श्री राजीव गजानन पुजारी
मी प्रवासी
☆ आमची चार धाम यात्रा – भाग – २ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
कुंभ पर्वात स्नानाचे पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी संबंध भारतातून लाखो लोक हरिद्वारला जमतात. सर्वजण बहुसंख्येने हरकी पौडीकडे स्नानासाठी धावतात. या ठिकाणचा घाट पूर्वी अतिशय अरुंद होता. अनावर झालेल्या गर्दीमुळे अनेक यात्रेकरू चिरडून मरण पावल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. १८१९ साली भरलेल्या कुंभमेळ्या प्रसंगी ४०० लोक प्राणास मुकले. अशा प्रकारच्या घटना १९२७, १९३८, १९४४ व १९५० यासाली अर्धकुंभ आणि पूर्ण कुंभाचे प्रसंगी घडल्या आहेत. त्यामुळे हरकी पौडी घाटाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. या घाटाच्या कडेला एक टेकडी होती त्यावर आता घरे, मंदिरे आणि विविध दुकाने उभी राहिली आहेत. पूर्वी उन्हाळ्यात ब्रह्मकुंडाच्या पाण्याची पातळी कमी व्हायची. कधी कधी ते कोरडे ठणठणीत पडायचे. त्यासाठी सप्तधारा या ठिकाणी एक बांध घालण्यात आला. त्यातून एक कालवा काढण्यात येऊन तो कुंडाच्या ठिकाणी वळविण्यात आला. त्यामुळे हे ब्रह्मकुंडच कालव्यात सामावून गेले. कुंडावरून कलकल करीत गंगा पुढे धावते. मध्येच एक बेटासारखा भाग निर्माण झाला आहे त्याला मालद्वीप म्हणतात. त्याच्या पलीकडून गंगेची दुसरी धार वाहते. त्यामुळे हरकी पौडी या घाटाची रुंदी आता दीडशे मीटर झाली आहे. बेटासह सर्व घाट उद्योगपती बलदेवप्रसाद बिर्ला यांनी तांबड्या फरशीने बांधून काढला. बेटावर राजविली स्मृती टॉवर उभारण्यात आला आहे. त्याला घंटाघरही म्हणतात. हरकी पौडीवर भगवान विष्णूंच्या पदकमलांची चिन्हे अंकित होती, तसेच मुघल सम्राट अकबराचा विश्वासू राजा मानसिंग याचीही समाधी हरकी पौडी जवळ होती. त्यावर मोगलकालीन शिल्पकृती होत्या एम. या राजा मानसिंगाने हरिद्वारची पुनर्स्थापना करून त्याचे सुंदर नगरीत रूपांतर केले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थी गंगेत विसर्जन करण्यासाठी सम्राट अकबराने खास व्यवस्था केली होती. तसेच गंगाकाठी त्याची समाधी बांधली. परंतु महापुराने ही समाधी व विष्णु पदचिन्ह घाटावरून अदृश्य झाले.
पूर्वी गंगेला आलेल्या महापुरामुळे हरिद्वारचा अनेक वेळा विध्वंस झाला आहे. १९२४ मध्ये आलेल्या महापुरामुळे तर संपूर्ण हरिद्वार जलमय झाले होते. पुराचे संकट कायमचे टाळण्यासाठी गंगेच्या मुख्य प्रवाहाला अनेक फाटे फोडून कालवे काढण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य प्रवाह विभक्त होऊन पुराचे संकट आता उरले नाही. गंगेच्या विविध कालव्यांवर अनेक पूल नव्याने बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हरिद्वार आज पूल आणि मंदिरांची नगरी बनले आहे. गरुड घाटावर बांधण्यात आलेला गंगा नहर पुल हा सर्वात जुना पूल होय. हा १८५४ साली बांधण्यात आला आहे. भारतात सप्तमोक्षदायी जी सात तीर्थस्थाने आहेत त्यापैकी हरिद्वार एक होय. गंगाद्वार, ब्रह्मपुरी, स्वर्गद्वार, कपिल या नावाने हरिद्वारचा पुराण ग्रंथात उल्लेख आहे. स्कंदपुराणात हरिद्वारला मायापुरी म्हटले आहे.
अयोध्या मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका॥
पुरी, द्वारावती दैव स्वप्तैते: मोक्षदायका:॥
असे वर्णन गरुड पुराणात आहे. या मायापुरी नगरीची लांबी १२ योजने होती. रुंदी तीन योजने होती. पूर्वेला नील, दक्षिणेला चक्रतीर्थ व उत्तरेला रत्नस्तंभ पर्वतापर्यंत माया नगरीचा विस्तार होता. नैसर्गिक घडामोडीत कालांतराने या नगरीचा विनाश झाला. केवळ १५ किलोमीटर परिसरात विस्तारलेले आजचे हरिद्वार पूर्वीच्या प्राचीन मायापुरीचाच एक भाग होय. फार वर्षांपूर्वी हरिद्वारच्या गंगाकाठचा परिसर अति घनदाट अरण्याने व्यापलेला होता. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी जाळलेले पांडवकालीन खांडववन म्हणजेच हा प्रदेश होय असे पुराण इतिहास संशोधकांचे मत आहे. खांडववन जाळून निसर्ग विनाश घडवून आणल्याबद्दल श्रीकृष्ण व अर्जुनाचा अनेक निसर्गप्रेमी ऋषीमुनीनी निषेध केला होता असे हरिद्वारच्या एका निसर्गप्रेमी साधकाने उल्लेखिले आहे. याच परिसरात पांडव वनवासात राहिले होते. पुलत्सवंशीय रजपूत राजा इसमसिंह याने २००० वर्षांपूर्वी आजच्या हरिद्वार नगराची पुनर्स्थापना केली होती असे म्हणतात. हरिद्वारवर राज्य करणारा वेणू हा शेवटचा राजा होता. उत्खननात त्याच्या नावाची नाणी सापडतात.
गंगा स्नानानंतर नाश्ता करून १० वाजता ऋषिकेशला जायला निघालो. हरिद्वार ते ऋषिकेश २८ किलोमीटर्स आहे. आम्ही ११ वाजता ऋषिकेशला पोहोचलो. मणिकूट पर्वताच्या कुशीत गंगाकाठी वसलेले हृषीकेश म्हणजेच भगवान विष्णूचा निवास असलेली भूमी. बहुसंख्य लोक हृषीकेशचा अपभ्रंशाने ऋषिकेश असा उल्लेख करतात. त्याचा अर्थ ऋषींच्या निवासाची भूमी असाही केला जातो. वशिष्ठ, कण्व, विश्वामित्र, भारद्वाज, परशुराम इत्यादी तपस्व्यांच्या साधनेने ही भूमी पवित्र पावन झालेली आहे. स्वयंभू मनू, महाराज दक्ष, राजा भगीरथ, राजा नहुष, श्रीराम लक्ष्मण, धर्म, भीम, अर्जुन व गौतम बुद्ध या राजघराण्यातील श्रीमंत योगी पुरुषोत्तमांचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. त्यामुळे ऋषिकेशचे सारे वातावरण हजारो वर्षांपासून अविनाशी तेजाने भारलेले आहे. ऋषिकेशमध्ये पाऊल टाकले की मनातील विकारांचा व विचारांचा केरकचरा गळून पडतो. तनमन शांत होऊन गंगेच्या पाण्यासारखे पवित्र होते. त्यासाठीच लाखो यात्रेकरू ऋषिकेशकडे लोहचुंबकासारखे आकर्षिले जातात.
ऋषिकेश ही दहा हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली तपभूमी होय. पुराणकाळी तप:साधना करणाऱ्या ऋषीमुनींना त्रास देऊन त्यांच्या साधनेत विघ्न निर्माण करणाऱ्या मधु आणि कैटरी या दैत्यांचे उच्चाटन श्रीविष्णुने केले. ही स्कंद पुराणातील कथा एका साधकाने सांगितली. श्री विष्णूची भूमी म्हणून पूर्वी या ठिकाणाचे नाव श्रीकेश होते. यासंबंधानेही त्याने दुसरी कथा ऐकवली. एका आम्र वृक्षाखाली रैभ्य नावाचा कुबडा ऋषी श्री विष्णूसाठी तप करीत होता. त्याच्या कठोर तपाने श्रीविष्णू त्याला प्रसन्न झाले. त्यावेळी रैभ्य ऋषींना श्री विष्णूंनी वचन दिले की माझा कायम येथे निवास राहील. यापुढे या भूमीचे नाव श्रीकेश होईल. पुढे याच श्रीकेशचा अपभ्रंश होऊन हृषिकेश आता ऋषिकेश असे या भूमीचे नाव प्रख्यात झाले.
विसाव्या शतकात स्वामी शिवानंद, स्वामी करुणानंद, स्वामी पूर्णानंद, शारदानंद, नारायणा नंद, कृष्णानंद हे जगप्रसिद्ध योगी या परिसरात होऊन गेले. ऋषिकेश मध्ये आश्रम स्थापन करून वेदाभ्यास, योग, संस्कृत भाषा प्रसाराबरोबरच मानव कल्याणाचे ऐतिहासिक कार्य या योगी जनांनी केले. त्यामुळे अनेक भारतीय व परदेशी नागरिक योगपारंगत झाले. भारतीय योगविद्या परदेशात पोहोचली. आजही या आश्रमांतून भारताचा पौराणिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे कार्य अखंडपणे चालू आहे. आज ऋषिकेश योगविद्येचे विश्वविद्यापीठ बनले आहे.
ऋषीकेशला पोहोचल्यावर पुसेगावकरांनी त्यांच्या ओळखीच्या एका गाइडला बोलावून घेतले. रस्ता चिंचोळा असल्याने आमची बस गावात फिरू शकणार नाही, यास्तव आपण रिक्षा करूया असे त्याने सुचविले. त्याप्रमाणे एका रिक्षात तीन जण असे रिक्षा करून आम्ही निघालो. ऋषिकेशमध्ये तपोवन नावाचा विभाग आहे. बहुसंख्य मंदिरे याच भागात आहेत. त्या भागात आम्ही पोहोचलो.
पहिल्यांदा आम्ही गेलो बद्रीनाथ- केदारनाथ स्मृती मंदिरात. भगवान बद्रीनाथ व भगवान केदारनाथ यांची ही दोन मंदिरे कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य परमपूज्य श्री स्वामी जयेंद्र सरस्वतींच्या पदतीर्थयात्रेच्या स्मृतीप्रित्यर्थ सन १९८६ साली निर्मिली आहेत. पारंपारिक द्रविड शैलीतील ही मंदिरे देखणी आहेत. ज्यांना कांही कारणवश बद्रीनाथ व केदारनाथ यात्रा शक्य होत नाही, त्यांनी येथे दर्शन घेतल्यास तेव्हढीच पुण्यप्राप्ती होते अशी मान्यता आहे.
नंतर आम्ही गेलो सीता रामधाम मंदिरात. याला गंगामाता मंदिर असेही म्हणतात. हे १८ मजली मंदिर असून यातील बरेचसे मजले अंडरग्राउंड आहेत. गेल्या गेल्या आपणास दुर्गा मातेचे मंदिर दिसते. वरील मजल्यावर मकरवाहिनी गंगामाता मंदिर आहे. तेथून गंगानदी व ऋषिकेश यांचा अप्रतिम नजारा दिसतो. उतरतांना आपण अंडरग्राउंडला जातो, विविध मजल्यांवर जवळ जवळ १००० खोल्या असून त्यांत देवदेवतांच्या सुंदर मूर्त्या आहेत. रावण वधानंतर रामाला ब्रह्मदोष लागला, त्याच्या निवाणार्थ त्यांचे गुरु वशिष्ठ ऋषींनी त्याला केदारखंडला जाऊन तप करण्यास सुचवले. राम, लक्ष्मण, सीता ऋषिकेशला पोहोचल्यावर तपोवनातील या स्थानावर गंगामाता त्यांच्या स्वागतार्थ आली. तेथे एका मंदिराचे निर्माण करण्यात आले ते हेच मंदिर होय.
नंतर आम्ही गेलो राधा कृष्ण मंदिर आनंद धाम येथे. येथे राधाकृष्ण व देवदेवतांच्या सुंदर मूर्ती आहेत. जवळच फक्त लक्ष्मणाचे देऊळ आहे. मला वाटतं फक्त लक्ष्मणाचे असे हे एकमेव देऊळ असावे. येथे आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी लक्ष्मणाने तपश्चर्या केली होती.
नंतर आम्ही सच्चा अखिलेश्वर महादेव मंदिर बघितले. येथील शिवलिंग साडेअकरा फूट उंच असून त्याचे वजन १२ टन आहे.
नंतर आम्ही प्रसिद्ध असा लक्ष्मण झुला बघितला. रावणवध करून रामाने सीतेची लंकेच्या तुरुंगातून सुटका केली. सीतेसह रामलक्ष्मण अयोध्येला परतले. अयोध्या नगरवासीयांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. परंतु अनेक दिवस रावणाच्या ताब्यात असलेल्या सीतेच्या चारित्र्याबद्दल कांही क्षुद्र प्रवृत्तीच्या प्रजाजनांनी आक्षेप घेतला. त्यानुसार रामाने सीतेचा त्याग केला. सीतेला यासंबंधाने रामाने कांहीएक न सांगता हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या अरण्यात सोडून येण्याची कामगिरी लक्ष्मणावर सोपविण्यात आली. ज्या ठिकाणी लक्ष्मणाने सीतेला सोडले तेच गंगाकाठचे लक्ष्मण झुल्याजवळचे ठिकाण होय. सीतेला गंगेचे विशाल पात्र पार करता यावे म्हणून लक्ष्मणाने बाणांचा पूल त्या ठिकाणी बनवला. अशी रामायणात कथा आहे. हा लक्ष्मणाचा बाणांचा पूल कालौघात नष्ट झाल्यावर त्याची स्मृती म्हणून जुटच्या दोरखंडाचा पूल बनविण्यात आला. याच झुलत्या पुलाला लोक लक्ष्मण झुला म्हणू लागले. तेच नाव अजपावेतो रूढ झाले आहे. १८८९ मध्ये सूरजमल नागरमल या राजस्थानच्या दानशूर सावकाराने सध्याचा लोखंडी झुलता पूल बांधला. त्यात अनेकवेळा दुरुस्त्या करून तो आता भक्कम बनविण्यात आला आहे. सुरक्षा कारणास्तव २०२० पासून त्यावर कोणालाही जाऊ दिले जात नाही. आम्हीला देखील पूल फक्त जवळून पाहता आला. त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही अनेक फोटो काढून घेतले व दुधाची तहान ताकावर भागविली.
लक्ष्मण झुला पाहून आम्ही परत हरिद्वारला यायला निघालो व दोन वाजता हरिद्वारला पोहोचलो. जेवण वगैरे करून आम्ही हरिद्वार दर्शन करण्यासाठी बाहेर पडलो. त्यासाठी आम्ही एक रिक्षा ठरवली.
सर्वप्रथम आम्ही राम दरबार शीश महल मंदिरात गेलो. गेल्या गेल्या राम-लक्ष्मण-सीता व हनुमान असलेला राम दरबार दिसतो. अत्यंत देखण्या अशा या मूर्ती आहेत. मंदिरात गणेश भगवान, हनुमान, लक्ष्मी नारायण, सरस्वती, संतोषी माता, स्कंद माता, कात्यायनी माता, दुर्गा माता, राधा कृष्ण यांच्या देखण्या मूर्ती आहेत. एका विशिष्ठ कोनातून पाहिले असता त्या मुर्तीच्या असंख्य प्रतिमा दिसतात. एका काचेच्या बंदिस्त टाकीत तरंगता पाषाण आहे त्याला राम सेतू पत्थर म्हणून ओळखले जाते. वरच्या मजल्यावर विविध मूर्ती, पौराणिक गोष्टींवर आधारित देखावे, चित्रे आहेत.
यानंतर आम्ही गेलो आचार्य बेला इंडिया टेंपल बघायला. हे मंदिर रामानुज संप्रदायाशी निगडित आहे. हे सप्त सरोवर मार्गावर आहे. येथे रामायण व महाभारतातील विविध प्रसंगांचे देखावे खुबसूरतरित्या साकारले आहेत. या मंदिराची स्थापना १९५० च्या काळात झाली आहे. महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्णाद्वारा अर्जुनास उपदेश देतानाच प्रसंग आहे, लक्ष्मण शूर्पणखेचे नाक कापतानाचे चित्र, आपल्या गुरु आज्ञेनुसार राम लक्ष्मण त्राटीकेचा वध करतानाचा देखावा आहे, आत गेल्या गेल्या श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलतानाचे अद्भुत चित्र आहे, श्री कृष्णाचे विराट रूपदर्शन, भगवान रामाचा लंका विजय, लक्ष्मणाला शक्ती लागणे, यशोदा मैय्या बरोबरच्या बालकृष्ण लीला आदि देखावे आवर्जून बघण्यासारखे आहेत. बहुसंख्य मूर्ती व देखावे प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवले आहेत.
यानंतर अशाच पद्धतीचे आणखी एक मंदिर बघितले. तिथेही देवदेवतांच्या मूर्ती व प्लास्टर ऑफ पॅरिस मधून साकारलेले पौराणिक गोष्टींवर आधारित देखावे, प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेला भुयारी मार्ग वगैरे होते. गंगावतरणाचा देखावा लक्ष वेधून घेणारा होता. त्याच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षक फोटो काढून घेत होते.
त्यानंतर आणखी एक राम मंदिर बघितले. गेल्या गेल्या राम-लक्ष्मण-सीता व हनुमान यांचे देऊळ दिसते. मूर्ती अत्यंत देखण्या आहेत. याशिवाय गणेश भगवान, राधा कृष्ण, संकटमोचन हनुमान, दुर्गामाता वगैरे अनेक देवदेवतांच्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत. या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे मंदिराच्या भिंतींवर संपूर्ण रामचरित मानस लिहिलेले आहे. प्रत्येक चौपाई स्पष्ट वाचता येते; तसेच लंका कांड, सुंदर कांड वगैरे प्रत्येक कांडांचे सेपरेशन व्यवस्थित केले आहे.
– क्रमशः भाग दुसरा
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






