सुश्री अपर्णा परांजपे
☆ ✍️ मन वढाय वढाय… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
☆
बहिणाबाईंनी मानवीमन अचूक ओळखलं आहे. मन असंख्य कल्पना सतत करत असतं. मनात विचार येणं नैसर्गिक आहे. त्या विचारांच्या दिशेने कृती केली जाते ऐच्छिक कर्माचे एक वैशिष्ट्य आहे, कर्म करावे वाटते, त्यानुसार कर्म करावेही वाटते पण सहेतुक ! काहीतरी मनात विशिष्ट विचार ठेवूनच कृती केली जाते त्यामुळे त्या कृतीचा परिणाम ही आवश्यक असतो व तो मिळतो ही! प्रश्न असा आहे की आलेला परिणाम मनाला कधी आवडतो कधी आवडत नाही. आवडणारा परिणाम त्या व्यक्तीचा अहंभाव पुष्ट करतो व नावडता परिणाम त्याला दुखावतो. विचार व कर्माची ही शृंखला अव्याहतपणे सुरू असते सोबतच सुख व दुःखही मिळत रहातात. थोडासा जरी विचार केला तर हे सुख असो की दुःख काहीच टिकाऊ नाही. सुखामागे दुःख व दु:खामागे सुख सुरुच असते त्यामुळे समाधान मात्र दूर रहाते. विचार व कृती ही धावपळ घडवतात त्यामुळे समाधान मिळत नाही. मनाचा गुणच संकल्प विकल्पाचा आहे. म्हणूनच बहिणाबाईंनी मनाला ओढाळ म्हंटले आहे. कुठेही न थांबता केलेले विचार व त्यानुसार कृती दमछाक करवतात व व्यक्ती थकून जातो.
सत्याचा शोध घेतल्याशिवाय ही दमछाक थांबणार नाही असे सांगत समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिलेत. ज्यात मनाला आधीच सज्जन संबोधून त्याच्यावर समाधान मिळवण्याची जबाबदारी टाकली. द्वाड म्हणून हेटाळणी न करता सज्जन म्हणून सन्माआन केला व त्या सन्मानाला पात्र होण्यासाठी काय करावे हा समुपदेश केला. ओढाळ मनाला शांत प्रशांत प्रसन्न करण्यासाठी ज्ञान दिले स्वतः चेच!मी कोण आहे हे कळणे प्राथमिकता ठरवली. देव कोण आहे हे सांगत आपलाच विस्तार सांगितला. आपण त्याचे अंश आहोत हे जर जाणवले तर त्याचे गुण अंगिकारणे परम कर्तव्य आहे फक्त त्यामुळेच सुख दुःखाचे हे दुष्टचक्र थांबू शकते अन्यथा पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं ही मालिका सुरूच राहील व आपला मूळ स्वभाव आनंदी आहे हे कळणारच नाही.
मनाचा उपयोग समाधान मिळवण्यासाठी करायचा असेल तर हदयाची विशालता त्याला समजावी लागेल तरच स्वतः ची मर्यादा मन ओळखू शकेल व शाश्वत समाधानासाठी स्वतः चे विचार व त्यानुसार कृती थांबवेल. मनाचा गोंधळ थांबल्याशिवाय हृदयातील शांती मिळणार नाही हे पटले की काम झाले!
मनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे त्याला जर एखादी गोष्ट पटली की मग त्याला काहीही करताना त्रास वाटत नाही. वाटणेच तर घात करते किंवा समाधान देते त्यामुळे ओढाळ मनाला तू मर्यादित नसून अमर्याद आहे असे पटले की अमर्यादाची म्हणजेच देवाची तळमळ लागते. अमर्याद कृती त्याच्याकडून विनासायास घडतात त्याही अपेक्षा विरहित व “इदं न मम”म्हणत!
आधीच सज्जन म्हणून सज्जनासारखी कृती करवून घेणारे स्वामी म्हणूनच समर्थ आहेत.
समर्थ भेटण्यासाठी आपली तशी ओढ आवश्यक आहे. जशी तळमळ असेल तसेच सद्गुरू करवून घेतात यावर ठाम निष्ठा असणे मात्र आपले काम आहे जे मनाद्वारे केले जाते. म्हणून मनावर लक्ष ठेवणे हा समाधानाचा पाया आहे.
☆
भगवंत हृदयस्थ आहे 🙏
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






