image_print

श्री राजीव गजानन पुजारी

? पुस्तकावर बोलू काही?

☆ पुण्यभूमी नृसिंहवाडी ☆ परिचय – श्री राजीव ग पुजारी 

पुस्तकाचे नाव :- पुण्यभूमी नृसिंहवाडी 

लेखक:- डॉ. बाळकृष्ण महादेव जमदग्नी व डॉ. सौ. मृणालिनी बाळकृष्ण जमदग्नी

प्रकाशक : श्री वामनराज प्रकाशन 

पृष्ठसंख्या : ८१६ 

किंमत : रु. ७०० /- 

मागील पंधरा दिवसांत बाळकृष्ण महादेव जमदग्नी व त्यांच्या सुविद्य पत्नी  डॉ. सौ. मृणालिनी बाळकृष्ण जमदग्नी लिखित ” पुण्यभूमी नृसिंहवाडी “ हे पुस्तक वाचले. खरोखर हे पुस्तक म्हणजे तीर्थक्षेत्र नृसिंहवाडीचा विश्वकोश किंवा ज्ञानकोषच आहे. महाभारताविषयी असे म्हंटले जाते की, महाभारतात जे आहे ते जगात सर्वत्र आहे व महाभारतात जे नाही ते जगात कोठेही असू शकत नाही. तद्वतच मी असे म्हणेन कि, नृसिंहवाडीविषयी जी माहिती या पुस्तकात आहे ती इतरत्र कोठेही असू शकणार नाही.

पहिल्यांदा लक्ष वेधून घेते ते पुस्तकाचे मुखपृष्ठ. श्री नृसिंहसरस्वती स्वामीमहाराजांच्या गंधलिंपित मनोहर पादुका व पार्श्वभूमीवर श्री नृसिंहसरस्वती स्वामीमहाराज आशिर्वचन मुद्रेत विराजमान झालेले– बघूनच मन प्रसन्न होते. नंतर लक्ष जाते ते पुस्तकाची बांधणी व मुद्रणाकडे. हे पुस्तक हार्ड बाउंड प्रकारात उपलब्ध असून मुद्रणाची गुणवत्ता उच्चदर्जाची आहे. संपूर्ण पुस्तकात एकही मुद्रणदोष आढळून येत नाही. याचे श्रेय श्रीवामनराज प्रकाशनाला नक्कीच जाते. पुस्तकामध्ये प्रसंगानुरूप कृष्णधवल छायाचित्रे आहेतच, तसेच पुस्तकाच्या शेवटी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीशी निगडीत एकेचाळीस रंगीत चित्रांचा संच आहे. लेखकद्वयीने संदर्भासाठी वापरलेल्या ग्रंथांची सूची – जी विभाग सातवा : परिशिष्ठ्ये म्हणून अंतर्भूत आहे – त्यावर फक्त नजर टाकली तरी ऊर दडपून जातो, व लेखकांनी घेतलेल्या मेहनतीची कल्पना येते. 

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी हे मूळ वाडीचेच. ते कृषीतज्ञ असून, कृषी या विषयात त्यांनी डॉक्टरेट केली आहे. त्यांच्या पत्नी डॉ. सौ. मृणालिनी या देखील हिंदी विषयात डॉक्टरेट आहेत. दोघांचाही अध्यात्माकडे अत्याधिक ओढा असल्यामुळेच श्री दत्तगुरूंनी त्यांच्याहातून हे कार्य करवून घेतले असे म्हणावे लागेल.

पुस्तक एकूण सहा विभागांत आहे. पहिल्या विभागात दोन भाग आहेत. पहिल्या भागात वाडीमध्ये दैनंदिन केल्या जाणाऱ्या नित्य सेवेची विस्तृत माहिती आहे. अगदी पहाटे म्हणजे साडेतीन चार वाजता ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा मंत्रजागर करत सर्व गल्ल्यांमधून फेरी काढणारे दत्तभक्त (वाडीमध्ये याला ‘दिगंबरा आला’ असे म्हणतात), पहाटेची काकड आरती, पंचामृत अभिषेक पूजा, महन्मंगल महापूजा, पवमान पंचसुक्त, सायंकालीन धुपारती, रम्य पालखी सोहळा, भक्तीसुमनांची शेजारती आदींची अगदी सविस्तर माहिती आहे.

पहिल्या विभागातील दुसऱ्या भागात वाडीमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या संवत्सर सोहळ्यांची विस्तृत माहिती आहे. प्रत्येक महिन्यात वाडीत वेगवेगळी अनुष्ठाने व सोहळे साजरे केले जातात. जसे की, चैत्रात संततधार अनुष्ठान व प. प. श्री. नारायणस्वामी पुण्यतिथी उत्सव, वैशाखात भगवान श्री नृसिंह जयंती व प. प. श्री. गोपाळ स्वामी महाराज पुण्यतिथी, जेष्ठ महिन्यात प. पू . श्री. रामचंद्र योगी महाराजांचे पुण्यस्मरण, आषाढ महिन्यात प. प. श्री. टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवातील समाराधना, श्रावण महिन्यातील दक्षिणद्वार स्नान, भाद्रपद महिन्यातील भगवान श्री. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती, अश्विन महिन्यातील दसरा व श्री गुरुद्वादशी, कार्तिक महिन्यातील तुलसीविवाह व त्रिपुरारी पौर्णिमा, मार्गशीर्ष महिन्यातील भगवान श्री दत्तात्रेय जयंती, पौष महिन्यातील भगवान श्रीमन् नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जयंती, माघ महिन्यातील कृष्णावेणी उत्सव व श्री गुरुप्रतिपदा आणि फाल्गुन महिन्यातील रंगपंचमी आणि प. प. श्री. काशीकर स्वामी पुण्यतिथी. ही सर्व माहिती इतकी काटेकोर व भावगम्य आहे की  जणू आपण दैनंदिन सेवा व संवत्सर सोहळ्यांसाठी वाडीतच उपस्थित आहोत असे वाटते.

पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात वाडीतील आराध्य देवतांविषयीची माहिती आहे. यामध्ये अत्रिनंदन दत्तात्रेय, दत्त महाराजांचे प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ व दुसरे अवतार श्री नृसिंहसरस्वती यांचेविषयी अतिशय सविस्तरपणे लिहिले आहे. दत्त संप्रदायामध्ये ज्याला पाचवा वेद म्हंटले जाते, त्या गुरुचरित्रातील अनेक कथा व घटनांचा यात समावेश आहे.

पुस्तकाच्या तिसऱ्या विभागात गुरुचरित्रात वर्णिलेल्या घटनांपैकी ज्या घटना नृसिंहवाडी परिसरात घडल्या त्यांच्या कथा आहेत. यात श्रीक्षेत्र औदुंबर येथे घडलेली मूढ द्विजपुत्र उद्धाराची कथा, श्री क्षेत्र अमरापूर ( सध्याचे औरवाड ) येथे घडलेली घेवड्यांच्या शेंगांची कथा, गंगानुज नावाड्यावर झालेला कृपानुग्रह व त्याला घडवलेली त्रिस्थळी यात्रा, शिरोळचे दत्त भोजनपात्र, शिरोळच्या गंगाधर ब्राह्मणाचे मृत बालक सजीव करणे आदि कथा आहेत.

पुस्तकाच्या चौथ्या विभागात नृसिंहवाडीक्षेत्री जे महामहिम होऊन गेले त्यांचेविषयी अत्यंत सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये श्री रामचंद्र योगी महाराज, सद्गुरू श्री ब्रह्मानंद यतिराज, श्रीमद् गोपाळस्वामी महाराज, प. प. श्रीमन्नारायण स्वामी महाराज, श्री कृष्णानंद स्वामी महाराज उर्फ श्री काशीकर स्वामी, श्रीमद् मौनी स्वामी महाराज, श्री शांताश्रम स्वामी महाराज, प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे ) स्वामी महाराज, प. प. श्री. नृसिंह सरस्वती (दीक्षित ) स्वामी महाराज, सद्गुरू श्री सीताराम महाराज टेंबे, श्री शांतानंद स्वामी महाराज, प. पू. सद्गुरू योगीराज श्री वामनराव गुळवणी महाराज, श्री शंकर स्वामी महाराज (पातकर ) आदि महापुरुषांसंबंधी साद्यंत माहिती आहे. वरील सर्व महापुरुषांना वाडीमध्ये ‘सनकादिक’ म्हणतात व त्यांची पूजाअर्चा श्रीमन्नृसिंहसरस्वती स्वामींच्या पादुकांच्या बरोबरीने होते; यावरून त्यांची अध्यात्मिक क्षेत्रातील थोरवी लक्षात यावी. वरील सर्व महापुरुषांविषयी लेखकांनी अगदी सविस्तर माहिती दिली आहे. म्हणजे त्यांचे मूळ गांव,त्यांची जन्मतारीख,त्यांचे पूर्वज, त्यांचे गोत्र, त्यांचे शिक्षण, त्यांचे गुरु, त्यांनी केलेली गुरुसेवा, त्यांनी केलेल्या यात्रा, त्यांना आलेली दैवी अनुभूती वगैरे. हे सर्व वाचून,  लेखकांनी ही माहिती गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले असतील याची जाणीव होते. आपण वाडीला गेल्यावर वरीलपैकी काही महात्म्यांच्या समाधी पाहतो व त्यांना सवयीने नमस्कार करतो. पण सदरचे पुस्तक वाचल्यावर त्या महात्म्यांची थोरवी कळते व आपण त्यांना आदरपूर्वक नमन करतो. यातच या पुस्तकाचे यश दडले आहे.

पुस्तकाच्या पाचव्या विभागात श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील विशेष कथा दिल्या आहेत. त्यात वाडीतील पुजारी घराण्याचे मूळपुरुष श्री. भैरंभट जेरे, दत्तभक्त रामभटांना मिळालेली सोन्याची लेखणी व श्रीमन्नारायण स्वामी महाराज यांच्या कृपेने ‘गुरुभक्त’ उपाधी प्राप्त झालेले श्री विठ्ठल ढोबळे यांच्या कथा आहेत. भैरंभट जेरे यांना श्रीमन्नृसिंहसरस्वती स्वामींच्या कृपेने उतारवयात पुत्ररत्न झाले, त्या मुलाला पुढे चार पुत्र झाले, त्या चार पुरुषांचे वंशज म्हणजेच वाडीतील पुजारी परिवार होय.

पुस्तकाच्या सहाव्या विभागात  नृसिंहवाडीचे क्षेत्रमहात्म्य वर्णिले आहे. त्यात श्रींच्या मनोहर पादुका व पादुकांवरील शुभचिन्हे, कृष्णवेणीमाता व दक्षिणद्वार सोहळा, कृष्णाघाट, ब्रह्मानंद मठ, पालखी सोहळा, सानकादिक महात्मे, औदुंबर वृक्ष, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील अष्टतीर्थे, कन्यागत महापर्वकाळ, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ‘ या अष्टदशाक्षरी मंत्राचा गूढार्थ, ‘ घोरकष्टोध्दरण ‘ स्तोत्राचा सरलार्थ व भावार्थ, प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे ) स्वामी महाराजांची ‘प्रश्नावली’ व नृसिंहवाडीतील पुजारीजनांची थोरवी आदि विषयांचा विस्तृत परिचय करून देण्यात आला आहे.

सर्वार्थाने हे पुस्तक अत्यंत वाचनीय व संग्राह्य आहे.

||श्री गुरुदेव दत्त||

परिचयकर्ता : श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments