image_print

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ रेस्टींग पिरियड…… नात्यांमधला !!! ☆ सुश्री स्वाती देव ☆

बागकाम हा माझा ठआवडता छंद असल्यामुळे बागकामाचे व्हिडिओ बघत होते. अनेक plants ची माहिती करून घेत होते. त्यांच्या वाढीविषयी किंवा त्यांच्या संगोपना विषयी माहिती वाचताना एक शब्द बऱ्याच वेळा येत होता. तो म्हणजे रेस्टींग पिरियड. साधारणतः हिवाळ्यामध्ये त्यांचा रेस्टिंग पिरियड असतो. त्या कालावधीमध्ये खत अजिबात घालायचं नसत, पाणी कमीत कमी देतात. काही काही झाडांच तर हार्ड प्रूनिंग किंवा कटिंग करून टाकतात. सगळी पाने काढून टाकतात. म्हणजे बर्‍यापैकी हार्श ट्रिटमेंट त्यांना दिली जाते असे मला वाचताना वाटले. म्हणजे एखाद्याला झाडांबद्दलची ही पुरेशी माहिती नसेल तर झाडांचे बहरणे बंद झाल्यावर तो सोसासोसाने त्याला खतपाणी घालत बसेल, उन्हातली कुंडी सावलीत ठेवेल, सावलीतली ऊन्हात ठेवून बघेल आणि तरी शेवटी फुलं येत नाही म्हणून दुःख करत बसेल. पण या हक्काच्या रेस्टिंग पिरियडनंतर ज्या जोमाने झाडं बहरतात हे वाचल्यानंतर मनात एकदम विचार येऊन गेला की नात्यांच पण असंच असतं का ?

नात्यांना आपण मायेचं, प्रेमाचं, विश्वासाचं खतपाणी घालत असतो आणि ती हळूहळू बहरतात पण कधीकधी या गोष्टींचा समतोल बिघडतो. कधी जास्त गृहीत धरल जातं, कधी अति काळजी केली जाते, कधी हक्क दाखवला जातो. काय आणि कसं पण हे नातें हळु हळू नाजूक, कमकुवत व्हायला लागत. मग अचानक कधीतरी छोटीशी वाटणारी कृती किंवा अजाणतेपणी गेलेला एखादा शब्द हे पुरेसं ठरतं आणि ते नातं एकदम शॉक मध्ये जातं. मग अशा वेळेस हा चक्क नात्यांमधला रेस्टिंग पिरियड आहे असं मानायला काय हरकत आहे ? मग अशावेळी जाणीपूर्वक संवाद थोडा कमी झाला तरी हरकत नाही, वारंवार भेटणं व्हायला पाहिजेच असं नाही, गरजेपुरताच संवाद झाला तरी काही बिघडत नाही. नेमकं काय चुकलं असेल याचा विचार करून, योग्य तो बोध घेऊन, आपण स्वतः चुकलो असलो तर आपल्याला स्वतःला सुद्धा माफ करून शांत राहावे. अगदीच तशी गरज पडलीच तर आपण आहोतच एकमेकांना एवढा विश्वास पुरेसा आहे. कालांतराने मन किंवा नाती पुन्हा जुळतील याबद्दल मला तरी खात्री वाटते.

मात्र कधीकधी बसणारा शॉक हा मोठा असतो. नुकत्याच आमच्या गच्चीमध्ये माळीबुवांकडून सगळ्या कुंड्या repoting करून घेतल्या. पूर्ण झाडं काढून त्याची मुळांची छाटणी करून ती गरजेनुसार मोठ्या कुंड्यांमध्ये लावली. काही काही झाडांना पालवी फुटायला सुरुवात पण झाली पण काही झाडं मात्र ढिम्मच. त्यांच्यात जिवंतपणाची काही लक्षणे दिसत नव्हती. मला चाळाच लागला होता रोज एकदा त्या वाळलेल्या झाडांकडे जाऊन निरीक्षण करायचं कुठे जिवंतपणाची निशाणी दिसतेय का ते. दोन तीन झाडांची तर मी आशाच सोडून दिली होती पण आता सीझन बदलल्यानंतर अचानक मला त्यांच्यावर इवलिशी फूट दिसायला लागली. ज्या झाडांची मी आशा सोडून दिली होती त्या प्रत्येकाला पालवी फुटलेली आहे. थोडक्यात नात्यात सुध्दा शॉक मोठा असेल तर वेळ पण जास्त लागेल पण ते पूर्ववत मात्र नक्की होईल असा विश्वास वाटतो.

एवढं सगळ असलं तरी जसं आपण अमरपट्टा घेऊन आलो नाहीये तशी काही नाती सुद्धा अमरपट्टा घेऊन आलेली नसतात, त्यांचीही एक्सपायरी डेट असतेच की. त्यांचा सुद्धा मृत्यू होतो. तसं झालंच तर मग त्या वेळेस मात्र तोही शांतपणे स्वीकारावा.

हे सगळे माझ्या स्वतःच्या अनुभवातून मनामध्ये उठणारे तरंग आहेत. निसर्ग आणि माझं अचपळ मन यात मला कुठेतरी संगती दिसली, ती शब्दांत उतरवली….

 

© सुश्री स्वाती देव

+91 98509 72526

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments