शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माहेरपण…! – कवयित्री : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी 

(अनादी काळापासून पृथ्वीवर वास करत असलेल्या ‘आई ‘नावाच्या दैवताला ही कविता समर्पित !)

स्वर्गाची तुमच्या महती

आम्हाला नका सांगू देवा

भोगून पहा माहेरपण

नक्कीच कराल आमचा हेवा ll

 *

मनसोक्त काढलेली झोप

आणि तिच्या हातचा गरम चहा

सुख म्हणजे काय असतं ,

देवा एकदा अनुभवून पहा ll

 *

नेलेल्या एका बॅगेच्या

परतताना चार होतात

तिच्या हातचे अनेक जिन्नस

अलगद त्यात स्वार होतात ll

 *

नेऊन पहा तिच्या हातच्या

पापड लोणचे चटण्या

सगळे मिळून स्वर्गात

कराल त्यांच्या वाटण्या ।।

 *

शाल तिच्या मायेची

एकदा पहा पांघरून ।

अप्रूप आपल्याच निर्मितीचं

पाहून जाल गांगरून ll

 *

लाख सांगा देवा हा

तुमच्या मायेचा खेळ l

तिच्या मायेच्या ओलाव्याचा

बघा लागतो का मेळ ?

 *

फिरू द्या तिचा कापरा हात

एकदा तुमच्या पाठीवरून l

मायापती  देवा तुम्ही,

तुम्हीही जाल गहिवरून ll

 *

आई नावाचं हे रसायन

कसं काय तयार केलंत ?

लेकरासाठीच जणू जगते

सगळे आघात झेलत ll

 *

भोगून पहा देवा एकदा

माहेरपणाचा थाट l

पैज लावून सांगते विसराल

वैकुंठाची वाट ।।

 *

माहेरपण हा केवळ

शब्द नाही पोकळ

अनुभूतीच्या प्रांतातलं

ते कल्पतरूचं फळ ll

 *

डोळ्यात प्राण आणून

वाट बघणारी आई l

लेकीसाठी ह्या शिवाय

दुसरा स्वर्ग नाही ll

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted