image_print

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ. ज्योत्स्ना तानवडे 

🌸  विविधा 🌸

☆ शांताबाईंचे ललित विश्व ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे 

अजून माझी उत्सुक ओंजळ

अजून ताजी फुले ||

या भावनेने शेवटपर्यंत स्वत:चा आणि जगाचा शोध घेणाऱ्या  सिद्धहस्त लेखिका म्हणजे शांताबाई शेळके. साहित्यातले विविधांगी प्रकार लीलया हाताळणाऱ्या शांताबाईंची अनेक रूपे आहेत.प्राध्यापिका, पत्रकार, कवयित्री, गीतकार, कथाकार, कादंबरीकार, अनुवादक, समीक्षक, ललितलेखक, संकलक, बालसाहित्यकार जणू आरसेमहालात दिसणारी असंख्य प्रतिबिंबच. यातले प्रत्येक रूप हे अंगभूत अशा अभ्यासू वृत्ती, उत्कटता, संपन्न साहित्य दृष्टी आणि रसिकतेने ओथंबलेले. सर्वच रूपे हवीहवीशी वाटणारी.

शांताबाईंच्या साहित्याच्या वाटेवरचा खरा जडणघडणीचा काळ होता तो सर परशुराम भाऊ कॉलेजमधली सहा वर्षे. इथे काही अभ्यासू सवयी लागल्या, जाणिवेच्या कक्षा रुंदावल्या, रसिकता डोळस झाली. त्यामुळे उदंड आशा,उल्हास आणि जीवनाबद्दल अपार आसक्ती वाटू लागली. एम.ए ची पदवी घेतल्यावर मुंबईत आचार्य अत्रे यांच्या ‘समीक्षक’ मासिक आणि ‘नवयुग’ साप्ताहिकात काम सुरू केले.खुद्द अत्र्यांसारख्या प्रतिभासंपन्न, सर्जनशील साहित्यिकाच्या सहवासात त्यांना साहित्यविषयक, वृत्तपत्रीय लेखनाचे वस्तुपाठच मिळाले. अनुवादक, समीक्षक, स्तंभलेखक, मुलाखतकार या शांताबाईंच्या रूपाचा पाया इथेच घातला गेला.

शांताबाईनी नामवंत वृत्तपत्रं आणि मासिकांमधील सदर लेखनाच्या निमित्ताने विपुल असे ललित लेखन केले. उत्कट जिज्ञासा,  भरपूर व्यासंग,मनुष्य स्वभावातील विविध छटांबद्दल असणारे तीव्र कुतूहल, निसर्गप्रेम आणि तरल काव्यात्म वृत्ती यामुळे शांताबाईंच्या ललित लेखनाला खास त्यांचे असे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. विविध संदर्भांनी संपन्न झालेली शैली आणि निवेदनातील जिव्हाळा यामुळे हे ललित लेख वाचणे हा एक अत्यंत आनंददायक असा अनुभव आहे.

यामुळेच ‘मदरंगी’, ‘एक पानी’, ‘जाणता -अजाणता’  यासारखे स्तंभलेखन आणि ‘आनंदाचे झाड’, ‘ सांगावेसे वाटले म्हणून’, ‘गुलाब – काटे- कळ्या’, ‘आवड-निवड’ यासारखे त्यांचे ललित लेखन खूपच वाचकप्रिय ठरले.

‘सांगावेसे वाटले म्हणून’ मधील सामाजिक जीवनात कसे वागावे  हे सांगणारा ‘ सलगी देणे ‘ हा लेख,त्याग करणारा व त्याचा गैरफायदा घेणारा यातील सीमारेषा दाखवणारा ‘ आयुष्याचे उखाणे ‘ लेख, आईवडिलांनी मुलांना देता येईल ते द्यावे अथवा देऊ नये, पण मनाप्रमाणे जगण्याचा त्यांचा अधिकार हिरावू नये हे सांगणारा ‘ ययातीचा वारसा ‘ लेख, आनंद आणि दुःख वाटून घेण्याचे महत्त्व सांगणारा ‘  हेमाला मुलगी झाली हो ‘ हा लेख, तसेच जाणता-अजाणता मधील दुःख-संकटातही जगणे आनंदी करणारां विषयी  ‘आत्मकरूणेची चैन ‘हा लेख, यशस्वी आणि अपयशी माणसांच्या मनोवृत्ती विषयी ‘ स्वार्था तुझा रंग कसा ‘ हा लेख, सहभोजनाचे महत्त्व सांगणारा ‘ कर्माबाईची खिचडी ‘हा लेख, जनमानसातील प्रतिमा आणि स्वतःच्या मनातील प्रतिमा जपणाऱ्यां विषयी ‘ प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट,’ हा लेख असे आयुष्याशी संबंधित सर्वच गोष्टींचा सर्वंकष आढावा घेणारे लेख वाचणे म्हणजे नव्याने आयुष्याचा अभ्यास करण्यासारखेच आहे.

शांताबाईंजवळ संपन्न साहित्यदृष्टी, रसिकता आणि प्रचंड मोठा व्यासंग होता.त्यांचे सगळेच लिखाण अतिशय सुंदर,अभिरुची संपन्न आहे. यातील ललित लेखनाचे वाचन करणे हा एक आनंददायी, आपले जगणे समृद्ध करणारा अनुभव  आहे.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments