संध्या बेडेकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ “फक्त आशिर्वाद मोजावेत..“ ☆ संध्या बेडेकर ☆
३) —
“ “ लेखिका : संध्या बेडेकर
फक्त आशिर्वाद मोजावेत – –
“रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची/सवयींची पाठराखण काही उपयोगाची नसते. ”
ताईकडे महालक्ष्मी सण मोठ्या थाटामाटात साजरा होतो. दर वर्षी तिच्या घरचे सर्व एकत्र येऊन हा सण साजरा करतात. ताईच्या सासू बाई पण असतातच. सर्व मिळून गौरींच्या आगमनाची तयारी सजावट, दुसऱ्या दिवशी ची तयारी करतात. भाज्या निवडणे वगैरे वगैरे.
पूजेच्या दिवशी ताई कडचे पंधरा वीस जण सहज असतात. म्हणून आम्ही माहेरचे एक दिवस नंतर विसर्जनाच्या दिवशी जातो. सर्वांना प्रसादही मिळतो. ताईला खूप दगदगही होत नाही. नंतर ची आवाराआवरीची जबाबदारी आम्ही घेतली आहे.
काम करताना गप्पा पण रंगतातच. किती तरी विषय निघतात. वेगवेगळ्या सणांच्या आठवणी निघतात. काही गोड असतात तर काही पुन्हा एकदा मनाच्या कोपऱ्यातून आपलं डोकं वर काढून जिवंत होतात.
मन आपल्या शरीरात कुठे आहे?? किती मोठे आहे?? त्याची मेमरी डिस्क किती GB ची आहे? काही माहीत नाही. पण अगदी सर्व मनात व्यवस्थित recorded असत. चांगल्यापेक्षा सर्व वाईट प्रसंग सहज अगदी डिटेल्स मध्ये आठवतात. बहुदा त्याची उजळणी बरेचदा झालेली असावी. बरे असो,
आम्हा तिघी बहिणींचे एकत्र येणेही या निमित्ताने होते.
रमा (आमची सर्वात लहान बहीण) म्हणाली, ताई!! तुझ्या घरी सर्व मजेत पार पडतं ग. आमच्या घरी एकत्र जमले की टेन्शनच असतं. एखादा तरी ‘रंगारंग कार्यक्रम’ होतोच. बहुतेक मीच टार्गेट असते. यावेळी काय ऐकायला मिळणार?? माझ्यातले दोष सांगण्यात येतात. मी कुठे चूकते?? वगैरे वगैरे. त्यानंतर आमच्या दोघांत भांडण होतं. हेही ठरलेलंच आहे.
असं सांगताना रमाचे डोळे भरून आले. ताईच्या सासूबाई लगेच म्हणाल्याच,
अग!! रमा! गौरींसमोर आहेस ना तू. मग अजिबात रडायचं नाही. अग!! तू शाळेत शिक्षिका आहेस ना,
‘Positive attitude’ वर भाषण देतेस ना मग स्वतः केंव्हा स्ट्रॉंग होणार??
ताई म्हणाली, रमा!! यात तुझी पण चूक आहेच. किती दा तुला सांगितलंय, की घरच्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात. प्रत्येक घरात काही न काही प्रश्न असतातच. नवरा बायको मध्ये वादविवाद चालतच असतात. ते सर्व बाहेरच्या लोकांना म्हणजे अगदी आम्हाला सुद्धा सांगायची काहीच गरज नाही. असं वागून तूच लोकांना तुझ्या घरात घुसायची परवानगी देते. चर्चेला विषय देते. मग असं होणारच. आधी तुम्ही दोघे एकमेकांना समजून घ्या, सांभाळून घ्या. इथे तिथे बोलण्यापेक्षा आपापसात बोला. तुम्ही दोघे एकमेकांची किंमत ठेवत नाही. मग दुसरे त्याचा फायदा घेतात. तुमच्या घरात लुडबुड करतात. तुझी ही सवयच झाली आहे. तू त्यात रमते. सारख रडगाण का??
या जगात कोणीच सर्व गुण संपन्न नाही.
म्हणतात ना,
“Talking about our problems is the greatest addiction, break the habit and talk about your joys. ” And enjoy life.
आपली किंमत आपण ठरवायची असते, दुसऱ्यांनी नाही. आपला मान आपण ठेवला तर दुसरा अपमान करायची हिम्मत करत नाही.
अग!! प्रत्येकाच्या घरी काही न काही घडत असतच. उतार चढाव येतातच. पण ते तुला कधी काही सांगतात का??
अग!!! काही लोकांना असते तशी सवय. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही. आगीत तेल घालण्याचे काम ते उत्तम करतात.
” कितीही प्रेमाने कांदा कापला तरी अश्रू निघणारच. ” दुर्लक्ष करायचे कौशल्य वाढवावे. तेच आपल्या सुखी आनंदी जीवन जगायचे औषध आहे. कोणी काहीही म्हणणार आणि तू रडणार का? लोक सोयीनुसार जवळ येतात, गरज संपली की झालं. आणि त्या नुसार तुम्ही वाईट की छान ठरवतात. लोकांना ‘impress’ करायला जायचे नाही. त्यात वेळ व कष्ट वाया घालवायचे नाही.
” When you decide not to impress anyone, your mental freedom begins. ”
स्वतः ला कमी लेखू नको. मी गरीब, मी बिचारी, या कोशातून बाहेर नीघ. तुझ्यात काय आहे?? जमेची बाजू कोणती?? याचा विचार कर. त्या गुणांचा विकास कर.
समोरचा श्रीमंत आहे, तर असू दे. म्हणून तूं गरीबीचा न्यूनगंड बाळगू नकोस. जसं स्वतः ला श्रेष्ठ समजणं अहंकार आहे, तसंच स्वतः ला गरीब, बिच्चारी समजणही चूकच.
दुसऱ्यांची आरती ओवाळण बंद कर. स्वतः ची आरती ओवाळण सुरू कर. आवाजात करारीपणा व डोळ्यात आत्मविश्वासाचे तेज असू दे.
अग!!! गरूडासारखी उंच झेप घेता येत नाही म्हणून बाकी पक्षी रडत बसतात का?? लहानस फुलपाखरू सुध्दा बगीच्यात स्वच्छंद बागडत.. वटवृक्षाखाली वाढणार गवत ही मजेत जगतच.
आपल्या क्षमतेप्रमाणे अगदी धाटात, मजेत व ताठ मानेने जगायचे.
आज गौराईं समोर नक्की ठरव, यापूढे हसून जगायचं की रडायचं?? धाकात जगायचं की थाटात??
यापूढे रडायचं नाहीच.
आज ताईने अगदी मनसोक्त बोलायचं ठरवलेलं दिसतंय. बरोबर आहे किती कुरवाळायच.??? कधी कधी कान उघडणी करणे पण गरजेचे असते.
बरोबर आहे. म्हणतात ना,
“Stop focussing how stressed you are, and remember how blessed you are. “
“Enjoy life “
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





