्व खर्चाने सर्व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणली होत्या. विमल मावशी साठी सुंदर, सुती वायल साडी आणली होती. ती विमल मावशी येताच नमस्कारसाठी पुढे झाली तेव्हा विमल मावशींनी तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत तिच्या बालपणीच्या आठवणी सामावल्या होत्या. ती म्हणाली, “मावशी आजी माझे बालपण रम्य झाले ते तुमच्यामुळे. तुम्ही माझ्या लहानपणी दिलेला वेळ माझ्यासाठी आठवणींचा अमूल्य ठेवा आहे “हे मोहिनीचे शब्द ऐकून विमल मावशी सुखावल्या त्यांच्या डोळ्यात पाणी तराळलं. कौतुक सोहळा होताच मोहिनी म्हणाली “मला एक माझ्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे. ” सर्वजण तिची इच्छा ऐकण्यासाठी उत्सुक होते. मी उद्यापासून याच हॉस्पिटलमध्ये “बाल रोग तज्ञ”. म्हणून रुजू होणार आहे हे ऐकताच माधुरी तसेच साने कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला. डॉक्टर साने म्हणाले “आता तू आणि तुझी आई दोघीही माझे कार्य पुढे नेण्यासाठी समर्थ आहात आता आम्ही आयुष्याच्या संध्याकाळी समाधानी जीवन जगायला मोकळे झालो”
– समाप्त –
© अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈ संस्थापक संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




