सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘अजि म्या ब्रह्म पाहिले…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
गुलबर्गा येथे रहाणाऱ्या श्रीनाथ डॉक्टरांशी अधून मधून होणाऱ्या गप्पांमधून ते म्हणाले, “आजकाल भिकारी सुद्धा आपण दिलेल्या खाद्यपदार्थावर टीका करतात. माझ्या आजारपणात भेटीला येणाऱ्या हितचिंतकांनी दिलेली फळे, एकट्याला एवढी लागणार नाहीत म्हणून सद् भावनेने वाटून टाकली. काहींनी ती कृतज्ञ भावनेने खाल्ली तर काही महाभागानी खुसपट् काढली. “
त्यांच्या म्हणण्यावर माझं मत मी मांडलं, ” एक तर, ही भिक्षेकरी मंडळी संकुचित वृत्तीची असतील किंवा त्यांना गरजच नसेल. भिकाऱ्याला ओकाऱ्या असंही म्हणता येणार नाही कारण व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे, काहीजण खरंच भुकेले आणि गरजवंत असतात. त्यांची गरज, भूक ओळखण्याचं कसब आपल्यात हवं, पण तेवढा वेळ आपल्या जवळ नसतो. चांगल्या भावनेने चांगलं देणं देऊन आपण मोकळं होतो आणि आपल्या रूटीनकडे वळतो – – डॉक्टर! ह्यावरून आठवलं, तुम्हांला मी तो किस्साच सांगते.गरिबांचे डॉक्टर आणि देव असलेले डॉ.अभिजीत सोनवणे, ह्या सद्गृहस्थांशी माझी ओळख झाली. समाजाच्या तळागाळात पोहोचून, गरीबांच्या मनात शिरून, त्यांची गरज ओळखून, देशसेवा, मानवसेवा करणाऱ्या ह्या निस्वार्थी महान समाजसेवकाशी ओळख झाल्याचा मला खूप आनंद झाला.”.
“होहो! हे नाव मी ऐकलय खरं”
श्रीनाथ डॉक्टरांनी उत्सुकता दाखवल्यावर, मीही सरसावून म्हणाले, ” त्याचं असं झालं.. पितृपंधरवडा आला. काहीतरी संकल्प करण्याची उर्मी मनात होती. अन्नदान तर करायचं होतच. मंदिरे वृद्धाश्रम शोधली तिथे देवाणघेवाणाचा कारभार चांगला असणारच. तिथला भरभरून वहाणारा अन्नकोटही बघितला. आणि आधीच तृप्त असलेले, अन्नावर भरपेट अन्न जेवून बाहेर पडणारे सधनही बघितले. “
त्यावर डॉ.श्रीनाथ म्हणाले, “खरं म्हणजे ह्या सुखवस्तुंना अन्नाची गरजच नसते. घरी खाऊन पिऊन ते सुखी असतात. अन्नावर अन्न आणि वस्रावर वस्र असाच हा प्रकार होतो “……. त्यांच्या म्हणण्याला पुस्ती जोडून मी पण म्हणाले, “अगदी बरोब्बर! हे! हेच म्हणायचय मला. खरी गरज भुकेलेल्यांनाच असते. आणि म्हणूनच ह्या दृष्टिकोनातूनच डॉ. अभिजीत सोनवणे यांच्याशी मी संपर्क साधला होता.. सौ मनीषाताई, अभिजीत अत्यंत प्रगल्भ बुद्धीचे उत्तम लेखक, अत्यंत कष्टाळू असे समाज सेवक आहेत. गरजवंतांची गरज ओळखण्याची आणि त्यांच्या मनांत, पोटात शिरून त्यांची मन:शांती आणि भूकशांत करण्याची कला, कसब त्यांच्यात नक्कीच आहे.तुम्हाला सांगते गरिबांचा हा देव आहे निराधार भगिनींचा हा पाठीराखा आहे. बालकांचा हे सद्गृहस्थ आणि सौ मनीषा ताई आईवडील आहेत तर निराधार वृद्धांसाठी ते पुत्र आणि कन्येची भूमिका मनापासून सेवा करून वठवतात.”.
श्रीनाथ डॉक्टरांची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती., “अरे वा! फारच छान आहे हा किस्सा आणि तुमचा अनुभव. बरं पंडित मॅडम मला असं सांगा. त्यांचा हा उपक्रम नक्की आहे तरी काय आणि कसा? “
उत्तरा दाखल मी डॉक्टर अभिजीत यांची अतिशय सुंदर भावपूर्ण, विनम्र अशी मला भावलेली कविताच वाचली… हा गरिबांचा परमभक्त नम्रपणे, कनवाळूपणे श्रीगणेशाला आळवतो – –
“ गणेशा माफ कर मला. तुझ्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर उसळला होता.
पण मी अभिषेक नाही करू शकलो, कारण त्यावेळी फुटपाथवर अस्ताव्यस्त पडलेल्या आई-वडिलांना अंघोळ घालण्यात मी व्यस्त होतो.
त्या आई-वडिलांची पूजा करताना तुझा क्षणभर मला विसर पडला होता. त्यांना रस्त्यावरून उचलून स्वच्छ करून एका स्वच्छ आश्रमात ठेवण्याच्या धावपळीत मी त्यावेळी होतो ”
– – डॉ.अभिजीत सेवाभावी सेवक, गणेशाची माफी मागून आशीर्वाद मागतात,
” तुझी कृपा आणि दानशूरांच्या दानधर्माच्या मदतीने या गरिबांची सेवा मला करायची आहे. ‘
हा किस्सा ऐकताना डॉ.श्रीनाथ म्हणाले, “कमाल आहे, किती कौतुकाची, महानतेची गोष्ट आहे ही. या गृहस्थांना जरासुद्धा गर्व नाहीय्ये.”.
त्यांच्या म्हणण्याला अनुमोदन देताना मी पुढे सांगु लागले, “”अहो हो ना! समाजातल्या गरजवंतांचे आशीर्वाद घेऊन, त्यांच्या मनात आदराचं, मानाचं स्थान पटकावणाऱ्या या गृहस्थांचे पाय जमिनीवरच आहेत. “.
डॉ.अभिजीतांच्या कवितेचे रसग्रहण करण्याचं भाग्य मला लाभलं होतं.
मी पुढे म्हणाले, ” त्यांची गणेशापुढे क्षमायाचना होती – – “गणेशा तुझ्यासाठी मी मखर नाही करू शकलो कारण त्यावेळी भर पावसात थंडीने कापणाऱ्या तान्ह्या लेकरांसाठी, सेकंड हॅन्ड ताडपत्री घेऊन सुतळीने छप्पर बांधण्यात मी गर्क होतो. तुझे पैसे मी तुझ्या लेकरांसाठीच वापरले आणि तुझ्या नैवेद्यासाठीचा मोदक मी भुकेलेल्यांच्या मुखात भरविला… तर तूच सांग देवा चुकलं कां रे काही माझं? “ ही आळवणी, ही शब्दरचना, अभिजीत स्वतः देवापुढे मांडून माफी मागत आहेत. ते म्हणतात, ‘तुझी आरती नाही मी केली कारण त्यावेळी पॅरॅलिसिस झालेले, स्पष्ट शब्दात आपल्या भावना मांडू न शकणारे माझ्या कानात काहीतरी सांगत होते. तुझ्या मंदिरातली नाही तर जनमानसातली ती आरती मी ऐकत होतो – –.
एका आजीचं साधं मागणं होतं, ” डाकतरा अंगाला झोंबणारा वारा कानात शिरला की थंडीनी कुडकुडायला होतं रे! एखादी कानटोपी तरी आणून देनां रे मला! “ तिची मागणी ऐकून अभिजीतांनी काय करावं! .. एक टोपी आणून आजींच्या डोक्यावर चढवून ते म्हणाले, “आजे अगं गणेशानी तुझं मागणं ऐकलं, आणि ही कानटोपी त्यांनी तुझ्यासाठी पाठवलीय “
आजीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर पसरलेलं, समाधानी हसू बघून ते गणेशाकडे वळले आणि म्हणाले,
” का गणेशा आजी भेटली तर तिला काही बोलू नकोस आणि पुन्हा हा विषय वाढवू नकोस “..
– – त्यांच्या प्रत्येक वाक्यावाक्यातून निःस्वार्थीपणा निथळत होता. कार्याचा बोलबाला नाही की प्रसिद्धीची हाव नाही. गायत्री मंत्र त्यांनी नुसता अनुभवला नाही तर जगवलाय.. जागवला आहे.
…. पाय नसलेल्या माऊलीला त्यांनी कृत्रिम पाय देऊन चालवलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद श्री व सौ सोनवणे यांनी मनसोक्त वाचला. दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद शोधणारी ही जोडगोळी धन्य धन्य आहे असं मला वाटतं..
देवाच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या निराधार जिवांना अग्नी देऊन ते मृत्तात्म्यांसाठी प्रार्थना करतात,
“देवा आता तरी त्यांना सुख मिळू दे रे बाबा! “
आणि विशेष म्हणजे त्यांच्या सुख शांतीसाठी स्मशानात त्यांनी दोघांनी सुखकर्ता दुखहर्ता आरतीसुद्धा गायली.
नवरात्रात फाटक्या वस्त्रातील मंदिराबाहेरच्या देवींच्या अंगावर त्यांनी नव्या साड्यांचे पांघरूण घातले. पुरात निर्वासित झालेल्यांना त्यांनी भाड्याच्या घरात छपराखाली आणले. तिथेच कलशपूजन करून त्यांचा संसार ह्या पुण्यकर्मी नवरा बायकोनी मांडून दिला.
डॉ अभिजीत उत्तम लेखकही आहेत. स्वतः लिहिलेली ही त्यांची गणेशाची आळवणी वाचून मी अवाक् झाले. ह्या आधुनिक तपस्वींना माझा सलाम.
पितृ पंधरवड्यात त्यांनी तर सेवेचा उच्चांक गाठला. शेकडो आई वडिलांना त्यांनी भोजनाने तृप्त केले. त्यांच्या शब्दात ते अन्नदान नसून तृषा शांती होती….. ह्या उपक्रमाशी मी थबकले. हजारो सधनांना जेवू घालण्यापेक्षा शंभर निर्धनांना भोजन देण्याचा हा उपक्रम मला मनापासून भावला. पितृपंधरवड्यात अन्नदानाचा हा नवा मार्ग मला गवसला. आणि सगळ्यांच्या संमतीने देणगी देण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टरांना फोन लावला. त्यांनी सगळा उपक्रम व कार्यभागाच्या आराखडा आमच्यापुढे मांडला. आम्ही भारावलो. माझ्या चिरंजीवांनी चेक पाठवला, ताबडतोब पोच पावती तर आलीच, पण दुसऱ्या दिवशी सकाळीच तृप्त मनाने भोजनास्वाद घेणाऱ्या अतिथींचे फोटोही डॉक्टरांनी पाठवले.ते बघून मी धन्य झाले. त्या अतिथींमध्ये मला माझे आईवडिल, पूर्वज दिसले. डॉक्टरांच्या माध्यमातून मला ब्रह्मदर्शन झाले होते.”
हे सगळं ऐकून गुलबर्गा येथून डॉ.श्रीनाथ उत्स्फूर्तपणे म्हणाले, “अत्यूत्तम आहे हा उपक्रम. माझ्या 200 लोकांच्या मंडळात मी हा उपक्रम मांडीन. सगळ्यांना तो आवडेल आणि खारीचा वाटा उचलण्यासाठी ते नक्कीच पुढे येतील.”.
आनंदाचा समाधानाचा सांठा मनात साठवून. डॉ.अभिजीत व सौ मनीषा ताईंचे पुन्हा पुन्हा आभार मानून मी संवाद आटोपता घेतला…..
आनंद, समाधानाचा हा सेतू डॉक्टर अभिजीत सोनवणे आणि सौ मनीषाताईमुळे मला सांधता आला.
त्या दोघांना माझे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद! ! .
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




