श्री दिवाकर बुरसे

??

✦ गावजत्रा… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा झाला की महाराष्ट्रातील गावोगावच्या उत्सवांना आरंभ होतो. 

रब्बीची पिके घरी येवून पडलेली असतात. बुरुडाकडून आणलेल्या, गोमयाने अंतर्बाह्य लिंपून उन्हात खडखडीत वाळवून निर्जंतुक केलेल्या धान्यांच्या कणग्यांची पोटे नवधान्यांनी तट्ट भरल्यावर त्यांच्या तोंडी कडुनिंबाच्या पानांचे तोबरे भरून, वर राख आणि शेणांनी ती तोंडे लिंपली जातात. आता अश्विनापर्यंत तोंडे बंद!

उरलेल्या धान्यांच्या खरेद्या-विक्र्या होऊन शेतकऱ्यांच्या कनवटीला चार पैसे खुळखुळू लागतात. सगळीकडे आनंदीआनंद असतो. मुलं, नातवंडांना नवी कापडं, नातींना परकर-पोलकी- गवानं, तान्ह्याला आंगडी, टोपडी, कुंच्या, करगोटं आणि घरधणीन, सुना, लेकींना लुगडी-चिरे-चोळ्या घ्यायच्या असतात. जमलं तर कारभारणीला एखादा सोन्याचा डागही करायची इच्छा असते घरधन्याची. 

गावातील सार्वजनिक ग्रामदैवतांच्या मंदिरात नामसप्ताह आयोजित केले जातात. अखंड नामसंकीर्तनाखेरीज रोज संध्याकाळी वारकरी कीर्तने होतात. आठवडाभर ग्रामस्थ विठूभजनात मग्न राहतात. रामनवमी उत्साहाने पार पडते. हनुमानाचा जन्मोत्सव होतो. रामाला आणि हनुमंताला वाहिलेल्या मोगरा-दवण्याचा सुगंध मंदिराच्या गाभाऱ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत पुढे आठवडाभर दरवळत असतो. गावभर सुंठवडा वाटला जातो. एकूण मजा असते, आनंदी आनंद असतो.

आमच्या माळशिरस (भुलेश्वर) गावाचा भैरवनाथाचा उत्सव प्रतिवर्षी चैत्र बारशीला (चैत्र शु. द्वादशी) असतो. सकाळी सहा वाजता ग्रामदैवत, ‘पुण्याचे वेरुळ’ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या भुलेश्वराला महाभिषेक, सात वाजता गावातील भैरवनाथाला महाभिषेक केला जातो. दुपारी बारा वाजता पाण्याची कावड नाचवत भुलेश्वरला नेली जाते. नंतर देवाच्या तांदळ्यावर (शिवपिंडीवरील दंडगोलाकार शाळिग्राम) जलधारा धरून अभिषेक केला जातो. रात्री साठेआठला गावात छबिना निघतो. ढोल-लेझिम पथके नाचतात. तरुण देहभान विसरून नाचतात, वाजवतात, नामगजर करतात. महिला, मुली, बालके नवी वस्त्रे लेऊन, नटूनथटून सहभागी होतात.

गावात पारावर, चौकात विविध वस्तू, मिठाया, खेळणी, कपडे, खाद्यपदार्थांची हाटेले इ. फिरत्या विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटलेली असतात. बाया घोळक्याने बाजारात फिरत, हसंत खिदळत, कलकल करीत खरेदी करीत असतात. एक लेकरु कडेवर, दुसरं बोटाला धरलेलं, तिसरं जरा थोरलं, आईच्या मागून ढकलंत घरंगळंत चालल्यासरखं चाललेलं, गर्दीतून चाँवचाँव करीत वाट काढीत पुढं पुढं जात असतात. लेकरासाठी जिलबी, गुडीशेव, भेळ, गारेगार घेत असतात. 

जत्रेच्या निमित्ताने घरोघरी सोयरेधायरे, व्याही मंडळी, मित्रमंडळी, पाहुण्यांचे आगमन झालेले असते. गोडाधोडाच्या जेवणावळी झडत असतात. आग्रह करकरून वाढले जाते. सारा दिवस धामधुमीत जातो. 

या दोन-चार दिवसाच्या धामधुमीत उपवर किंवा उपवधू कन्या-पुत्रांच्या विवाहासाठी योग्य उमेदवाराची चाचपणी, टेहाळणी काही धूर्त, चाणक्ष पालक करून घेतात. आपल्या कुटुंबासाठी सुयोग्य, आनुरूप सून-जावई हेरून ठेवतात. काही व्यवहारी मंडळी जमीन, घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी सूतोवाच्य करून ठेतात, जुजबी बोलणी करून घेतात. विवाहाचे आणि जमीन, घर खरेदी विक्रीचे प्रत्यक्ष व्यवहार नंतर सोईने संपन्न होतात.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे चैत्र शु. त्रयोदशीला घरोघरी सामिष भोजने होतात. दुपारी चिंचेच्या बागात कुस्त्यांचे फड उभे राहतात. पंचक्रोशीतले मल्ल त्यात सहभागी होऊन आपापल्या क्रिडा नैपुण्याचे प्रदर्शन करतात. प्रथम लहान मुलांच्या कुस्त्या होतात. त्यांच्यावर कौतुक म्हणून रेवड्या उधळल्या जातात. उधळलेल्या रेवड्या हस्तगत करण्यासाठी त्यांच्यावर पोरा-टोरांच्या, प्रेक्षकांच्या उड्या पडतात. मोठ्या तरुणांच्या कुस्त्यांमधे विजेत्याला रोख रकमांची पारितोषिके दिली जातात. हौशी कुस्तीप्रेमी गावकरी पारितोषिकांच्या बोल्या लावतात. उत्तरोत्तर खेळ रंगत जातो. प्रेक्षकांपैकी काही जण विजयी वीरांना खांद्यावर घेऊन नाचवतात, मिरवतात. रात्री पारावरील मोकळ्या मैदानावर उभारलेल्या रंगमंचावर एखादे लोकनाट्य (तमाशा) रंगते.

नमन, गण-गौळण, लावणी, बतावणी झाली की मुख्य वगाला आरंभ होतो. ढोल्या विविध ताल व लयकाऱ्या वाजवून ढोलकीवरील आपले प्रभुत्व वारंवार सिद्ध करतो. पायपेटी वादक त्याच्या करामती दाखवतो. नृत्यांगनांचा लयबद्ध पदन्यास, गिरक्या, फिरक्या, मुरक्या, ठुमके आणि अदकारीला प्रेक्षक टाळ्या, शिट्ट्या वाजवून, डोईचे फेटे हवेत उडवून भरभरून दाद देतात. मावशी मजा आणते. सोंगाड्या आपल्या अंगविक्षेपांनी आणि द्विअर्थी शाब्दिक कोट्यांनी धमाल उडवतो, प्रेक्षकांना खळखळून हसवतो. असे हे उत्तरोत्तर रंगलेले लोकनाट्य पहाटे पहाटे संपते. गावकरी पुढील वर्षभर पुरेल येवढ्या आनंदाची साठवण मनात करीत आपापल्या घरी परततात.

 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments