image_print

श्रीमती उज्ज्वला केळकर

🌸 विविधा 🌸

☆ उदे ग अंबे उदे  भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

 ( मागील भागात आपण पहिले –  तिथे जाऊन त्यांनी विष्णू हाच हविर्भागदेण्यासाठी योग्य आहे,  असे सांगितले. तेव्हापासून भक्तवत्सलांछनहे बिरुद विष्णूदेवाने अलंकाराप्रमाणे मिरवले आहे. आता इथून पुढे )

भृगुऋषी निघून गेले, पण लक्ष्मीला मात्र त्यांच्या वर्तनाचा राग आला. ती म्हणाली, ‘तुमच्या हृदयातील माझ्या निवासावर,  आलिंगन स्थानावरच त्यांनी लाथ मारली. हा माझा घोर अपमान आहे. तुम्ही त्यांना काहीही न बोलता, त्यांचे आगत-स्वागत केलेत. पण मला हे सहन होत नाही. मी आपल्या सान्निध्याचा व या वैकुंठाचा त्याग करून, परमदिव्य अशा महाक्षेत्री करविरास ( म्हणजेच  कोल्हपुरास) जाते. विष्णूने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने ऐकले नाही. ( देव-देवताही माणसांसारख्याच रुसतात,  फुगतात तर! – देव,  दानवा नरे निर्मिले – केशवसुत ).

पुढचा कथा भाग असा,  लक्ष्मी गेल्यानंतर विष्णूला चैन पडेना. तिच्या लाभासाठी त्याने दहा वर्षे तपश्चर्या केली. मग नंतर आकाशवाणी झाली, की सुवर्णमुखरी नदीच्या उत्तर तिरावर तपोभूमी तीर्थ स्थापन कर. तिथे देवलोकातील दिव्य कमळे,  नाना परिमळाचे वृक्ष लाव. तिथे १२ वर्षे तप कर. त्याप्रमाणे विष्णूने सरोवर निर्माण केले. वृक्ष लावले व तपश्चर्या केली. तिथे पद्मतीर्थात लक्ष्मी प्रगटली. तीच पदमवती होय. तिने कल्हार (कृष्णकमळ) फुलांची माळ विष्णूच्या गळ्यात घातली. विष्णूने त्यानंतर पुष्करणी जवळिल शेषाचलावर वस्तव्य केले. हे पुढे वेंकटगिरी या नावाने प्रसिद्धीस आले. इथे वेंकटेशाच्या हृदयावर लक्ष्मीची मूर्ती आहे, पण त्याच्याशेजारी ना लक्ष्मी आहे, ना पद्मावती. पद्मावतीचे  मंदीर खाली सरोवराजवळ आहे. लक्ष्मीचा निवास कोल्हापुरी आहे. त्यामुळे कोल्हापूर हे वैष्णव क्षेत्रही झाले. जनमानसावरील हा ठसा स्पष्ट आणि गडद होण्याच्या दृष्टीने,  पुढे नवरात्रात तिरुपती देवस्थानहून महालक्ष्मीसाठी किती तरी लाखांचे शालूही येऊ लागले. ही प्रथा कधीपासून सुरू झाली, हेही अभ्यासकांनी अभ्यासायला हरकत नाही.

सर्वसामान्य श्रद्धाळू भाविकांच्या दृष्टीने मात्र देवी जगदंबा,  मग ती पार्वती असो,  की लक्ष्मी,  जगाची माता आहे. शक्तिमान आहे. भक्तांच्या  मनोकामना  पूर्ण करणारी आहे. दुष्टांचे निर्दाळण करणारी आहे. एवढेच त्यांना पुरेसे असते.

देवीने अनेक असुरांचा नाश केला. शुंभ-निशुंभ, धूम्रवर्ण, रक्तबीज आणखी किती तरी… देवी महात्म्यात त्याचे वर्णन आहे. प्राचीन काळी कोलासुर नावाचा दैत्य स्त्रियांना फार त्रास द्यायचा. तेव्हा सर्व स्त्रियांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची प्रर्थना केली. मग त्यांनी कोलासुराचा नाश करण्याचे कार्य महालक्ष्मीवर सोपवले. महालक्ष्मीने कोलासुराला मारून लोकांना संकटमुक्त केले. या घटनेवरून त्या नगरीला कोल्हापूर हे नाव प्राप्त झाले. कोलासुर म्हणजे रानडुक्कर. ते शेतीची नासधूस करते. देवीने त्याला मारून शेतीचे रक्षण केले. म्हणून महालक्ष्मी ही समृद्धीची देवताही मानली जाते.

दुर्गा, महिषासुरमर्दिनी हेही त्या महालक्ष्मीचेच रूप. त्याबद्दल अशी कथा सांगितली जाते, की देव-दानवांचा संग्राम झाला. त्यात असुरांचा जय झाला. असुरांचा राजा महिषासुर इंद्र झाला. त्याने देवांचे अधिकार हिरावून घेतले. देव दीन झाले. ते ब्रह्मदेवाकडे गेले व त्याच्यासह शंकर आणि विष्णू यांच्याकडे गेले.  ते ऐकून शंकर क्रोधित झाले. त्यांच्यामुखापासून तेज निघाले, तसेच सर्व देवांच्या मुखातून तेज निघाले.  ते तेज एकत्र झाले. ते तेज एकत्र मिळून एक नारी झाली. पुढे देवी महात्म्यात म्हंटले आहे, ‘तीच भवानी जगदंबा । त्रैलोक्याची जननी अंबा । जी हरिहराते स्वयंभा। उत्पन्न करिती जाहली । म्हणजे, जिने देवांना उ्पन्न केले,  त्यांच्या तेजापासून तिनेभक्तकार्यासाठीपुन्हा अवतार घेतला, असे वर्णन आहे. शंकराच्या तेजापासून तिचे मुख झाले. यमाच्या तेजापासून केस,  विष्णूच्या तेजापासू नबाहू,  अशाप्रकारे विविध देवांच्या तेजापाससून तिचे विविध अवयव बनले. नंतर  सतत नऊ दिवस व नऊ रात्री तिने महिषासुर व असुर सैन्याशी युद्ध केले आणि महिषासुराचा व सर्व असुर सैन्याचा वध केला आणि देवांना आणि पृथ्वीला असुरांच्या तावडीतून मुक्त केले. या कालावधीत देवही तपश्चर्येला बसले होते. आपल्या तपाचे पुण्य त्यांनी देवीला अर्पण केले. अखेर नऊ दिवस आणि नऊ रात्रींच्या तुंबळ युद्धानंतर महिषासुराचा वध झाला. दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस.

क्रमशः......

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments