श्री राजीव गजानन पुजारी
मी प्रवासी
☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
त्यानंतर हरिद्वार जवळील कानखलस्थित दक्षेश्वर महादेव मंदिर बघायला गेलो. आत गेल्या या गेल्या वाघ सिंहाच्या प्रतिमा लक्ष वेधून घेतात. तसेच माता पार्वतीला हातांवर घेतलेल्या महादेवांची मोठी मूर्ती आहे. तसेच माता पार्वतीला हातांवर घेतलेल्या महादेवांची मोठी मूर्ती आहे. मंदिराला पौराणिक महत्व आहे. कारण येथेच दक्ष राजाने एक मोठा यज्ञ केला होता ज्यामध्ये भगवान शिवांना आमंत्रित केले नव्हते. प्रत्यक्ष पित्याने आपल्या पतीचा केलेला अपमान सहन न झाल्याने ज्या यज्ञकुंडात पार्वतीने आत्मदहन केले, ते यज्ञकुंड येथे आहे. पार्वतीच्या आत्मदहनाचा धक्का सहन न झाल्याने महादेवांनी आपल्या जटेच्या केसापासून वीरभद्र या योध्याची निर्मिती केली. त्याने दक्ष प्रजापतींचा शिरच्छेद केला करून त्याला बकऱ्याचे शीर बसविले अशी कथा आहे. हे मंदिर राणी धनकौर यांनी १८१० साली निर्माण केले. १९६२ मध्ये याचा जीर्णोद्धार करण्यात आला. येथे शनी मंदिर, हनुमान मंदिर आदि मंदिरे आहेत. महाकवी कालिदास या स्थळी अनेक दिवस वास्तव्यास राहिला. मेघदूता सारखे चिरतरुण काव्य त्याने याच कनखलच्या धरतीवर बसून लिहिले असा काही पुराण इतिहास संशोधकांचा तर्क आहे. याच कनखलच्या धरतीवर कालिदासाने मेघदूताला अलकापुरीचा मार्ग सांगितला. याप्रसंगी येथील निसर्गमय अल्हाददायी वातावरणाचे अतिशय सुंदर वर्णन कालिदासाने मेघ दूतात केले आहे. हे वर्णन वाचून सुईन चांग हा चिनी प्रवासी अतिशय प्रभावीत झाला. अंतर्बाह्य भारून गेला. या पवित्र भूमीचे दर्शन घेण्यासाठी अनेक संकटे झेलीत, हजारो मैलांचा प्रवास करून तो सतराव्या शतकात चीनवरून हरिद्वारात आला. हरिद्वारातले नैसर्गिक, धार्मिक व अध्यात्मिक सौंदर्य त्याने डोळ्याखालून घातले. हिंदू संस्कृतीचे चैतन्यमय सौंदर्य पाहून तो आनंदून गेला. साहित्य, संस्कृती आणि धर्म यांचा संगम असलेले हरिद्वार हे हिंदू धर्माच्या उन्नत अवस्थेचे प्रतीक होय अशा शब्दात हरिद्वारचे वर्णन त्याने आपल्या प्रवास ग्रंथात केले आहे. त्या अगोदर सहाव्या सातव्या शतकात ह्यु एन त्संग हा प्रसिद्ध चिनी प्रवासीही हरिद्वारला येऊन गेला होता.
हरकी पौडी घाटावर सूर्यास्ताच्यावेळी गंगा आरती असते व त्यासाठी पाच वाजल्यापासूनच जागा धरून बसावे लागते असे आम्हाला दुपारी जेवणाच्या वेळीच सांगितले होते. पण दक्षेश्वर महादेव मंदिराहून यायलाच आम्हाला वेळ झाला. आम्ही गेलो त्यावेळी घाटावर एव्हढी गर्दी होती की मुंगी शिरायलाही जागा नव्हती. पण गंगा मैय्यालच आमची दया आली असावी. एक इसम जणू आम्हाला हुडकतच आल्यासारखा आमच्याजवळ आला आणि म्हणाला, “आपणास गंगा मैय्याची आरती करायची आहे का? अमुक एक पैसे द्यावे लागतील. ” आम्ही मान्य केले. ती व्यक्ती आम्हाला थेट नदी जवळ असलेल्या गंगा मैय्याच्या देवळाजवळ घेऊन गेला. एका पुजाऱ्याच्या हवाली त्याने आम्हाला केले. त्या पुजाऱ्याने आम्हाकडून गंगा मैय्याची यथासांग पूजा करून घेतली व म्हणाला, “तुम्ही सात नंबर पोस्ट जवळ थांबा, तिथे आरती येईल. ” त्याप्रमाणे आम्ही ठरलेल्या ठिकाणी थांबलो. एव्हढ्यात ध्वनिक्षेपकावरून आरतीचे प्रसन्न सूर कानी पडू लागले. अनेक पुजारी दिप आणि इतर साधने घेऊन आरत्या करत होते. आरतीच्या लयबद्ध सुरात दिवे वरखाली केले जात होते. एवढ्यात एक पुजारी अनेक ज्योती असणारा मोठा पितळी दिवा घेऊन आमच्या जवळ आला व त्या दिव्याने आम्ही अगदी गंगा मैय्याच्या किनारी उभे राहून आम्ही आरती केली. अशा प्रकारे आरती करायला मिळेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. अनेक भक्त इच्छा आणि प्रार्थना व्यक्त करण्यासाठी गंगेत लहान तरंगणारे दिवे सोडून या विधीत सहभागी होत होते. वातावरण अत्यंत उत्साही व आध्यात्मिक असते. गंगा आरती करून हॉटेलवर आलो. जेवण केले. दुसऱ्या दिवशीचा प्लॅन तेथे आम्हाला सांगण्यात आला. तदनुसार दुसरे दिवशी सकाळी पावणे आठला राणाचट्टीकडे प्रयाण करायचे होते. तेथे आमचा मुक्काम असणार होता. राणाचट्टी म्हणजे जमनोत्रीचा बेसकॅम्प.
जमनोत्रीच्या दिशेने
२८ तारखेला सकाळी पावणेआठ वाजता आमची बस राणाचट्टाकडे निघाली. वातावरण अतिशय आल्हाददायी होते. आकाश लखलखित निळेभोर होते. त्याखाली बर्फाच्छादित पांढरे शिखरे होती. त्याखाली हिरवी वनस्पती आणि शेजारून कलकल आवाज करीत फेसाळती यमुना वाहत होती तर उंचावरून खाली उडी घेणारे जलप्रपात यमुनेच्या मिठीत मिटून जात होते. मंद शितल वारा तन मन फुलवित होता. पक्षांची किलबिल कानाला मोहिनी घालत होती. ज्यावेळी निळ्या आकाशात सूर्य थोडा वर आला त्यावेळी या साऱ्या वातावरणात पवित्रता आणि तेज अवतरले, सारे काही उजळून निघाले. सुंदरता, सुरम्यता आणि उबदार शीतलता यांचे दर्शन ठाई ठाई होऊ लागले. त्यामुळे मनाची प्रसन्नता अत्युच्च टोकाला पोहोचली. मानवी जीवनातील साऱ्या चिंता, श्रम यांचा विसर पडला. दोन डोळ्यांनी हे निसर्गसौंदर्य किती किती प्राशन करू असे मला होऊन गेले. यात्रा संपल्यावर देखील या निसर्ग सौदर्याचा ठेवा मजजवळ असावा म्हणून बसच्या खिडकीतून मी भरपूर फोटोज व व्हिडिओज काढले. एके ठिकाणी बस नाष्ट्याकरता थांबली. त्या हॉटेलच्या गच्चीत टूर ऑपरेटर्सनी self introduction चा कार्यक्रम ठेवला होता. आमच्या सोबतच अकोल्याच्याच एका टूरिस्ट कंपनीची बस व चार इनोव्हा होत्या. एकंदर आम्ही साधारण साठ जण होतो. या कार्यक्रमामुळे आम्ही सर्वजण आणखी जवळ आलो. या गच्चीतून दिसणारा नजारादेखील आम्ही मोबाईलमध्ये साठवून ठेवला. सव्वा सहाला बस राणाचट्टीला पोहोचली.
तेथे हॉटेल गंगा-जमुनामध्ये आमची राहण्याची सोय होती. रूम समोरच्या कॉरिडॉर मधून अप्रतिम निसर्गदृश्य दिसत होते. थंडी भरपूर होती. रूम मधील फरशीवर पाय ठेवल्यावर जणू बर्फाच्या लादीवर पाय ठेवल्यासारखे वाटत होते. आम्हाला दिलेले पांघरूण साधारण चार इंच जाड होते. जेवण करून, सार्वजनिक त्रिपदी म्हणून गुडुप्प झोपी गेलो.
२९ तारखेला सव्वा सातला चहा नाश्ता करून जानकीचट्टीकडे जाण्यासाठी बसने निघालो. अर्ध्या पाऊण तासात तेथे पोचलो. बस पार्किंगलॉट मध्ये पार्क केली. बस थांबल्या थांबल्या शेकडो डोलीवाले बसवर तुटून पडले व आपलीच डोली घेण्याविषयी आग्रह करू लागले. आमच्यापैकी ज्यांना ज्यांना डोलीने जायचे होते, त्यांच्यासाठी पुसेगावकरांनी डोल्या जमवून दिल्या. आम्हाला घोड्याने जायचे होते. घोडे बुकिंगची सोय पार्किंग पासून थोड्या अंतरावर होती, तेथे जाऊन आम्ही घोडे बुक केले. घोड्यावरून प्रवास करायची ही माझी दुसरी खेप. यापूर्वी माथेरानला घोड्यावर बसलो होतो, पण तो सपाट प्रदेश होता. घोडा पायऱ्या चढतो, निसरड्या रस्त्यावरूनही व्यवस्थित जातो, हे मी प्रथमच अनुभवत होतो. जानकीचट्टीपासून संपूर्ण सात किलोमीटर्स चढाईचा रस्ता आहे. या डोंगर कपाऱ्यातून गेलेल्या रस्त्याने जाताना निसर्ग खजिन्याचे एक एक दालन उघडत गेले. निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचा नवनवीन साक्षात्कार होत गेला. चीड, कालासिरस, देवदार, अक्रोड, बांस आदी वृक्षांनी आणि विविध दिव्य औषधी वनस्पतींनी यमुनेचे संपूर्ण खोरे गर्द हिरव्या रंगात बुडाले होते.
या गर्द राईतून कडेकपारीतून धावणारी यमुना सळसळत्या सौदामिनी सारखी तेजस्वी दिसत होती. खोल दरीत नजर टाकली की डोळे हिरवे झाल्याचा भास व्हायचा. मन एकाग्र करून बसलो की कानांना पानाची सळसळ आणि पक्षांची किलबिल ऐकू यायची पण हे पक्षी मात्र कोठे दिसत नव्हते, नजरेच्या टप्प्यात येत नव्हते. निसर्गसौंदर्य प्राशन करत साडेनऊला जमनोत्रीला पोचलो.

आजूबाजूच्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर अत्यंत सुंदर चित्रातल्यासारखे दिसते. यमुना मातेची मूर्ती काळ्या संगमवरातून घडवलेली असून अत्यंत देखणी आहे. मंदिर परिसरातच एक उकळत्या पाण्याचे छोटे कुंड आहे. त्या कुंडातील पाणी कायमच उकळत असते. त्यामुळे यमुनोत्रीचा सारा परिसर सतत वाफाळलेला असतो. त्या पाण्यात फडक्यात बांधलेले तांदूळ ताबडतोब शिजतात. या पाण्यात शिजलेले तांदूळ हाच यमुनोत्रीचा प्रसाद होय. तो आम्ही घेतला.
कूर्म पुराणातील यमुनोत्रीची कथा येथे आम्हाला ऐकावयास मिळाली. गंगा आणि यमुना या सूर्यकन्या. सावत्र बहिणी. सूर्याच्या संज्ञा या पत्नीपासून गंगेची निर्मिती झाली. छाया या दुसऱ्या पत्नीपासून यमुना व यमराज उत्पन्न झाले. यम आणि यमुना हे सख्खे भाऊ बहीण होते. एकदा यमाने चिडून आईला लाथ मारली. त्यावेळी तुला स्वर्गलोकातून मृत्यूलोकात जावे लागेल. तेथे मानवाच्या लोकसंख्येच्या नियंत्रणाचे काम करावे लागेल. माणसाच्या गळ्याभोवती मृत्यूचा पाश आवळण्याची व पापी लोकांना शासन करण्याची कामगिरी पार पाडावी लागेल. असा शाप छायाने यमराजाला दिला. सूर्याने या शापाचे समर्थन केले. त्यानुसार यम राजाचा पृथ्वीवर संचार सुरू झाला. सूर्यानेही जनकल्याणार्थ यमुनेला पृथ्वीवर पाठवले. ती स्वर्गातून श्वेतपर्वतावर म्हणजेच बंदर पूच्छवर उतरली. (बंदरपुच्छ हे जमनोत्रीजवळील एक शिखर आहे) तिथून खाली उतरून ती प्रवाहित झाली. भगवान श्रीकृष्णाच्या आठपट्टराण्यांपैकी यमुना ही कालिंदी या नावाने ओळखली जाते. यम आणि यमुना निसर्ग नियमानुसार आपापल्या कार्यात मग्न होते. वर्षांपासून वर्षे गेली. यमुना भावाच्या आठवणीने व्याकुळ व्हायची. मृत्यूच्या कार्यात आणि पापी जनांना नरकाच्या दारात ढकलता ढकलता यम यमुनेला विसरून गेला. अनंत कालानंतर एक दिवस यमाला यमुनेचे स्मरण झाले. माझी बहीण कोठे आहे, काय करत असेल म्हणून तो चिंतीत झाला. तिच्या शोधासाठी त्याने यमदुतांना पाठवले. त्यांनी त्रिखंड पालथे घातले. पण यमुना त्यांना भेटली नाही. मग स्वतः यम तिच्या शोधात निघाला. पण त्यालाही यमुनेचा पत्ता लागेना. तो ध्यानस्थ झाला. अतींद्रिय शक्तींनी त्याला यमुनेचा पत्ता कळला. तो धावत हिमालयात आला. यमुनोत्रीत त्याला त्याची बहीण यमुना भेटली. त्या दिवशी कार्तिक महिन्यातील द्वितीया होती. या दिवशी झालेल्या भाऊ बहिणीच्या अलौकिक भेटीने त्यांची हृदय उचंबळून आली. यमुनेने यमाचा योग्य तो आदर सत्कार केला. तप्त कुंडातील गरम पाण्याने त्याला अभ्यंग स्नान घातले. त्याच्यासाठी पंचपक्वानांचे भोजन रांधले. त्याला पंचारतीने ओवाळले. यमाला अतिशय समाधान आणि आनंद वाटला. ओवाळणी म्हणून तू कोणताही वर माग, तुझी इच्छा पूर्ण होईल असे प्रसन्नचित्त यमाने यमुनेला सांगितले. त्यावर मला कोणत्याही प्रकारची इच्छा नाही तुझ्या भेटीने मला सर्व मिळाले आहे असे यमुना नम्रपणे उत्तरली. परंतु ओवाळणी म्हणून तुला काहीतरी मागितलेच पाहिजे असा हट्ट यमाने धरला. त्यावर यमुना त्यास म्हणाली तुला द्यायचेच असेल तर असा वर दे की, कार्तिक महिन्याच्या शुक्लपक्षाच्या द्वितीयेला जे भाऊ-बहीण एकमेकांना भेटतील, एकमेकांच्या सुखदुःखात समरस होतील, जी बहीण प्रेमाने भावाला ओवाळेल, या प्रेमाचे प्रतीक म्हणून जो भाऊ बहिणीला ओवाळणी घालेल, त्या भावा-बहिणीस तू चिरंतन सुखी ठेव. त्यांच्यावर अकस्मात मृत्यूचा घाला घालून त्यांना यमयातना देऊ नकोस. भाऊ बहिणीच्या चिरंतन निरपेक्ष प्रेमाचे प्रतीक म्हणून हा वर मला तू दे. यमुनेला हा वर तथास्तु म्हणून यमाने दिला. तसेच या द्वितीयेला जे लोक यमुना जलात स्नान करतील ते पुनर्जन्म बंधनातून मुक्त होतील असाही वर यमाने यमुनेला दिला. म्हणून मथुरा आणि यमुनोत्री येथे भाविक या दिवशी मोठ्या संख्येने यमुनेचे स्नान करतात. यम आणि यमुनेच्या उत्कट भेटीच्या या दिवसाला यम द्वितीया असेही म्हणतात. यम यमुनेच्या भेटीच्या दिवसापासून भाऊबीजेची प्रथा सुरू झाली. हजारो वर्षापासून भाऊ बहिणीच्या प्रेमाच्या प्रतीक असलेला भाऊबीजेचा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. ही यम आणि यमुनेच्या अत्युच्च प्रेमाचे प्रतीक असलेली कथा ऐकून हजारो वर्षांपूर्वी घडलेला हा सारा प्रसंग माझ्या अंत:चक्षू समोर उभा राहिला. हिवाळ्यातले सतत सहा महिने बर्फात समाधीस्थ असलेले यमुनोत्रीचे मंदिर अक्षय तृतीयाला उघडते. भाऊ बीजेच्या दिवशी बंद होते. या दिवशी यम यमुनेकडे भाऊबीजेसाठी अदृश्य रूपाने येतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे भाऊबीजेच्या दिवशी येथे मोठा उत्सव असतो. आम्हाला हॉटेलमधून निघतांना चिवडा लाडू वगैरेचे पॅकेट दिले होते. ते खाऊन आम्ही परतीच्या प्रवासाला १०. ३० ला निघालो व १२. ३० वाजता आमची बस जिथे पार्क केली होती तिथे पोहोचलो. डोलीतून गेलेले सहप्रवासी साधारण दोन पर्यंत तिथे पोहोचले. आमच्यापैकी कांही अतिउत्साही लोक पायी गेले होते, ते साडेचार पाच पर्यंत परत आले नव्हते. त्यांची वाट बघून इतर लोक कंटाळले. त्यामुळे एक बस त्यांना घ्यायला तिथे थांबेल व एक बस इतर लोकांना घेऊन हॉटेलकडे परतेल असे ठरले. त्याप्रमाणे साडेपाचला आम्ही रूमवर परतलो. थोडी विश्रांती घेऊन साडेसातला जेवणाच्या टेबलवर आलो. तेंव्हा पायी गेलेली मंडळी भेटली. ती साडेसहाला जानकीचट्टीवर परतली होती. टूर ऑपरेटर्सनी अशा अतिउत्साही मंडळींना आवर घातली पाहिजे असे मला वाटते. When you are in Rome you should behave like Romans only. जेवणाच्या वेळी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम सांगण्यात आला. दुसऱ्यादिवशी सकाळी अकरा वाजता जेवण करून आम्हाला उत्तरकाशी मुक्कामी जायचे होते.
– क्रमशः भाग तिसरा
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




