श्री सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ प्रगतिपथावरचं तारतम्य… लेखिका: श्रीमती नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
पंधरा दिवस मुंबईतल्या मुंबईत मुलाकडे राहायला गेलो होतो.
एका दिवसातच ऑनलाईन दिली जाणारी order आणि कमीतकमी चारतरी घरपोच येणारी पार्सल हा माझ्या चिंतेचा आणि रागाचा विषय झाला.
नवरा नेहमीप्रमाणे स्थित प्रज्ञ….
“पंधरा दिवसात काय तू मागे पडून यांची ‘सिस्टिम’ बदलायच्या भानगडीत पडतेस?”
सुनावलंच मला.
पण भाज्या, फळं, आणि त्या त्या दिवशी लागणारं सामान मी स्वतः बाजारात जाऊन आणणार. ही गोष्ट मुलाच्या आणि सुनेच्या गळी उतरवण्यात मात्र मी यशस्वी झाले.
दोघंही पटवून देतच होते,
“आई हे घरपोच येणं खूप सोयीचं आहे.
स्वस्त ही पडतं.
त्यावर कित्ती तरी “ऑफर्स “असतात.
सुट्ट्या पैशांची कटकट नाही.
माल परत ही घेतला जातो.
वगैरे वगैरे…….”
त्यांच्या व्यस्त जीवन शैलीमुळे त्यांना हे फायदे वाटतात.
ज्येष्ठ नागरिकांकडे वेळच वेळ आहे म्हणून तुम्हाला हे पटत नाही हा आजच्या पिढीचा ठळक मुद्दा.
“अगदी बरोबर “असं म्हणून वाद टाळलाच मी.
पंधरा दिवस नातवंडांबरोबर घालवून पुढे दोन तीन महिने पुरेल इतकी आनंदाची शिदोरी भरून घेण्यासाठी तर येतो आपण.
त्यात वादाच्या मिठाचा खडा कशाला?
पण मनच ते..उघड बोलले नाही तरी अनेक गोष्टी डाचत होत्याच.
घरपोच येतं, पण तुमच्या सोयीच्या वेळेनुसार येतं का?
कधी भाजी फोडणीला टाकत असतो, कधी wash room मध्ये असतो, कधी वाचत असतो, आणि सामान येतं. दार उघडा,
OTP दिल्याशिवाय मिळत नाही
मग फोन शोधा.
लिस्ट प्रमाणे चेक करा.
यात वेळ तर जातोच ना.
तोसुद्धा तुमच्या मनाविरुद्ध आणि गैरसोयीचा.
मग आपल्या सोयीने, वेळ काढून का नाही बाजारातून आणायचं.?
स्वस्त असतं का हे मी काही पडताळून बघितलं नाहीये.
पण अवाढव्य कोबी, “(अर्धा बाईंना द्यावा लागतो.. हरकत नाही पण गरजही नसते. )
मलूल पालेभाजी, ताजी नसलेली फळं हे चालवून घ्यावं लागतं.
ऑफर्स म्हणाल तर त्यासाठी ठराविक किमतीचं सामान घ्यावंच लागतं. मग 2000 rs ला 200 rs कमी पडतायत, काही तरी मागव म्हणजे ती ऑफर मिळेल म्हणून 200 rs गरज नसताना खर्च करायचे.
आज ‘सेवा उद्योग’ इतका मोठा झालाय, तत्पर झालाय की आजची पिढी नकळत त्याच्या आहारी गेलीय.
आपल्या घरी काम करणाऱ्या मावशीने सणवाराला, किंवा आपल्या अडचणीला आपल्याला मदत (सेवा) केली तर आपण त्यांना काहीतरी प्रेमाने बक्षीस देतो.
इथे उलटी गंगा आहे. ज्यांची सेवा ‘घेतो’ तेच आपल्याला काही तरी देतात.
कुरिअर घेऊन येणारा असो, किराणा घेऊन येणारा असो, दुधाचं, वर्तमानपत्रांचं bill घ्यायला येणारा असो, इस्त्रीवाला असो, फुलपूडी टाकणारा असो, या सगळ्यांशी एक जवळीक असते. एक आपुलकीचं नातं तयार होतं.एकमेकांची विचारपूस केली जाते.या विचारांच्या आपल्या पिढीला हा सगळा ऑनलाईन रोखठोक मामला नाही पसंतीस येत.
कपडे, खेळणी, अगदी कुकर, induction, क्रोकरी, चादरी, पडदे,सगळं फोटो पाहून मागवायचं आणि पसंत पडलं नाही, साईझ चुकली तर परत करायचं.हा यांचा उलटा कारभार माझ्या तरी आकलनाच्या पलीकडे आहे.
आणि पर्यावरणाचा विचार केला तर संताप आणणारा आहे.
एकदा एक छोटा box आला. तो एका कागदाच्या पिशवीत( सर्विस provider चं नाव मिरवणाऱ्या) आपला पत्ता असलेली चिट्ठी चिकटवलेला होता.
सीलची tape चिकटवलेली होतीच.
इतकी कागदाची वेष्टनं दूर करून boxच्या आतल्या प्लास्टिक पिशवीत काय वस्तू सापडावी?थर्मोमीटर ..
माझ्या रागाचा पारा प्रचंड चढलाच.
डोक्याला इतका ताप झाला
की मुलगा सून घरी आल्यावर माझा संताप मी व्यक्त केलाच..
अशा सहज खरेदी करता येणाऱ्या वस्तू मागवून कागदाची किती नासाडी होते याचं भान नसतं यांना.
स्वयंपाकाच्या मावशी आल्या, आणि लागणारी एखादी वस्तू नसेल तर
Blink itवरून पापणी लवायच्या आत ती दारात हजर होते.
सोय म्हणून ठीकच आहे पण kichen मॅनेजमेंटचा बट्याबोळ झालाय.
त्याची सवय लागली, काही अडतच नाही ना.
पण शिस्त हरवत चालली याची खंत वाटतेच.
सात वर्षांची नात रात्री काही तरी मागत होती माझ्याकडे. मी म्हटलं, दुकान बंद झालं आता. तर तिनेच सांगितलं ऑनलाईन मागवून ठेव ना आत्ता. उद्या मिळेल मला.
‘आत्ताच्या आत्ता’ हा रोग, ‘संयम नसल्याचं लक्षण’ किती घातक आहे.
नकळत पोहोचतंय, झिरपतंय ते लहान मुलात.
माझ्याकडे आत्ता पैसे नाहीयेत, हेही तिला पटलं नाही.
GPay कर म्हणून सल्ला दिला तिने.
तिच्या हजारजबाबीपणाचं कौतुक करू,तिच्या हुशारीची दाद देऊ की, तिला किती माहिती आहे याचं नवल वाटून घेऊ
या बुचकळ्यात पडले मी.
का इतकी माहिती असली पाहिजे या वयात?
आत्ता ही वस्तू देणार नाही, मिळणार नाही हे साधं सोपं गृहीतक पटवायचे दिवस संपले का?
तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. त्याचे अनेक फायदे आहेत. अनेक सोयी उपलब्ध झाल्यात.
या कुठल्याही प्रगतीला माझा विरोध नाही
मी ही bill भरणे, किराणा, औषधं मागवणे, तिकिटं काढणे ही ऑनलाईन पण सावध, सुरक्षित अशी transactions करते.
माझं म्हणणं एवढंच… की प्रगतीपथावर चालताना ‘तारतम्य’ बाळगा.
कुठल्याही मार्गात खाच खळगे असतात, खड्डे असतात, उतार चढाव असतात.
त्यामार्गांवरचं ‘कुठपर्यंत पोहोचायचं’ हे ‘आपलं स्थान’ आपण पक्कं करून मार्गक्रमणा करावी.
प्रगतीच्या दिशेने जाणारा मार्ग ‘एकदिशा’ मार्ग नसतो.
भरकटलात तर ‘Uturn’ घ्यावा लागू शकतो.
त्यामुळे ‘तारतम्य’ बाळगून प्रगतिपथावर नक्की घोडदौड करावी, या बाबत माझं दुमत नाहीच मुळी.
विचारात गढून गेले.मी….इतक्यात बेल वाजली.
‘काही तरी ‘पार्सल’ आलं बहुधा.’
☆
लेखिका: श्रीमती नीलिमा जोशी.
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





