श्री जगदीश काबरे
☆ नवरात्रीचे अनोखे उपवास! ☆ श्री जगदीश काबरे ☆
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे उपास केले जातात. कोणी निर्जळी करतो, तर कोणी कडकडीत अनवाणी चालतो. पण या कर्मकांडी उपासाच्या ऐवजी या वेळेस एक अनोखा बौद्धिक पातळीवरचा उपवास आपण सर्वांनी केला असता आपल्या तनमनाचे शुद्धीकरण तर होईलच, त्याचबरोबर हे जगही सुंदर दिसायला लागेल.
हा उपवास आपण नवरात्रीच्या निमित्ताने जरी करणार असलो तरी तो वर्षातील कुठलेही सलग नऊ दिवस असा उपवास करून आपल्याला मन:शांती, समाधान आणि महत्त्वाचं म्हणजे आयुष्यभर निखळ आनंद मिळेल… जगण्याचा अर्थ कळू लागेल. तेव्हा व्हा तयार…
प्रथम दिवस
– मी माझा सर्व राग आणि द्वेष सोडून देईन.
द्वितीय दिवस
– मी लोकांच्या विषयी आडाखे बांधणं सोडून त्यांच्या जातीधर्मापेक्षा त्यांच्या गुणांना महत्त्व देईन.
तृतीय दिवस
– मी माझे इतरांबद्दल असलेले सर्व आकस, पुर्वग्रह सोडून देईन आणि डोळ्यावरचा चष्मा स्वच्छ करून नव्या चष्म्याने सगळ्यांकडे नितळ दृष्टीने पाहीन.
चतुर्थ दिवस
– मी स्वतःला ओळखून आणि स्वतःविषयी परखड आत्मपरीक्षण करून सर्वांना क्षमा करेन.
पंचम दिवस
– मी स्वतःला आणि प्रत्येकाला गुणदोषासकट स्वीकारेन.
षष्ठी
– मी स्वतःवर आणि प्रत्येकावर अटीतटीचे प्रेम न करता बिनशर्त प्रेम करेन.
सप्तमी
– मी माझ्या ईर्ष्या आणि अपराधाच्या सर्व भावना सोडून प्रत्येकाशी सहकार्याने आणि सौजन्याने वागेन.
अष्टमी (दुर्गाष्टमी)
– मी माझी सर्व भीती सोडून अंधश्रद्धांचा त्याग करीन आणि विवेकाने जगण्याचा प्रयत्न करेन.
नवमी (महानवमी)
– माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी आणि मला जे मिळाले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ राहीन.
दशमी (विजयादशमी)
विश्वामध्ये सर्वांसाठी जागा आहे. विश्वातील वैविध्यतेला मी विषमता समजणार नाही. बिनशर्त प्रेम, साधना, निष्काम सेवा आणि विश्वासाद्वारे मी हे जग सुंदर करायचा प्रयत्न करेन.
तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्वांना नवरात्रीच्या सदिच्छा…
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






