सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ. दीप्ती कुलकर्णी
💐 अ भि नं द न 💐
गाडगीळ मॅनेजमेंट, सांगली आयोजित मराठी काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांच्या काव्य रचनेस उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. ई अभिव्यक्ती मराठी तर्फे श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🖊️
पुरस्कार प्राप्त कविता आज प्रकाशित करत आहोत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
पुरस्कार प्राप्त कविता
कवितेचा उत्सव
☆ “पाऊस” ☆ दीप्ती कुलकर्णी ☆
☆
पाऊस आला, पाऊस आला, घेऊन मृदगंधाला
ग्रीष्मातील त्या उष्ण धरेचा, कणकण संतोषला
जलधारांनी बरसत आला, थेंबातुनी प्रगटला
बळीराजाही पेरायाला, शिवारात गुंतला ||१||
*
इंद्रधनुचा मोहक पट तो, आकाशी उमटला
बालचमुसह सर्वांसाठी, आनंददायी बनला
जलाशयांचा, तरुवेलींचा, जीवनदाता ठरला
चिंबही भिजल्या सृष्टीचा तो, सखा जणू भासला ||२||
*
धरतीनेही हिरवा शालु, अंगभरी ल्यायला
गवतफुलांचा, फळाफुलांचा, सुगंध साकारला
मातीतुनी या नवकोंबांचा, हर्ष दिसू लागला
तनामनाने चाहुल घेता, आसमंती विहरला ||३||
*
चातकासही थेंबा घेऊनी, जन्म नवा लाभला
रिमझिम येता जलधारांचा, नाद ही झंकारला
पाऊस आला, पाऊस आला, मोद असा जाहला
नव आशांचा, नव स्वप्नांचा, झुला जणू झुलला ||४||
☆
© दीप्ती कुलकर्णी
कोल्हापूर
भ्र. ९५५२४४८४६१
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




