श्री प्रमोद वामन वर्तक
मनमंजुषेतून
🎤 बातमीचा समाचार! 📺 श्री प्रमोद वामन वर्तक ☆
पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रेडियोवर सुरु होणाऱ्या, “मंगल प्रभात” या कार्यक्रमात, बिस्मिल्लाखान यांच्या शहनाईवादनानंतर, सहा वाजता दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून एक-एक मिनिटांचे, प्रथम हिंदी व नंतर इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होत असे. तसेच, संध्याकाळी सात वाजता,
“नमस्कार, आकाशवाणीच हे मुंबई केंद्र आहे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत. आजच्या ठळक बातम्या… ”
वाचकहो, टीव्ही नामक इडियट बॉक्स आजच्या सारखा झोपडपट्टीपासून बंगल्या बंगल्यात आणि आता तर मोबाईलमधे सुद्धा घुसायच्या आधीची ही गोष्ट! त्या काळी या दोन “ऑथेँटिक बातमी पत्रावर” अवलंबून असणारी आमची पिढी, रेडियोवरची ही दोन बातमी पत्र ऐकत, ऐकत मोठी झाली. त्याकाळी रेडियो घरात असणं हे थोडं श्रीमंतीचच लक्षण मानलं जात होतं. सगळ्या मध्यमावर्गी्यांना त्याकाळी परवडण्यासारखी ती गोष्ट नव्हतीच मुळी. आमच्या चाळीच्या पंचेचाळीस बिऱ्हाडात जेमतेम दोन ते तीन “मरफीचे” रेडियो होते, यावरून त्याची कल्पना आपल्याला यावी! या रेडियोच्या बाबतीतल्या गमती जमती सांगण्यासाठी वेगळा लेख पुढे मागे लिहायचा माझा विचार आहे. आता आजचा लेखाचा विषय “बातमीचा समाचार” असल्यामुळे, माझ्या पुढील लेखाच्या विषयाची आगाऊ बातमी देणं, हे मी माझं कर्तव्य समजतो म्हणून ही ताजी बातमी आपल्याला दिली. असो!
माझं अर्ध्याहून अधिक आयुष्य हिंदमाता टॉकीजजवळच्या नायगावच्या ८ बिल्डिंगच्या अहमद सेलर चाळीच्या संकुलात गेलं. त्यावेळी आमच्या चाळीतलं चालत बोलत “वर्तमानपत्र” होतं ते जोशी काकूंच. जोशी काकूंची खोली जिन्याजवळ, त्यामुळे जिन्यावर नुसता पावलांचा आवाज यायचा अवकाश, काकू लगेच बाहेर येऊन आलेल्या गेलेल्याची त्याच्याशी ओळख असुदे अथवा नसूदे, सखोल चौकशी केल्याशिवाय सुटका करीत नसत! आणि मग दुपारी चाळीच महिला मंडळ आपापल्या घरचं धान्य निवडण्याच, भाजी निवडण्याचं काम किंवा शिवणकाम घेऊन चौकात एकत्र जमल्या की मग त्यांच्यासाठी जोशी काकूंच बातमीपत्र सुरु होई.
वाचकहो त्यावेळच्या जोशी काकूंच्या बातमीपत्रास ‘वावडी’ म्हणतात हे थोडं मोठं झाल्यावर मला कळायला लागलं. तसे
‘वावडी’ या शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत, जे संदर्भाप्रमाणे बदलतात. मुख्य अर्थ म्हणजे ‘खोटी बातमी’ किंवा अफवा, अवई, कंडी, हूल, वदंता इत्यादी इत्यादी. थोडक्यात कुठल्याही बातमीची खरी खोटी शहानिशा न करता, ती बातमी जगजाहीर करून स्वतः फुशारकी मारणे.
पुराण काळात राजाचा एखादा हुकूम अथवा फर्मान रयतेला (तेव्हा सामान्य लोकं रयत म्हणून ओळखले जायचे, त्यांची जनता नंतरच्या काळात झाली बरं कां! ) कळण्यासाठी वेगळी सोय होती. एक दवंडीवाला, त्याच्या ढोल वाजवणाऱ्या साथीदारासह गांवभर फिरून, तो राजाचा नवीन हुकूम अथवा फर्मान प्रत्येक गावच्या चावडीवर मोठ्याने वाचून दाखवत असे! त्या योगे तमाम जनतेला राजाच्या नवीन हुकुमाची माहिती होई. तसंच काही काही राजांनी त्याकाळी विशिष्ट पक्षांचा उपयोग, अतिदूर असलेल्या कोणासाठीतरी संदेश (बातमी) देण्यासाठी वापरल्याच आपल्या वाचनात आलं असेलच. आणि ते वाचलेलं आठवत नसेल तर, “कबुतर जां, जां, जां” हे गाणं आठवून बघा, म्हणजे मी काय म्हणतो ते लगेच लक्षात येईल! हल्ली सगळ्यांनाच स्पून फिडींग करायला लागतं, त्याला तुम्ही तरी कसे अवपाद असणार म्हणा! असो!
काही आफ्रीकन देशातले लोकं फार पूर्वी ड्रम सारखे वाद्य विशिष्ट तालात मोठयाने वाजवून एखादी बातमी पुढच्या गावात पोहचवत असत. नंतर त्याच काळात “रनर”ची परंपरा सुरु झाली. रनर म्हणजे गावातला एखादा सगळ्यात जलद धावणारा तरुण, स्वतः दुसऱ्या गावात जाऊन एखादी बातमी तिथल्या प्रमुखाला सांगत असे. मग त्या गावातला “रनर” तीच बातमी पुढच्या गावात पोहचवत असे!
मराठी वृतपत्रांचा उदय सर्वप्रथम मुंबईत झाला. मराठीतील पहिले वृतपत्र “दर्पण” या नावाने बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले. हे वृतपत्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत होते, जे जेमतेम ८ वर्ष चालून १८४० मधे बंद पडले. ही दोन्ही वृतपत्रे सुरु करण्याचा मान बाळशास्त्री जांभेकरांना जातो, त्यामुळेच त्यांना ‘मराठी वृतपत्राचे जनक’ मानले जाते.
बातमी हा विषय असल्यामुळे “केसरी”, “नवाकाळ” आणि “मराठा” या एकेकाळी गजलेल्या तीन वर्तमानपत्रांविषयी लिहिल्या शिवाय हा लेख पूर्ण झाल्यासारखं निदान मला तरी वाटणार नाही. या पैकी “केसरी” हे वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी ४ जानेवारी १८८१ रोजी पुणे येथे सुरू केले होते, जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख मुखपत्र बनले, हे आपण जाणताच. हे वृत्तपत्र सुरवातीला विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने सुरू झाले आणि मराठी भाषेतून राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी वापरले गेले. “केसरी” संबधीचा बाकी इतिहास सर्वश्रुत आहेच.
मार्च १९२३ मध्ये खाडिलकरांनी स्वतःचे “नवकाळ” हे वृत्तपत्र सुरू केले, जे गांधींच्या कार्यक्रमाला पाठिंबा देत होते आणि त्यातील संपादकीय गांधींच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत होते.
आचार्य अत्रे यांनी “नवयुग” (साप्ताहिक) आणि “मराठा” (दैनिक) ही दोन प्रमुख वृत्तपत्रे सुरू केली होती, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच त्यांनी ‘जयहिंद’ आणि ‘तुकाराम’ ही वृत्तपत्रेही चालवली होती, पण ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली वृत्तपत्रे होती, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
हल्ली पूर्वी सारखी निर्भीड पत्रकारिता आणि त्या अनुषंगाने निष्पक्षपणे बातम्या देणं हे कधीच काळाच्या आड गेलं आहे. त्यामुळे सध्याच्या कुठल्याही वृतपत्रांबद्दल बोलायचं झालं तर त्या त्या वर्तमानपत्राचा “मालक, चालक” किंवा त्याची मालकी असलेली कंपनी यांच्या धोरणानुसार वर्तमानपत्र चालवलं जात, त्यातील बातम्या छापल्या जातात हे त्रिवार सत्य आपण सारेच जाणतो. आणि आता तर “पीत पत्रकारिता” हा नवीनच प्रकार उदयास आला आहे, त्या विषयी न बोललेच बरं!
आता वृत्तपत्राचा उल्लेख आलाच आहे, तर मी मागे वाचलेल्या एका इंग्रजी कादंबरीची आठवण झाली. स्वतः मालक, चालक, संपादक असलेला माणूस, “बातमी सम्राट” होण्यासाठी आणि आपल्या पेपरचा खप सगळ्यात जास्त होण्यासाठी कोणत्या थराला जातो, हे आयरविंग वल्लास या लेखकाने आपल्या “Almighty” (1982) या कादंबरीत कथन केले आहे. सध्याच्या पत्रकारितेतली “आपण सर्व प्रथम ही exclusive बातमी आमच्याच चॅनेलवर बघत आहात” अशी खरी, खोटी फुशारकी, त्याकाळी त्याने आपल्या वर्तवलेल्या त्याच्या कादंबरीच्या वेगळ्या अर्थाने जवळ जाणारी आहे, असं आता हल्लीचं पत्रकारितेच रूप बघता मला वाटायला लागलं आहे, म्हणून त्या कादंबरीचा उल्लेख केला इतकंच.
पुढे जसं जसा मानव प्रगत होतं गेला तसं तशी, संपर्काची नव-नवीन साधन त्याने आपल्या बुद्धीने विकसित केली. उदाहरणं द्यायच झालं तर पोस्ट कार्ड अथवा अंतर्देशीय पत्र, जी त्या काळी आपल्या स्वतःच्या ख्याली खुशालीची बातमी, अथवा एखादी दुःखद बातमी आपल्या दूरच्या नातेवाईकांना कळवण्यासाठी वापरात येऊ लागली. पण नंतर नंतर त्यातील उणीवा कळल्यावर आणि “तार” नामक बातमी पोचवण्याचा जलद उपाय उपलब्ध झाल्यावर(१८५०) पोस्ट कार्ड आणि अंतर्देशीय पत्र या दोघांचा वापर कमी कमी होत गेला. अर्थात या “तारेच्या” सुद्धा अनेक गमती जमती आपण या आधी ऐकल्याच असतील. त्यानंतर मग टेलिफोनचा शोध लागल्यावर जगाच्या एका कोपऱ्यातली बातमी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात क्षणार्धात पोहचू लागली!
नंतर “दूरदर्शनने” घरात प्रवेश केल्यावर त्यावरील त्या काळात असलेल्या “एकाच चॅनेलवर” वेगवेगळ्या बहारदार कार्यक्रमा बरोबरच दिल्या जाणाऱ्या बातम्या लोकं बघायला लागले आणि त्यावर खात्रीने विश्वास ठेवू लागले! बातम्या कशा द्याव्यात आणि कशा देवू नयेत याच आज सुद्धा उत्तम उदाहरण म्हणजे, दूरदर्शनच्या बातम्या आणि आजकाल इतर कुठल्याही पेव फुटलेल्या न्यूज चॅनेलवरील बातम्या! या बाबतीत जास्त न बोललेच बरं आणि आता तर काय मोबाईल नामक यंत्राने साऱ्या दुनियेतले सगळे लोकं अख्ख जगच आपापल्या खिशात घेऊनच वावरत असतात म्हणा नां! त्यामुळे जगाच्या एखाद्या टोकाला घडतं असणाऱ्या घटनेची बातमी आपण जगाच्या दुसऱ्या टोकाला आसलो तरी बसल्या जागी नुसती ऐकूच नाही, तर प्रत्यक्ष पाहूही शकतो!
पण विज्ञानाच्या कुठल्याही शोधाला, एक चांगली आणि एक वाईट बाजू असतेच असते. जसं ऍटोमिक एनर्जीचा शोध लागल्यावर काहींनी त्या पासून सर्वनाश करणारा ऍटोम बॉम्ब बनवला तर काहींनी त्याचाच उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला! आता तर मोबाईलमध्ये वेगवेगळे ऍपस अल्लाउदिनच्या जादूच्या दिव्यासारखे शिरल्यावर, त्याच्या कडून चांगली काम करून घेणाऱ्या लोकांपेक्षा त्याच्या कडून वाईट कामच लोकं जास्त करून घेवू लागलेत हे खरंच दुर्दैवी आहे. आणि आता आणखी एक पाऊल पुढे पडल्यामुळे सध्याच्या AI नामक जादूगारमुळे काही जण स्वतःच एखादी बातमी क्रिएट करून ती पोस्ट करून मोकळे होतात! बरं अशी बातमी बघितल्या बघितल्या त्या बातमीची कुठलीच शहानिशा न करता ती बातमी काही लोकं आपापल्या मित्रांना पुढे पाठवून मोकळे होऊ लागलेत! असो, व्यक्ती तितक्या प्रकृती, दुसरं काय?
मंडळी, आपल्याला एखादी बातमी कुणाकडूनही, अगदी माझ्याकडून देखील कळली, तरी ती पुढे ढकलतांना कृपया त्याची शहानिशा करूनच पुढे ढकला, अशी माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती!
मंडळी याच बरोबर माझं आजच “बातमीचा समाचार” हे बातमीपत्र संपलं! हे बातमीपत्र आपल्याला आवडल्यास कृपया आपण ते पुढे पाठवायला माझी हरकत असण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे ते आपण निर्धास्तपणे पुढे पाठवू शकता!
आपल्याला कळलेल्या कुठल्याही बातमीचा आपण योग्य समाचार घ्यावा अशी आपल्या पुन्हा एकदा विनंती करतो आणि आजच्या पुरती आपली रजा घेतो!
शुभं भवतु!
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






