श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “नात्यांचं सांभाळणं…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की….

ऑफिसमधून रोजच्या वेळेपेक्षा लवकर निघून सुभाष मित्राच्या जनरल स्टोअरवर गेला.

“या कौन्सिलर, घरस्फोटाची भांडणं सोडवून झाली का?”बापूनं स्वागत केलं.

“गप रे, का उगाच छळतोस. जाम वैतागलोय”

“आज जास्त केसेस होत्या वाटतं”

“एकच होती. सगळा दिवस खाल्ला. सुशिक्षित जोडपं पण धुमाकूळ घातला. लग्नाला दोनच वर्ष झालेली पण एकमेकांविषयी पराकोटीचा द्वेष. जोरजोरात भांडत होते. लग्नाचं कर्ज अजून फिटलं नाही तोपर्यंत घटस्फोटाची वेळ आली. दोघांचाही ‘ईगो’ खूप स्ट्रॉंग. खूप समजावलं पण पालथ्या घड्यावर पाणी… ”

“या असल्या गोष्टी तू कधीपासून मनावर घ्यायला लागला. त्यांचं ते बघतील. ”

“ते आहेच रे. खरं सांगू. दररोज दुसऱ्यांची धुणी धुवून कंटाळा आलाय. ”सुभाष 

“इमोशनली विचार करतोयेस. याकडं फक्त नोकरी म्हणून बघ. ”

“इतकी वर्ष तेच तर करतोय तरीही त्रास होतॊ. सततच्या कटकटींचा आणि नकरात्मकतेचा परिणाम होतोच. नातं जोडण्याची जेवढी घाई तशीच तोडण्याची सुद्धा. आयुष्यभर सोबत असणारं जोडपी जगात नाहीत असं वाटायला लागलं. ”दोघं बोलत असताना एक वयस्कर जोडपं झेरॉक्ससाठी दुकानात आलं.

“दर येळेला नवीन कायीतरी मागत्यात” चिडलेले आजोबा पेपर पुढे करत म्हणाले.

“सरकारी काम आहे. कागदपत्र द्यावीच लागतात. ”बापू.

“ते बी खरं हाय. कोर्टाची पायरी चढलीये आता दम लागला तरी थांबता येणार नाही. ” 

“अजून किती येळा यायला लागल”आजीबाई 

“मला काय माहीत?”आजोबा खेकासले.

“माज्यावर उगा चिडायचं नाय?सांगून ठेवते. ”आजीच्या तत्काळ प्रतिक्रियेनं आजोबा वरमले.

“लग्नाला किती वर्ष झाली”बापूनं विचारलं.

“पन्नासला दोन कमी. ”

“कधी भाडणं झाली नाही”सुभाष.

“लई यळा, आत्ता पण झालं, म्हणून तर म्हातारी कावलीये”आजोबा हळू आवाजात म्हणाले.

“कितीबी हळू बोल्लं तरी मला ऐकायला येत. ”आजी फणकाऱ्यात म्हणाली.

“माहितीये. लय तिखट कानाची हायेस. सूनाबी ह्येच म्हंतात”आजोबांच्या बोलण्यावर आजी खुदकन हसली.

“तुमची जोडी भारीये” बापू म्हणाला तेव्हा आजीबाईंनी नाक मुरडलं.

“तर वो, माजी हिरोविन तवा बी झ्याक व्हती आणि आता बी.. अजूनही तिच्या गालावरची खळी… ”आजोबांनी आजीकडे पाहत डोळे मिचकावले तेव्हा आजी चक्क लाजली. अहाहा!! ते “लाजणं” फारच मनमोहक होतं.

“ए बाबा, आपलं काम कर. ते कागद दे. ”आजीनं विषय बदलला.

“कायची यवडी घाई, घरी तरी काय काम हाय. होऊ दे निवांत”आजोबा 

“सारखं यायला लागतंय ते बरंच हाय की.. या निमित्तानं नवरा-बायकोला फिरता येतेय, बोलता येतेय. ”बापू म्हणाला तेव्हा “या बया… ”म्हणत आजीनं कपाळावर हात मारला.

“ह्ये माज्या ध्यानातच आलं नाही. घरच्या गोतावळ्यात म्हातारीशी धडं बोलणं व्हत नाही. ही आयडिया बेस्ट!!आता लागू दे कितीबी येळ, फिकीर नाई. रोज येऊ. मस्त मजा करू”आजोबांनी म्हटल्यावर आजीच्या चेहऱ्यावर उमटलेले “भाव” लाजवाब. काही वेळानं आजी आजोबा निघून गेले. एकाच दिवशी टोकाचे अनुभव घेतलेला सुभाषचा मूड एकदम फ्रेश झाला. नाती तोडणं सोप्पंयं पण खरा आनंद ती टिकवण्यात आहे.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted