श्री कमलाकर नाईक
वाचताना वेचलेले
☆ “ळळळ ळळळ…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
☆
‘ळ‘ — हे अक्षर असलेली व‘ळ‘णदार भाषा म्हणजे आपली मराठी!!
आणि ….
म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धीचा आम्हाला गर्व आहे!
‘ळ‘ अक्षर नसेल तर?
पळणार कसे…?
वळणार कसे…?
दुसर्यावर जळणार कसे?
भजी तळणार कशी?
सौंदर्यावर भाळणार कसे?
पोरं-टोरं तळ्यात-मळ्यात खेळणार कशी..?
तीळगूळ कसा खाणार?
टाळे कसे लावणार?
बाळाला वाळे कसे घालणार….?
खुळखुळा कसा देणार?
घड्याळ नाही, तर सकाळी डोळे कसे उघडणार?
घड्याळ बंद पडले, तर पळे कोण मोजणार?
वेळ पाळणार कशी?
मने जुळणार कशी?
खिळे कोण ठोकणार?
तळे भरणार कसे?
नदी सागराला मिळणार कशी……..?
मनातली जखम भळाभळा वाहणार कशी?
हिवाळा, उन्हाळा, पावसाळा….
नाही उन्हाच्या झळा
नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा….!
कळी कशी खुलणार?
गालाला खळी कशी पडणार?
फळा, शाळा, मैत्रिणींच्या गळ्यात गळा….
सगळे सारखे, कोण निराळा?
दिवाळी, होळी सणाचे काय……?
कडबोळी, पुरणपोळी ओवाळणी पण नाही?
तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता?
भोळा सांब,
सावळा श्याम
जपमाळ नसेल तर कुठून रामनाम?
मातीची ढेकळे नांगरणार कोण?
ढवळे पवळे बैल जोततील कोण?
पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण?
निळे आकाश, पिवळा चाफा…
माळ्याच्या कष्टाने फळाफुलांनी बहरलेला मळा!
नारळ, केळ, जांभूळ, आवळा
काळा कावळा, पांढरा बगळा
ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा?
अळीमिळी गुपचिळी, बसेल कशी दातखिळी?
नाही भेळ,
नाही मिसळ,
नाही जळजळ
नाही मळमळ
नाही तारुण्याची सळसळ
कणीक मळली जाणार नाही, पोळ्या लाटल्या जाणार नाहीत…..
टाळ्या आता वाजणार नाहीत…..!
जुळी तिळी होणार नाहीत…….!
बाळंतविडे बनणार नाहीत……!
तळमळ कळकळ वाटणार नाही….!
काळजी कसलीच उरणार नाही…!
पाठबळ कुणाचे मिळणार नाही
सगळेच बळ निघून जाईल,
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.
काहीच कळेनासे होईल ‘ळ‘ शिवाय!
☆
कवी: अज्ञात
प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






