श्री राजीव गजानन पुजारी
मी प्रवासी
☆ आमची चार धाम यात्रा – भाग – १ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
आमचे एक नातेवाईक श्री पुसेगावकर यांनी नुकतीच श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ ही यात्रा कंपनी सुरू केली होती. ते नुकतेच नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आले होते व त्यांची पुढची यात्रा हिमालयातील चार-धाम होती. यात्रा खर्च प्रत्येकी रु ४५, ०००/- येणार होता. त्यापैकी रु २०, ०००/- लगेच पाठवून उर्वरीत रक्कम नंतर पाठवायची होती. त्याप्रमाणे २३ मार्चला आमच्या दोघांचे रु ४०,०००/- आम्ही पुसेगावकरांना G-pay ने पाठविले.
आमची टूर दिल्ली-चार धाम- दिल्ली अशी होती. ती २६ मे ला दिल्लीहून सुरू होऊन ७ जूनला दिल्लीला संपणार होती. चारधाम यात्रेसाठी उत्तराखंड टुरिझम डेवलपमेंट बोर्डाकडे रजिस्ट्रेशन करावे लागते; त्यात यात्रेचा कालावधी, कोणत्या तारखेला तुम्ही कोठे असणार आहात वगैरे तपशील ध्यावा लागतो. सर्व यात्रेकरूंची रजिस्ट्रेशन्स श्री. पुसेगावकरांनी करून सर्वांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट्स पाठवली. आमचे रजिस्ट्रेशन २८ मार्चला झाले.
दरम्यानच्या काळात २२ एप्रिलला पहेलगाम हल्ल्याची दुःखद घटना घडली. या घटनेमुळे जम्मू-काश्मीरच्या पर्यटकांनी त्यांचे पर्यटन रद्द केलेच पण इतरही ठिकाणच्या अनेक पर्यटकांनीही त्यांच्या टूर्स रद्द केल्या. आमच्या मनातही चलबिचल सुरू झाली. पहेलगामच्या भ्याड हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. आता हे युद्ध किती दिवस चालणार, आपली यात्रा होणार की नाही अशी शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली. पण चारच दिवसांत भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ले करून पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली. पाकिस्तानने युद्धबंदी करावी अशी भारताला विनंती केली व भारताने ती मान्य केली व १० मे रोजी हे युद्ध संपले. हळू हळू वातावरण निवळू लागले व आम्ही ठरल्याप्रमाणे यात्रेला जायचे नक्की केले व १३ मे ला चारधाम यात्रेचे राहिलेले पैसे व बुकिंगचे पैसे असे रु ५८, ४५०/- श्री पुसेगावकरांना G-pay ने पाठविले.
दरम्यान केदारनाथकडे जाणाऱ्या घोड्यांना कोरोना सदृश आजार झाला आहे व त्याची लागण यात्रेकरूंना होत आहे अशी बातमी वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. श्री. पुसेगावकरांनी त्यांच्या केदारनाथ येथील कॉन्टॅक्टस् कडे विचारपूस करून ही बातमी निराधार आहे याची शहनिशा केली.
१६ मे रोजी पुसेगावकरांनी यात्रेचा संपूर्ण तपशील पाठविला. त्यात कोणत्या दिवशी किती वाजता निघायचे, मुक्कामाला आपण कोठे असणार आहोत वगैरे इत्यंभूत माहिती होती. तसेच गरम कपडे, छत्री, रेनकोट, कुठे कुठे ओटी भरायची आहे व त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे इत्यंभूत माहिती पाठवली.
पुणे मार्गे दिल्ली
२३ तारखेला सव्वा नऊ वाजता वंदे भारत एक्सप्रेसने आम्ही पुण्याला निघालो. आज पर्यंत वंदे भारत गाड्यांविषयी फक्त ऐकून होतो, पण आज गाडी प्रत्यक्ष अनुभवता आली. आरामदायी आसने, सर्वांना सोसेल एवढे वातानुकूलन, स्वच्छता, पडद्यावर दिसणारी गाडीची सद्य:स्थिती म्हणजे पुढील स्टेशन किती लांब आहे, तेथे पोहोचण्याची वेळ, गाडीचा सध्याचा वेग वगैरे. एवढा वेग असूनही पोटातील पाणीही हालत नव्हते. गाडीची फक्त एक गोष्ट खटकली ती म्हणजे गाडीत फक्त कन्नड व इंग्रजी वृत्तपत्रे वाचायला दिली गेली. गाडी हुबळीतून सुटत होती त्यामुळे कन्नड वृत्तपत्र ठीक आहे, पण गाडीचा बहुतांश प्रवास महाराष्ट्रातून होत असल्याने मराठी वृत्तपत्र देणेही आवश्यक आहे. गाडी ठीक सव्वा वाजता पुण्याला पोहोचली. आम्हाला घ्यायला अमित आला होता. दोन सव्वादोनला चि. मुग्धाच्या घरी पोहोचलो. पुणे मुक्कामी अमितने आम्हाला परमपूज्य गुळवणी महाराजांनी चालू केलेल्या ‘वासुदेव निवास’ या पवित्र ठिकाणी नेले. तेथे मनःशांतीचा विलक्षण अनुभव येतो. चि. मुग्धाने आमची बडदास्त अत्यंत उत्तम ठेवली होती.
२५ मे रोजी सकाळी दर्शन एक्सप्रेसने आम्ही दिल्लीला प्रयाण केले व खऱ्या अर्थाने आमची यात्रा सुरू झाली. २६ मे ला सकाळी सात वाजता फिरोजपूरला (दिल्लीला) पोहोचलो. पुसेगावकरांनी हॉटेल ‘लकी इन’ मध्ये काही खोल्या आरक्षित केल्या होत्या. स्टेशन पासून हे हॉटेल साधारण १२-१३ किलोमीटरवर आहे. खोलीवर जाऊन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट केला, तोवर अकोल्याचे यात्रेकरू देखील येऊन पोहोचले. श्री व सौ पुसेगावकरांची तेथेच भेट झाली. दुपारी तीन वाजता हरिद्वार कडे प्रयाण करायचे होते, मधल्या काळात स्त्रीवर्गाने करोलबाग मध्ये जाऊन थोडेफार शॉपिंग केले. दुपारी दीड-दोन च्या सुमारास जेवण करून हॉटेलपासून साधारण एक किलोमीटरवर पार्किंग केलेल्या २२आसनी टुरिस्ट बस मध्ये बसलो. बस समोर नारळ वाढविण्यात आला व देवादिकांचा जयघोष करून बस मार्गस्थ झाली. थोड्या वेळाने गाणी व जोक्स यांना उधाण आले. शिरीष पुसेगावकर किशोरदांचे जबरदस्त फॅन आहेत. किशोरदांची अनेक गाणी त्यांना मुखोद्गत आहेत. त्यांनी एक माहोल पैदा केला. अमितनेही गाणी म्हटली. अत्यंत अध्यात्मिक असलेला अमित एवढी छान गाणी म्हणतो. हे आम्हाला प्रथमच कळले. शुभांगीनेही काही गाणी म्हंटली. पुण्याचे प्राध्यापक कुलकर्णी यांनी मनोरंजक किस्से सांगून प्रवाशांची करमणूक केली. अकोल्याची बरीचशी मंडळी नाना महाराज तराणेकरांची अनुयायी होती त्यामुळे संध्याकाळी सात वाजता सार्वजनिक त्रिपदीचे म्हणणे झाले. हा त्रिपदी म्हणण्याचा परिपाठ पूर्ण यात्रेदरम्यान सुरू होता; अगदी केदारनाथच्या गोठविणाऱ्या थंडीतही! त्यामुळे सर्वांना मानसिक बळ मिळायचे. बसमध्ये नाना महाराजांचा फोटो ही लावण्यात आला. आमचा ड्रायव्हर एक सरदारजी होता. बस चालवण्याचे त्याचे कौशल्य काही वेळातच आमच्या लक्षात आले.
२६ मे ला रात्री नऊ वाजता आम्ही हरिद्वारला पोहोचलो. आमची राहण्याची सोय लाला किशनलाल सेवाकुंज मध्ये करण्यात आली होती. पूर्ण यात्रेदरम्यान शुद्ध शाकाहारी जेवण होते. यासाठी एक जीप होती. त्यात तांदूळ, गव्हाचे पीठ वगैरे असायचे; फक्त भाज्या रोज मार्केट मधून आणल्या जायच्या. आचारी व त्यांची टीम नागपूरची होती. स्वयंपाक अत्यंत रुचकर असे. साधारण एक दिवसाआड गोड पक्वान्न असायचे. ही टीम एवढी प्रेमळ होती की, मला एकट्याला केदारनाथहून यायला उशीर झाला संध्याकाळचे सहा वाजले. त्या दिवशी पुरणपोळीचा बेत होता; तर सहा वाजता सुद्धा मला गरम गरम पोळ्या करून आग्रहाने वाढण्यात आल्या. पुसेगावकरांनी खास नागपूरहून आंबे आणले होते. एक दिवस आमरसाचा बेत होता. यात्रा सुरू होण्यापूर्वी आम्हाला पूर्ण यात्रेची ईटीनरी देण्यात आली होती; तरीपण रोज जेवण झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जायची; तद् नुसार २७ तारखेला पहाटे पाच वाजता गंगा स्नानास जायचे होते, दहा वाजता ऋषिकेश दर्शनाचा कार्यक्रम व अडीच वाजता ऋषिकेशहून परत हरिद्वार व त्यानंतर हरिद्वार दर्शन व संध्याकाळी गंगा आरती असा कार्यक्रम होता. गंगा स्नानासाठी कोठे जायचे, काय काळजी घ्यायची हे सर्व तपशीलवार सांगण्यात आले.
हरिद्वार आणि ऋषिकेश दर्शन
सत्तावीस तारखेला पहाटे पाच वाजता उठलो व हॉटेलपासून रिक्षाने सर्वानंद घाटावर स्नानासाठी आलो. आयुष्यात एकदा गंगा स्नान व जवळून हिमालय दर्शन या माझ्या अनेक वर्षांपासूनच्या इच्छा होत्या त्यातील एक आज पूर्ण होणार होती. येथे गंगा नदीचे पात्र भरपूर विस्तीर्ण असून पाण्याला ओढ देखील भरपूर आहे; म्हणून नगर निगमने लोखंडी कठडे व दोरखंड बसवले आहेत. इतर सर्वांनी दोराला धरून नदीत बुड्या मारल्या. मी सर्वप्रथम गंगेला मनःपूर्वक नमस्कार केला व पायरीवर बसून तांब्याने डोक्यावरून आंघोळ केली. गंगा स्नानाची एक इच्छा पूर्ण झाली.
गंगेच्या काठावर वसलेले हरिद्वार हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र. साधुसंत, महात्मे यांच्या गंगाकिनारी असलेल्या कायम वास्तव्यातूनच या पवित्र नगरीचा उदय झाला. राम-लक्ष्मण, पांडव आणि अनेक थोर ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन बनली आहे. सर्वसामान्य माणसाला गंगा दर्शन प्रथम येथे घडते म्हणून या नगरीला जिव्हाळ्याने गंगाद्वार असेही म्हणतात.
यवनांच्या आक्रमणाचे अनेक प्रहार झेलूनही हिंदू धर्माची पताका फडकवीत ही भूमी उभी आहे. अशा या पुण्यभूमीच्या दर्शनाने आम्ही पावन झालो. जमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ व बद्रीनाथ या हिमालयातील चार धाम यात्रेचा शुभारंभ हरिद्वारपासूनच होतो व या पवित्र यात्रेची सांगताही हरिद्वार येथेच होते. हिमालय हा हरी (विष्णू) व हर (शंकर) यांचे निवासस्थान म्हणून या नगरीचे नाव हरिद्वार पडले. विष्णूभक्त ‘हरिद्वार’ म्हणतात तर शिवभक्त ‘हरद्वार’ म्हणतात. या ठिकाणी ब्रम्हा-विष्णू-महेशाचे कायमचे वास्तव्य असल्याची प्रत्येक हिंदूधर्मियाची अढळ मान्यता आहे. या बाबत एक पुराणकथा आहे ती अशी: राजा श्वेत याने गंगाकिनारी एका जलकुंडा जवळ उभे राहून ब्रह्मदेवाच्या भेटीसाठी अनेक वर्षे तपश्चर्या केली. राजाची घोर तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले व राजाला वर मागण्यास सांगितले. त्यावर राजा म्हणाला, ”देवा मला कोणती काही प्रकारची ऐहिक सुख व संपत्ती नको, माझे तुम्हा जवळ एकच मागणे आहे ते म्हणजे आपण, विष्णू देव आणि शंकर महादेव यांनी या नगरीत सदैव वास्तव्य करावे. ”तेव्हापासून हरिद्वारात ब्रह्मा-विष्णू-महेश निवास करून आहेत. ज्या कुंडाच्या ठिकाणी ब्रह्मदेव श्वेतराजाला प्रसन्न झाले त्या कुंडाला ब्रह्मकुंड नाव पडले. याच ठिकाणी दक्षाला विष्णुदर्शन झाले. ब्रह्मकुंडालाच ‘हर की पौडी’ असेही म्हणतात. या संबंधात दुसरी एक कथा आहे.
राजा विक्रमादित्याचा भाऊ भृतृहारी याने या ठिकाणी तपश्चर्या करून अमरपद प्राप्त केले. त्याच्या स्मरणार्थ राजा विक्रमादित्याने ब्रह्मकुंडात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या. या पायऱ्यांना लोक ‘हरी की पैडिया’ म्हणू लागले. त्याचा अपभ्रंश होऊन ‘हर की पौडी’ हे नाव रूढ झाले.
सागर मंथनातून निघालेला अमृतकुंभ दानवांकडून हिसकावून घेऊन ज्यावेळी ब्रह्मदेव निघाले त्यावेळी त्यांनी काही काळ या ब्रह्मकुंडा जवळ विश्रांती घेतली. या अमृतकुंभातले काही अमृतकण या कुंडात पडले, त्याने या कुंडातील पाणी अमृतमय बनले अशी आख्यायिका आहे. या अमृतकुंडात स्नान केल्याने माणसाची जन्म जन्मांतरीची पापे नाहीशी होतात, वर्तमान जीवनातील त्याची पाप वासना जळून जाते, त्याचे तन – मन पवित्र होते, मृत्यूनंतर पुनर्जन्मास न येता माणूस अमरपदास पोहोचतो अशी प्रत्येक हिंदूची श्रद्धा व भावना आहे. याच भावनेतून दर सहा वर्षांनी अर्ध कुंभ व बारा वर्षांनी पूर्ण कुंभमेळा भरतो. हिमालयाच्या कुशीत कडेकपारीतील गुहेत राहणाऱ्या तपस्वी साधूमुनींसह देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो साधुगण आणि यात्रेकरू हरिद्वारात कुंभ पर्वाच्या दिनी जमतात. २०२१ मध्ये झालेल्या कुंभ पर्वास ९१ लाख यात्रेकरू जमले होते. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने खास व्यवस्था ठेवली होती. याबाबत माहिती सांगताना एक नागा साधू म्हणाला, “अमृत कुंभाकरता देव आणि दानव यांच्यात बारा दिवस कलह चालला. स्वर्गलोकांतले हे बारा दिवस पृथ्वीवरील बारा वर्षे होत. देवाने आपल्या ताब्यातला अमृतकुंभ बारा दिवसात ज्या बारा ठिकाणी ठेवला त्या बारा ठिकाणांवर या अमृतकुंभाच्या स्मरणार्थ कुंभ पर्व साजरे केले जाते. ज्या ठिकाणी हा कुंभ ठेवला त्या ठिकाणी अमृताचे थेंब पडले. ज्या तिथीला हे अमृतकण या ठिकाणी पडले त्या तिथीला कुंभ पर्व मानून त्या ठिकाणच्या जलप्रवाहात स्नान केल्याने माणसास अमरत्व लाभते, तो स्वर्गलोकीचा निवासी बनतो जन्ममृत्यूच्या संकटातून तो मुक्त होतो. हा अमृतकुंभ ठेवलेल्या बारा ठिकाणांपैकी आठ स्वर्गलोकी आहेत बाकी चार ठिकाणे पृथ्वीवर आहेत. हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व नाशिक अशी ही ठिकाणे होत. मेष राशीतून कुंभ राशीत सूर्याचा प्रवेश होतो त्यावेळी हरिद्वारात कुंभमेळा भरतो. नागा साधू संप्रदायात शस्त्रधारी आणि शास्त्रधारी असे दोन प्रकार आहेत. मुघलांनी ज्यावेळी हरिद्वारवर आक्रमण केले त्यावेळी शस्त्रधारी साधूंनी पराक्रम गाजवून मोगलाचे आक्रमण परतवून लावले. हिंदू धर्म संस्कृती व मंदिराचे रक्षण केले म्हणून कुंभमेळ्याच्या दिनी या साधूंना गंगेतील ब्रह्मकुंडात सर्वप्रथम स्नान करण्याचा मान आहे. त्यानंतर इतर साधुसंत स्नान करतात तर सर्वात शेवटी इतर लोक स्नान करतात. सतत तीन दिवस या पवित्र पुण्यदायी स्नानाचा कार्यक्रम चालतो. सर्व साधू सोन्या-चांदीने मढवलेल्या हत्ती घोड्यावरून वाजत गाजत भव्य मिरवणुकेने हरकी पौडी घाटावर जातात. त्यात नग्न साधू, वस्त्रधारी साधू बहुसंख्येने सहभागी होतात. कुंभपर्व प्रसंगी हर की पौडीवरील गंगेच्या ब्रह्मकुंडात स्नान केल्याने मनुष्य संसार बंधनातून मुक्त होऊन परमेश्वराच्या कृपेस प्राप्त होतो, त्याच्या सर्व पापांचा क्षय होतो. या स्नानाने १००० अश्वमेध यज्ञ १०० वाजपेयी यज्ञ, १००० वेळा कार्तिक स्नान, नर्मदेतील एक करोड वैशाखी स्नान व पृथ्वीला एक लाख प्रदक्षिणा घालण्याची पुण्याई लाभते.
– क्रमशः भाग पहिला
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




