श्री राजीव गजानन पुजारी

? मी प्रवासी ?

☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ४ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

उत्तरकाशीकडे… 

३० मे रोजी ठरल्यानुसार ११ वाजता आम्ही उत्तरकाशीकडे प्रस्थान केले. वाटेतील निसर्गसौदर्याचा आस्वाद घेत घेत आम्ही संध्याकाळी साडेचार वाजता उत्तरकाशीला पोहोचलो. ११५८ मीटर्स उंचीवर भागीरथीच्या काठावरील एक तीर्थक्षेत्र म्हणून उत्तर काशीचा अनेक पुराणग्रंथात उल्लेख आहे. पुराणात उत्तरकाशीचा उल्लेख सौम्यकाशी म्हणून आहे. गढवालीत उत्तर काशीला बारहाट असे म्हणतात. अनादिकालापासून ही नगरी ऋषी मुनींची तपोभूमी होती. अशी मान्यता आहे की पांडवांची इथे ये जा असायची. तसेच जमदग्नी ऋषींचा आश्रम इथेच होता. येथेच जमदग्नी ऋषींचे कनिष्ठ पुत्र परशुरामाने आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार आपली माता रेणुका हिचा शिरच्छेद केला होता. बालखिल्य, ऐरावत, इंद्रकिल व वारुणावत हे चार पर्वत उत्तरकाशीचे चार पहारेकरी आहेत. उत्तरकाशी वरुणावतच्या पायथ्याला वसली आहे. हे नगर पूर्वी भारत व तिबेट यांदरम्यानच्या व्यापाराचे महत्त्वाचे ठिकाण होते. तिबेटी व्यापारी पर्वत पार करून येत व मीठ व इतर पदार्थांच्या बदल्यात रत्नांची घेवाण करत. उत्तरकाशी वरुणा व अस्सी या दोन नद्यांच्या मध्ये स्थित आहे. या नगरीच्या एका टोकाला अस्सी व भागीरथी यांचा संगम आहे तर दुसऱ्या टोकाला वरुणा व भागीरथी यांचा संगम आहे. या दोन संगमांमधील ठिकाणास वाराणसी म्हणतात. पूर्ण जगात फक्त दोनच ठिकाणे अशी आहेत की जी दोन संगमांदरम्यान वसली आहेत. एक आहे काशी व दुसरे स्थान आहे उत्तर काशी. म्हणूनच प्राचीन काळी उत्तर काशीला सौम्य काशी म्हणून संबोधिले जात असे. या नगरीला उत्तर काशी म्हणण्याचे दुसरे कारण म्हणजे गंगामाई इथून जवळच असलेल्या तंबाखानी इथे धरण बांधण्यापूर्वी उत्तर दिशेकडे वहात होती. उत्तरकाशीचा उल्लेख स्कंद पुराणातील केदारखंडात सापडतो. दरवर्षी चैत्रातील कृष्ण त्रयोदशीला वरुणावताची पंचक्रोश प्रदक्षिणा निघते याला वारुणी यात्रा म्हणतात.

हॉटेलवर मुक्कामी जाण्याआगोदर आम्ही येथील प्रसिद्ध विश्वनाथ मंदिरात गेलो. उत्तर काशीमधील हे सर्वांत जुने मंदिर. या मंदिराची निर्मिती कचुरी शैलीत पाषाणांनी केली आहे व त्यासाठी हिमालय पद्धत अवलंबली आहे. मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ गंगाजलाने विश्वनाथाला अभिषेक होतो. प्रांगणात श्री गणेश आणि शक्तिदेवतेचे मंदिर आहे. प्रांगणातच एकवीस फूट उंचीचा व अडीच फूट व्यास असलेला भव्य त्रिशूळ आहे. त्रिशूळाचा वरचा भाग लोखंडी तर खालचा भाग तांब्याचा आहे. देव दानवांच्या युद्धात देवानी याचा वापर केला होता. अशी केदारखंडातील अख्यायिका आहे. या त्रिशुळावर प्राचीन पाली लिपीत कांही ओळी कोरल्या आहेत. त्या ओळी इसवीसनाच्या ५०० वर्षांपूर्वी उत्तर काशीच्या राजाने आपल्या राज्यारोहण समारंभाच्या निमित्ताने नंतर कोरलेल्या असाव्यात असा इतिहास तज्ञांचा अभिप्राय आहे. हा त्रिशूळ उत्तराखंडच्या प्राचीन धार्मिक चिन्हांपैकी एक आहे. त्रिशुळावर नाग वंशाची वंशावळ देखील अंकित आहे. मंदिर परिसरात साक्षी गोपाल व मार्कंडेय ऋषींची मंदिरे देखील आहेत. मंदिरातील महादेवाची पिंड थोडी झुकलेली आहे. त्या संबंधी अशी आख्यायिका आहे की, ऋषी मार्कंडेय विधिलिखिताप्रमाणे अल्पायु होते. ते सदरच्या मंदिरात तपस्या करीत असत. त्यांचे आयुष्य संपल्यावर स्वतः यमराज त्याना नेण्यास आले, त्यावेळी मार्कंडेय पिंडीला घट्ट मिठी मारून बसले होते. यमराजानी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पिंडी थोडी वाकडी झाली. मार्कंडेयांची भक्ती व तपश्चर्या पाहून शंकर भगवान प्रसन्न झाले व त्यांनी यमांना माघारी पाठविले. मार्कंडेय ऋषींना दीर्घायुष्य प्राप्त झाले. या प्राचीन विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार टेहरीचा पवॉरवंशीय राजा सुदर्शन शहाने १८५७ मध्ये केला. महाशिवरात्रीचा सोहळा येथे मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. भगवान भोलेनाथांच्या प्रतिमा व गंगामैयाच्या सासन काठ्यांसह हजारो शिवभक्त ढोल ताशांच्या गजरात पूर्ण उत्तरकाशीची नगर प्रदक्षिणा करतात. विश्वेश्वर मंदिराजवळच मारुतीरायाचे सुंदर मंदिर आहे. तिथे जाऊन आम्ही मारूतिरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही कृष्णा पॅलेस या हॉटेलात मुक्कामासाठी गेलो. आमच्या हॉटेलमधून अप्रतीम निसर्गसौंदर्य दिसत होते. पण आमच्या समोरच्या हॉटेलमध्ये आमच्यापैकी कांही जणांची राहण्याची सोय केली होती, त्या हॉटेलच्या मागील बाजूस गंगामैया झुळूझुळू वहात होती व निसर्गाच्या माहोल कांही औरच होता.

गंगोत्रीकडे – – 

३१ मे ला सकाळी साडेसहा वाजता गंगोत्रीला जाण्यासाठी आम्ही निघालो. साडेनऊला गाडी गंगोत्रीजवळ पार्क केली. तेथून साधारण तीन किलोमीटर्स पायी चालावे लागणार होते. रस्त्यात पूजासाहित्याची अनेक दुकाने आहेत. त्यापैकी एका दुकानातून गंगाजल घरी नेण्यासाठी एक कॅन विकत घेतला. १०. ३० वाजता गंगोत्री मंदिराच्या प्रांगणात पोचलो. पुसेगावकरांनी एका पुजाऱ्यांकरवी खास दर्शनाची व्यवस्था केली होती त्यामुळे आम्हाला फारसे रांगेत उभे राहावे लागले नाही.

जी थोडी रांग होती त्या बरोबर आम्ही पुढे पुढे सरकू लागलो व गंगामैयाच्या मूर्तीसमोर आलो. गंगामैयाची मूर्ती पांढऱ्या संगमरवरामध्ये असून भान हरपेल एवढी देखणी आहे. मैय्याचे मनोभावे दर्शन करून बाहेर आलो. कांही पायऱ्या उतरून खाली आलो. मंदिरासमोरून गंगामैया तुफान वेगाने वाहते. यात्रेकरूंना नदीत पाय धुण्यासाठी जाड साखळ्या बांधल्या आहेत. त्यांना धरून आम्ही हातपाय प्रक्षालन केले व बरोबर आणलेल्या कॅन मध्ये गंगाजल भरून घेतले व वर येऊन तेथे असलेल्या पुजाऱ्यांकरवी कॅनमधील जलाचे पूजन करून घेतले. याला गंगापूजन म्हणतात. हे सर्व आवरून पावणेदोनला आम्ही बसमध्ये बसलो. गंगोत्री ते उत्तरकाशी सदोदित गंगामैया सतत आमच्या सोबत होती. कधी झुळूझुळू तर कधी जोरकसपणे. वाटेत येणाऱ्या दगडधोंडे व खडकांना अलगद ओलांडत तर कधी त्यांचेवरून अवखळपणे उड्या घेत तर कधी त्याना वळसे घालत. सोबतीला चीड आणि देवदार वृक्ष होतेच! असे सर्व निसर्गसौंदर्य प्राशन करीत आम्ही साडेचार पाच पर्यंत रूमवर पोचलो.

गंगा गंगोत्री वरून उगम पावते, असा काही लोकांचा समज आहे. परंतु गंगोत्री पासून १८ किलोमीटर दूरवर असलेल्या प्रचंड बर्फाच्या ग्लेशियरमधून ती बाहेर पडते. हजारो वर्षांपूर्वी गंगेचा उगम गंगोत्रीस असावा, परंतु प्रचंड वृक्षतोडीमुळे हिमकडे कोसळून तो १८ किलोमीटर मागे गेला असावा. या उगमाला गोमुख असे म्हणतात. कठोर तप करून राजा भगीरथाने स्वर्गातून तिला पृथ्वीवर आणले म्हणून तिला भागीरथी नावाने संबोधले जाते. देवप्रयाग पर्यंत ती भागीरथी नावाने वाहते. देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा आणि भागीरथीचा संगम होतो. देवप्रयाग पासून ७१ किलोमीटर प्रवास करून ऋषिकेशच्या मैदानात ती गंगा या नावाने अवतरते.

मात: शैलसुता सपत्नी वसुधा शृंगाराहारवली ।

स्वर्गारोहिण वैजयंती भवती प्रार्थये ।।

त्वत्तिरे वसतस्त्वदर्पित पिबत स्त्वव्दीचिशु ।

स्त्वन्नाम स्मरत स्त्वदर्पित दृश:स्योन्मे शरीरव्यय: ।।१।।

याप्रमाणे भागीरथीचे पुराणग्रंथात सुंदर वर्णन दिले आहे. त्याचप्रमाणे गंगेची जन्मकथाही पुराणात आहे. धरतीवर तिची अवतरण झाले याची ही कथा म्हणजे इतिहास होय. सत् युगातील ही कथा आहे.

प्राचीन काळात इश्वांकू वंशातील चक्रवर्ती राजा सगर राज्य करीत होता. महापराक्रमी आणि प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा राजा म्हणून त्याचा लौकिक होता. त्याने अश्वमेध यज्ञ करायचे ठरवले. त्यासाठी त्याने घोडा सोडला. सदर राजाचा अश्वमेध यज्ञ साकार झाला तर हा शक्तिशाली राजा आपला पराभव करून इंद्नगरीचा कब्जा घेईल अशी इंद्राला भीती वाटली. या अश्वमेध यज्ञात विघ्न निर्माण करण्यासाठी त्याने एक क्लुप्ती योजली. त्यानुसार त्याने घोड्याला पकडून समाधीस्थ कपिल मुलींच्या आश्रमात गुपचूपपणे बांधून टाकले. घोडा हरवल्याचे कळताच सगर राजा चिंताग्रस्त झाला. आपल्या पराक्रमाला आव्हान देणाऱ्या कोणत्या वीराने घोडा अडवला म्हणून राजाच्या सैन्याने त्याचा शोध घेतला, परंतु घोडा सापडायला तयार नव्हता. शेवटी त्याने आपल्या साठ हजार पुत्रांना घोड्याला शोधण्यासाठी पाठवले. त्यांनी स्वर्ग मृत्यू पाताळ पालथे घातले, परंतु घोडा मिळाला नाही. ते निराशमनाने माघारी परतले. फिरत फिरत ते कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आले. तो आश्रमापाठीमागे घोडा बांधलेला त्यांना दिसला. मुनी समाधीस्थच होते. आपल्या आश्रमामागे चक्रवर्ती राजा सगराचा अश्वमेध यज्ञाचा घोडा बांधला आहे याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. परंतु कपिलमुनींनीच घोडा पळवून आश्रमात बांधून ठेवला असा सगर पुत्रांचा समाज झाला. त्यांनी चिडून कपिलमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या गळ्यात मृतसर्प लटकवला. मुनींना मोठमोठ्याने अर्वाच बोलू लागले. त्यामुळे मुनींची समाधी भंग पावली. सगर पुत्रांच्या मर्कटलिला पाहून त्यांचा क्रोधांनी जागृत झाला. डोळे उघडताच त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. त्यामुळे ६०, ००० सगरपुत्र भस्म होऊन त्यांचे राखेच्या ढिगार्‍यात रूपांतर झाले. राजा सगराला ही बातमी समजतात तो कपिल मुनींकडे आला. कपिल मुनींची त्याने क्षमा मागितली. पुत्रांना जीवदान देण्याची विनंती केली. आपल्या आश्रमात घोडा बांधण्याचे कपटकारस्थान इंद्राचे होते हे नंतर योगसाधने द्वारा मुनींना समजले. केवळ अज्ञानापायी सगर पुत्रांचा नाश झाला. त्यामुळे कपिलमुनींना खंत वाटली. ते राजाला म्हणाले, ’तुझ्या पुत्रांचा मृत्यू माझ्या शापामुळे होणार होता. तसे त्यांच्या नशिबात लिहिलेलं होतं. तो मृत्यू कोणत्याही कारणाने टाळता आला नसता. यात माझा आणि त्यांचा काहीच दोष नाही. त्यांचे जगण्याचे दिवस संपलेले आहेत. त्यामुळे ते पुन्हा जिवंत होऊ शकणार नाहीत. परंतु अधिक विचार न करता मी त्यांना भस्म केल आहे त्यामुळे त्यांच्या आत्ममुक्तीसाठी आणि उद्धारासाठी प्रयत्न करणं मी माझं कर्तव्य समजतो. त्यासाठी त्यांच्या मुक्तीचा मार्ग मी तुला सांगतो. प्रत्यक्ष ब्रह्मद्रव्य गंगा ब्रम्हलोकातून खाली आणली व तिचे जल या रक्षेवर शिंपडले तर तत्काळ तुझ्या पुत्रांना मुक्ती मिळेल. ’ यावर राजा सगर विवश होऊन म्हणाला, ’मुनीवर्य ब्रह्म लोकातून गंगा पृथ्वीवर आणणे ही अशक्य गोष्ट आहे. माझी शारीरिक, मानसिक व आत्मिक शक्ती तेवढी प्रबळ नाही. गंगा अवतरणासाठी मी असमर्थ आहे. ’ यावर मुनीवर्य म्हणाले, ’राजा या जगात मानवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. त्याच्या अंतरंगात ईश्वरी शक्तींचे प्रचंड भांडार आहे. पण त्याचा त्याला पत्ता नसतो. त्यासाठी कठोर साधनेची गरज असते. त्यासाठी सत्यव्रती, प्रतिज्ञापालक, दृढनिश्चयी बनावं लागतं. तरच त्याच्यातील सुप्त शक्ती व पुरुषार्थ जागा होतो. मग त्याला जगातली कोणतीही गोष्ट साध्य करता येते. तुझ्या कुळात असा सामर्थ्यशाली पुरुष निर्माण होऊन तो ब्रह्मलोकांतून गंगा मृत्यूलोकात निश्चितपणे आणेल. या गंगेच्या स्पर्शाने तुझ्या पुत्रांना मुक्ती मिळेल. ’

मुनींचा आशीर्वाद घेऊन दुःखद अंतःकरणाने राजा राजधानीत आला. राजवाड्याच्या दर्शनी दरवाजावर त्याने एक शिलालेख कोरला- ‘माझ्या ६०, ००० पुत्रांची राख कपिलाश्रमासमोर पडलेली आहे. कपिल मुनींच्या शापामुळे दग्ध झालेल्या या पुत्रांच्या मुक्तीसाठी गंगाजलाची आवश्यकता आहे. माझ्यानंतर माझ्या वंशात होणाऱ्या ज्या राजांच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य असेल त्याने ब्रह्मलोकांतून गंगा पृथ्वीवर आणावी. आपल्या कुळाचा उद्धार करावा. जोपर्यंत गंगा पृथ्वीवर वाहत राहील तोपर्यंत त्याचे नाव घेतले जाईल. ’

सगर राजाचा पुत्र दिलीप हा सिंहासनावर बसला. त्याने शिलालेख वाचला. परंतु त्याला ब्रह्मलोकातून गंगा आणणे शक्य झाले नाही. त्याला अतिशय तेजस्वी पुत्र झाला. त्याचे भगीरथ नाव ठेवण्यात आले. लहानपणापासून भगीरथ जिज्ञासू प्रवृत्तीचा होता. राजवाडाच्या दरवाजाकडे तो तासानतास बघत राहायचा दरवाजावरील शिलालेख त्याने आपल्या पिताजींकडून वाचून घेतला त्याचा अर्थ व इतिहास समजावून घेतला. आपल्या आजोबांची अतृप्त इच्छा पूर्ण करून आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याची इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. युवावस्था प्राप्त झाल्यावर तो राजसिंहासनावर बसला. पण त्याचे मन राज्यकारभारात रमेना. ऐशआराम त्याला बोचू लागला. दरवाजावरील शिलालेख त्याला खुणावत होता. आव्हान करीत होता. मग त्याने एक दिवस घोर प्रतिज्ञा केली. :‘ब्रह्म लोकातून गंगा धरतीवर आणून पितरांचा उद्धार करीन त्याचवेळी मी सिंहासनावर बसेन. ’ प्रतिज्ञेनुसार राज सिंहासनाचा त्याग करून तो हिमालयात गेला. हिमशृंग पर्वतावरील श्रीकंठ शिखरावर तो पोहोचला. तेथे त्याने गंगा प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या सुरू केली. हिमालयातील यक्ष, किन्नर व गंधर्वांनी विघ्ने आणून त्याचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर विजय मिळवून भागीरथाने आपली तप:साधना चालू ठेवली. भागीरथाची कठोर तपश्चर्या पाहून गंगा प्रसन्न झाली. भागीरथाने तिला आपल्या तपश्चर्येचे कारण सांगितले. त्यानुसार गंगा ब्रम्हलोकातून मृत्यूलोकात यायला तयार झाली. परंतु ती भगीरथाला म्हणाली, ’मी तुझ्या पुर्वजांच्या उद्धारासाठी पृथ्वीवर येईन, परंतु माझ्या जलप्रवाहाचा वेग पृथ्वीला सहन होणार नाही. त्याच्या वेगाने तिचे तुकडे तुकडे होतील. माझा वेग धारण करणारी एकच व्यक्ती आहे. श्री भगवान शंकर त्यांच्यातच माझ्या प्रबळ वेगाला धारण करण्याची शक्ती आहे त्यांना तू प्रसन्न करून घे. मी यायला तयार आहे.’

– क्रमशः भाग चौथा 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments