सौ अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आर एच डायग्नोस्टिक्स… – लेखिका : सुश्री सुधा मूर्ती ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

सुधा मूर्ती यांचे वडील आर. एच. कुलकर्णी डॉक्टर होते. त्यांचं पोस्स्टिंग एका खेड्यात झालं होतं. डॉक्टर म्हणून असलेलं ज्ञान, कौशल्य वापरण्याची वेळच येत नव्हती. खेड्यातील लोक बरं वाटेनासं झालं की स्वतःच त्यांना माहीत असलेले नैसर्गिक उपचार करून बरे होत असत…

पण एक रात्र वेगळीच उजाडली…

पाऊस कोसळत होता. विजा चमकत होत्या. ढग गर्जत होते.

अंधार, पाऊस, विजा, लखलखाट नी गडगडाट.

कोणीही पेशंट नसण्याची सवय असलेले आर. एच. कंदिलाच्या उजेडात जेवण उरकून निवांत बसले असतानाच दाराची कडी वाजली.

दारात अनोळखी माणसं उभी होती…

“डॉक्टर सायेब, बॅग घ्या तुमची. येक पेशन्ट बघायला जायचं हाय. “

समोरचे लोक मराठी बोलत होते…

आर. एच. यांनी एकंदर हवामान बघून त्यांना जमेल तितका विरोध करत सांगितलं, “क्लिनिक बंद झालं आहे. “

समोर जे लोक उभे होते त्यांच्या body language मध्ये नुसता आग्रह नव्हता. एक अनुच्चारीत गर्भित धमकी होती. त्यातल्या एकाने डॉक्टरांना जवळजवळ ओढूनच बाहेर काढलं…

डॉक्टर बॅग घेऊन मुकाट्यानं बैलगाडीत बसले…

“मला कुठं नेत आहात? “

त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची तसदी कोणीही घेतली नाही.

कधीतरी तो प्रवास थांबला. एका घरापुढं बैलगाडी थांबली.

भातांची शेतं भोवताली. अन् मध्यभागी एक घर.

घरातल्या स्त्रीने त्यांना मार्गदर्शन केलं…

“हिकडं… हिकडं ठेवलीय तिला. “

डॉक्टर तिच्या मागं गेले.

अन क्षणात मागं सरकले.

समोर एक सोळा सतरा वर्षांची मुलगी प्रसूती वेदनेनं तळमळत होती.

“मला नाही जमणार हे. मी स्त्री रोग तज्ञ नाही. माझं प्रशिक्षण झालं नाही यात. “

त्यांचा विरोध अगदी फुसका ठरला. समोरची पार्टी अधिक आग्रही, अधिक आक्रमक होती.

“त्ये काय आमाला ठावं न्हाई. तुमी ह्ये बाळातपण करा. तुम्ही म्हणाल तेवढा पैका देतो. “

डॉक्टर गोंधळले. घाबरले. इथून सुटका नाही हे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी की काय त्यांनी त्यांना त्या खोलीत ढकलून दार लावून घेतलं.

बेगुमान कोसळणारा पाऊस, खोलीत ती असहाय मुलगी अन् घाबरलेले आर. एच…

परतीचा मार्ग नाही म्हटल्यावर प्रशिक्षण घेत असताना प्रोफेसर्सना डीलिव्हरीमध्ये असिस्ट केल्याचे एक दोन प्रसंग आठवत त्यांनी काम सुरु केलं.

वेदना आणि दुःख सोसत पडलेली ती मुलगी त्यांना म्हणाली, “काही करू नका. मी मरेपर्यंत इथं बसून रहा. मला नी बाळाला वाचवू नका. “

ती विनंती त्यांचं काळीज कापत गेली…

“काय बोलतेस? मी डॉक्टर आहे. मला शेवटच्या क्षणापर्यंत प्राण वाचवण्याचे प्रयत्न करायचं शिकवलं गेल आहे. “

मुलगी रडली. तिच्या डोळ्यातून पाऊस बरसू लागला…

“हे लोक माझ्या बाळाला मारून टाकतील आणि मला जिवंत ठेवलं तरी बेदम मारतील. आम्हांला वाचवू नका. “

ती पुन्हा पुन्हा विनंती करत होती…

तिनं सांगितलेल्या हकीकतीनुसार ती जमीनदाराची मुलगी होती. शाळा शिकायची म्हणून तिला बाहेर ठेवलं. तिथं प्रेमात पडून तिनं मर्यादा ओलांडली होती. ती गरोदर आहे समजताच तिचा प्रियकर पळून गेला होता. हे सगळं घरच्यांना समजेपर्यंत उशीर झाला होता. गर्भपात करणं रिस्की होतं. म्हणून घरच्यांनी तिला या दुर्गम भागात आणून लपवून ठेवली होती…

बाळंतपण करण्यातील आपला तुटपुंजा अनुभव नी ज्ञान, त्याच्या बरोबरीने दोन जीव वाचवण्याची तळमळ डॉक्टरांनी पणाला लावला…

मुलीनं एका मुलीला जन्म दिला.

मुलगी जन्मली आहे…  समजल्यावर ती आणखी हतबल झाली. जगलोच नशिबानं तरी हिला कसं सांभाळायचं…?

“ती रडत का नाही? मेलीय का ती? बरं होईल मेली असली तर. “

एक नुकतीच आई झालेली मुलगी आपल्या बाळाच्या मरण्याची आशा करत होती…

वेदनेचा न संपणारा हा प्रवास पाहून डॉक्टर पण स्तिमित झाले होते…

“शक्य झालं तर पुण्याला पळून जा. तिथं पुणे नर्सिंग स्कूल आहे, तिथं गोखले म्हणून clerk आहे. त्याला माझं नाव सांग. तो तुला नर्सिंग कोर्सला ऍडमिशन मिळवून देईल. स्वतःच्या पायावर उभी रहा म्हणजे मुलीला वाढवू शकशील. “

त्यांनी तिला सल्ला दिला…

“कशी जाऊ…? माझ्याकडे पैसे नाहीत. “

यावर आर. एच. गप्प झाले. कारण त्या क्षणी त्यांच्याकडे फक्त त्यांची बॅग होती…

आपण काहीच करू शकत नाही ही खंत बाळगत ते बाहेर आले…

“डॉक्टर सायेब, ही घ्या तुमची फी, आन हितं जे काय बी घडलं त्ये भायेर कुटं बोलू नका. “

एका माणसानं त्यांच्या हातावर शंभर रुपये ठेवत त्यांना धमकी दिली…

“माझी कात्री राहिली वाटतं खोलीत, आलोच’ म्हणत आर. एच. पुन्हा मागं गेले. मुलीच्या हातावर शंभर रुपये ठेवत म्हणाले, “हे घे आणि इथून बाहेर पड अन् मी सांगितलं तसं कर. “

“तुमचं नाव काय, डॉक्टर? “, तिनं विचारलं…

“आर. एच. कुलकर्णी. पण लोक मला आर. एच. म्हणतात. “

पावसाच्या राक्षसी आवाजात तिला फक्त आर. एच. एवढंच ऐकू गेलं…

त्यानंतर कित्येक वर्षे गेली. त्यांचं लग्न झालं. पैसे साठवून त्यांनी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षानंतर चेन्नईच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन ते गायनॉकोलॉजिस्ट झाले. प्रोफेसर झाले. लोकप्रिय डॉक्टर आणि विद्यार्थिप्रिय प्रोफेसर झाले…

एकदा एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये एका तिशीतल्या महिलेचं रिसर्च presentation ऐकून त्यांनी तिचं अभिनंदन केलं. कौतुक केलं…

मागून कोणी तरी त्यांना जेवायला जाण्यासाठी हाक मारली,

“आर. एच. , जेवायला निघायचं ना? “

“तुमचं नाव काय, डॉक्टर? “

समोरच्या मुलीनं विचारलं. त्यांनी सांगितलं…

“तुम्ही 1943 साली चंदगड मध्ये होता? “

“हो. “

मुलीचे डोळे चमकले.

“डॉक्टर, मी इथून चाळीस किलोमीटर्स दूर राहते. तुम्ही थोड्या वेळासाठी माझ्या घरी येता का? “

तिच्या डोळ्यात आर्जव होतं. पण आर. एच. ना ती विनंती विचित्र वाटली.

“पुन्हा कधीतरी”, म्हणत त्यांनी तिला टाळण्याचा प्रयत्न केला.

“प्लीज डॉक्टर. ही विंनती अशा व्यक्तीची आहे जिनं तुमची कित्येक वर्षे वाट पाहिली आहे. “

आर. एच. गोंधळले. तिच्या नजरेत असणारं कोडं त्यांना सोडवता येत नव्हतं. अखेर ते तिच्या घरी गेले…

ते जिथं पोहचले ते देखील एक नर्सिंग होम होतं…

“आई, हे डॉ. आर. एच. , ज्यांची तू वाट पाहत होतीस. “,

ती म्हणाली.

पन्नाशीतली एक बाई पुढं आली. त्यांच्या पायावर झुकली.

“तुम्हाला मी आठवत नसेल. त्या पावसाळी रात्री तुम्ही मला मदत केली. माझी डिलिव्हरी केली. मला पैसे दिले. त्या काळी शंभर रुपये खूप मोठी रक्कम होती. पण तुम्ही ती सगळी मला देऊ केली. मी पुण्यात आले. तुमच्या मित्राला भेटले. नर्स झाले. माझ्या मुलीला मी योग्य पद्धतीनं वाढवू शकले. माझ्या मुलीनं स्त्री रोग तज्ज्ञ व्हावं ही माझी इच्छा तिनं पूर्ण केली. ती आणि तिचा नवरा इथं प्रॅक्टिस करतात. मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. तुमचं नाव आर. एच. एवढंच ऐकू आलं होतं. दरम्यान तुमचे मित्र गोखले पण वारले. आमच्या नर्सिंग होमच्या उदघाट्नाला तुम्हाला बोलवण्याची माझ्या मुलीची खूप इच्छा होती. पण तुम्हाला संपर्क कसा करायचा हेच समजत नव्हतं. “

आर. एच. भरल्या डोळ्यांनी, त्यांनी घडवलेलं एक हाडामांसाचं भविष्य समोर पाहत होते. डोळ्यातल्या पाण्यानं धूसर झालेल्या चित्रात त्यांनी नर्सिंग होमचं नाव शोधलं. ते होतं…

… “आर एच डायग्नोस्टिक्स “

लेखिका : सुश्री सुधा मूर्ती

(सुधा मूर्ती यांच्या ‘तीन हजार टाके’ पुस्तकातून) 

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted