सौ. ज्योती कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ बाई मी कशी? देवाने दिली तशी!… ☆ सौ. ज्योती कुलकर्णी ☆
आमच्या घरात या पिढीतली मी पहिलीच मुलगी. काकूला तीन मुलेच! मी झाल्यानंतर माझा चुलत भाऊ माझ्या पाळण्यापाशी काहीतरी करत होता. (आई सांगायची हो! मला एवढं जुनं काही आठवत नाही.) तो धावत सगळ्यांना सांगत आला, ’ अंगला आऊला (मंगला काकूला) (त्याला काही शब्द म्हणता येत नसत) जादूची मुलगी झाली. तिचा पाय दाबला की लाल लाल होतो. आणि सोडला की रंग ‘……
मी कशाला सांगू माझा रंग तुम्हाला! तो गोरा होता तर लहानपणापासूनच शान मारायचा.
अशी मी खरोखरच जादूची होते की काय? माझ्या मनातले विचार तर जादू भरे असायचे. आम्ही सगळे जेवायला बसल्यावर आमच्या कडील वडीलधारे पोट्ट्यांना सांगायचे, ”पानात टाकायचे नाही! टाकले तर त्याची माळ करून तुमच्या गळ्यात बांधून देईन! ” तो पर्यंत मी पोळीचा कुस्करा वरणात कालवलेला असायचा. तो मी पानात टाकला तर हे कसे काय सुई धाग्यात ओवून गळ्यात बांधतील? हा प्रश्न मला नेहमी पडायचा. अन मला मोठ्यांपैकी कोणी तरी वडीलधारे माझ्या समोर बसलेले आहेत आणि मी टाकलेल्या कुस्कऱ्याची दोऱ्यात माळ ओवण्याचा प्रयत्न करीत आहेत असे डोळ्यापुढे दिसायचे.
थोडी मोठी झाल्यावर नंतरचा प्रसंग! सांगितलेले काम नीट केले नाही तर आई म्हणायची काडीने मलम लावून कामं होत नसतात. मला प्रत्येकाचाच शब्द शब्दशः खरा वाटायचा! ‘ मुंगेरीलाल के हसीन सपने’प्रमाणे! मला डोळ्यापुढे चित्र दिसायचे की मी काडीवर मलम घेते आहे आणि कसाबसा लावायचा प्रयत्न करते आहे. एक दिवस मी पूर्ण तयारीतच होते. आईने वाक्य उच्चारल्याबरोबर मी आईस्क्रीमची छोटी काडी घेऊन उभीच होते. व त्यावर घेतलेला मलम पायाला लावून दाखवला आईला! त्याबरोबर आईने मला असा जोरदार धपाटा लगावला की बस्स! असा धपाटा का बसला हे अजूनही मला कळत नाहीये हो….
मी कशी मॅट्रिक पास झाले कोण जाणे! माझ्या मॅडम म्हणाल्या ”झाल्या एकदाच्या रडत खडत पास! ”माझा एक भाऊ चिडवायचा ‘म्या केली ट्रिक अन् झाले मॅट्रिक! ’ माझ्या शेजारी राहणारी मैत्रीण मात्र नापास झाली होती. मी माझ्या वडिलांजवळ बसून काॅलेजचा फाॅर्म भरत होते. माझी ती मैत्रीण जवळच बसली होती. अचानक हमसून हुमसून रडायला लागली. खूप विचारलं तिला काय झालं म्हणून! शेवटी मी फाॅर्म भरतेय तर हिला वाईट वाटलं असेल असं समजून मी गप्प बसले तोच तिने गुगली टाकली, ”रंजू तू पण नापास झाली असतीस तर आपण पुढल्या वर्षी सोबत फाॅर्म भरला असता न गंऽऽऽ”.. …
काय काय सांगू बाई तुम्हाला? एक दिवस सासूबाईंनी आवाज दिला, ‘या गं पोरी हो जात्याला हात लावू लागायला. ’ महालक्ष्मीची आंबील त्या जात्यावरच दळायच्या. मला एकदम आठवलं! माझी आई म्हणायची की, “पाण्यात पडल्यावर पोहणं येतं, हातात लेखणी घेतली की लिहायला येतं, आणि जात्यावर बसले की दळायला येतं ” आईवर माझा खूप विश्वास त्यामुळे हे वाक्य माझ्यासाठी शंभर टक्के खरे होते.
तिचं हे वाक्य पक्कं लक्षात ठेवून मैत्रिणीकडल्या मोठ्या विहिरीत पोहायला गेले. तिच्या वडिलांनी मला मोठा दोर कमरेला बांधून दिला होता व धरला पण होता. त्यांना आम्ही सगळे तात्या म्हणत असूं. आईचं वाक्य ऐकून मी दिमाखात विहिरीच्या पायऱ्यांवरून पाण्यात उतरले शरीर पाण्यात जात नाही तोच आकांत केला. ’ तात्या मला वाचवाऽऽ’ ‘तात्या मला वाचवाऽऽ’…’ वर ओढा मलाऽऽ’ …झाले! पोहण्याच्या म्हणीची वाट लागली. लिखाणाचं तुम्ही बघतच आहात! आता जात्यावर बसून बघायचं राहिलं होतं.
पोहायला उतरले त्याच दिमाखात जात्यावरही बसले. झालं! जातं काही ओढवेना! मग काय! मी खुंट्याला नुसताच हात लावला. हात फिरवायची नुसतीच ॲक्शन! मग जातं त्यांनीच ओढलं. वरून त्यांच्या कानपिचक्याही मिळाल्या! ‘ तुला काय वाटलं, जात्यावर बसले की दळायला येतं! ’ त्यांच्या चेहेऱ्यावरचे जगातल्या सगळ्या सासवांसारखे वेडे वाकडे हावभाव बघून मी, ‘आईच तसं म्हणायची’ हे सांगितलंच नाही. ओठावरचं पोटात गिळून टाकलं! हो….. आधीच आई नेहमी म्हणायची मला, ‘ही पोरगी सासरी माझ्या नावाचा उद्धार करणार आहे म्हणून! ’ जाऊ दे झालं! कुणी न सांगताही झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली हेच काय कमी आहे?
एक दिवस रात्री मला झोपच येत नव्हती. मला सारखं वाटत होतं खोलीतल्या कड्यांना दोरी बांधून झोपाळा टांगावा अन् मला कुणी तरी झोके द्यावे. माझी कल्पना सत्यात येणार नाही हे लक्षात आले. शेवटी पुस्तक उघडून वाचत बसले. ह्यांना झोप लागली होती. वाचता वाचताच डास चावायला लागले. डास काही दिसत नव्हते. सावली मात्र दिसत होती. मी खाली सावली कडे बघून वर डास मारण्यासाठी टाळ्या वाजवत होते. तेही बसल्या बसल्याच! शरीर व टाळ्यांचे हात खाली डासांच्या सावली कडे बघून वर गोल गोल फिरवत. टाळ्या चालूच! टाळ्यांचा आवाजही वाढला होता. हे झोपेतून उठले व वैतागाने म्हणाले, ’ हे काय चालू आहे तुझं. घागरी फुंकतात तसं गोल गोल घुमणं आणि टाळ्या वाजवणं! ’ मी म्हंटले…..
”अहो अर्जुनाने फिरत्या मासोळीच्या पडछायेला बघून तिच्या डोळ्याला बाण मारला. मी फिरणाऱ्या डासाच्या छायेला बघून त्याला मारण्याचा प्रयत्न करते आहे. आणखी काय? ”. त्यांनी उठून गुड नाईट लावलं आणि म्हणाले चल झोप आता. माझा चेहेरा येवढासा झाला. येवढं अर्जुनाच्या पावलावर पाऊल ठेवून चालले होते त्याचं काहीच नाही?
सकाळी उठल्यावर नातेवाईकांचा फोन आला. आम्ही येणार आहे म्हणून! आता टाॅयलेट पासून सगळी सफाई एकदम कशी करायची? घरी कोणी येणार असलं की घर स्वच्छ आहे का? टाॅयलेट स्वच्छ आहे की नाही? पाहुणचार काय करावा? किती चिंता असतात नं आपल्याला? तेव्हढ्यात शाहरुख माझ्याकडेच येताना दिसला. त्याला चहा-पाणी न विचारताच सरळ बखोटीला धरून पिवळा ‘सं….. ’ दाखवला आणि म्हंटले…. ’माझा पिवळा सं….. पांढरा करून दे भाऊ, नाहीतर सरळ घराबाहेर हो. त्याला
कसं माहिती होतं कोण जाणे? हारपिक सोबत घेऊनच आला होता माझ्या कडे. माझा अवतार बघून त्यानी लगेच साफ करून दिला. मी खूपच खुश झाले येवढा मोठा स्टार आपल्या कडे येऊन. ……. साफ करून देतो म्हणजे काय?
रिटायर्ड झाल्यापासून यांचं टीव्ही बघणं फारच वाढलं जाहिराती पण पाठ होऊन गेल्यात. इतक्या की वस्तूचं नाव आठवण्या ऐवजी जाहिरातीतलं गाणंच आठवायचं त्यांना. एक दिवस म्हणाले, “अगं आपण लगे आय हाय आणायला जाऊ”. मला समजतच नव्हते, काय आणायला जायचंय ते! तेवढ्यात लागलेली जाहिरात दाखवली त्यांनी. त्या जाहिरात करणाऱ्याचं बनियनची जाहिरात करणं बघितलं. तो बनियन मध्ये अंगठे घालून गिरक्या घेत कृष्णभोवती राधा नाचते की राधेभोवती कृष्ण या थाटातलं नाचत होता. ते बघितलं आणि म्हणाले, ’काही नाही जायचं! ’ तर त्यांनी लगेच लागलेली दुसरी जाहिरात दाखवली. मग “ये नही तो कुछ नही” हे तरी आणू. (बरं झालं मी आधीच रोज घालायचे आतले कपडे आणून ठेवले होते. नाही तर माझ्या सोबत येऊन दुकानात ‘लगे आय हाय’, अन् ‘ये नही तो कुछ नहीं’ मागितले असते तर!) लगे आय हाय आणि ये नही तो कुछ नहीं सारख्या जाहिरातींमुळे त्यांचा खप किती वाढतो हा प्रश्न मनातच ठेवून मी त्यांच्याकडे अशा खाऊ गिळू नजरेने बघितलं आणि मनातल्या मनातच म्हटलं,
“जिथे शोधिशी हास्य मधुर तू
तिथे असे ती कवळी
गतकाळातील गोड स्मृतींना
तिथेच सोडून ये ऽऽऽऽ…. ”
वाचताना आपापल्या कवळ्या काढून ठेवल्या होत्या की लावलेल्या होत्या, जरूर सांगाल मला……
© सौ. ज्योती कुलकर्णी
अकोला.





